बातम्यांच्या ग्लॅमरसाठी ‘कुछ भी’
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला २ महिने उलटून गेले आहेत. याप्रकरणी सीबीआय आणि एनसीबी चौकशी करत आहेत. दरम्यान रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आलेली आहे. रिया एनसीबी कार्यालयात दाखल होतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात रियाच्या भोवतालचा मिडीयाचा गराडा आणि सरकार, प्रशासन, मिडीयायांच्याकडूनच सोशल डिस्टन्सचे वाजलेले तीन तेरा बघून पोट ढवळून निघतंय.
जगभरात आलेल्या कोरोनाच्या संकटात आपली संयमी भूमिका महत्त्वाची आहे. कोरोनोविरोधात लढण्यासाठी प्रशासन, मीडिया वारंवार सूचना, जनजागृती करताना आपण पाहिलं. पण आपण हा सदर फोटो पाहिल्यास लक्षात येतं की वारंवार सूचनांचे रेकॉर्डर ऐकवणाऱ्यांनीच ‘सोशल डिस्टन्सिंगचा कसा बोजवारा उडवला आहे?’. लाईव्ह कव्हरेज, एक्सक्लुझिव्ह दृष्य, चॅनलच्या TRP तर सोशल मिडीयावर खमंग बातम्या टाकून लाईक्स मिळवण्यासाठी चाललेला हा खटाटोप आपल्याच अंगाशी येऊ शकतो बरं का? यात आपण कुठेतरी सामाजिक भान विसरल्याचं जाणवतंय.
त्यावेळी जमलेल्या पत्रकार, फोटोग्राफर, पोलीस कधी, केव्हा, कुठे कोरोना रूग्णाच्या संपर्कात आले असतील हे सांगू शकतो का? यात एखाद्या पत्रकार, फोटोग्राफर, पोलीस, किंवा रिया चक्रवर्तीला कोरोना झाल्यास जबाबदार कोण? हे अतिरेकी वागण्याचा काय परिणाम होऊ शकतो याची कल्पनाच करवत नाही.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही आरोपी आहे किंवा नाही हे आपली न्यायव्यवस्था ठरवेल पण त्याआधी ती एक महिला आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक महिलेला सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाटावं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. रिया चौकशीसाठी जाताना तिच्यावर तुटून पडणारी गर्दी पाहता तिच्या मनावर येणाऱ्या दडपणाची कल्पना न केलेली बरी. यातून होणार मानसिक व शारिरिक त्रास तर निराळाच.
सुशांत प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही. भविष्यात तपास लागल्यावर अभिनेत्री रिया चक्रवर्ती दोषी असेल वा नसेलही. यासाठी न्याय देण्यासाठी आहे की आपली न्यायव्यवस्था. शिक्षा देण्यासाठी न्यायव्यस्था सक्षम आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
आपण आपल्याप्रमाणे बातमी देणार, व्हायरल करणार. बातम्यांच्या पोस्टवर २-४ शिव्या टाकणार. हा कुठला आला सुसंस्कृतपणा? सर्व माध्यमांनी, सोशल वीरांनी संयमी व निःपक्षपाती भूमिका घेऊन वागणं खूप गरजेचं आहे… एखाद्या सेलिब्रेटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींनी काही चुका केल्या की आपण पोस्ट टाकून हात धुऊन घेण्यात माहिर असतो. हो, आहे ना इथे लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. पण आपल्या मताचा, वागण्याचा अतिरेक तर कुणा एका व्यक्तीवर होत नाही ना? हे पडताळून बघायला हवं.
रियासोबत घडलेल्या प्रसंगात आपलीच कुणी जवळची व्यक्ती असती तर ?? मग यात एखादी स्त्री असो वा पुरुष. आत्मपरिक्षण करणं आणि त्यात सुधारणा करुन अंमलात आणणं सुध्दा तितकचं गरजेचं आहे.
मग मिडीया असो वा सोशलसाईटवरील वीर किंवा एक सामान्य माणूस. चला, थोडा विचार करून बघू.
प्रज्ञा आगळे.