‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मुंबईतच ‘बॉलिवूड’ का रुजले?
एव्हाना तुम्हाला एक बातमी समजली असेलच की, मुंबईतील बॉलीवूड नवी दिल्लीलगतच्या नोएडा या शहरात नेण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या विकासाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे वगैरे वगैरे. मनोरंजन विश्वाचा आजचा आणि उद्याचा विस्तार पाहता असा पर्याय गरजेचा ठरु शकतो. आजच्या ग्लोबल युगात तशी चित्रपटच काय अगदी मालिका/रिअॅलिटी शो/गेम शो/जाहिराती/वेबसिरिज यांच्या निर्मितीत प्रचंड वाढ झाली असून त्याच्या निर्मितीसाठीच्या गरजाही वाढल्या आहेत.
शूटिंग स्पॉटपासून इनडोअर सेट उभारणे (मालिका असेल तर दीर्घकाळासाठी) ते अगदी तांत्रिक सोपस्कारासाठी अधिकची गरज वाढणार आहेच. आपण याकडे राजकीयदृष्ट्या न पाहता मनोरंजन क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने पाहूया. आणि या सगळ्या घडामोडीत इतरही अनेक लहान मोठे संदर्भ आहेतच. मुळात मुंबईतच हे मनोरंजन विश्व का रुजले/वाढले/फोफावले? यासाठी थोडेसे फ्लॅशबॅकमध्ये जायला हवं.
आपल्या देशातच जे पहिले स्क्रीनींग झाले तेच मुंबईत आणि ते देखील ७ जुलै १८९६ रोजी. फ्रान्सच्या लूमिरी बंधूनी ‘अरायव्हल ऑफ द ट्रेन ‘ हा लघुपट तेव्हा मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये दाखवला. या लघुपटात एकमेव दृश्य होते, एक आगगाडी एका रेल्वे स्टेशनवर येऊन थांबते इतकेच. पण तेव्हाच्या समाजाला असे चालते फिरते दृश्य पाहण्याची संधीच मिळाली नसल्याने काही प्रेक्षकांनी घाबरून चक्क पळ काढला. यानंतर अधूनमधून परदेशातून असे अवघ्या काही मिनिटांचे लघुपट मुंबईत आणि मग अगदी हळूहळू इतर शहरात येऊ लागले. तेव्हाची दळणवळणाची साधने आणि जगण्याची शैली पाहता या दृश्यमाध्यामाबाबत विशेष कुतूहल होते.
दादासाहेब फाळके यांनी आपल्याकडचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र ‘ निर्माण केला तो ३ मे १९१३ रोजी गिरगावातील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तो मूकपट आहे आणि तेव्हापासून आपल्याकडे मूकपटाची निर्मिती सुरु झाली. विशेष म्हणजे, ‘राजा हरिश्चंद्र’साठी दादासाहेब फाळके यांनी दादरला पूर्व बाजूच्या मथुरा भवनमध्ये या चित्रपटाच्या निर्मितीसाठी स्टुडिओ उभारला. तेथे त्यांनी तब्बल आठ महिने शूटिंग करीत हा चित्रपट पूर्ण केला. आता मुंबईत मूकपटाची निर्मिती सुरु झाली. सुरुवातीच्या काळात असेच पौराणिक मूकपट निर्माण होत. मग नाशिक शहरात फाळके यांच्या कंपनीने मूकपट निर्मिती सुरु केली. मग पुणे शहरात पाटणकर फ्रेन्डस अॅण्ड कंपनीने संतपट निर्मिती सुरु केली. कोल्हापूरला प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. असे करता करता निर्मिती संस्था आणि शहरे वाढत गेली आणि त्यात मुंबईचे महत्व कायम राहिले.
प्रभात फिल्म कंपनीनेच व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ या आपल्या पहिल्या मराठी बोलपटाची निर्मिती केली. १९३२ सालची ही गोष्ट आहे. तेव्हाच अर्देशिर इराणी यांनी ‘आलम आरा ‘ हा पहिला हिंदी बोलपट मुंबईत निर्माण केला. तो १४ मार्च १९३१ रोजी मुंबईत गिरगावात मॅजेस्टिक थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता चित्रपट बोलू लागला. मूकपटाचा काळ आता मागे पडू लागला आणि बोलपटाचे युग हळूहळू आकार घेऊ लागले.
देशाच्या इतर भागातही हळूहळू स्थानिक प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मिती होऊ लागली. त्या काळात मुंबई, पुणे, कोल्हापूर, मद्रास (आताचे चैन्नई), लाहोर (आता पाकिस्तानात), कलकत्ता (आताचे कोलकत्ता) ही चित्रपट निर्मितीची मुख्य केंद्रं होती. मद्रासला दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची तर कोलकत्ता येथे बंगाली चित्रपटाची निर्मिती होई. मुंबई आणि लाहोर येथे हिंदी तर पुणे आणि कोल्हापूर येथे मराठी चित्रपटांची निर्मिती होई. फाळणीनंतर लाहोर पाकिस्तानला गेले हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच.
हा झाला पाया आणि त्यावरची इमारत उभी राहिली ती कशी? आपण प्रामुख्याने मुंबईचा विचार करु. तर मुंबईत एकेक करत स्टुडिओ उभे राहत होते आणि चित्रपट निर्मितीची वाढ होत गेली. ती होताना देशाच्या विविध भागातून कलाकार, लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मुंबईत येऊ लागले. कारण येथे संधी होती. खरं तर ३०च्या दशकात प्रभात (पुणे शहरात), न्यू थिएटर्स (कोलकत्ता) आणि बॉम्बे टॉकीज (मुंबई) चित्रपट निर्मितीचा पाया रुजवला. बॉम्बे टॉकीजचा जन्म १९३६ सालचा मुंबईतील. तर चित्रपती व्ही शांताराम यांनी १९४३ साली मुंबईत परेल येथे राजकमल कलामंदिर स्टुडिओची स्थापना केली. आपण फक्त पटकथा आणि संवाद घेऊन जायचे, या स्टुडिओत शूटिंगपासून डबिंग, मिक्सिंग, रेकॉर्डिंग वगैरे सगळं करून तयार चित्रपट करून बाहेर यायचे अशी सुविधा.
मुंबईत एकेक करत स्टुडिओ उभे राहत जाताना एक गोष्ट झाल्याचे दिसते, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी आपला स्वतःचा स्टुडिओ असावा असा जास्त कल राहिला. काही उदाहरणे सांगायची तर, राज कपूरने १९४८ साली चेंबुरला आर. के. स्टुडिओची स्थापना केली (गेल्या वर्षीच त्याची विक्री झाली आणि तो पाडला गेला) कमाल अमरोही यांनी अंधेरीच्या महाकाली परिसरात भव्य कमालीस्थान स्टुडिओ उभारला. शशधर मुखर्जी यांनी अगोदर गोरेगावला फिल्मीस्थान तर अंधेरी पश्चिमेला आंबोली येथे फिल्मालय स्टुडिओ उभारला.
मेहबूब खान यांनी वांद्र्याला मेहबूब स्टुडिओ उभारला. तर रामानंद सागर, शक्ती सामंता, प्रमोद चक्रवर्ती, एफ. सी. मेहरा आणि आत्माराम या पाच निर्मात्यांनी अंधेरी-कुर्ला रोडवर नटराज स्टुडिओ उभारला. दादरला चंदुलाल शहा यांचाच रणजित स्टुडिओ, साकी नाकाजवळ हेमंत कदम या मराठी माणसाने चांदिवली स्टुडिओ उभारला. (यातील नटराज स्टुडिओ इतिहासजमा झाला आहे तर फिल्मालयचा फक्त थोडासा भाग कार्यरत आहे) इतरही लहान मोठे चित्रपट स्टुडिओ मुंबईत सुरु झाले (एस्सेल, मोहन, ज्योती वगैरे) तर सेठ स्टुडिओ वगैरे बंद पडले. अंधेरीतील सेठ स्टुडिओचे उद्घाटन चेतन आनंद दिग्दर्शित ‘कुदरत’ (१९८०) या चित्रपटाने झाल्याचे आठवतेय. हा मुंबईतील पहिला आणि एकमेव वातानुकूलित स्टुडिओ होता. तोपर्यंत स्टुडिओत सुविधा किती कमी जास्त आहेत यापेक्षाही तेथे आपण किती
दर्जेदार चित्रपट निर्माण करतोय याकडे त्या काळातील निर्माता आणि दिग्दर्शकांचा जास्त कल होता. आणि या स्टुडिओंची भटकंती करताना तसा मला पहिल्यापासूनच प्रत्यय आला. काही वेगळाच फिल येई. ही प्रत्येक वास्तू मला काही सांगतेय असे सतत वाटत आलं आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबईत चित्रपट शूटिंग स्टुडिओची संख्या वाढली म्हणजेच मुंबईत चित्रपटसृष्टी खोलवर रुजत गेली.
हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकार अथवा टेक्निशियन म्हणून करिअर करायचे तर मुंबईशिवाय पर्यायच नव्हता. त्यात आघाडीच्या निर्मिती संस्था मुंबईत होत्या. काही नावे सांगायची तर व्ही. शांताराम यांची राजकमल फिल्म, राज कपूरची आर. के. फिल्म, बिमल रॉय यांचे बिमल रॉय प्रॉडक्शन्स, आनंद बंधुंचे नवकेतन, त्यातीलच मग चेतन आनंदचे हिमालय फिल्म, बी. आर. चोप्रा यांची बी. आर. फिल्म, सोहराब मोदींचे मिनर्व्हा मुवहीटोन तसेच मेहबूब खान, कमाल अमरोही, के. असिफ, रामानंद सागर, भगवानदादा , शक्ती सामंता, राज खोसला, नासिर हुसेन अशा अनेक निर्मात्यांनी मुंबईत सातत्याने चित्रपट निर्मिती केली. त्या काळात मराठी चित्रपटाची निर्मिती कोल्हापूर, मग पुणे आणि मुंबईत होई. आता मुंबई मराठी चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे.
आता मुंबईत चित्रपटसृष्टीचा इतका आणि असा पसारा वाढताना डबिंग थिएटर, मिनी थिएटरही वाढली (यातील काही स्टुडिओत होती) स्टारचे आलिशान बंगले वाढले, पंचतारांकित हॉटेलमध्ये फिल्मी पार्ट्या रंगू लागल्या. गॉसिप्स, ग्लॅमर वाढत गेले.
साधारण सत्तरच्या दशकापर्यंत चित्रपटसृष्टीबाबत समाजात आदराची भावना बळकट होती. फिल्मवाल्याना ड्रीम मर्चंटस मानले जाई. ऐशीच्या दशकाच्या सुरुवातीला रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ येताना आजच थिएटरमध्ये रिलीज झालेला चित्रपट आजच चोरट्या मार्गाने घरी दिसू लागला आणि चित्रपटसृष्टीतील वातावरणाने वेगळे वळण घेतले.
९०च्या दशकात चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्ड या नात्याने आणखीन गोची केली आणि जुन्या चित्रपटांचा शौकिन १९७५ सालापर्यंतचा सिनेमा हाच खरा असे मानू लागला. सिनेमाचे सुवर्णयुग म्हणजे १९६० ते ६५ पर्यंतचाच काळ असे मानणारा खूपच मोठा वर्ग समाजात आहे. तो सिनेमाशी एकनिष्ठ आहे आणि प्रचंड प्रामाणिक आहे.
एव्हाना हा सगळा प्रवास बहुपदरी होत गेला. नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था यांच्या काळातच काहीच गरज नसतानाही याचे नामकरण “बॉलीवूड” झाले. ते विजय आनंदसारख्याना अजिबात आवडले नाही. हे उघड उघड हॉलीवूडची नक्कल होते आणि नवीन पिढीला त्यातच हर्षवायू होऊ लागला.
आता तर काय म्हणे, सिनेमा सुपर हिट होण्याचा हुकमी फॉर्मुला असतो असे म्हणतच लेक्चर देणारे आहेत. खरं तर जोपर्यंत फस्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सिनेमाचे नक्की काय होणार याचे उत्तर कोणाहीकडे नसते. कार्पोरेट युगाला त्याची समजच नाही याचे आश्चर्य वाटते. उत्तम आणि खर्चिक मार्केटिंग म्हणजे घवघवीतपणे यश असे असते तर ‘कलंक ‘ आणि ‘ठग्ज ऑफ हिन्दुस्तान ‘कडे अतिशय वेगाने रसिकांनी पाठ फिरवली नसती.
तात्पर्य, मुंबईत चित्रपटसृष्टी प्रचंड रुजताना त्यात भलत्यसलत्या, अनिष्ट वृत्ती आणि गोष्टीही मिसळल्या. समाजातही तसाच बदल आणि बिघाड झाला. पण सिनेमा ग्लॅमरस क्षेत्र असल्याने त्यावर ठळक फोकस पडतोच. चित्रपटासह मालिकांपासून वेबसिरिज, ओटीटीपर्यंत निर्मितीचे पीक आल्याने मनोरंजन क्षेत्राची पाळेमुळे आणखीन खोलवर आणि इतरत्र पसरली.
दक्षिणेकडील स्थित्यंतर सांगायचे तर, चेन्नईत तमिळ, त्रिवेंद्रमला मल्याळम, बंगलोरला कन्नड तर हैद्राबादला तेलगू यांची चित्रपटसृष्टी फोफावली. देशाच्या इतर भागातही चित्रपट निर्मिती होऊ लागली. बंगाली, हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी, गुजराती, कोंकणी, तुळू, पंजाबी वगैरे वगैरे मिळून एकूण बावीस तेवीस लहान मोठ्या भाषेतील चित्रपट आपल्याकडे सातत्याने निर्माण होतात. पण जगभरात भारतीय चित्रपट म्हटले की,” मुंबईचे बॉलिवूड” हीच ओळख अनेक कारणांमुळे अधिकाधिक घट्ट झाली आहे, ती सहजपणे बदलणे शक्यच नाही. चित्रपटसृष्टी ही मुंबईच्या बहुरंगी बहुढंगीपणाची एक ओळख आहे. पण त्याच्या फांद्या इतरत्रही लावल्या जाऊ शकतात. आणि त्यादेखील फोफावू शकतात. तेवढा या क्षेत्राचा व्यापच महाप्रचंड आहे.