नाट्यप्रयोगात बाळ रडतं तेव्हा…
नाटक जेव्हा प्रत्यक्ष रंगमंचावर सादर होतं, तेव्हा रंगमंचाइतक्याच घडामोडी प्रेक्षकांतही घडत असतात. कधी फोन वाजतो, कधी बाळ रडतं. या गोष्टी कोणता कलाकार कशाप्रकारे हाताळतो हे त्या-त्या कलाकाराचं कसब असतं. अशाच दोन अभिनेत्यांचे हे भन्नाट किस्से तुमच्याशी शेअर करतोय.
‘साखर खाल्लेला माणूस’ नाटकाचा प्रयोग सुरू होता. प्रशांत दामले वडिलांच्या भूमिकेत होते. नाटकातील त्यांची मुलगी त्यांना येऊन सांगते, “बाबा आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे”. तेवढ्यात प्रेक्षकातील कुणाचं तरी बाळ रडू लागलं. प्रशांत दामले यांनी तिथल्या तिथे ॲडीशन घेतली. “अगं ते बाळ रडतंय त्यावरुन आठवलं, लग्न करायचं म्हणतेस तर मुलाबाळांचं काय ठरवलं? कुठे? कधी?कशी? किती?” अर्थातच प्रेक्षकातून हशा आणि टाळ्या आल्या नसत्या, तर नवल होतं.
अधिक वाचा: क्वारंटाईन आणि मराठी नाटके
दुसरा किस्सा अभिनेते श्रीकांत मोघे यांच्याबाबतीत घडलेला. ‘लेकुरे उदंड झाली’ नाटक तेव्हा तुफान चालू होतं. शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रयोग सुरू होता. नट रंगमंचावर वावरत असला तरी प्रेक्षागृहाकडे त्यांचं लक्ष असतंच. प्रेक्षकातील एक रडणारं बाळ त्या बाळाच्या आईने नव-याच्या हाती सोपवून नव-याला थिएटरच्या कोपऱ्यात उभं रहायला लावलं आहे हे श्रीकांत मोघे यांनी हेरलं होतं. ‘लेकुरे’ मध्ये श्रीकांत मोघे यांच्या पात्राचं नाव होतं राजशेखर उर्फ राजा. त्या राजाच्या स्वगतात विवाहित पुरुषांबद्दल राजा मित्राला विचारत असतो,”रंगलेल्या गप्पांमधून तुला आंघोळीसाठी कुणी धुवायला काढलाय?” “पातळ खरेदी करण्यासाठी भर रानडे रोडवरुन उन्हातान्हात किंवा पावसापाण्यात तुझी कुणी धिंड काढलीय?” या मूळ संवादाला जोड देत श्रीकांत मोघेंनी त्या रडणा-या बाळाला घेऊन उभ्या नव-याकडे बोट दाखवत ऑडिशन घेतली, “केकाटणा-या पोराला घेऊन तुला कुणी थिएटरच्या कोपऱ्यात उभा केलाय? आणि त्याबरोबर प्रेक्षागृहात हास्याचा नायगारा कोसळला. पण त्या बाळाची आई इतकी चिडली की; तिच्या हातातली पर्स श्रीकांत मोघे यांच्यावर भिरकावत तरातरा ती रागाने थिएटर बाहेर निघून गेली.
नाटक ही जिवंत कला आहे. त्यात जेव्हा ह्या गंमतीजमती घडतात, तेव्हा या कलेचं जीवंतपण अधिक प्रकर्षाने जाणवतं. कलाकाराच्या हजरजबाबीपणाची, उत्स्फुर्तपणाची ती परीक्षाच असते एकप्रकारे. काही जण या अडचणींबद्दल तक्रार करत रहातात तर काही जण अडचणींच्या बॉलला मस्त टोलवत षटकार खेचतात. अशा नाटकवीरांना खरंच कुर्निसात!