
ढाले पाटलांचे ‘राजा राणी’ तमिळमध्ये
कोणत्याही कलाकृतीच्या टीमचा आनंद यामध्येच असतो की त्या कलाकृतीला लोकांनी इतके पसंत करावे की भाषेची बंधने पार करत ती कलाकृती असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी. अनेक पुस्तकांचे अनुवादन होत असते ते याच कारणाने. सिनेमे, नाटक यांचेही भाषांतर होऊन ते जगातील इतर भाषा जाणणाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात असते. सिनेमांच्या राज्यात तर रिमेक हा शब्द प्रत्येकाच्या ओळखीचा. हिंदीसह प्रादेशिक भाषांमधील सिनेमा नेहमीच प्रेक्षकांपर्यंत रिमेक करून पोहोचत असतो आणि तो हिटही होत असतो.
अशाच प्रकारचा रिमेक राजा राणीची गं जोडी या मालिकेचाही होणार आहे आणि लवकरच ऑनस्क्रीन दिसणारी रणजित ढाले पाटील व संजीवनी ढाले पाटील ही मराठी जोडी तसेच या मालिकेतील बांदल फॅमिलीचा खानदानी अंदाज आता तमिळ भाषेतून मालिकेच्या रूपाने तयार होणार आहे. तमिळमधील राजा राणीच्या जोडीवरही असंच प्रेम करा असे म्हणत अभिनेता मणिराज पवार आणि शिवानी सोनार यांनी ही गुड न्यूज सोशलमीडियावर शेअर केली आहे.
हे देखील वाचा: वंदना गुप्ते यांच्या रंगभूमीवरील एंट्रीची ही धमाल गोष्ट !
राजा राणीची गं जोडी या मालिकेला काही दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झाले. सांगलीमध्ये सुरू असलेल्या या मालिकेच्या शूटिंगसाठी सगळ्या कलाकारांचा मुक्कामही सांगलीतच आहे. शूटिंग जरी सांगलीत असले तरी मालिकेची कथा कोल्हापुरात घडत असल्याचे दाखवण्यात आल्याने या मालिकेतील रांगड्या भाषेतील संवाद प्रेक्षकांना खूपच आवडले. सध्या या मालिकेत नायिका संजीवनी ही लग्नासाठी सज्ञान नसल्याचे उघड झाल्याने त्या खोटेपणाचा दोष नायक रणजितने संजीवनीला दिला आहे. म्हणूनच एरव्ही प्रेमालापात चिंब असलेल्या या ऑनस्क्रीन राजाराणीच्या जगात दुरावा आला आहे. अत्यंत उत्सुकता वाढवणाऱ्या ट्रॅकवर सध्या ही मालिका आहे.
मणिराज आणि शिवानी नेहमीच या मालिकेच्या ऑफस्क्रीन मजामस्तीचे व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच मालिकेच्या महाएपिसोडच्या निमित्ताने अनेक कलाकार लाइव्ह गप्पाही मारत असतात. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले, गार्गी फुले या देखील आहेत. अवघ्या शंभर भागांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेल्या या मालिकेची उत्तम कथा, ओघवते सादरीकरण, सगळ्याच कलाकारांचा सकस अभिेनय हा यूएसपी आहे.
आज समाजात अनेक कारणांनी मुलीचे लग्न १८ वर्षे पूर्ण होण्याआधी केले जाते. पण हे बेकायदेशीर आहे. या मालिकेच्या कथेची वनलाइन स्टोरीही अशीच आहे. एका विचित्र परिस्थितीत १७ वर्षाच्या संजीवनीचे रणजितसोबत लग्न होते. तिच्या वडीलांनी खरंतर ही फसवणूक केली आहे आणि त्यासाठी संजीवनीवरही दबाव टाकला आहे. खूपवेळा ही गोष्ट रणजितला सांगावी असे वाटत असूनही संजीवनीकडून ते धाडस होत नाही. जेव्हा ही गोष्ट उघड होते तेव्हा सगळी घडीच विस्कटते. सध्या मालिका या वळणावर आली आहे.
राजा राणीची गं जोडी’ फेम ‘रणजित’ अभिनेता मणिराज पवार राजा राणीची गं जोडी’ फेम ‘संजीवनी’ म्हणजेच शिवानी सोनार
गेल्याच आठवड्यात मालिकेतील कलाकारांना निर्मिती टीमच्यावतीने सांगण्यात आलं की आपल्या राजा राणीची गं जोडी या मालिकेचा रिमेक होणार आहे. तेव्हा खरंतर कलाकारांना वाटलं की ही मराठी मालिका हिेंदी भाषेत प्रसारीत केली जाईल. कारण आजपर्यंत अशा अनेक हिंदी मालिकांवर मराठी मालिका किंवा मराठी मालिकांवर हिंदी मालिका दाखवण्यात आल्या आहेत. सध्या फुलाला सुगंध मातीचा या मालिकेची कथा ही दिया और बाती हम या मालिकेच्या कथेशी मिळती जुळती आहे.
हे वाचलंत का: ‘मोरूच्या मावशी’ची सोनेरी वाटचाल
असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ही मराठी मालिका उतरन या मालिकेचाच मराठी आविष्कार होती. पण जेव्हा कलाकारांना कळालं की आपली मालिका थेट तमिळ भाषेत रिमेक होणार आहे तो आनंद सेटवर दणक्यात साजरा करण्यात आला. सध्या तरी ही मालिका तमिळ भाषेतील कोणत्या वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे किंवा त्यामध्ये कोणते कलाकार दिसणार आहेत ही माहिती गुलदस्त्यातच आहे.

या मालिकेचा नायक मणिराज पवार सांगतो, ही माझी पहिलीच मालिका आहे. माझ्या मालिकेला तर प्रेक्षकांनी कौतुकाची थाप दिलीच पण आता आमची कथा एका वेगळ्या भाषेत मांडली जात असल्याची आनंद वेगळाच आहे. नायिका शिवानी सोनार सांगते, यापूर्वी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत लक्ष्मी ही छोटी भूमिका केली होती. पण मला खरी ओळख दिली ती या मालिकेतील संजीवनीच्या भूमिकेने. तमिळ भाषेतील राजा राणी ची जोडी पाहण्यासाठी आम्ही दोघेही आतूर आहोत असंही मणिराज आणि शिवानी यांनी या खास व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
-अनुराधा कदम