अभिनय संपन्न ९१ वर्षं – श्रीकांत मोघे
राजबिंडे व्यक्तीमत्व, प्रसन्न चेहरा आणि उमदा अभिनय यांचा एकत्र संगम म्हणजे अभिनेता श्रीकांत मोघे. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात अतिशय सहजपणे वावरणाऱ्या श्रीकांत मोघे यांचा आज ९१ वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कारकीर्दीकडे एक नजर टाकूया.
राम गणेश मोघे या कीर्तनकार पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या श्रीकांत यांचं सगळं बालपण किर्लोस्करवाडी येथे गेलं. शिक्षणानिमित्त ते पुण्यात आले. महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेताना त्यांना अभिनय आणि गाण्याची आवड निर्माण झाली. प्रत्यक्ष अभिनयक्षेत्राकडे वळण्यापूर्वी विविध क्षेत्रात मोघे यांनी केलेल्या मुशाफिरीने त्यांच्या अभिनयाला बहुआयामी पैलू प्राप्त झाला.
मॅकेनिकल इंजिनीअरिंग करणा-या श्रीकांतजींनी प्रत्यक्षात पहिली नोकरी दिल्ली आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून केली. १९६१ साली त्यांची मुंबईत बदली झाली. विविध नाटकांतून स्वत:ला आजमावताना श्रीकांत यांनी आकाशवाणीची नोकरी सोडून चक्क जे जे स्कूल आर्टच्या अप्लाईड आर्कीटेक्चरला प्रवेश घेतला.या दरम्यान तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार या त्यांच्या नाटकांची चर्चा होती. पण श्रीकांत मोघे यांना कलाकार म्हणून ख-या अर्थाने प्रस्थापित करणारं नाटक म्हणजे पु.लं देशपांडे लिखित “वा-यावरची वरात”. या नाटकात ते तीन विविध भूमिका रंगवत. त्यातही चाचाचा डान्स करणारा त्यांचा धमाल तरुण आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
त्यानंतर श्रीकांत यांची अनेक नाटकं प्रेक्षक पसंतीस उतरली. आंधळ्यांची शाळा, सीमेवरुन परत जा, लेकुरे उदंड झाली, अजून यौवनात मी, गारंबीचा बापू, गरुडझेप, मृत्युंजय, संकेत मिलनाचा ही त्यापैकी काही. ‘सीमेवरुन परत जा’ नाटकात राजबिंडा सिकंदर प्रेक्षकांना अनुभवता यावा यासाठी श्रीकांत प्रयोगाआधी चेस्ट एक्सपांडरच्या सहाय्याने वॉर्म अप करुन रंगमंचावर प्रवेश करत. त्यामुळे स्नायु अधिक पिळदार दिसून बांधा सिकंदराप्रमाणे देखणा दिसत असे.भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज होई.
नाटकातील काम पाहून श्रीकांत मोघे यांना ‘प्रपंच’ चित्रपटातील सुलोचनाताईंच्या धाकट्या दिराची महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली. पदार्पणाच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आणि नाटकासह अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने श्रीकांत मोघे यांनी प्रेक्षकमने जिंकली. ‘निवृत्ती ज्ञानदेव’, शेवटचा मालुसरा, मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, काका मला वाचवा, सिंहासन, उंबरठा, नवरी मिळे नव-याला, गंमत जंमत, मनचली, कालचक्र(हिंदी) हे त्यांचे गाजलेले काही चित्रपट.
काळासोबत पावलं टाकताना मालिकांच्या विश्वात श्रीकांत मोघे यांचे पाऊल ‘स्वामी’ मालिकेतील राघोबादादांच्या भूमिकेमुळे वळले. ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे त्यांनी साकारली. स्वामी मालिकेचे चित्रीकरण पहायला बाबासाहेब पुरंदरेंसारखी दिग्गज मंडळी आवर्जून उपस्थित रहात. कधी उग्र संतापी तर कधी माधवरावांवर प्रेम करणारा राघोबादादा श्रीकांत अशा ताकदीने उभा करत की त्या शुटींगवेळी नाटकाप्रमाणे श्रीकांतजींच्या अभिनयाला टाळ्या मिळत.
हे हि वाचा: विजया मेहता- मराठी रंगभूमीवरील समृद्ध पर्व
अशा या गुणी अभिनेत्याला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, केशवराव दाते स्मृती पुरस्कार, डॉ.काशीनाथ घाणेकर स्मृती पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. २०१२ साली सांगली येथे पार पडलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही श्रीकांतजींनी भुषवले. आज त्यांचा हा अभिनय वारसा त्यांचा मुलगा शंतनु मोघे समर्थपणे पुढे नेत आहे.
विविध क्षेत्रात मुशाफिरी करताना ते पैलू आपल्या अनेकविध भूमिकांतून प्रत्ययास आणून देणा-या श्रीकांतजींना ९१व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!