‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
कलात्मक संगीतकार – सोमेश नार्वेकर
हल्लीच्या टेक्नोसॅव्ही जगामध्ये ऑनलाईन म्युजिकची चांगली चलती आहे. कोणतेही गाणे ऑनलाईन जलदगतीने लोकांपर्यंत पोचते हीच गोष्ट ओळखून सोमेश नार्वेकर या युवा कलाकाराने युट्युब आणि अन्य ऑनलाईन पोर्टल्सच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोचण्याचा पर्याय निवडला असून आत्तापर्यंत जवळपास ५ लाख लोकांपर्यंत त्याने या माध्यमातून आपल्या रचना सादर केल्या आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर संगीतात कसा करावा याचे एक उत्तम उदाहरण त्याने लोकांसमोर उभे केले आहे.
सोमेशचे वडील संगीतकार भगवंत नार्वेकर आणि आई मानसी नार्वेकर या दोघांनाही संगीताची अत्यंत आवड होती आणि ते संगीतकार कमलाकर भागवत यांच्याकडे गाणं शिकत होते. सोमेश खूप लहान म्हणजे साधारण ३ वर्षांचा असतानाचा एक किस्सा आहे . एकदा त्याच्या बाबांनी भागवत सरांकडे त्याला नेलं होतं. गमतीत सरांनी विचारलं “काय रे बाळा? तू गाणं म्हणतोस का?” सोमेशने लगेच हो म्हटलं आणि भूप रागाचे आरोह-अवरोह अतिशय सुरात गाऊन दाखवले! बाबा घरी रियाज करत असताना त्याने ते बहुतेक ऐकले होते. भागवत सरांना किंवा सोमेशच्या बाबांना असं काही घडेल याची कल्पना नव्हती. “हा काय चमत्कार” असं त्यांच्या तोंडून निघून गेलं.
पुढे भागवत सरांकडे आई/बाबा सोमेशला गाणं शिकायला घेऊन जायचे. त्यांनी संगीतबद्ध केलेला “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” हा अभंग “सेवा भारती” ने आयोजित केलेल्या एका स्पर्धेत सोमेश गात होता तेव्हा गायिका/संगीतकार वर्षा भावे यांनी ऐकलं. आणि सोमेशच्या वडिलांना त्या येऊन भेटल्या आणि म्हणाल्या “हा मुलगा तुम्ही मला देऊन टाका” मी ह्याला गाणं शिकवेन. अशा प्रकारे सोमेश वर्षा मावशीकडे वयाच्या ९व्या वर्षी गाणं शिकायला लागला आणि कलांगण या संस्थेचा भाग झाला. पुढे अनेक आंतरशालेय स्पर्धांमध्ये त्याला बक्षिसं मिळाली. मग राज्यव्यापी गाण्याची स्पर्धा जिंकून “कलांगण गुणनिधी २००२” हा पुरस्कार त्याला मिळाला.
ETV मराठी वरच्या “गुणगुण गाणी” या स्पर्धेत मुंबईत तो प्रथम आला. सह्याद्री वाहिनी, झी मराठी वरील “नक्षत्रांचे देणे” (मंगेश पाडगांवकर एपिसोड) यांसारख्या अनेक कार्यक्रमात त्याला गाण्याची संधी मिळाली. आणि अशाप्रकारे बालगायक म्हणून प्रवास सुरू असताना २००४ साली वयाच्या १४ व्या वर्षी कंठ फुटल्यामुळे त्याचं गाणं बंद झालं.
पुढे त्याने १०वी नंतर सायन्स ला एडमिशन घेतली आणि १२ वी नंतर इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा दिली. त्या मे महिन्याच्या सुट्टीत कलांगण च्या निवासी छंदशाळेत सोमेश गेला आणि तब्बल ५ वर्षांनी वर्षा मावशी, कमलेश दादा यांच्या सहवासात येऊन, गाण्यात परत येऊन त्याच्या प्रवासाला परत एक वेगळं वळण मिळालं. त्यानंतर आपण संगीतात च स्वतः ला पूर्णतः झोकून द्यायचं असा ठाम निश्चय झाला आणि इंजिनिअरिंगला न जाता सोमेशने रुपारेल कॉलेज मध्ये एडमिशन घेतली.
सोमेशच्या सांगीतिक जडण-घडणीत रुपारेल कॉलेज च्या स्वरसाधना मंडळाचा ही मोठा वाटा आहे. २००८ साली त्याने पहिलं गाणं संगीतबद्ध केलं आणि वडिलांकडून चाली लावण्याचा वारसा त्याच्याकडे आला आहे हे त्याला समजलं. गुरु वर्षा भावे यांचं मार्गदर्शन, कमलेश भडकमकर यांचं पाश्चात्त्य संगीताचं मार्गदर्शनही लाभत होतं. २०१० त्याचा शालेय मित्र सागर गुंजाळ याने दिग्दर्शन केलेल्या “between the lines” या बाल नाट्याच्या संगीतासाठी सोमेशला राज्य नाट्य पुरस्कार मिळाला.
मग २०११ साली रुपारेल कॉलेजकडून युवा महोत्सवात “भारतीय समूहगान” संगीतबद्ध आणि दिग्दर्शित करण्याची संधी त्याला मिळाली आणि त्या गाण्याला अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळालं. तिथून पुढे संगीतकार म्हणून खऱ्या अर्थाने सोमेशच्या प्रवासाला सुरुवात झाली. काही काळ मुंबई विद्यापीठातून डिप्लोमा करत असताना, प्रा. नरेंद्र कोठंबिकर यांच्याकडून आणि काही काळ पंडित सत्यशील देशपांडे यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकण्याची संधी त्याला मिळाली.
आजच्या काळात काही वर्षांपूर्वी गाण्यांची निर्मिती केवळ चित्रपट किंवा स्वतःच्या अल्बमससाठी केली जात होती. ही गाणी मर्यादित लोकांपर्यन्त पोचत असत. मात्र आता काळ बदलत चालला असून अधिकाधिक लपकांपर्यंत रचना पोचविण्यावर भर दिला जात आहे. सोमेशनेसुद्धा याचाच अवलंब केला असून युट्युब, फेसबुक, 9X झकास वाहिनी, झी5 आणि अन्य ऑनलाईन माध्यमातून लोकांपर्यंत तो गाणी, स्वतःच्या रचना पोचवत आहे. “सोमेश नार्वेकर” या त्याच्या युट्युब चॅनेल ला १८०० हुन अधिक subscribers आणि ५००००० (पाच लाख) हुन अधिक views व्ह्यूज मिळाले आहेत.
“त्या सांज किनाऱ्यापाशी”, “चाहूल”, “त्या सांज किनाऱ्यापाशी Unplugged”, “तुझ्यासवे”, “मन वेडे पाखरू”, “माझ्या मनातले”, “देव माझा” “ही अशी”, “हसतेस तू जराशी” “सांग खरे”, “इथे तू तिथे मी” या सोमेश ने संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचे म्युझिक व्हिडिओस “सध्या युट्युबवर हिट असून त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मौनात बोलते रात”, “तोच चेहरा तुझा”, “माझ्या सावळ्या विठ्ठला” या अलबम्साठी संगीत दिग्दर्शन त्याने केले असून यामध्ये संगीतातील वेगवेगळे प्रयोग त्याने केले आहेत. प्रोग्रामिंग तसेच लाईव्ह म्युजिक या दोन्हीचा चांगला वापर संगीतामध्ये केला असून दर्जेदार चालींमुळे रसिकांपर्यन्त या संगीतरचना पोचत आहेत. विशेषतः गणेशोत्सव, आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याने केलेल्या गाण्यांना लोकांकडून दाद मिळत आहे.
एकीकडे युट्युबवर आपलं गाणं बघितलं जाईल का, लोकांना गाणं आवडेल का असे अनेक प्रश्न या क्षेत्रात काम करणाऱ्याना पडलेले असताना त्याचा विचार करता सोमेश काम करत असून काम चोख असेल तर रसिकांची साथ मिळतेच असं तो म्हणतो.
केवळ चांगली चाल लावून सोमेश थांबत नसून गाण्याची अरेंजमेंट, त्यासाठी चांगलं रेकॉर्डिंग, चांगल्या वादकांची निवड यासाठी तो मेहनत घेत असून त्यामुळेच त्याला रसिकांची दाद मिळत आहे. साधारणपणे युट्युबसाठी गाणी तयार करताना अनेकदा चालढकल करून काम केलं जातं मात्र त्याला फाटा देत सोमेशने गाण्याला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे.शब्दांचा अर्थ आणि गाण्यातला गोडवा, त्याचा मूळ भाव न बिघडवता गाण्यात नवनवीन प्रयोग करण्याची खूप इच्छा असून त्यासाठी येत्या काळात सोमेश प्रयत्न करणार आहे.
चित्रपटासाठीही संधी
अलब्म, सिंगल्स, जिंगल्स यांच्याबरोबरच चित्रपटाला संगीत देण्याचा प्रयत्नसुद्धा सोमेशने केला असून आगामी “एक सत्त्य” आणि “देह” या दोन मराठी चित्रपटांचं संगीत केलं आहे यातली गाणी मंदार चोळकर आणि अनुराधा नेरुरकर यांनी लिहिली असून हृषीकेश रानडे”, वैशाली माडे”, “आनंदी जोशी” आणि सायली महाडिक या गायकांनी गायली आहेत.
-आदित्य बिवलकर