‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
काळ्या रंगाच्या राणीची ही छोटीशी ओळख…
नओमी कॅम्पबेल ही सुपरमॉडेल 22 मे रोजी वयाची पन्नाशी पूर्ण करत आहे. खरंतर मॉडेलिंग या क्षेत्रात वय हा फॅक्टर मोठा असतो. पण नओमी जिथे असते तिथे सर्व नियम बाद होतात… फक्त ती सांगेल तो नियम… असा दबदबा नओमीनं कसा केला… ती सूपरमॉडेल झाली तेही अगदी कमी वयात… त्यात तिचा रंग काळा… या काळ्या रंगाच्या राणीची ही छोटीशी ओळख…
काही दिवसांपूर्वी म्हणजे कोव्हीडचा जेव्हा सर्व देशात प्रवेश होत होता, तेव्हा एक व्हिडीओ चर्चेत होता. हा व्हिडीओ होता नओमी कॅम्पबेलचा… सूपरमॉडेल… ती न्युयॉर्कला परत येत होती. कोव्हीडबाबत काळजी म्हणून नओमीनं स्वतःला पूर्ण कव्हर केलं होतं… अंग झाकेल असा एक किट तिनं घातला होता.. शिवाय विशिष्ट गॉगल, मास्क, हॅन्डग्लोज होतेच… विमानतळावर पोहचल्यावर तिने हॅन्डग्लोज न घातलेल्या तिथल्या कर्मचा-यांनाही स्वच्छतेचे आणि सुरक्षिततेचे धडे दिले होते. विमानात चढण्यापूर्वी व्हिटामीन सी असलेली ज्युसची पाकीटं फस्त केली होती. एवढ्यावरच नओमी थांबली नाही तर विमानात गेल्यावर आपली सीट आणि आसपासचे सामान तिने स्वतः डोटॉलने स्वच्छ पुसले… शिवाय सीटवरही आपल्याकडचे कव्हर घातले… नओमीनं हा व्हिडीओ आपल्या स्वतःच्या चॅनलवर म्हणजे Being Naomi वर शेअर केला… सुरुवातीला या व्हिडीओला अनेकांनी ट्रोल केले. नओमी उगीचच एवढी काळजी घेतेय असा ट्रोल करणा-यांचा कल होता. पण नंतर कोव्हीड-19 चे व्यापक रुप पहाता नओमीनं घेतलेली काळजी अगदी योग्य होती, असे स्पष्ट झाले. पण या सर्वाचा नओमीवर नक्की काहीही परिणाम झाला नसेल… वयाच्या 15 व्या वर्षाची असतांना ती मॉडेलिंगमध्ये आली. तेव्हापासून अनेकवेळा तिच्यावर टिका झाली. तिच्या काळ्या रंगावरुन तिला भेदभावाला सामोरे जावे लागले. पण नओमी नावाचे अस्त्र वेगळे आहे. नओमी आणि वाद यांचं नात जुनं आहे.
नओमी कॅम्पबेल या नावापुढे फॅशन जगतात सुपरमॉडेल हा मानाचा किताब लावण्यात आला आहे. नओमी आहेच सुपरमॉडेल… एक मॉडेल होण्यासाठी लागते तसा तिचा बांधा… पाच फूट दहा इंच उंची… काळेभोर केस आणि डार्क ब्राऊन रंगाचे डोळे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चेह-यावर आत्मविश्वास… या बळावर पन्नाशीला पोहचलेली ही सुपरमॉडेल आजही फॅशन जगतावर आपला दबदबा कायम ठेऊन आहे. या फॅशन जगतात नओमी अगदी आपसूक आली. नओमीची आई जमैकन नृत्यांगना… आई चार महिन्यांची गर्भवती असतांना नओमीच्या वडीलांनी तिला सोडून दिले. याचा राग ठेऊन नओमी आपल्या वडिलांना कधी भेटली नाही. हे कॅम्पबेल नाव तिला तिच्या सावत्र वडीलांकडून मिळाले. तिची आई नृत्याच्या कार्यक्रमासाठी देश-विदेशात फिरायची. अशावेळी नओमी नातेवाईकांकडे रहायची. आईच्या अनुपस्थितीत ती आईनं सांगितलेली कामं चोख करत असे… यातील प्रमुख काम म्हणजे नृत्याचा सराव… या मायलेकींचं नातं त्यातूनच अधिक दृढ झालं. पुढे म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी एका इंग्लिश गाण्याच्या व्हिडीओमध्ये नओमी दिसली. चौदा वर्षाची नओमी एका शॉपिंग मॉलमध्ये गेली तेव्हा मॉडेल एजन्सीमध्ये काम करणा-या एका महिलेची तिच्यावर नजर केली. शाळेच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या नओमीला तिने आपलं कार्ड दिलं आणि भेटायला बोलवलं. आपल्या आईबरोबर नओमी त्या ऑफीसमध्ये गेली. तिला तिथे बेथ बोल्ट भेटले. बेथ म्हणजे सिनॅक्रो मॉडेल एजन्सीचे प्रमुख… त्यानंतर एक वर्षातच म्हणजे वयाच्या सोळाव्या वाढदिवसाला नओमी टॉप फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजवर विराजमान झाली आणि तिची मॉडेल यात्रा सुरु झाली.
Vogue या ब्रिटीश मॅगझिनच्या मुखपृष्ठावर नओमी डिसेंबर 1987 मध्ये झळकली. एखाद्या काळ्या रंगाच्या मॉडलला प्रथमच हा मान मिळाला होता. सुपरमॉडेल हा किताब हातावर मोजण्यासारख्या कमी महिलांना मिळाला त्यातली नओमी ही एक आहे. आतापर्यंत हजाराहून अधिक मॅगझीनच्या कव्हरवर नओमीचं छायाचित्र आलं आहे. जगातील सर्व प्रसिद्ध फॅशन डीझायनरसाठी तिने मॉडेलिंग केले आहे. मान्यवर फोटोग्राफरमध्ये तिचे फोटो काढण्याची स्पर्धा असते. पॅरिस, मिलान, न्युयॉर्क शहारात हजारो फॅशन शोमध्ये तिने रॅम्पवॉक केला आहे. ती जिथे जाईल तिथे फोटोग्राफर तिच्या मागे असतात. यामुळे अनेकवेळा तिच्या आणि फोटोग्राफरच्या वादाच्या घटनाही झाल्या आहेत. ब्रिटीश एअरवेजने तिला बॅन केलं आहे. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर तिचं सामान हरवलं. त्यामुळे चिडलेल्या नओमीनं तिथे असलेल्या ऑफीसरबरोबर बाचाबाची केली. तिला शिक्षा म्हणून समाजसेवा करावी लागली. आणि 3000 डॉलर भरावे लागले होते. नओमीचा राग बहुधा तिच्या नाकाच्या शेंड्यावर आहे. त्यामुळे तिच्या सहका-यांना अनेकवेळा तिने फोन किंवा हाताला लागतील अशा वस्तू फेकून मारल्या आहेत. यासाठी तिला शिक्षा म्हणून रागावर नियंत्रण ठेवणारा अभ्यासक्रमही करावा लागला आहे.
असे असले तरी नओमी अनेक समाजसेवी संस्थाबरोबर जोडली गेली आहे. आपल्या शोच्या माध्यमातून ती करोडो रुपयांचा फंड गोळा करते. या फंडाचा उपयोग विद्यार्थी आणि महिलांसाठी नओमी करते. महिला आणि मुलींसाठी काही संस्थां तिने उभ्या केल्या आहेत. फॅशन शो करुन कटरिना वादळ, मुंबई अतिरेकी हल्ला, जपान भूकंप यांच्यासाठी मदत म्हणून फंड गोळा केला आहे. ब्राझिलमध्ये We Love Brazil नावाची चॅरिटी सुरु करुन स्थानिक महिलांच्या कलाकुसरीच्या वस्तूंसाठी बाजारपेठ मिळवून दिली. नओमीच्या या कार्यांचं कौतुक नेल्सन मंडेला यांना खूप होतं. ते नओमीचा उल्लेख आपली नात म्हणून करायचे.
नओमी भारतातही आली होती बर का… साडीमध्येही तिने कॅटवॉक केलं आहे. एक ज्वेलरी शो साठी नओमीनं मॉडेलिंग केलं. लॅक्मे फॅशन विकमध्येही नओमीची उपस्थिती होती. काळ्या रंगाच्या साडीमध्ये तीने कॅटवॉक करुन आपल्या चाहत्यांमध्ये भर घातली.
नओमीला आपल्या आईचा खूप अभिमान आहे. आपल्या आईमुळेच आपलं अस्तित्व आहे असं ती सांगते. दोघींनी एकत्र अॅड कॅम्पेंनही केलं आहे. कॅटवॉक कसा करायचा हे आईनं शिकवल्याचंही ती सांगते. कोणाची कॉपी करु नकोस… स्वतःची स्टाईल डेव्हलप कर ही आईची शिकवण खूप कामी आल्याचं नओमी सांगते. सिंगल मदर म्हणून आईचा संघर्ष खूप मोठा होता, आणि त्या आठवणी सांगतांना नओमी हळवी होते.
नओमी तिच्या स्टार रिलेशनमुळेही कायम चर्चेत राहीली. मान्यवर फॅशन डिझायनर, माईक टाईसन, एडी मर्फि, मायकल जॅक्सन यांची नावं तिच्या जवळच्या मित्रांमध्ये घेतली जातात. तिचं घरही तसंच आहे… तिच्यासारखं… सतत चर्चा करण्यासारखं. हजारो एकरवर असलेल्या तिच्या घराचा आकारच मुळी डोळ्यासारखा आहे. इको फ्रेंन्डली म्हणून हे घर डीझाईन केले आहे. करोडो रुपयांत या घराची किंमत करण्यात येते.
आता नओमीच स्वतःचं चॅनेल आहे. Being Naomi. लॉकडाऊनच्या काळात ती तिच्या फॅशन डिझायनर सहका-यांबरोबर संवाद साधते. मिलान, पॅरिस, लंडन, न्युयॉर्क येथील फॅशन डिझायनर, मॉडेल यांच्याबरोबर गप्पा मारते. तेथील लॉकडाऊन आणि कोरोनाचे अनुभव ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते. मिलान आणि पॅरीस येथील फॅशन डिझायनरबरोबर बोलतांना आणि तेथील आत्ताचे अनुभव ऐकल्यावर नओमी भावूकही होते. गेली अनेक वर्ष या शहरांमध्ये नओमी फिरली आहे. या फॅशनच्या जगताची ती राणी… हे जगच उजाड झाल्याने नओमी आपल्या सहका-यांचे अनुभव ऐकतांना हळवी होत आहे.
नओमीला सतत प्रवास करायला आवडतं. हवेत रहाणं…. असं ती प्रवासाचं वर्णन करते. 30 वर्षापेक्षा जास्त तिने फॅशन जगतावर राज्य केलं आहे. अनेक नामांकित कंपन्यांसाठी मॉडेलिंग केलं आहे. एक ब्लॅक म्हणजे काय याचा अनुभव घेतला आहे. पण या ब्लॅक रंगातला काळेपणा आपल्या यशाच्या आड तिनं कधीच येऊ दिला नाही. माझ्याकडूनही अनेक चुका झाल्या… मी माणूस आहे. चुका होणारच… पण यातूनच मी सुधारले… असं सांगून नओमीं आपल्या प्रामाणिकपणाची कबूली देते. नओमीच्या या सरळ बोलांमुळेच या फॅशन जगताची ती राणी आहे….
सई बने