‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टिवन स्पीलबर्ग यांनी सुद्धा त्यांच्या चित्रपटात ह्या श्रेष्ठ अभिनेत्याला संधी दिली होती…!
वयाची चाळीशी उलटल्यावर एक अभिनेता चित्रटात येतो. त्याच्या अभिनयाची जादू चालते… ती सुद्धा व्हीलन म्हणून… मग त्याची व्हीलनची भूमिका असायलाच हवी अशी निर्मात्यांची मागणी येऊ लागते…. या अभिनेत्यानं चारशेहून अधिक चित्रपटात काम केलं. त्याचे काही डायलॉग तर आजही आयकॉन आहेत… त्यापैकी एक म्हणजे मोगॅंबो खूष हुआ…. अर्थात जेष्ठ अभिनेते अमरीश पुरी. 22 जून 1932 रोजी पाकिस्तानमधील लाहौरमध्ये त्यांचा जन्म झाला… खलनायक म्हणून प्रसिद्ध झालेले अमरीश पुरी यांचे हिंदी चित्रपट सृष्टीतील योगदान महत्त्वाचे आहे.
अमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी हिंदी चित्रपटात कार्यरत होते. शिमल्यामधील कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करुन अमरीश पुरी सरकारी नोकरीत दाखल झाले. वीस वर्ष सरकारी नोकरी करुन त्यांनी राजीनामा दिला आणि नाटकामध्ये काम करु लागले. पंडित सत्यदेव दुबे दिग्दर्शित अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्याकाळी त्यांचे नाटक बघण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधीही नियमीत येत असत. अमरीश पुरी यांनी चित्रपटात काम करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्यांच्यावर क्रुड अॅण्ड हार्श फेस… असा शेरा मारुन त्यांना नकार देण्यात आला. दरम्यान त्यांनी काही जाहीराती केल्या. रेश्मा आणि शेरा हा चित्रपट सुखदेव करत होते. त्या चित्रपटासाठी अमरीश यांना विचारण्यात आले. काही दिवसांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून सुनील दत्त यांनी सूत्र हाती घेतली. तेव्हा अमरीश पुरीसुद्धा या चित्रपटासाठी हो म्हणाले आणि त्यांचा मोठ्या पडद्यावर प्रवेश झाला.
पण त्यानंतर त्यांच्याकडे काही खास चित्रपट आले नाहीत. अमरीश पुरी हे नाट्य कलावंत… त्यामुळे श्याम बेनेगल या कलाकाराला ओळखत होते. बेनेगल यांनी त्यांना साथ दिली… दर्जेदार चित्रपट दिले. निशांत, मंथन मध्ये पुरी यांना संधी मिळाली. अर्थात अमरीश पुरी यांनी या संधीचं सोनं केलं. त्यानंतर गोविंद निहलानी यांचा अर्धसत्य हा चित्रपट आला. तिथून हा उंच, दणकट बांध्याचा खलनायक हिंदी चित्रपटांचा अविभाज्य भाग बनला.
त्यानंतर हम पांच, विधाता, हिरो सारखे चित्रपट चर्चेत होते. पण शेखर कपूर यांच्या मिस्टर इंडीयानं कमाल केली. हिरोबरोबर व्हीलनही तेवढाच लोकप्रिय होऊ शकतो, हे अमरीश पुरी यांनी दाखवून दिलं. सोबत मोगॅंबो खूष हुआ… हा अजरामर डायलॉगही दिला. त्यांचा हा मोगॅम्बो बघून हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टिवन स्पीलबर्ग यांनी त्यांच्या इंडियाना जोन्स अॅण्ड दि टेम्पल ऑफ डूम या चित्रपटात अमरीश पुरी यांना संधी दिली. हा चित्रपट हॉलिवूडमध्ये चांगलाच चालला. त्यामुळे पुरी यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली.
वयाच्या चाळीपासून चित्रपटात आलेल्या या अभिनेत्यानं काही काळ व्हिलनच्या भूमिका केल्या. पण त्यानंतर मात्र सौम्य, सोज्वळ भूमिकाही केल्या… प्रेम पुजारी, चाची 420, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, दामिनी, गर्दिश, गदर, घातक, घायल, हीरो, करण अर्जुन, कोयला, मंथन, मेरी जंग, मुस्कराहट, नगीना, फूल और कांटे, राम लखन, ताल, त्रिदेव, विधाता, गांधी यासारख्या त्यांनी केलेल्या काही चित्रपटांवर नजर टाकली तरी अंदाज येतो अमरीश पुरी किती श्रेष्ठ अभिनेते होते.
अमरीश पुरी यांनी अनेक मल्याळम, तामिळ चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. वयाची सत्तरी ओलांडल्यावरही हा अभिनेता मोस्ट डिमांड या यादीत होता. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तेव्हा किसना नावाचा चित्रपट ते करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला.
अमरीश पुरी जरी आपल्यात आता नसले तरी त्यांच्या मोगॅंबो या डायलॉगने ते कायम त्यांच्या चाहत्यांच्या मनात राहतील हे नक्की….
सई बने