नावडत्या गाण्यानेच केला सिनेमा सुपर हिट !
काही गाण्याचं भाग्य थोर असतं. थोर या साठी की अगदी हे गाणं सिनेमातच नकोच म्हणून काढण्या पर्यंत सर्वांच जवळ जवळ एकमत झालं होतं. पण संगीतकाराच्या आग्रहासाठी हे गाणं सिनेमात ठेवलं आणि काय सांगता….या गाण्याने धुमाकूळ घातला व सिनेमा सुपर डुपर हिट व्हायला हेच गाणं कारणीभूत ठरलं!
तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही. हा किस्सा १९८० साली पडद्यावर आलेल्या ’सरगम’ या सिनेमातील एका गाण्याचा आहे. हा सिनेमा अनेक अर्थाने महत्वपूर्ण होता. दाक्षिणात्य अभिनेत्री जयाप्रदाचा हा पहिला हिट हिंदी सिनेमा होता. डिस्को युगाच्या नांदी वर्षात अस्सल भारतीय संगीताचा नजराना देणारा हा सिनेमा होता. मूलत: हा सिनेमा १९७६ साली तेलगू भाषेतील ‘सिरि सिरि मुव्वा’ या सुपर हिट सिनेमाचा रिमेक होता. दिग्दर्शक होते के वि्श्वनाथ. त्यांनीच मूळ तेलगू सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या तेलगू आवृत्तीत जयाप्रदा व चंद्रमोहन ही जोडी होती, तर संगीत के व्ही महादेवन यांचे होते. हिंदीत जेंव्हा हा सिनेमा आणायचा ठरवले त्यावेळी नायिका तीच ठेवून म्युझिकल रोमॅंटीक हिरो म्हणून ऋशी कपूरला घेण्यात आले. गाणी आनंद बक्षी यांची, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच होतं.आता येवूयात मूळ गाण्याकडे. ‘डफली वाले डफली बजा’ हेच गाणं खर तर या सिनेमाची आजही ओळख आहे.
पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल हे गाणं सुरूवातीला निर्माता, दिग्दर्शक कुणालाच आवडलं नव्हतं. त्यांच्या मते या गाण्याचे शब्द खूपच हलक्या प्रतीचे,काम चलावू व स्वस्त आहेत. या सिनेमातील इतर गाणी पाहता (“पर्बत के इस पार”, “कोयल बोली दुनिया डोली”, “मुझे मत रोको मुझे गाने दो”, “रामजी की निकली सवारी”, “हम तो चले परदेस”, “कहाँ तेरा इंसाफ़”) काही अंशी ते खरंही होतं. सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं. या गाण्याला सिनेमात कुठही जागा मिळाली नाही. एल पी मात्र कायम हे गाणं सिनेमात समाविष्ट करावे याचा आग्रह करीत होते. या गाण्याला रसिकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळेल, याचा त्यांना विश्वास होता.
शेवटी हो नाही हो नाही करत करत सिनेमा संपायच्या अगदी काही मिनिटे हे गाणं अक्षरश: घुसविण्यात आलं. कारण इतरत्र कुठे त्याला सिच्युएशन नव्हती; जागा तर अजिबात नव्हती.सिनेमा रिलीज झाला आणि पब्लिकने डोक्यावर घेतला आणि सर्वात लोकप्रिय झालं डफली वाले…. या गाण्याने रेकॉर्ड ब्रेक अशी लोकप्रियता मिळवली. त्या वर्षीचं ते बिनाका टॉपचं गाणं होतं, तर एल पीं ना फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. ऋशी कपूरचं तर ते सिग्नेचर सॉंग बनलं. स्टुडंट ऑफ द इयर (२०१२) य अलीकडच्या मध्ये तो हेच गाणं गाताना दाखवलाय!