पोलीस स्टेशन मधील ‘झंकार’ प्रेमगीत
एखादे गाणे जेव्हा चित्रपटातील प्रसंगांना अनुसरून असतं किंवा कथेला पुढे घेऊन जाणारं असतं, तेव्हा त्या गाण्याची रंगत अजूनच वाढते. ‘शेंटिमेंटल’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक समीर पाटील आणि संगीतकार मिलिंद जोशी यांची भेट झाली. मिलिंद त्या चित्रपटाचे संगीत करणार होता. पोलीस सेवेत कार्यरत असणारा एक तरुण आणि एक तरुणी यांच्यातील प्रेमाची ती कथा होती आणि पोलीस स्टेशन मध्येच प्रेमगीत चित्रित झालं पाहिजे, असं ठरलं होतं.
समीर पाटीलने मिलिंदला सांगितलं की तुला ही काही सुचलं आणि तू शब्द रचना केलीस तरी काही हरकत नाही. मिलिंद जोशी याच्या पुढे हे एक मोठे आव्हान होते कारण पोलीस स्टेशन मध्ये प्रेमगीत चित्रित करायचे आहे, म्हणजे गाण्यात निसर्ग, झाडे, पाने, वेली काही नाहीत. गाण्यामध्ये पोलीस स्टेशन मधील दृश्येही येणार होती. मिलिंद स्वतः पूर्वी जाहिरात क्षेत्रात देखील कार्यरत असल्याने त्याला एखाद्या गोष्टीचे व्हिज्युअलायझेशन उत्तम जमतं. त्याने शब्द लिहिले,’इथंच झाला तुझ्या नि माझ्या हृदयाचा झंकार, इथंच मांडू तुझ्या नि माझ्या प्रेमाचा संसार’. दिग्दर्शक समीर पाटील यांना ते शब्द खूप आवडले. पोलीस स्टेशन, तिथलं वातावरण, ठेवलेल्या फाईल्स, चाललेला व्यायाम, मध्येच चोराला पकडून आणणं या सर्वांच्या साक्षीनं त्या दोघांचं प्रेम फुलतं, असं उत्तम पद्धतीने गाणे चित्रित करायचे ठरले.
या गाण्याला संगीत देताना मिलिंद जोशी स्पॅनिश गिटार, मेलडीज यांचा वापर तर केला आहेच, पण आजच्या काळाला हे गीत कसं योग्य ठरेल याचाही विचार केला. आजच्या ट्रेंड मध्ये हे गीत पूर्ण योग्य वाटलं पाहिजे, असा विचार मिलिंद याने संगीतकार या नात्याने केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये गाणे चित्रित होणार असल्याने तो तरुण लग्नाच्या बंधनात अडकला हे दाखवताना तो तरुण आणि ती तरुणी या दोघांच्याही हातात बेड्या दाखवल्या आहेत. विकास पाटील आणि पल्लवी पाटील यांच्यावर हे गीत चित्रित झालं आहे.
हे हि वाचा : ‘हरहुन्नरी’ असा आपला तुषार साळी सगळ्यातच भारी !
हे गीत अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांच्या स्वरात रेकॉर्ड झाले. अवधूतच्या आवाजात तो मराठी बाणा सुद्धा आहे आणि अर्थात प्रेमगीत गातानाचा जो एक स्टायलिश नखरा म्हणता येईल तो देखील आहे. या गीतात ‘संसार’ या शब्दाचा उच्चार मुद्दामहून हिंदी मधील ‘संसार’ शब्दाप्रमाणे केला आहे. आपण शहरी वातावरणात एकदम मिसळून जातो, तेव्हा आपले काही शब्दांचे उच्चार बदलतात, असा विचार देखील एक संगीतकार या नात्याने मिलिंदने इथे केलेला दिसतो.
अशोक सराफ, उपेंद्र लिमये हे सुद्धा या गाण्यात आहेत. या गाण्याचे संगीत संयोजन मिथिलेश पाटणकर याने केले आहे. मिलिंद जोशी याने गीतकार आणि संगीतकार या दोन्ही भूमिकांना उत्तम न्याय दिला आहे.