‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘के’ आद्याक्षराच्या मुव्हीज निर्मिती आणि दिग्दर्शित करणारा पिता…
राकेश रोशनची आजच्या ग्लोबल पिढीतील ‘मुव्हीज’ रसिकांची ओळख असेल ती ह्रतिक रोशनचा पिता. आपल्या हॅन्डसम आणि तेजतर्रार डान्स शैली असलेल्या पुत्रासाठी “कहो ना प्यार है” (२०००) पासून ‘के’ आद्याक्षराच्या मुव्हीज निर्मिती आणि दिग्दर्शित करणारा पिता.
तर खूप मागची पिढी म्हणेल, साठच्या दशकात ‘रहे ना रहे हम महेका करेंगे’ (ममता), जो वादा किया वो निभाना पडेगा (ताजमहाल), अब क्या मिसाल दू तुम्हारे शबाब की (आरती), कभी तो मिलेगी, कही तो मिलेगी (आरती), मिले न फूल तो काटों से दोस्ती करली (अनोखी रात), मैने शायद तुम्हें पहले भी कभी देखा है (बरसात की रात) अशा सर्वकालीन लोकप्रिय श्रवणीय संगीत असलेल्या गाण्यांचा संगीतकार असलेल्या रोशन यांच्या दोन पुत्रांपैकी राकेश रोशन अभिनयाच्या क्षेत्रात तर दुसरा राजेश रोशन पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपट संगीतकार झाला.
पण पिता हिंदी चित्रपटाचे यशस्वी संगीतकार असले तरी त्या काळात ‘अर्थकारणा’ ला प्रचंड महत्व वगैरे नव्हते. ‘कलेसाठी कला’ अशी बांधिलकी होती. मोठे स्टार चांगले मानधन घेत, पण त्याच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ होत नसत. संगीतकार वगैरेंच्या कमाईपेक्षा तेव्हाचा मिडिया आणि चाहत्यांचे लक्ष दर्जेदार कामाकडे असे. म्हणूनच तेव्हाचे चित्रपट आणि त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. तात्पर्य, कौटुंबिक इकॉनॉमी स्थिती भारी नसल्याने राकेश रोशनने हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकले. मोहनकुमार यांच्याकडे ‘अंजाना’ (राजेन्द्रकुमार आणि साधना) यांजकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वावरत असतानाच राजेन्द्रकुमारने शिफारस केल्याने चाणक्य दिग्दर्शित ‘मन मंदिर’ (संजीवकुमार आणि वहिदा रहेमान) या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली. आणि अशातच मग मेहनती स्वभाव आणि निर्माता दिग्दर्शकांशी भेटीगाठी यातून साधारण एकाच वेळेस बी. नागी रेड्डी यांचा ‘कहानी घर घर की’ (१९७०, नायिका भारती), राजेंद्र भाटीया यांचा ‘पराया धन’ (१९७१, नायिका हेमा मालिनी), जे. ओम प्रकाश यांचा ‘ऑखो ऑखो मे’ (१९७२, नायिका राखी) असे चित्रपट मिळाले आणि हीरो म्हणून करियर सुरु तर झाली. (याच जे. ओम प्रकाश यांच्या मुलीशी कालांतराने राकेश रोशनचा विवाह झाला). तर ‘हीरो’ म्हणून वाटचाल करताना मार्ग अवघड होता. राजेश खन्नाच्या क्रेझने आणि त्याच्या लागोपाठ सतरा सुपर हिट चित्रपटाने वातावरण ग्लॅमरस केले होते. शशी कपूर,धर्मेंद्र, जितेंद्र, संजीवकुमार यांची चलती असतानाच विनोद खन्ना आणि शत्रूघ्न सिन्हा व्हीलनगिरीकडून हीरोगिरीकडे आले. अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावत असतानाच ऋषि कपूरही आला. अशी तगडी आव्हाने होती आणि विनोद मेहरा सगळ्यांशी जुळवून आपली करियर व्यवस्थित आखत होता. तात्पर्य, राकेश रोशनपुढे दोनच पर्याय होते. शक्य असेल तर ‘सोलो हीरो’ (एक कुंवारा एक कुंवारी, खट्टा मिट्टा इत्यादी) अथवा ‘दोन हीरो’ चे चित्रपट (जखमी, खेल खेल मे, हत्यारा, बुलेट, देवता इत्यादी) असे मार्ग स्वीकारणे. ‘शोले’ (१९७५) पासून मारधाड फिल्म आणि मल्टी स्टार कास्ट असे दोन ट्रॅक सुरु झाले आणि राकेश रोशनला जितेंद्र, ऋषि कपूर यांच्या चित्रपटात सहनायक/दुसरा नायक असा करावा लागलेला प्रवास त्याच्या पथ्यावर पडला.
एकीकडे ते चांगले मित्र झाले (हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात दुर्मिळ गोष्ट) आणि शक्य तेव्हा जुहूच्या सन अॅण्ड सॅण्ड हॉटेलमध्ये शनिवार रविवार एकत्र येऊ लागले. दुसरीकडे राकेश रोशनने ‘फिल्म क्राफ्ट’ ही निर्मिती संस्था स्थापन केली आणि सुरेन्द्र मोहन यांजकडे दिग्दर्शन सोपवत ‘आप के दीवाने’ (१९८०) केला. पहिल्याच चित्रपटात ऋषि कपूर हीरो आणि टीना मुनिम नायिका. तसेच स्वतः दुसरा हीरो. आणि जितेंद्रचे पाहुणा कलाकार म्हणून एक डान्स गीत. संगीत अर्थात राजेश रोशन. मग के. विश्वनाथ दिग्दर्शित ‘कामचोर’ (१९८०) मध्ये स्वतः हीरो आणि जयाप्रदा नायिका. पुन्हा संगीत अर्थात राजेश रोशन आणि गाणी आजही लोकप्रिय. मुंबईत मेन थिएटर नॉव्हेल्टीमध्ये मॅटीनी शोला रौप्यमहोत्सवी यश हिट. राकेश रोशनचा ‘निर्माता’ म्हणून आत्मविश्वास वाढल्याचे त्याच्या ‘भगवानदादा’ (१९८६) च्या मेहबूब स्टुडिओतील मुहूर्ताला मी हजर असताना अनुभवता आले. यात रजनीकांत, टीना मुनिम आणि स्वतः तो! राकेश रोशन मिडिया क्रेझी कधीच नव्हता. पण आपल्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग कव्हरेजसाठी आम्हा सिनेपत्रकारांचे आवर्जून स्वागत करणार. चहा आठवणीने देणार. तेव्हा फारसं काही बोलणार नाही. त्यासाठी सांताक्रुझच्या त्याच्या ऑफिसमधे तो आमंत्रित करणार. ‘खुदगर्ज’ (८८) पासून दिग्दर्शनातही आत्मविश्वासाने वाटचाल सुरु केली. मुंबईत मेन थिएटर मेट्रोमधील ‘खुदगर्ज’ चा स्टायलीश आणि ग्लॅमरस प्रीमियर म्हणजे “यादगार पल” ठरला. एकेकाळचा सहाय्यक दिग्दर्शक आज स्वतंत्र शैलीचा दिग्दर्शक म्हणून उभा राहिला होता. आणि तेव्हाच ‘के’ आद्याक्षराने आपल्या चित्रपटाचे नाव त्याला प्रिय झाले. खून भरी मांग, किशन कन्हया इत्यादी….
मग एकेका चित्रपटासोबत राकेश रोशन निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून एस्टॅब्लिज होत गेला. आपल्या एकेकाळच्या नायिका राखीला त्याने ‘करण अर्जुन’ (१९९५) मध्ये सलमान- शाहरूखच्या आईची भूमिका देत दिग्दर्शन केले. काही हिट, काही फ्लॉप्स अशी वाटचाल सुरु राहिली.
‘कहो ना प्यार है’ च्या वेळी सुपूत्र ह्रतिकच अभिनय क्षेत्रात आला तेव्हा जुहूच्या कविता बिल्डिंगमध्ये भेटलेल्या राकेश रोशनमध्ये ‘आपल्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या रिलीज’ ची काळजी असलेला पिता प्रकर्षाने जाणवला. यावेळी पहिल्यांदा राकेश रोशनने मिडियासाठी बरेच दिवस राखून ठेवले आणि रोज फक्त आम्हा एक दोन सिनेपत्रकाराना भेटत होता. त्याच्या घरात त्याच्या ‘दुसरा नायका’ च्या भूमिका असलेल्या पूर्वीच्या ‘धनवान’, ‘आखिर क्यू’ अशा हिट चित्रपटाच्या ट्रॉफीज आजही डोळ्यासमोर आहेत. पण तो ‘फ्लॅशबॅक’ मध्ये जाण्याच्या मूडमध्ये नव्हता. ‘कहो ना प्यार है’ पासून त्यालाही दिग्दर्शक म्हणून आणि पिता म्हणून नवीन वाटचाल सुरु करायची होती.
कदाचित कल्पना नसेल पण मनोरंजन चॅनलवर ‘कहो ना प्यार है’ ‘पासून टीझर संस्कृती सुरु झाली. पहिल्याच टीझरमधील ह्रतिकची नृत्य स्टाईल आणि राजेश रोशनचा म्युझिक पीस एकदम इम्प्रेसिव्ह ठरला.
मुंबईत मेन थिएटर इरॉसला फस्ट डे फर्स्ट शो पासूनच ‘कहो ना प्यार है’ ला युवा पिढीची हाऊसफुल्ल गर्दी झाली, सिनेमा हीट झाला आणि काही महिन्यांनी राकेश रोशनने आपले कार्यालय ओशिवरा येथे नेले. आणि मग राकेश रोशन दिग्दर्शक आणि ह्रतिक हीरो अशा ‘के’ कारी हिट फिल्मचा धडाका लागला.
‘कोई मिल गया’ (२००३) च्या वेळेस त्याच चकाचक ऑफिसमधे भेटलेल्या राकेश रोशनमध्ये आपला पुत्र स्टार झाल्याचा आणि तो आपल्या प्रत्येक भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत असल्याचे समाधान होते.
राकेश रोशनची “योग्य वेळी योग्य निर्णय घेत” तब्बल पन्नास वर्षे यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे.