मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
१९३६ पासून आजपर्यंतचा चित्रपट सृष्टीतील विठ्ठलाचा महिमा…..
अवघ्या महाराष्ट्राला विठ्ठल नावाची भूरळ पडली आहे. हा काळा देव आमचा आत्मा आहे. तो चराचरात आहे. त्याचं कारण म्हणजे तो अगदी साधा… भोळा… भक्तांच्या हाकेला धावणारा आहे. या अशा विठ्ठलावर मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट निघाले… आणि अनेक निघतीलही…
विठ्ठल…. विठ्ठल….
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम |
पंढरीनाथ महाराज की जय!
आज आषाढी एकादशी… महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या नामघोषात दंग असलेला आजचा दिन… या विठ्ठलाची आम्हाला एवढी भूरळ आहे की तो आम्हाला सर्व रुपात हवा असतो. हा विठ्ठल आहेच तसा… काळा सावळा… भाबडा… त्याचेच हे मोहक रुप अनेक रुपात सर्वत्र असते. मग यापासून चित्रनगरी तरी वेगळी कशी राहील. आजवर अनेक चित्रपट विठ्ठलावर निघाले. काही चित्रपटात विठ्ठलाचा नामघोष झाला. विठ्ठल भक्तांवर निघालेल्या चित्रपटांचा समृद्ध खजिना आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यात दिवसेंदिवस भर पडते आहे…. आणि पडत रहाणारच… पांडुरंग… विठ्ठल… वारी… पंढरपूर… यांनी मराठी चित्रपट सृष्टीला ख-या अर्थानं संपन्न केलंय.
विठ्ठल भक्तीचा मार्ग सामान्यांना दाखवला तो तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांवर पहिला चित्रपट आला तो 1936 मध्ये. संत तुकाराम या नावानं आलेल्या या चित्रपटाची निर्मिती विष्णुपंत गोविंद दामले यांनी केली. हा चित्रपट म्हणजे विठ्ठलभक्तांसाठी मायाजाल ठरला. सर्वत्र या चित्रपटाचीच जादू पसरली. 5 व्या व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये या चित्रपटाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रभात फिल्मचा हा चित्रपट. लेखक शिवराम वाशीकर आणि दिग्दर्शक व्ही दामले. तुकाराम महाराजांच्या भूमिकेत विष्णुपंत पागनीस होते. हा चित्रपट म्हणजे चमत्कार ठरला. त्यातील अभंग सर्वमुखी झाले. आधी बीज एकले… बीज अंकुरले रोप वाढीले…. म्हणत तुकाराम महाराज जेव्हा तल्लीन व्हायचे त्यांच्यासोबत अवघा प्रेक्षकावर्ग तल्लीन व्हायचा…. आवलीला सोडून तुकाराम महाराज जेव्हा सदेह वैकुंठाला जातात तो तर क्लायमॅक्स ठरला. विमान उडते तो क्षण पहायला अजूनही विलक्षण वाटतो… त्याकाळी तर अचंबित करणारा तो क्षण होता. पांडुरंग हरी पांडुरंग हरी च्या नादात तुकाराम महाराज विठठलाचं वर्णन करतात… त्यांना नेण्यासाठी गरुडाचे वाहन येते… आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा… हा अभंग सरु होतो… आणि चित्रपटात तुकाराम महाराजांच्या भक्तांचे डोळे पाणावतात… त्याचवेळी हा चित्रपट बघायला आलेले विठ्ठल भक्तही भावूक होत असत… प्रेक्षकांमधूनही पांडुरंग हरी पांडुरंग हरी हा जयघोष होत असे… तुका जातो वैकुंठाला म्हणत ते गरुड वाहन आकाशी उडते हे दृष्य बघून पडद्यावर फुले उधळली जायची…
त्यानंतर प्रभात फिल्मचा 1940 मध्ये आलेल्या संत ज्ञानेश्वर या चित्रपटालाही अशीच प्रसिद्धी मिळाली. शिवराम वाशिकर यांची कथा आणि दिग्दर्शक व्ही दामले. शाहू मोडक, दत्ता धर्माधिकारी यांच्या अभिनयानं संपन्न याही चित्रपटाला पाहून प्रेक्षक भावूक व्हायचे… लहानपणी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी सोसलेले हाल पाहिल्यावर प्रेक्षकही रडू लागत. रेड्याच्या तोंडातून वेद पठणाचे दृश्य पाहून अनेकजण अचंबित व्हायचे. चांगदेवाचे आगमन… वाघावर त्यांची स्वारी आणि चांगदेवाला भेटायला जाण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली तो क्षण या चित्रपटाचा क्लायमॅक्स ठरला. एक तत्व नाम दृढ धरी मना…. या बाल ज्ञानेश्वरांच्या मुखी असलेल्या अभंगांनं खूप प्रसिद्धी मिळवली.
भक्तीचा मळा हा असाच पांडूरंगाच्या भक्तीचा आणखी एक चित्रपट. 1944 मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक केशवराव दाते, व्ही शांताराम. बेबी नलीनी यात होत्या. संत सावता माळी यांच्या भक्तीवर आधारीत या चित्रपटात सावता माळ्यांच्या मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी विठ्ठल स्वतः येतात तेव्हा प्रेक्षकही तल्लीन होतात. या विठ्ठलाच्या भक्तीच्या मळ्यात अनेक चित्रपट आले… प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम आणि यश दिले. संत गोरा कुंभार, भक्त पुंडलिक हे चित्रपटही गाजले. श्रद्धा पिक्चर्सचा माहेर माझे हे पंढरपूर हा चित्रपट विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय हरी विठ्ठल विठ्ठला या भक्तीगीतांनं गाजला. बाळ धुरी, आशाताई वाबगांवकर, शरद पोंक्षे, समीर अधिकारी यांच्या यात भूमिका होत्या. 1988 मध्ये पंढरीची वारी हा चित्रपटही या भक्ती माळेतला पुढचा भाग ठरला. वसंत चित्रयन, सांगली प्रस्तूत या चित्रपटात आशा काळे, जयश्री गडकर, अशोक सराफ, बाळ धुरी, राजा गसावी, आणि पाहुणे कलाकार म्हणून अनुप जलोटा होते. रमाकांत कवठेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. संत चोखामेळा, संत नामदेव, मुंगी उडाली आकाशी, झाला महार पंढरीनाथ, संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत सावता माळी, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई या विठ्ठल भक्तांवर आलेल्या चित्रपटांनीही प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान मिळवले.
पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली. त्यावर ‘दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट आला आहे. वारी म्हणजे वारक-यांचा…. विठ्ठलाच्या भक्तांचा मेळा. आनंदसोहळा. या वारीवर आधारीत अनेक चित्रपट, लघूपट निघाले. चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी वारीवर ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनाचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले. राजीव रुईया यांनीही ‘विठ्ठल’ हा चित्रपट काढला आहे. विठ्ठल, वारी, पंढरपूर हे सूत्र पकडून परेश मोकाशी यांनी काढलेला ‘ऐलिझाबेथ एकादशी’ कोण विसरेल. ज्ञानेश आणि झेंडू या बहिण भावाची गोष्ट. आईचं शिलाई मशीन बॅंकेनं जप्त केलेलं. ते सोडवण्यासाठी पैसे जमवतांना होतांनाची भावपूर्ण कथा. त्याच्या पार्श्वभूमीवर पंढरीचं रुप. वारक-यांचा मेळा. मधुगंधा कुलकर्णी यांची ही साधी, सोप्पी गोष्ट मनात घर करते. या चित्रपटात आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं अप्रतिम आहे. छोट्या बालकलाकारंच्या आवाजात ते गाण्यात आलं आहे. बाकी चित्रपटात टाळ चिपळ्यांचा आवाज अत्यंत प्रभावीपणे वापरण्यात आला आहे.
रितेश देशमुखच्या लई भारीनं तर विठ्ठल भक्तीचं नव रुप समोर आणलं. दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या या चित्रपटाचे संवाद एकदम भारीच ठरले. शिवाय माऊली माऊलीचा जयघोष… पुंडलिका वरदे हारी विठ्ठल…. श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय…. हा घोष अंगी चैतन्य निर्माण करतो. अजय-अतुल यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. या चित्रपटाचाच पुढचा भाग ठरलेल्या ‘माऊली’ चित्रपटातही विठ्ठल भक्ती चं एक रुप सादर झालं आहे. त्यातला ‘माऊली समोर मान खाली’ हा डायलॉग गाजला. आदित्य सरतोदार यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातलेही संवाद प्रेक्षाकांच्या पसंतीस आले. रितेश देशमुखचे अॅक्शन सीनही खूप गाजले.
8 जून 2012 रोजी आलेल्या तुकाराम या चित्रपटानं तुकाराम महाराजांची नव्यानं ओळख मिळाली. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र जोशी, राधिका आपटे, प्रतिक्षा लोणकर, यतीन कार्येकर, शरद पोंक्षे, विणा जामकर, विकास पाटील, रविंद्र मंकणी, निनाद लिमये, समीधा गुरु, सखी गोखले आहेत. अशोक पत्की, अवधूत गुप्ते यांच्या संगीताची गोडी अवघ्या महाराष्ट्राला भावली. सदा माझे डोळा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, जगण्याचा पाया हे अभंग आणि गाणी पुन्हा नव्या पिढीच्या मुखी बसली.
चित्रपटातील पांडुरंगाच्या दर्शनानं जेवढा प्रेक्षकांना आनंद मिळालाय तेवढेच काम चित्रपटातील गाण्यांनी किंबहुना अभंगांनी केलं आहे. 1977 साली गाडगे महारांजावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपट आला. श्रीराम लागू यात प्रमुख भूमिकेत होते. ग. दि. माडगुळकरांची गाणी. तर दत्ता डावजेकर यांचं संगीत. राजदत्त यांचं दिग्दर्शन. अप्रतिम कृष्णधवल चित्रपट. गाडगे महारांजांनी केलेल्या जनजागृतीच्या कार्याला या चित्रपटातून जनतेसमोर आणलं गेलं. यातील विठ्ठलाच्या पायी थरारली वीट हे भीमसेन जोशी गायलेलं गाणं आजही ऐकलं की मन तल्लीन होतं. ‘विठू माउली तू माउली जगाची, माउलीत मूर्ती विठ्ठलाची’ हे ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातील गाणंही असंच कायम ऐकावं असं वाटत. सुधीर फडकेंच्या आवाजातील या गाण्याला अनिल अरुण यांचं संगीत आहे. ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी’ हा ज्ञानेश्वरांनी रचलेला अभंग ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’मध्ये ऐकता येतो. भीमसेन जोशी, आशा भोसले यांच्या आवाजातील या अभंगाला सी. रामचंद्र यांचे संगीत आहे.
‘फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’ हे ग. दि. माडगूळकरांचं गाणं ‘प्रपंच’ या चित्रपटात आहे. सुधीर फडके यांनी हा विठ्ठल नामाचा गो़डवा गायला आहे. सुधीर फडके यांचे ‘संत गोरा कुंभार’ मधील ‘तुझे रुप चित्ती राहो’ हे गाणंही विठ्ठल रुपात रंगलेलं…. गायक वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचे ‘कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा’… हे ‘झाला महार पंढरीनाथ’ मधील गाणं आजही विठ्ठल भक्तांच्या मुखी आहे.
विठ्ठल, पांडुरंग, सावळ्या अशी अनेक नाव या देवाला आहेत. त्याचे भक्त म्हणतात आमचा देव चराचरात आहे. ते खरंही आहे. अनेक रुपातला विठ्ठल आपल्याला चित्रपटात भेटतो. विठ्ठल आणि त्याचे भक्त यांचं अतूट नातं आहे. वारीत जसं अनेक गावांतून वारकरी येतात आणि माऊलीच्या रुपात एक होऊन जातात तसंच या चित्रपटांचं असतं. नुसता विठ्ठल विठ्ठल हा नामघोष जरी चित्रपटात असला तरी चित्रपट विठ्ठल नामाच्या माळेत सहभागी होतो… हाच या विठ्ठलाचा महिमा आहे…