Sagar Karande : पोस्ट लाईक्सच्या नादात सागरला ६१ लाखांचा गंडा!

निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन ह्यांनी असं काय केलं की ग्लॅमर डॉल शिल्पा एका रात्रीत स्टार झाली…?
सिनेमाचा मुहूर्त / शूटिंग / पार्टी / रिॲलिटी शो / प्रीमियर / भव्य स्टेजवर इव्हेन्टस / आऊटडोअर शूटिंग / पोस्टर फोटो शूट / सोशल मिडिया असे काहीही असू देत, शिल्पा शेट्टीच्या दोन गोष्टी असणारच… तिचा दांडगा ओसंडून वाहणारा उत्साह आणि लक्षवेधक फिटनेस. बरं, हे आजचे नाही. तर व्हीनस निर्मित आणि अब्बास मस्तान दिग्दर्शित ‘बाजीगर’ (१९९३) पासून आहे. तब्बल २७ वर्षे आपली अशी सकारात्मक प्रेझेंटेबल पर्सनालीटी मेन्टेन करणे सोपे नाही. खाण्यापिण्याच्या अनेक मोहांवर कमालीचा संयम, स्पर्धेचा तणाव येऊ न देण्याची ठाम वृत्ती, योगा आणि व्यायामासाठी बराच वेळ देण्यासाठी चित्रपट आणि रिॲलिटी शो यांची संख्या नियंत्रणात ठेवणं हे सगळेच जमायला / जपायला हवे. त्यात ती यशस्वी ठरलीय आणि नायिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही ती छान कार्यरत आहे. या काळात फॅशन फंडाही बदलला, पण शिल्पा शेट्टीने पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही प्रकारच्या वस्रात तितकाच ग्लॅमरस लूक कायम ठेवला. आपल्या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण यांचे वारे वाहू लागले तेव्हाच शिल्पा शेट्टीने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि या नवजगाशी ती फिट्ट ठरली.
खरं तर शिल्पा शेट्टीचा पहिला चित्रपट होता, ‘गाता रहे मेरा दिल’ (१९९२). यश चोप्रा यांच्याकडे अनेक वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेला दिलीप नाईक या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत होता (‘नाखुदा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचेच आहे). आणि रोहित रॉय आणि रोनित रॉय हे तिचे दोन नायक होते. शिल्पा तेव्हाच्या अलिखित रिवाजानुसार आपल्या आई बाबांसोबत आली होती. ते तसे गरजेचे असते. याचे कारण म्हणजे, नवीन वातावरणाला सामोरे जाताना फॅमिली सपोर्ट महत्वाचा असतोच. अंधेरीतील नटराज स्टुडिओत या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी अभिनेता सुरेश भागवतशी भेट झाली तेव्हा समजले की, त्याच्या शिफारशीवरुन शिल्पा शेट्टीला हा रुपेरी पदार्पणाचा पहिला ब्रेक मिळाला आहे. याचे एक कारण म्हणजे दोघेही चेंबूरचे रहिवासी आणि त्यांचे अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत. शेजारधर्म पाळण्याचा तो काळ. सुरेश भागवतनेच शिल्पा शेट्टीशी “पहिली भेट” करुन दिली तेव्हा पहिले लक्षात आले की ती मराठीत बोलते. हिंदी चित्रपटसृष्टीतील महाराष्ट्रीय कलाकार मराठीत बोलला की तो काहीसा जवळचा वाटतो. त्याच्यातील आणि आपल्यातील अंतर कमी होते. अर्थात हे मराठीवरील प्रेमातून घडते. तेव्हा आपल्या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताचा उत्साह तिच्या बोलण्यात आणि देहबोलीत जाणवला. पण “सिनेमाच्या जगात असे अनेक नवीन चेहरे येतात, दोन चार चित्रपटानंतर गायब होतात” असा दीर्घकालीन अनुभव असल्याने या भेटीत मी तरी फारसा इम्प्रेस झालो नाही. त्याकाळात माधुरी दीक्षित, मीनाक्षी शेषाद्री, मनिषा कोईराला, जुही चावला, शिल्पा शिरोडकर, रविना टंडन, नीलम, सोनम फॉर्मात होत्या. काजोल, करिष्मा कपूर, नगमा, पूजा भट्ट, उर्मिला मातोंडकर यांची वाटचाल सुरु झालेली. त्यात शिल्पा शेट्टीला स्पेस ती कुठे आहे असा प्रश्न होताच. आणि अशातच तीन चार रिळांनंतर हा चित्रपटच बंद पडला.
पहिल्याच चित्रपटाचा तो सेटवरच असताना ‘द एण्ड’ म्हणजे अधिकच अवघड असते. या चित्रपटसृष्टीत यश म्हणजेच सर्व काही असते, पण त्यासाठी अगोदर हातात चित्रपट हवा आणि मग यशाचे टॉनिक.
‘बाजीगर’ने शिल्पा शेट्टीची इनिंग सुरु ठेवली. तरी त्यात शाहरूख खानसोबत एक गाणे (किताबे बहुत सी पढी होगी तुमने) आणि त्याच्याच हातून हत्या, एवढेच फूटेज. त्यामुळे शाहरूख आणि काजोल भाव खाऊन गेले.
पण शिल्पाला व्यावसायिक वृत्तीने हात दिला (या क्षेत्रात वागणे पहिल्या क्रमांकावर असते असे अनेक उदाहरणांतून दिसेल) व्हीनसच्याच समीर माल्कन दिग्दर्शित ‘मै खिलाडी तू अनाडी’ (१९९४) मध्ये अक्षयकुमारसोबत तिला संधी मिळताच तिने आपल्या लूकवर लक्ष केंद्रित केले. याच चित्रपटातील अक्षय – शिल्पाने ‘चुरा के दिल मेरा, गोरीया चली’ हे मॉरीशसच्या निळ्याशीर समुद्रात आणि वाळूत असे काही प्रेझेन्ट केले की सिनेमाचा तोच हायपॉईंट ठरला. काय योगायोग आहे पहा, तेव्हाच म्युझिक वाहिन्यांचे पेव फुटले आणि त्यावर याच गाण्याचे हॅमरिंग सुरु झाले. लोकप्रिय गाण्यांमुळे चित्रपट सतत फोकसमध्ये राहतो तो हा असा. म्हणून चित्रपटात गाणी हवीत.

पिक्चर हिट झाला हो, पण शिल्पा शेट्टी म्हणजे ग्लॅमर डॉल अशी प्रतिमा अथवा इमेज. त्यावर नवीन चित्रपट ते किती मिळणार? अशातच काय घडले माहित्येय? तेव्हाचे निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना मुंबई, दिल्ली अशा काही ठिकाणी पत्रकार परिषदेत एक सहजच प्रश्न विचारला गेला, तुमची आवडती अभिनेत्री कोण?
प्रश्न पूर्ण होतोय तोच शेषनजी म्हणाले “शिल्पा शेट्टी”!
ही वृत्तपत्रातील चौकटीची बातमी ठरली आणि शिल्पा शेट्टी स्टार झाली. सिनेमाच्या जगात असे काहीही घडू शकते, तसे हे घडले….
आणि एकदा का स्टार झाल्यावर शिल्पा शेट्टीने चित्रपटांची संख्या वाढवण्यापेक्षा अधूनमधून सिनेमा, कधी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘बीग बॉस’, तर कधी इकडे एखादा रिअॅलिटी शो अशी वाटचाल आखताना आपली पर्सनॅलिटी व्यवस्थित मेन्टेन केली.
शिल्पाला प्रचंड आनंद झाल्याचे अनुभवले ते के. सी. बोकाडिया निर्मित ‘लाल बादशाह’ च्या (१९९९) गोरेगावच्या फिल्म सिटीतील मुहूर्ताच्या वेळी! अमिताभसोबत मनिषा कोईराला आणि शिल्पाने मुहूर्त दृश्य दिले, फटाफट फ्लॅश उडाले, काही काळाने बच्चनसाहेब आपल्या व्हॅनिटीत बसून निघाले आणि शिल्पा शेट्टीने आम्हा प्रत्येक सिनेपत्रकाराशी मनसोक्त मनमुराद संवाद साधला. त्यासाठी बराच काळ ती थांबली.
मला वाटतं, बोलण्यातील मोकळेपणा आणि प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीतील आनंद घेण्याची सकारात्मक वृत्ती यामुळेच शिल्पा आपल्या फिटनेससह प्रेझेंटेबल लूक जपण्यात कायमच यशस्वी ठरलीय….
