
स्वयंवराची १०४ वर्ष!
नाटकाची शंभरी सोपी गोष्ट नाही. कथा, लेखन, सादरीकरण या सगळ्याच बाबतीत नाटकाचं नाणं खणखणीत असल्या शिवाय पिढ्यानु पिढ्याते नाटक सादर करत राहावंसं वाटू शकतं नाही. मात्र विविध नाटक कंपन्यांना आजही जे खुणावतं, सादर करावसं वाटतं असं संगीत नाटक म्हणजे ‘स्वयंवर’. १० डिसेंबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीतर्फे मुंबईत झाला होता. १०४ वर्षं जुन्या नाटकाचं हे स्मरणरंजन!
नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडिलकर लिखीत – दिग्दर्शित या पाच अंकी नाटकाने संगीत नाटक ही संकल्पना ख-या अर्थाने रंगभूमीवर रुजवली. रुक्मिणी आणि कृष्णाची स्वयंवर कथा या नाटकाने मांडली. रुक्मिणीच्या भूमिकेत खुद्द बालगंधर्व तर कृष्णाच्या भूमिकेत गणपतराव बोडस होते. ही प्रेमकथा रसिकांना भावली. त्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे नाटकातील पदं. मूळ नाटकात ५७ पदं होती विविध नाटक कंपन्या त्यापैकी निवडक पदं सादर करीत. भास्करबुवा बखले यांनी चाली दिलेली पदं खुद्द बालगंधर्वांच्या मुखातून ऐकणं ही रसिकांसाठी पर्वणी असायची. ‘नरवर कृष्णा समान.. नाथ हा माझा.. मम आत्मा गमला.. मम मनीं कृष्ण सखा.. करी यदुमनी सदना.. मम सुखाची ठेव…सुजन कसा मन चोरी.. स्वकुलतारक सुता ह्या नाट्यपदांवर आजही नाट्य रसिक डोलतात.
हे देखील वाचा: वंदना गुप्ते यांच्या रंगभूमीवरील एंट्रीची ही धमाल गोष्ट !
‘संगीत स्वयंवर’ हे मराठी रंगभूमी वरील सर्वात श्रीमंत नाटक म्हणता येईल. शब्दशः या नाटकाने अत्तराचे दिवे लावण्याचा अनुभव रसिकांना दिला. अत्तरात न्हाऊन निघालेले बालगंधर्वांचे भरजरी शालू प्रेक्षकांना श्रीमंती सुवासिक अनुभव देत. ही अत्तरं पॅरिसहून खास मागवण्यात आली होती. रुक्मिणीचे दागिनेही खास घडवण्यात आले होते. हे सारं ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्र पाहण्यासाठी रसिक गर्दी न करते तर नवल!

या नाटकाने ख-या अर्थाने गंधर्वयुगाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. खाडीलकरांचे हे तिसरे नाटक. संगीत रंगभूमीची नाडी ओळखून या नाटकाने प्रेक्षकांना बांधून टाकलं. आजही नवनव्या नटसंचात निवडक नाट्यपदांसह हे नाटक कलावंतांना सादर करावंसं वाटतं यातच या नाटकाचं यश सामावलेलं आहे.