‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
स्वराज्याकडे वाकड्या नजरेतून बघणा-या कोणत्याही सैतानाची फत्ते होऊ द्यायची नाही….
स्वराज्याकडे वाकड्या नजरेतून बघणा-या कोणत्याही सैतानाची फत्ते होऊ द्यायची नाही…. आई भवानीच्या साक्षीनं जिजाबाईची भूमिका साकारणारी, मृणाल कुलकर्णी जेव्हा हे वाक्य बोलते, तेव्हा थेअटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो… मृणाल कुलकर्णी म्हणजे जिजाबाई हे समीकरण बनलंय… मृणालनं आत्तापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलंय. मालिकाही केल्यात. पण तिने केलेल्या ऐतिहासीक चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकांना तोड नाही. मग ती रमा असो, गोपिकाबाई असो, अहिल्याबाई होळकर असो, जिजाबाई असो… मृणालनं प्रत्यक्षात या सर्व कतृत्वान महिलांना आपल्या समोर उभं केल्याचा भास होतो.
मृणाल कुलकर्णी पूर्वाश्रमीची मृणाल देव. आजोबा गोपाळ निळकंठ दांडेकर. आई विणा देव, प्राध्यापिका आणि प्रख्यात साहित्यिका. वडील प्राध्यापक विजय देव. या साहित्यिक घरात जन्मलेल्या मृणालची पहिल्यापासून भाषेवर हुकूमत… ती स्वतः उत्तम वाचक आणि लेखकही. अभ्यासू वृत्ती. हे तिचे सर्व गुण तिला आपल्या भूमिका साकारतांना उपयोगी पडले. मृणालला पहिलीच मालिका मिळाली ती स्वामी. रणजीत देसाई यांच्या कांदबरीवरील मालिका. सोळा वर्षाची मृणाल स्वामी मालिकेत रमाबाईंच्या भूमिकेत दिसली. माधवराव पेशव्यांच्या भूमिकेत रविंद्र मंकणी होते. ही मालिका खूप गाजली. मृणालच्या रमाबाईच्या भूमिकेनं तर प्रेक्षकांना भूरळ घातली. मूळतः शांत, संयमी स्वभावाची मृणाल या रमाबाईंच्या भूमिकेत चपखल बसली. या मालिकेपासून मृणालचा आणि अभिनयाचा प्रवास सुरु झाला. मराठमोळ्या वातावरणात वाढलेल्या मृणालकडे मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकाही आल्या. तेव्हा आपल्याला हिंदीही परफेक्ट बोलायला हवं या जाणिवेतून तिनं चक्क हिंदी बोलण्याच्या सरावासाठी क्लास लावला होता. याचा फायदा असा झाला की, मृणालला दि ग्रेट मराठा नावाची ऐतिहासिक मालिका मिळाली. त्यात ती खंबीर राजकारणी अहिल्याबाई होळकर यांच्या भूमिकेत होती. अहिल्याबाई शांत, संयमी होत्या. शिवभक्त असलेल्या अहिल्याबाईंची भूमिका साकारतांना मृणालच्या चेह-यावरील सात्विक भाव लक्षात राहीला. तिच मृणाल दौपदीच्या भूमिकेत मनातला द्रोह व्यक्त करतांना अग्निशिखेसारखीच दिसली.
नितीन सरदेसाई यांच्या राजा शिवछत्रपती या मालिकेत मृणाल नं साकारलेली राजमाता जिजाबाईची भूमिका कोण विसरेल. मोत्याची नाजूक चिंचपेटी, त्याच्याजोडीला सोन्याची चिंचपेटी, ठुशी, मोहनमाळ, बेलपान लफ्फा, लफ्फा गादी, पुतळ्यांचा हार, कोल्हापुरी साज, कंबरपट्टा, हातात हिरवा चुडा, तोडे, कानात मोठे झुमके, नाकात ठसठशीत मोत्यांची नथ, गळ्यात काळ्या मण्यांचं गंठण, पायात मोठी जोडवी आणि कपाळवार या दागिन्यांना साजेशी मोठी चंद्रकोर, हातात तलवार… मृणालनं साकारलेली ही राजमाता जिजाबाईची भूमिका खूप गाजली. यात मृणालनं घातलेल्या दागिन्यांचीही खूप चर्चा होती. आपले मराठी दागिने खरे प्रमोट केले ते या मालिकेतून मृणालनेच. शिवाजी महाराजांना घडवणारी राजमाता जिजाबाई, महाराज अफजलखानाला भेटायला जातांना चिंतेत असणारी आई, आपला मुलगा मुघलांच्या कैदेत असतांना त्यानं मिळवलेलं स्वराज्य कसोशीनं सांभाळणारी आई ते राज्याभिषेक सोहळ्याचे सुख तृप्त डोळ्यानं अनुभवणारी आई… अशी विविध रुपं या मालिकेत मृणालनं साकारली आहेत. प्रत्येक रुपात मृणालच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे.
स्वामी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणा-या मृणालनं रमा माधव नावाचा चित्रपटही काढला आहे. या चित्रपटात तिनं तिहेरी भूमिका केली आहे. ती या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. लेखिका आहे. शिवाय या चित्रपटात तिने गोपिकाबाई पेशवे यांची भूमिका केली आहे. विशेष म्हणजे यात रविंद्र मंकणी यांनी नानासाहेब पेशव्यांची भूमिका केली आहे. आत्ता आलेल्या फत्तेशिकस्त या चित्रपटात पुन्हा करारी जिजाबाईच्या भूमिकेत दिसली आहे. दोन्ही हातात तलवार घेऊन आपल्या मुलाच्या मागे समर्थपणे उभी असलेली तिच्या रुपातील जिजाबाई बघितली की पुन्हा एकदा जाणवतं मृणाल कुलकर्णी शिवाय जिजाबाई कोणी साकारु शकत नाही. कोणत्याही मराठ्याचं रक्त इतकं स्वस्त नाही हे त्या शाहीस्त्याला कळूद्या हे जेव्हा ती आपल्या भारदस्त आवाजात म्हणते, तेव्हा मराठी जनांच्या अंगात चैतन्य सळसळतं… तिची करारी नजर, भाषेवरील प्रभुत्व याला तोड नाही.
मृणालनं अनेक भूमिकांमधून आपल्याला भूरळ घातली आहे. पण काही चेहरे विशिष्ट कारणासाठी कायम लक्षात रहातात… त्यापैकी एक म्हणजे मृणाल कुलकर्णी… राजमाता जिजाबाई यांचा चेहरा म्हणून तिला ओळख मिळाली आहे. राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित ही अभिनेत्री वाढत्या वयाबरोबर अधिक परिपक्व होत चालली आहे. तिच्या भावी प्रवासाला कलाकृती मिडीयाच्या शुभेच्छा..
सई बने