‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बीस साल बाद भी आजची स्टार ‘करीना’
कपूर घराण्यातल्या एका सुपरस्टारचा आज वाढदिवस ! सकाळपासून तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो तुम्ही पाहतच असाल न! फोटो पाहता पाहता जाणून घेऊया बेबोच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाबद्दल !
ऋषि कपूर आणि करिष्मा कपूर यांनी एकत्र भूमिका साकारलेला चित्रपट माहितेय? बघा आठवा. दीपक आनंद दिग्दर्शित ‘लगते जिगर’ (१९९१) या चित्रपटात ते दोघे एकत्र आले होते, पण नायक आणि नायिका म्हणून नव्हे, तर पिता आणि कन्या अशा नात्याच्या त्यांच्या भूमिका होत्या आणि ऋषि कपूरची वेगळी भूमिका म्हणून दिग्दर्शकाने जुहूच्या मयूर महलमधील शूटिंगच्या वेळी आम्हा काही सिनेपत्रकाराना आवर्जून शूटिंग रिपोर्टिंगसाठी बोलावले होते.
एक वेगळा चित्रपट या विचारातच सेटवर पाऊल टाकणार तोच एका बाजूला करिष्माची आई बबिता दिसली. आपली लाडकी कन्या आपल्या दीरासोबत कॅमेरासमोर कशी वावरतेय, हे अनुभवण्यास आणि तिला सपोर्ट सिस्टीम देण्यासाठी ती आली आहे, हे वेगळे सांगायची गरज नव्हती. सिनेमाच्या जगात असे सहज म्हणूनही इकडेतिकडे पाहिलं, तरी अनेक रंजक तर कधी एक्सक्लुझिव्ह गोष्टी दिसतात. आणि अशातच बबितासोबत एक गोरी गोमटी शाळकरी मुलगी दिसली आणि लक्षात आलं की ही लोलोची छोटी बहिण बेबो अर्थात करिना कपूर…तेव्हा शाळकरी वयात ती असली तरी तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वातला ‘कपूर खानदानातील ती आहे’ असा आत्मविश्वास, आकर्षकता आणि चार्म पटकन लक्षात आला.
लोलोला पहिल्यांदा या चित्रपटाच्या सेटवर पाहिले, पण हा चित्रपट आणखीन चार पाच दिवसांच्या शूटिंगनंतर बंद झाला…
लोलोची करियर भरात असतानाच बेबोने फिल्म क्राफ्ट बॅनरच्या राकेश रोशन निर्मित आणि दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ (२०००) मध्ये नवीन चेहरा ‘रोशनपुत्र’ ऋतिकसोबत पहिला चित्रपट साईन केला, एका गाण्याचे रेकॉर्डिंग झाले आणि महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत पहिले शूटिंग सत्र पार पडले. अशा एकामागोमाग एक बातम्या आल्या, त्या आम्ही सिनेपत्रकार प्रसिद्ध करतोय आणि या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टीगसाठी कधी बरे बोलावले जातेय, असा विचार करीत होतो. तेवढ्यात ‘ब्रेकिंग न्यूज’ आली, मम्मी बबिताने या बेटीला(ही) आपल्या पहिल्या चित्रपटातून बाहेर आणण्याचा निर्णय घेतला. (बबिताने लोलोलाही ‘बरसात ‘मधून असेच बाहेर काढले आणि ट्विंकल खन्ना त्यात बॉबी देओलची नायिका झाली. याचाच रिटेक यावेळी झाला. सिनेमाचे जग अशाच ‘अनपेक्षित आणि अनाकलनीय’ गोष्टींनी भरलयं. म्हणूनच यात भटकंती करण्यात/डोक्यावण्यात गंमत आहे).
बबिताची ही इन ॲण्ड आऊटची खेळी उगाच नव्हती. काही झाले तरी कपूर खानदानाची ती सून हो! तिने चित्रपटसृष्टीच्या शहेनशहाच्या पुत्रासोबत आपल्या लोलोला रुपेरी पदार्पणाची संधी मिळवली.
सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्यूजी’ (२०००) मध्ये अभिषेक बच्चन आणि करिना कपूर.
बच्चन आणि कपूर एकत्र म्हटल्यावर पिक्चरची अगदी घोषणेपासूनच भारी चर्चा. जास्त फोकस बच्चनपुत्रावर. अमिताभ म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ म्हटल्यावर अभिषेकने घरातच उठता बसता चहा पीत पीत अभिनयाचे धडे गिरवले असतील असा समज. लोलोचे तर पणजोबा (पृथ्वीराज कपूर) पासून कपूर खानदान या हिंदी चित्रपटसृष्टीत. पिता रणधीर कपूरही सत्तरच्या दशकात हीरो. तरी तिच्याकडून फारशा अपेक्षा का नव्हत्या, अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांना वेगळ्या शोचे आयोजन करुन ‘रिफ्यूजी’ दाखवण्याऐवजी मेन थिएटर लिबर्टीत प्रेक्षकांसोबत फस्ट डे फर्स्ट शोचे तिकीट दिले. त्यामुळे आपल्यातील समिक्षकाचा इगो थोडा बाजूला पडतो. पब्लिकच्या दृष्टिकोनातून फिल्म पाहता येते (अथवा यावी).
मध्यंतरामध्ये समोसा खात खात आम्ही समिक्षक म्हणत होतो, करिना छा गयी. काय कॉन्फिडन्टली वावरलीय. आपल्यावर जणू मुव्हीज कॅमेरा नाही अशा विश्वासात ते वावरतात….
पिक्चर सुपर हिट झाला नाही. पण तोपर्यंत सर्व फिल्मी गॉसिप मॅगझिनच्या ग्लॉसी पेपरच्या कव्हरवर लोलो छा गयी. प्रत्येक मॅगझिनसाठी स्वतंत्र फोटो सेशन आणि नवीन मुलाखत. इतकं तिने सांगितले तरी काय हा प्रश्न नाही, तर यासाठी लागणारी एनर्जी तिने आणली कुठून हा प्रश्न होता. करियर टेक ऑफ आणि इमेज बिल्ड अपसाठी यह तो करना ही पडता है. ‘कहो ना प्यार है’ सोडल्याची खंत तिच्या बोलण्यात नव्हती. खरं तर २००० च्या जानेवारीत कहो ना…पडद्यावर आला तोच सुपर हिट झाला आणि सात महिन्यांनी ‘रिफ्यूजी’ आला.
लोलोला धडाधड मोठ्या बॅनरचे बिग हीरोजसोबतचे चित्रपट मिळाले (घराणेशाही म्हणतात ती येथेच, किती सहज चित्रपट मिळाले)! पण तिच्या पर्सनालीटीत प्रचंड गोडवा आहे, तिने एकेक चित्रपट पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. चित्रपटासोबत आपल्या अभिनयात प्रगती केली, व्यावसायिक अॅप्रोचने करियरची आखणी केली. (हे स्वभावतःच असावे लागते. आणि तेच यश देते. मग तुमचे घराणे कोणतेही असो). अशातच धर्मा प्रॉडक्शनच्या शकून बत्रा दिग्दर्शित ‘एक मै और एक तू’ या चित्रपटाच्या मुलाखतीच्या निमित्ताने त्यांच्या खारच्या कार्यालयात लोलोच्या स्वतंत्र भेटीचा योग आला…. व्यवस्थित प्रश्न ऐकून घेऊन आणि तितक्याच सावधगिरीने तिने उत्तरे दिली आणि कपूरांमध्ये असा संयमाचाही गुण असतो, याचा प्रत्यय आला.
लोलोने सैफ अली खानशी लग्न करणे, तैमूरला जन्म देणे आणि आता पुन्हा मातृत्वाचा आनंद घेण्यास उत्सुक असणे आणि अशा सगळ्यात आपल्या करियरच्या वीस वर्षानंतरही ती तितकीच फ्रेश असणे, ‘आजच्या टॉप टेन’ (की फाईव्ह?) ॲक्ट्रेसमध्ये तिचे स्थान असणे, अरे काही कौतुक आहे की नाही? व्यक्तिगत आणि व्यावसायिक वाटचालीचा किती छान समतोल ठेवलाय. अनेक प्रकारचे चित्रपट (माय नेम इज खान, ओमकारा, उडता पंजाब, खुशी, देव, युवा, ऐतराज, चमेली, हिरोईन वगैरे किती विविधता बघा. याचाच अर्थ अनेक प्रकारच्या दिग्दर्शकांनी तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला) आणि त्यात विविध प्रकारच्या भूमिका. यातून आपला फिटनेस फंडा, लूक, ग्लॅमर आण आकर्षण, आपला फॅन्स आणि फॉलॉअर्स कायम ठेवलाय, ही खेळी सोपी गोष्ट नाही हो. त्यासाठी ‘कपूर’ असणे हिताचे ठरले असेलही; पण स्वतःचेही काही असावे लागतेच….