मराठी रंगभूमीची लाडकी फुलराणी
मराठी रंगभूमीवरील सदाबहार फुलराणी भक्ती बर्वे यांचा आज जन्मदिवस. मराठी रंगभूमीवरील एकमेव स्त्री सुपरस्टार म्हणून ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी ज्यांचा गौरव केला त्या भक्ती बर्वेंची नाट्यकारकीर्द म्हणजे मराठी रंगभूमीच्या खजिन्यातील माणिकमोतीच!
ती फुलराणी, अखेरचा सवाल, किमयागार, अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होतेय, गांधी आंबेडकर, टिळक आगरकर, पुरुष, पप्पा सांगा कुणाचे, हॅण्डस् अप, शॉर्टकट या आणि अशा अनेक नाटकांमधून भक्ती बर्वे यांचा अभिनय रसिकांनी अनुभवला.
१० सप्टेंबर १९४८ मध्ये जन्मलेल्या भक्ती यांनी सुधा करमरकर यांच्या लिटील थिएटरच्या माध्यमातून अनेक बालनाट्ये केली. त्यानंतर आकाशवाणी, दूरदर्शनवरील निवेदिका म्हणून त्या घराघरात पोहचल्या. ‘साप्ताहिकी’ हा त्यांचा दूरदर्शनवरील कार्यक्रम तर आजही रसिकांच्या स्मरणात असेल. त्यानंतर त्यांची नाट्यकारकीर्दही तितकीच गाजली. पु.लं. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ नाटकाने भक्ती यांना खरी ओळख प्राप्त झाली. या नाटकातील ‘मंजुळा’ हे पात्र रंगभूमीवरील अजरामर भूमिकांपैकी एक! या नाटकाच्या तालमींच्या आठवणीही तितक्याच खास आहेत.’ती फुलराणी’ मधील स्वगत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ पुलंनी स्वत: भक्ती यांच्याकडून बसवून घेतले होते. या स्वगताला वन्स मोअर येणार हे भाकीत पुलंनी तालमीतच केले. गाण्याला वा वादनाला वन्स मोअर येणं स्वाभाविक होतं पण स्वगताला वन्स मोअर म्हणजे भक्ती यांच्यासाठी ती कल्पनाच अविश्वसनीय होती. ती फुलराणी च्या पहिल्या प्रयोगात भक्ती यांनी हे स्वगत सादर केलं आणि प्रेक्षकातून एकदा नाही अनेकदा वन्स मोअर आला…पुलंचं भाकीत खरं ठरलं. या नाटकाचे जवळपास ९५० प्रयोग भक्ती यांनी केले.
त्यानंतरची त्यांची सगळीच नाटकं म्हणजे मास्टरपीस होती. त्याशिवाय दूरदर्शनवरील सावल्या ही मालिका, बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावरील मालिका यातही त्यांनी काम केले. ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटातील त्यांची नकारात्मक छटेची वृत्तपत्र संपादक रसिकांच्या खास लक्षात राहीली.
‘पुलं, फुलराणी आणि मी’ या कार्यक्रमाचे लेखन करुन भक्ती तो सादर करत. कृष्णामाईच्या उत्सवात याच कार्यक्रमाचे सादरीकरण करुन कारने परत येत असताना झालेल्या भीषण अपघातात भक्ती बर्वे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या अकाली एक्झिटने रसिक हळहळले.
त्यांच्यानंतरही अनेक स्त्री कलाकारांनी त्यांची फुलराणीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला पण आजही फुलराणी म्हटलं की भक्ती बर्वे हेच नाव आठवत रहातं.
मराठी रंगभूमीला आपल्या अभिनयाने टवटवीत करणा-या या फुलराणीला विनम्र अभिवादन!