मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
न्यूज अँकर ते अभिनेत्री…
हा नवा कोरा चेहरा आहे, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतली सहकलाकार निकीता आणि ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनलवरील अँकर अमृता बने हीचा. अभिनय क्षेत्र असो वा अँकरिंग वा रिपोर्टींग अमृताने या सगळ्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
“नमस्कार, मी अमृता बने’’ म्हणत आपल्या गोड आवाजानं घराघरात पोहचली. त्यानंतर स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेतील ‘सरस्वती देवी’ रुपानं प्रत्येकाच्या घरचा जणू काही सदस्यच बनली.
चला, तर मग जाणून घेऊया जर्नलिस्ट ते अभिनेत्री या अमृताच्या हॅपी जर्नीबद्दल…
अमृता तुझं खूप-खूप स्वागत आपल्या कलाकृती मिडीया वेबसाईटवर.
- तु अभिनय क्षेत्रात येण्याआधी न्यूज अँकर म्हणून काम केलं आहे. न्यूज अँकर ते अभिनेत्रीचा प्रवास कसा होता?
खूप काही शिकवणारा होता. या प्रवासाला आता कुठे सरुवात झाली आहे. त्यामुळे खूप मेहनत करायची आहे.
पण दोन्ही ठिकाणी एक कॉमन गोष्ट आहे ती कॅमेरा. पण न्यूज अँकर म्हणून काम करताना मनावर दडपण असायचं. जे काही ते Full and Final असतं. कारण आपण काय बोलतो यावर प्रेक्षकांचं लक्ष असतं आणि इथे आपल्याला एडिटींगचा पर्याय नसतो. सिरिअल किंवा चित्रपटात काम करताना रिटेक घेऊ शकतो, चुका सुधारण्याची संधी असते. पण न्यूज अँकर असताना तसं नसतं. यावेळी शब्दसंपदा आणि वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान असणं खूप मह्त्वाचं असतं.
- जर्नलिझम फिल्डमधून अभिनयात क्षेत्रात येताना स्वत:मध्ये काय बदल केलेस?
न्यूज अँकर असताना एक जबाबदारी असते. सोशल साईटवर व्यक्त होताना देखील विचार करावा लागतो. तसं इथे नसतं. या ग्लॅमर इंडस्ट्रीत टिकून रहायचं असेल तर आपल्याला स्वत:कडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शारिरीकदृष्या सदृढ आणि सुंदर दिसण्यासाठी मी पूर्ण लक्ष्य देऊन वर्कआऊट करू लागले.
- तु याआधी बऱ्याच जणांची मुलाखत घेतली आहेस. पण आज तु मुलाखत देतेय. कसं वाटतंय?
अँकरिंग किंवा रिपोर्टींग करताना मला सतत वाटायचं की, आपली पण कोणीतरी मुलाखत घ्यावी. मी आज कोणासाठी तरी बूम पकडतेय तर भविष्यात माझ्यासाठी देखील कोणीतरी बूम पकडावा. पण हे सगळं काही खरं होईल असा मी कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे मी खूश आहे.
- सरस्वती देवी भूमिकेबद्दल काय सांगशील?
सरस्वती देवीची भूमिका जेव्हा मला मिळाली तेव्हा मी जॉब करत होते. जॉब करता-करता अँक्टिंग माझ्यासाठी शक्य नव्हतं. त्यावेळेस आयुष्यात मला २४ तासांत एक निर्णय घ्यायचा होता. एक तर न्यूज अँकरची नोकरी किंवा अँक्टिंग क्षेत्रात काम करणं. जॉब करताना आपल्याला महिन्याला पगार मिळत असतो. रोज ऑफिसला जाणं, काम करणं पण मालिकेत रोज शूटिंग असेलच असं नाही. महिन्याला हातात पगार येणार नव्हता. त्यामुळे अनिश्चितता होती. जे होईल ते होईल म्हणून मी अभिनय क्षेत्र निवडलं. आणि सरस्वती देवीची भूमिका माझ्यासाठी खूप lucky ठरली.
- स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेतील सरस्वतीची भूमिकेचा अनुभव कसा होता?
सरस्वती देवीच्या भूमिकेसाठी मी काही पुस्तकं वाचली. याआधी ज्यांनी सरस्वतीची भूमिका केली आहे त्यांचा अभ्यास केला. सरस्वती देवी असेल तर ती कशी दिसेल, कशी बोलेल याचं बारकाईनं निरक्षण केलं. पुन्हा नव्यानं मला सरस्वती देवीची ओळख झाली.
- सरस्वती देवी भूमिकेकडून काय शिकायला मिळालं ?
संयम शिकले, जो माझ्याकडे अजिबात नव्हता. कारण असं व्हायचं की तुमचा सिन कधीही असला तरी तुम्हाला साडी, दागिने, मेकअप करुन तास न् तास बसावं लागतं. कधी-कधी असं व्हायचं की मी सकाळी मेकअप करुन बसायचे आणि माझा सीन संध्याकाळी असायचा. त्यामुळे नसुतं बसून राहण्याशिवाय काही काम नसायचं. यावेळेस मात्र खूप चिडचिड व्हायची. पण संयम बाळगण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. पौराणिक मालिकेत काम करताना आपल्याला प्रमाण भाषेचा वापर करावा लागतो. आणि हे सगळं काही माझ्यासाठी नवीन होतं.
- निकिताच्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
निकिताची भूमिका देवी सरस्वती आणि अमृताच्या पूर्णपणे विरुध्द आहे. निकिता एका मोठ्या कंपनीच्या मालकीनीची सेक्रेटरी आहे. त्यामुळे ती प्रचंड शिस्तप्रिय आहे. आज्ञाधारक आहे. तीच्या वागण्यात वक्तशीरपणा आहे. या सगळ्याचा मला माझ्या खाजगी आयुष्यात फायदा होतो. ती करिअरच्या बाबतीत खूप फोकस आहे. निकिताला काळ्या लोकांबद्दल राग अजिबात नाहीये. तीला फक्त सौंदऱ्याच्या ऑर्डस पाळायच्या आहेत.
- हर्षदा खानविलकरसोबत स्क्रिन शेअर करण्याचा अनुभव कसा आहे?
हर्षदाताईविषयी सुरुवातीला मनात थोडी भीती होती. कारण त्यांना मी नेहमी कडक, शिस्तप्रिय सासू, त्यांचा दरारा असणाऱ्या भूमिकेत पाहिलं होतं. त्यामुळे मनात थोडीशी भीती होती जी आजही आहे पण आदरायुक्त भीती आहे. तर त्याचं झालं असं की, मालिकेचं शूटींग सुरू होण्याआधी आमचं फोटोशूट होतं. त्यावेळेस आम्ही सगळे एकमेकांसाठी नवीन होतो. नेमक्या फोटोशूट वेळेस माझं कानातलं पडलं आणि मी शोधा-शोध करत होते. त्यावेळी हर्षदा ताईंनी माझा उडालेला गोंधळ आणि कावरीबावरी झालेले पाहून त्यांच्या मेकअप बॉक्समधलं मला दुसरं कानातलं पटकन काढून दिलं. त्यानंतर त्यांच्याविषयी असलेली भीती गायब झाली. आणि आता आमच्यात खूप चांगली मैत्री झाली आहे.
- हर्षदाताई तुला एक सहकलाकार किंवा जुनिअर आर्टिस्ट म्हणून टीप्स देतात का?
हो. त्या नेहमी मला मार्गदर्शन करत असतात. माझ्या चुका त्या-त्या वेळेस मला दाखवून देतात. आपण कसं बोललं पाहिजे?आपला कॅमेरासमोर हावभाव, हातवारे कसे असायला हवेत? याविषयी सांगत असतात. चुकलं की रागवतात, ओरडतात पण तेवढंच समजूनही सांगतात.
- ‘रंग माझा वेगळा’ सेटवरचा कायम लक्षात राहील असा प्रसंग कोणता?
कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला. आम्हाला सांगण्यात आलं की, आजच तुम्हाला शूटिंग बंद करावं लागणार आहे. अन्यथा कारवाई होईल. नेमक्या लॉकडाऊन वेळेस मालिका आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या दृष्टीने महत्वाचा एपिसोडचं शूटिंग सुरू होतं. दिपा आणि कार्तिकचं लग्न. त्यांचा संगिताचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी सगळ्यांची खूप धांदल उडाली. प्रत्येकानं वन टेकमध्ये शूट केलं होतं. थोडं दडपण होतंच पण मज्जाही आली होती.
- निकिता नेहमी सौंदऱ्या इनामदारला दिपाला लक्ष्य करण्यासाठी नवीन कल्पना देत असते. यावरुन कोणत्या प्रेक्षकानं कधी डिवचलं आहे का?
संमिश्र प्रतिक्रिया येतात. एका आजीने मला अक्षरक्षा: ‘’आगलावी’’ म्हणटलं होतं. दुसरी प्रतिक्रिया अशी होती की, माझ्या मित्राची आजी रंग माझा वेगळा सिरिअल न चुकता बघते. तर तो मुद्दाम आजीला चिडवून देत होता की, आजी हीच ती सौंदऱ्या इनामदारला नवीन कल्पना देत असते. त्यावर आलेली आजीची प्रतिक्रिया भारी होती. “अरे, काम आहे तीचं. ती सौंदऱ्या जे सांगणार तीला करावं लागणार. तीच्याकडे कामाला आहे ना ती”. (खूप हसले होते आणि एक मानसिक समाधानही मिळालं की चला, आपलं काम लोकापर्यंत पोहचतंय.)
रॅपिड फायर
- आवडता लिपस्टिक कलर – गुलाबी.
- आवडतं आउटफिट – वेस्टर्न आउटफिट.
- आवडता छंद – जुनी गाणी ऐकणं.
- आवडती डीश – सुरमई.
- कूकिंग येतं का? – हो, मला कूकिंग येतं.
- आवडते पर्यटन स्थळ – पाचगणी.
आपली सगळ्यांची लाडकी सरस्वती देवी आणि निकिताला म्हणजेच ‘अमृता बने’ हिला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!
- मुलाखत आणि शब्दांकन – प्रज्ञा आगळे.