‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
मंदार म्हणतोय..”दत्तगुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे!”
‘स्टार प्रवाह’ या वाहिनीद्वारे ‘दत्तगुरु’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला गोड आणि हसतमुख चेहरा म्हणजे ‘मंदार जाधव’. म्हणजेच आपला लाडका जयदीप! जाणून घेऊया त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल.
१. ‘अल्लादिन’ ते ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या प्रवासाबद्दल काय सांगाल?
अभिनय क्षेत्रातलं हे माझं चौदावं वर्ष आहे. २००६ मध्ये ‘से सलाम इंडिया’ नावाचा माझा एक हिंदी सिनेमा आला होता. क्रिकेटवर आधारित या सिनेमात महत्वाच्या चार पात्रांमधील एका पात्राची भूमिका मी केली होती. त्यानंतर २००७ मध्ये मला ‘अल्लादिन’ मालिका करायला मिळाली. दोन-अडीच वर्षे ही मालिका चालू होती. त्यानंतर कलर्स मराठी वरील ‘महावीर हनुमान’ या मालिकेतील श्रीरामांचे पात्र मला साकारायला मिळाले. बालिका वधू, पवित्र रिश्ता, बिट्टो, रझिया सुलतान, प्यार का दर्द हैं मिठा मिठा… अशा बऱ्याच मालिकांमधून विविध भूमिका करत असताना मराठी इंडस्ट्रीत काहीतरी करावं, असं वाटत होतं. अनेकांकडून विविध मराठी भूमिकांसाठी विचारणा होत होती, पण माझं मन मला साथ देत नव्हतं. गेल्यावर्षी एका मराठी दिग्दर्शकाचा मला फोन आला आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेसाठी मी होकार दिला.
२. या प्रवासादरम्यान तुम्ही स्वतःत कोणते बदल केलेत?
बदल करण्यापेक्षा बदल झाले, असे मी म्हणेन. कोणतीही गोष्ट सतत केल्याने आपण त्यात तरबेज होतो. इतकी वर्षे काम केल्याने अभिनयात सहजता आली आहे. खऱ्या अर्थाने मी पॉलिश झालो आहे, अधिक आत्मविश्वासू झालो आहे.
हे देखील वाचा: ताई माझी लाडाची गं !
३. साक्षात ‘दत्तगुरु’ ही भूमिका तुम्ही केलीत. यातून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या?
दत्तगुरूंच्या कृपेमुळेच मला हा रोल मिळाला, असे मी म्हणेन. लहानपणी ‘शारदाश्रम’ शाळेत शिकत असताना तिथल्या दत्तगुरूंच्या मंदिरासमोरून जाताना देवाला हात जोडून वर्गात जायचो, त्यावेळेला भविष्यात आपण स्वतः दत्तगुरु म्हणून लोकांसमोर येऊ, असं कधीच वाटलं नव्हतं.
या पात्रातून काय शिकायला मिळालं, या प्रश्नाचे उत्तर देणे फार अवघड आहे. दत्तगुरु साकारताना त्यांच्या स्वभावातील स्थिरता मला माझ्या अंगी रुजवावी लागली. त्यामुळे शांतता, स्थैर्य, प्रसन्न चेहऱ्याने वावरणे अशा बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या.
४. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत वर्षा उसगावकर, सुनिल गोडसे यांच्यासारख्या सिनियर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? सहकलाकारांकडून काय शिकायला मिळतंय?
खूप सुंदर अनुभव आहे. वर्षा ताईंना लहानपणापासून स्क्रीनवर पाहत आलोय. त्यांच्या सोबत काम करायचं स्वप्न होतं. स्क्रीन बरोबरच आमचं सेटवरचं नातंही आई आणि मुलासारखचं आहे. आम्ही खूप मजा-मस्ती करत असतो. सुनिल सरांसोबत याआधीही बऱ्याचदा काम केल्यामुळे ते कुटुंबासारखेच आहेत. गिरीजा सारखी वयाने लहान पण अनुभवी कलाकार, किंवा इतर सगळे सहकलाकार खूप प्रतिभावान आहेत.
५. अभिनयासाठी कुटुंबाचा पाठिंबा कशाप्रकारे मिळतोय?
आई, बाबा, भाऊ, बायको आणि २ मुले असं आमचं कुटुंब आहे. माझे बाबा बॉलीवूड सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते आहेत. त्यांच्याकडूनच मला अभिनयाचे बाळकडू मिळाले. माझा भाऊही अभिनय क्षेत्रात आहे आणि बायकोही. त्यामुळे अभिनयात सुधारणा कशी करावी, याबद्दल नेहमी आमच्या चर्चा रंगत असतात. कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. थँक्स टू माय फॅमिली!
६. मालिकांच्या सेटवरची एखादी स्पेशल आठवण कोणती?
तशा स्पेशल आणि मजेशीर आठवणी फार आहेत. मी महत्वाच्या २ आठवणी सांगतो. ‘अल्लादिन’ ही मालिका लहान मुलांना फार आवडायची. अल्लादिन या पात्राचा फॅन असणारा भोपाळ मधला एक मुलगा होता. मला काहीही झालं तरी अल्लादिन मला वाचवायला येईल, असं त्याला वाटायचं. म्हणून त्याने घरच्या गच्ची वरून उडी मारली. त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला. पण अल्लादिन आला नाही, या रागाने त्याने औषध घेण्यास नकार दिला. तेव्हा त्याच्या कुटुंबाने ‘अल्लादिन’ टीमशी संपर्क साधला आणि मला फोन केला. मी त्याच्याशी बोलल्यावर त्याला बरं वाटलं आणि त्याने औषध घ्यायला सुरुवात केली. हळूहळू तो पूर्ण बरा झाला.
‘श्री गुरुदेव दत्त’ च्या सेटवरची स्पेशल आठवण आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत दत्तगुरुंना मानणारे खूप लोक ही सिरीयल पाहायचे. एक वृद्ध आजी सेटवर मला भेटायला आल्या होत्या. मला पाहिल्याबरोबर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. इतक्या मोठ्या आजींनी मला नमस्कार करावा, हे मला चांगलं नाही वाटलं. ‘माझ्या कुंडलीतील दत्तगुरुंना पाहण्याचा योग तुझ्यामुळे पूर्ण झाला’, या त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया देऊ हे न समजल्याने मी त्यांना मिठी मारली आणि आमचे दोघांचे डोळे पाणावले. आयुष्यभर लक्षात राहणारी ही आठवण.
हे तर वाचायलाच हवं: ‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस कुलकर्णीशी गपशप
७. इतक्यात दगदगीच्या वेळापत्रकात बसणारे ‘फिटनेस फंडे’ कोणते?
अभिनय कौशल्यासोबतच स्क्रीन प्रेझेन्स साठी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. खरं तर गरजेचा आहे, असं मी म्हणेन. फिटनेस मुळे प्रेक्षकांनाही तुम्हाला पाहायला आवडतं. त्यामुळे मी फिटनेसची सुरुवात केली आणि आता हा माझ्या लाइफस्टाइलचा भाग झाला आहे. कोरोना मध्ये जिम बंद आहेत, पण तरी मी घरच्या घरी कमीत कमी उपकरणांमध्ये स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतोय. घरी २ मुलं असल्याने व्यायाम करणं थोडं कठीण जातं, पण तरी त्यातही खूप गंमत आहे. कलाकृती मीडियाच्या वाचकांना मी हेच सांगेन की, ‘स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या.’
८. तुमच्यासाठी ‘सुख म्हणजे नक्की काय?’
माझ्यासाठी माझं कुटुंब, माझा प्रेक्षकवर्ग आणि त्यांचं समाधान हेच खरं सुख आहे.
९. रॅपिड फायर राउंड :
ओटीटी, थिएटर की टीव्ही = टीव्ही
आवडता अभिनेता/ अभिनेत्री = टॉम हँक्स आणि ऋतिक रोशन
आवडता चित्रपट = हॉलीवूड चित्रपट – Saving Private Ryan
फिटनेस मोटिवेशन = ऋतिक रोशन
तुम्ही केलेल्या मालिकांपैकी तुमचं आवडतं पात्र = तीन पात्र मला खूप आवडतात. दत्तगुरु, जयदीप आणि अल्लादिन.
आवडता छंद = मुलांसोबत मॉलमध्ये विंडो शॉपिंग करणे
स्वतःला रिचार्ज करण्याचा मार्ग = व्यायाम करणे
दत्तगुरूंच्या भूमिकेतून तुम्हाला आदर, प्रेम सगळंच मिळालं. सध्याची जयदीपची भूमिकाही प्रेक्षकांना भावते आहे. मंदार सर, तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
- मुलाखत आणि शब्दांकन: सोनल सुर्वे