‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
गप्पिष्ट आणि छंदिष्ट अशा ‘आशालता’
आशालता आणि राजेश खन्नाच्या पहिल्या भेटीचा किस्सा खूप रंजक आहे आणि आशालतांकडून मी तो अनेकदा ऐकला आहे. तो मी तुमच्याशी शेअर करतोय. त्यामुळे आशालतांच्या व्यक्तीमत्त्वाच्या अनेक छटा आपल्या समोर उलगडत जातील.
आशालता बासू चटर्जी दिग्दर्शित ‘अपने पराये’ या चित्रपटाचे अंधेरीतील नटराज स्टुडिओत शूटिंग करीत होत्या. तो त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. अमोल पालेकर, शबाना आझमी, भारती आचरेकर इत्यादींसोबत त्या शूटिंग करत असतानाच त्यांना समजले की, अगदी शेजारच्याच सेठ स्टुडिओत राजेश खन्नाचे शूटिंग सुरू आहे. राजेश खन्ना हा आशालता आणि त्यांच्या भावाचा विक पॉईंट. आशालता यांनी आपल्या सेक्रेटरीला सांगितले की, कसेही करून मला राजेश खन्नाला भेटायचे आहे. मला माहितेय तो मराठी उत्तम बोलतो, मी त्याच्याशी दोन मिनिटं का होईना पण मराठीत बोलेन. तो तेथे चेतन आनंद दिग्दर्शित ‘कुदरत’च्या शूटिंगमध्ये बिझी होता. बासूदांची परवानगी घेऊन आशालता सेठ स्टुडिओकडे निघाल्या.
नटराजच्या आतूनच सेठ स्टुडिओत जाण्याचा रस्ता होता आणि ‘कुदरत’च्या सेटबाहेरच्या झाडावर, समोरच्या इमारतीतील गॅलरीत, खिडकीत बघ्यांची गर्दी आणि उत्साह पाहून त्या सुखावल्या आणि मग सेटवर गेल्या. राजेश खन्ना त्याच्या सवयीनुसार उशिरा आला. त्याने हेमा मालिनीला स्मित हास्य केले आणि आपल्या खुर्चीत जाऊन बसला. आशालता यांचा सेक्रेटरी राजेश खन्नाचा सेक्रेटरी असलेल्या अच्चा आनंदला सांगितलं की, आशालताजी मराठी ड्रामा की बहुत ही बडी एक्ट्रेस है, सिर्फ दो मिनिट काकाजी को मिलना है! (काका म्हणजे राजेश खन्ना) पण राजेश खन्ना चेतन आनंदकडून दृश्य समजून घेण्यात मग्न. त्याने ढुंकूनही इकडे तिकडे पाहिले नाही. आशालता राजेश खन्नाच्या अशा वागण्याने प्रचंड निराश झाल्या. आणि रागवून पुन्हा ‘अपने पराये’च्या सेटवर परतल्या.
आशालता हे सांगताना तो सगळा क्षण डोळ्यासमोर उभा करीत आणि पुढे सांगत, अरे त्याचं झालं असं की, काही महिन्यांनीच श्रीधर दिग्दर्शित ‘दिल ए नादान’ या चित्रपटात मला राजेश खन्ना, जयाप्रदा आणि स्मिता पाटील यांच्यासोबत भूमिका मिळाली आणि मद्रासला शूटिंगसाठी गेले. (मद्रास म्हणजे आताचे चेन्नई).
शहरापासून थोडे लांब शूटिंग होते. मी तयार होऊन तेथे बसले. राजेश खन्ना इतक्यात काही येणार नाही असे गृहीत धरूनच शूटिंग सुरू झाले होते आणि अशातच राजेश खन्ना आला, सोबत त्याचा लवाजमा. मला काही कळायच्या आतच तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, आज भी तुम मुझसे नाराज हो? त्याने असं अगदी आठवणीने आणि आपल्या अतिशय गोड, स्टाईलीश बोलीने मला हे विचारलं आणि मग काय छान केमिस्ट्री जमली आमची. आम्ही ‘आशा ज्योती’ वगैरे चित्रपटातही एकत्र काम केले.
आशालता प्रत्यक्ष भेटीत असोत अथवा फोनवर आपले असे अनेक अनुभव, आठवणी, किस्से मनमुराद आनंद घेत सांगणार आणि मग फोन संपताना सांगणार, माहिमला माझ्या घरी जेवायला ये. मी गोव्याची असल्याने मासे छान करते. माहिम मार्केटमध्ये जाउन आणते. आणि मग घरी गेल्यावर शशी कपूर, अनिल कपूर यांच्यापासून ते स्मिता पाटील, पूनम धिल्लॉनपर्यंत अनेकांच्या आठवणी रंगवून सांगत. आशालताचा मोठा छंद हाच. आणि मग आपले एकादे गाणे गाऊन दाखवणार. माझा कल हिंदी चित्रपटसृष्टीकडे जास्त असल्याने त्यावर त्या जास्त भर देत.
आशालता वाबगावकरच्या दिर्घकालीन कर्तृत्वाच्या प्रगती पुस्तकात चांगले गुण खूप. मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतानाच मराठी चित्रपट, तेथून हिंदी चित्रपट आणि मग मालिका असा त्यांचा प्रवास.
‘…आणि काशिनाथ घाणेकर ‘ हा चित्रपट त्यांनी अतिशय मोठ्या अपेक्षेने पाहिला. याचे कारण म्हणजे, खुद्द काशिनाथ घाणेकर यांच्यासोबत त्यांनी मराठी रंगभूमीवर भरपूर प्रयोग केले होते. अगदी बरेच दौरेही केले होते आणि त्यामुळे काशिनाथ घाणेकर एक अभिनेते आणि व्यक्ती म्हणून त्यांना चांगलेच जवळून माहित होते. पण आशालतांना जेवढे आणि जसे काशिनाथ घाणेकर समजले आणि उमजले होते तसे ते चित्रपटात दिसले नाहीत हे त्यांचे ठाम मत होते.
आशालताताईंच्या घराजवळच सनसिटी, सिटीलाईट आणि प्लाझा ही चित्रपटगृहे असल्याने त्यांना सातत्याने मराठी आणि हिंदी चित्रपट पाह्यची हौस कायम ठेवता आली आणि अनेकदा तरी सकाळीच फोन करून रात्री आपण ‘राजी’ चित्रपट पाहिला. अथवा अन्य काही चित्रपट पाहिला हे आवर्जून सांगत. आणि मग एकादी जुनी आठवण निघत आणि त्यात अधिकच रमत.
आशालता वाबगावकर यांच्या अभिनय कारकीर्दीतील “मत्स्यगंधा” आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाट्यपदे गाजली. आणि त्या सहज गुणगुणत. वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील संगीताने पं. अभिषेकी यांनी नाट्यसंगीताचा बाज बदलला, त्याला नवे रूप दिले.
नाटकातील ‘सत्यवती’ (मत्स्यगंधा)च्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्य पूर्णपणे हरलेली राजमाता अशा १८ ते ७० वर्षे वयोगटातील विविध छटा यातून सादर करायच्या होत्या. ते एक आव्हानच होते. तेव्हापासून त्यांच्यातील अभिनेत्री घडत गेली. पण आपल्या वागण्यात त्यानी कधीच पिढीतले अंतर येऊ दिले नाही हे विशेष कौतुकाचे आहे.
१ मे १९६४ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात नाटकाचा ‘मत्स्यगंधा’ पहिला प्रयोग सादर झाला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले नाटक दुपारी अडीचच्या सुमारास संपले. संगीत आणि नाट्यपदे हा या नाटकाचा मूळ आत्मा. पुढे काही प्रयोगांनंतर ते नाटक अधिक आटोपशीर व कमी करण्यात आले. या नाटकाने त्यांना खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. म्हणूनच आजवरच्या अभिनय प्रवासात हे नाटक त्यांना महत्त्वाचे वाटले. पण समोरच्या व्यक्तीची आवड ओळखून त्या गप्पा करीत. कधी घरी आलेल्या पाहुण्यांना पेढा आणि अर्धा कप दूध देत त्याचे स्वागत करीत.
विशेष म्हणजे, नाटकात पूर्णवेळ करायचे असे ठरवून त्यांनी सचिवालयातील (आताचे मंत्रालय) सरकारी नोकरी सोडली. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून त्यांनी पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मदनाची मंजिरी’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘स्वामी’, ‘गरुडझेप’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘भावबंधन’, ‘गुंतता हृदय हे’, ‘छिन्न’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्येही त्या होत्या. ‘माफीचा साक्षीदार’, ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’,’गंमत जमंत’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘एकापेक्षा एक’,’घोळात घोळ ‘ ‘आत्मविश्वास’ आणि अन्य शंभर मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या.
काही मराठी चित्रपटांच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी कोल्हापूरला जाणे झाले आणि त्यात आशालता असेल तर सहज ख्याली खुशाली विचारुन झाली की जुन्या नव्या गोष्टीत आम्ही रमत असू. विजय कोंडके निर्मित आणि दिग्दर्शित ‘माहेरची साडी’चा मुहूर्त, मग भोर तालुक्यातील इंगवली येथील दादा कोंडके यांच्या स्टुडिओतील या चित्रपटाचे शूटिंग आणि मग अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चित्रपटाची झालेली सक्सेस पार्टी या सगळ्यात आशालताची सतत भेट होत राहिली.
खासदार अभिनेते सुनील दत्त यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगला. ‘माहेरची साडी’ (१९९१) च्या प्रदर्शनास कधी वीस तर कधी पंचवीस/सत्तावीस वर्षे झाली की आशालताशी फोनवर त्या चित्रपटाच्या शूटिंगच्या आठवणी काढण्याच्या हमखास गप्पा होणे हे अगदी ठरलेले. जुन्या आठवणीत रमणे आशालताला विशेष आवडणारे आणि तेवढेच आजच्या मनोरंजन क्षेत्रात काय चाललंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असे.
गायन हा आशालताचा आणखीन एक महत्त्वाचा गूण.
त्यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया’ ही आरती आजही लोकप्रिय आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात दरवर्षी ही आरती वाजविली जाते. ‘एचएमव्ही’ कंपनीने त्याची ध्वनिमुद्रिकाही काढली. ‘चांद भरली रात आहे’, ‘चांदण्यांची रोषणाई मी कधी ना पाहते’, ‘राजसा राजकुमारा’(नाटक-विदूषक, तीनही गाण्यांचे संगीतकार श्रीनिवास खळे), ‘जन्म दिला मज त्यांनी’, ‘तव भास अंतरा झाला मन रमता मोहना’ (मत्स्यगंधा), ‘रवी किरणांची झारी घेऊनी’ (भावगीत) ही त्यांनी गायलेली अन्य काही गाणी.
आशालता वाबगावकर हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व. महत्वाचे म्हणजे, आपल्या कर्तृत्वाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून त्या अगदी माझ्या ‘पहिल्या भेटी ‘पासून मला भेटल्याने आमचे सूर जुळले.