‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
बदल होतोय……
शक्ती सामंता दिग्दर्शित ‘मेहबूबा’ (१९७६) चे साधारण सत्तर टक्के शूटिंग झाले असेल. हिमाचल प्रदेशात एका मोठ्या शूटिंग सत्रात बरेचसे चित्रीकरण झाले होते आणि आता मुंबईत प्रसंगानुसार मोठे सेट लागत होते आणि अशातच इंग्रजी गॉसिप्स मॅगझिनमधून राजेश खन्नाच्या भरभरून मुलाखती येऊ लागल्या, माझे दिवस पुन्हा येतील… ‘मेहबूबा’ माझ्या कमबॅकचा सिनेमा असेल…
खुद्द सुपर स्टारच आपल्या मधल्या पडत्या काळातून ‘मेहबूबा’ सावरेल असे म्हणतोय म्हटल्यावर त्याचे बॅकफूटवर गेलेले माझ्यासारखे फॅन खुलले. काही फ्लॉप्स चित्रपटानी त्याच्या झंझावाताला ब्रेक लावला होता…
काही काळाने ‘चित्रपट पूर्ण होता होता ‘गाण्याची रेकॉर्ड प्लेअर (तबकडी) प्रकाशित झाली, बिनाका गीतमालामध्ये गाणे आले, मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा….. आनंद बक्षी यांच्या गीताना राहुल देव बर्मनचे संगीत म्हटल्यावर ‘क्लास’ उच्च असणे स्वाभाविक होतेच. ‘परबत के पीछे चंदेबा गाव…’ किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांचे हेही गाणे रेडिओ सिलोनवर सकाळी आठच्या गाण्यात ऐकायला मिळे. ही गाणी पडद्यावर कशी दिसतील/असतील याची उत्सुकता वाढत गेली. दूरदर्शन हळूहळू पसरत होते तरी फक्त गुरुवारच्या अर्ध्या तासाच्या छायागीतमध्ये चित्रपट रिलीज झाल्यावर एकादे गाणे एकदाच दाखवत. रविवारी रेडिओ विविध भारतीवर ‘मेहबूबा’ च्या पंधरा मिनिटांच्या प्रोग्राममध्ये सगळी गाणी थोडक्यात ऐकायला मिळत, मेरे नैना सावन भादो हे किशोरकुमार आणि लता मंगेशकर अशा दोघांचेही आहे हे एव्हाना माहित झाले होते आणि गावदेवीच्या इराणी हॉटेलमध्ये ज्यूक बॉक्समध्ये आठ आण्याचे नाणे टाकून हे गाणे ऐकायचो. आता साप्ताहिक, मासिके यातून ‘मेहबूबा’ येतोय याचे वातावरण वाढत गेले, रेल्वे स्टेशन्स, रस्तोरस्ती पोस्टर लागली (काही फाटलीही), बसच्या मागे पोस्टर आले, अनेक ठिकाणी प्रचंड मोठी होर्डींग्स लागली. आ रहा है असे ठळकपणे रंगवले होते. कुठे कमिंग सूनचा दिलासा.
एव्हाना, आपले दिवस पुन्हा येतील हा राजेश खन्नाचा आशावाद सगळीकडे पसरला/पोहचला. काहीनी त्याची फिल्मी थट्टा केली, कोणी म्हटलं, आता अमिताभचा ॲन्ग्री यंग मॅनचे दिवस आहेत, तर काहीना शक्ती सामंता आणि राजेश खन्ना जोडीवर विश्वास होता. आराधना, अमर प्रेम, कटी पतंग, अजनबी यानंतरचा या जोडाचा हा चित्रपट होता. निर्माते मुशीर रियाज यांनी बजेटमध्ये कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. आणि आता उत्सुकता शिगेला पोहोचली. ‘मेहबूबा’ ची रिलीज तारीख कोणती? त्या काळात चित्रपट सेन्सॉर झाल्याशिवाय वृत्तपत्रात जाहिरात देता येत नसे. पण स्क्रीन साप्ताहिक आणि ट्रेड पेपर्समध्ये अगदी चित्रपटाच्या घोषणेपासूनच जाहिराती येत. जनसामान्यांना स्क्रीन साप्ताहिक तर फिल्म इंडस्ट्रीला त्यासह ट्रेड पेपर्स हा अशा माहितीसाठी आधार होता…
एव्हाना राजेश खन्नाच्या मुलाखती आणि दोन्ही गाणी यामुळे ‘मेहबूबा’ ची अक्षरशः प्रचंड हवा निर्माण झाली आणि मग मुंबईतील रसिकांचे लक्ष लागले या फिल्मचे मेन थिएटर कोणते असेल? त्या काळातील तो महत्वाचा फंडा होता. कदाचित आश्चर्य वाटेल पण मारधाड फिल्म असेल तर शालिमार तर कौटुंबिक चित्रपट असेल तर रॉक्सी असे जणू फिक्सिंग असे, आणि अनेकदा तरी त्यानुसारच थिएटर मिळावे म्हणून चक्क अगोदरचा चित्रपट उतरेपर्यंत वाट पाहिली जाई.
….. ‘मेहबूबा’ मुंबई आणि परिसरात १९ जुलै १९७६ रोजी चित्रपट प्रदर्शित होत असून मुख्य चित्रपटगृह नॉव्हेल्टी (ग्रॅंन्ट रोड) आहे अशी वृत्तपत्रात सिंगल कॉलम जाहिरात आली (तेवढीही तेव्हा पुरेशी असे) आणि मग सोमवारीच ॲडव्हान्स बुकिंगसाठी सकाळपासून अक्षरशः प्रचंड मोठी रांग लागली. तेव्हा नॉव्हेल्टीत स्टॉल दोन रुपये वीस पैसे, अप्पर स्टॉल तीन रुपये तीस पैसे आणि बाल्कनी चार रुपये चाळीस पैसे असे तिकीट दर होते आणि दुपारपर्यंत पहिल्या तीन दिवसाच्या नऊही शोची तिकीटे हाऊसफुल्ल….
शुक्रवारी सकाळी नॉव्हेल्टी थिएटरला फुलांची प्रचंड सजावट, भव्य थिएटर डेकोरेशन आणि मग फस्ट डे फर्स्ट शोला टेरिफिक गर्दी…..
हे मी स्वानुभवाने सांगतोय हो.
एखादा महत्वाचा चित्रपट येतोय याचे ढोल ताशे नगारे बॅण्ड बाजे असे वातावरण निर्माण होई. जणू एकादा फेस्टीवलच. सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांसची रसिकांनी अशीच दीर्घ आतुरतेने वाट पाहिली (आणि जे आवडले नाहीत, त्यांना तत्परतेने ‘वाटेला’ लावले, नाकारले. ‘मेहबूबा’चे तेच झाले. ‘एक महल हो सपनो का’, ‘फरार’, ‘इमान धरम’, ‘इश्क इश्क इश्क’, ‘जमाने को दिखाना है’, ‘लैला मजनू’ , ‘पापी’ असे प्रचंड वातावरण निर्मिती करुन पडद्यावर आलेले चित्रपट पब्लिकने झटक्यात रिटर्न पाठवले.)
….. ओटीटी प्लॅटफॉर्मने एकाच दिवशी ‘शकुंतला देवी’ आणि ‘रात अकेली है’ हे चित्रपट आपल्यासमोर येताना तसे काहीही वातावरण नाही, पण या चित्रपटांबाबत उत्सुकता निश्चित आहे. इतकेच नव्हे तर, आजच्या ग्लोबल युगातील महत्वाचा प्रश्न असा आहे की, ‘झुंड’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने रिलीज कधी होणार? अमूकतमूक चित्रपट हॉटस्टार आहे की अमेझॉन वर अथवा आणखीन कुठे हा आजचा पहिला प्रश्न आहे.
आपल्यापर्यंत चित्रपट येण्याची उत्सुकता खूप बदलत गेली.
व्हिडिओ कॅसेटचे युग संचारले आणि मग अनेक प्रेक्षकांनी सिनेमा थिएटर्सही बराचसा कट ऑफ घेतला. ‘अर्ध सत्य’, ‘बेताब’, ‘प्यार झुकता नही’, ‘राम तेरी गंगा मैली’ , ‘सागर’, ‘आखरी रास्ता’, ‘तेजाब’, ‘त्रिदेव’, ‘राम लखन, ‘शहेनशहा’ असे चित्रपट असतील तर थिएटरला जायचे अन्यथा अधिकृत असो अथवा अनधिकृतपणे मार्केटमध्ये येत असलेल्या नवीन चित्रपटाच्या कॅसेटकडे लक्ष ठेवायचे अशी या काळात सवय लागली आणि मग ती वाढली. सिनेमा थिएटर्सला सोपा पर्यायच आल्यावर काय हो? बरं, अमूक प्रसंग दिग्दर्शकाने असाच का घेतला असावा वगैरे विचार करायला पब्लिककडे वेळही नव्हता आणि गरजही नव्हती. समोर जे काही दिसतेय ते समजतेय ना तेवढेच पुरेसे होते.
नव्वदच्या दशकात उपग्रह वाहिनीच्या आगमनाने घराघरात सिनेमा शिरला आणि मग त्यावर ‘दीवाना’, ‘विश्वात्मा’ कधी बरे येतोय याची वाट पहायची सवय लागली. अगदी राहवले नाही तर थिएटरला जायचे अन्यथा चॅनलवर येईलच कधी तरी असा विश्वास वाढला होता. अगदी ‘हम आपके है कौन’ (१९९४), ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (१९९५) धुवांधार गर्दीत सुरु असतानाही त्याची कॅसेट नक्कीच येईल, ते एकाद्या चॅनलवर दाखवतील यावर विश्वास असलेला एक वर्ग होता. त्यामुळे वितरकांचा किती धंदा बुडतो याच्याही त्यांना काहीही देणे घेणे नव्हते. आपल्याला सुपर हिट चित्रपट पाह्यचाय हे एवढेच त्यांचे ‘एकच लक्ष्य’ असे. या वर्गानेच सिनेमावर भरभरून प्रेम केले.
काळ जस जसा पुढे सरकला तस तशी नवीन चित्रपटाच्या आगमनाची वाट पाह्यची सवय बदलत गेली आणि हे होतच असते. सगळ्याच बाबतीत बदल होत गेले तसेच ते यातही झाले.
मल्टीप्लेक्सच्या युगात शोची संख्या वाढली आणि सकाळी आठ, कुठे साडेआठ ते रात्री उशिरापर्यंत मोठ्या सिनेमाचे शो असणे याची खात्री पटली. त्यातून मग कोणत्या शोची तिकीटे ऑनलाईन बुक करायची आणि मग जेवणासाठी कुठे जायचे याचे प्लॅनिंग होऊ लागले. शहरी नवश्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाला मल्टीप्लेक्स ‘आपलं वाटलं’, त्यांना पॉपकॉर्न परवडतो. ते सिंगल स्क्रीनला जाणे डाऊन मार्केट मानू लागले. तर त्याचवेळी आजच रिलीज झालेला ‘हाऊसफुल्ल फोर’, ‘कलंक’ आजच आपल्या मोबाईल स्क्रीनवर कधी बरे येतोय याची वाट पाह्यची सवय लागली. ती इतकी लागली की, भरगच्च लोकल ट्रेनमध्ये एकाकडचा ‘पद्मावत’ क्षणात दुसरीकडे पोहचायचा. सिनेमाचा प्रवास वेगाने सुरु झाला. आणि धावत्या ट्रेनमध्ये जसा जमेल तसा चित्रपट पाहिला जाऊ लागला. एकादा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिला काय आणि मोबाईल अथवा लॅपटॉपवर पाह्यला काय असा काहीही फरक पडत नाही ही तर ‘चित्रपट पाहण्याची नवीन संस्कृती रुजली’. सिनेमा कसा पहायचा, तर जमेल तसा आणि तेवढाच, त्यात इमोशनली अडकायचे नाही. ते जुन्या चित्रपटाच्या काळात घडे, तेव्हा एकेका चित्रपटावर तासन तास बोलायला/वाचायला/ऐकायला वेळही होता. आता ‘सिनेमा पहा आणि विसरा’ असा काहीसा ट्रेण्ड सुरु झाला आहे, याचे कारण म्हणजे भरमसाठ चित्रपट निर्मिती आणि अनेक प्रकारचे मनोरंजन हे आहे. सिनेमा/शॉर्ट फिल्म/वेबसिरिज/ यु ट्यूब चॅनल असे केवढे पर्याय आहेत.
आणि आता तर नवीन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेमका किती तारखेला अथवा तारखेपासून आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. आणि हे सर्व कसे सोशल मिडियात! बसल्या बसल्या माहिती मिळणार. पूर्वी राजेश खन्ना आणि मग अमिताभ बच्चनचा चित्रपट सुपर हिट झाला रे झाला की कौतुकाने म्हटले जाई, तिकीटे मिळत नाहीत हो…. काही आठवडे जाऊ देत, थोडी गर्दी कमी झाल्यावर बघु सहकुटुंब सहपरिवार अशी मानसिकता होती. म्हणजे, आजूबाजूला चर्चा होत असलेला हा चित्रपट काही दिवसांनी बघू असा संयम समाजात होता. तोपर्यंत चित्रपट मॅगझिनमधून त्या चित्रपटाबाबत बरेच काही वाचायला मिळे. ‘शोले’ च्या वेळी तेच झाले. बरेच दिवस मिनर्व्हा थिएटरचे तिकीट ॲडव्हान्स बुकिंगलाच हाऊस फुल्ल होई आणि तेही मिळवायचे तर भली मोठी रांग लावा….
आता त्या रांगा इतिहासजमा झाल्या, ॲडव्हान्स बुकिंगची गरज बदलली, मल्टीप्लेक्सचे तिकीट अगदी त्या दिवशीही मिळते, तर ओटीटी प्लॅटफॉर्म वर्षभरचे पैसे आपण अगोदरच भरतोय आणि सहज चित्रपट पाहणे होते.
सत्तरच्या दशकात थिएटरमध्ये सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाह्यला जाताना खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली नेत…. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याच घरात आपण सहकुटुंब सहपरिवार चित्रपट एन्जाॅय करतोय, घरीच काही गरमागरम खातोय आणि घरचे पाणीही आहेच सोबतीला. काळ फिरुन तेथेच आला आहे ना? भविष्यात काही चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये, काही मोबाईल स्क्रीनवर, काही चॅनलवर तर काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर काही ॲपवर (त्याला चौथा पडदा म्हणतात) पहायचे. पर्याय वाढत चालतेय, अहो सिनेमा पाहणारेही वाढल्याने अशीही वाढ हवीच होती…सकारात्मक दृष्टिकोनातून