‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
“इरॉस थिएटर” प्रदर्शित चित्रपटांचे माहेरघर…
प्रत्येक चित्रपटगृहाला आपलं स्वतःचे असे एक व्यक्तीमत्व आहे अथवा असते असे मी म्हणेपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर आपापल्या विभागातील चित्रपटगृहे नक्कीच आली असतील…. इरॉस थिएटरचे एकूणच व्यक्तीमत्व साहेबी थाटाचे/रुबाबाचे आणि इंग्रजकालीन वास्तुशास्त्राचा अतिशय उत्तम प्रत्यय देणारे. महत्वाचे म्हणजे त्याचा स्पॉट मुंबईतील एका अतिशय महत्वाच्या ठिकाणचा. चर्चगेट स्टेशनबाहेर पडल्यावर अगदी समोरच त्याची भव्य इमारत. १९३८ साली हे चित्रपटगृह सुरु झाले. आर्किटेक्ट शोराबजी भेडवार यानी ही Art deco style ची भव्य देखणी इमारत उभारली.
या बिल्डिंगचे स्वरुप Streamline Moderne असे आहे. या चित्रपटगृहात स्टॉल, अप्पर स्टॉल आणि बाल्कनी अशी मिळून १,२४० अशी आसनक्षमता आहे. आपल्या देशातील सर्वच मोठ्या शहरातील जुन्या एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सची आसनक्षमता हजार आणि त्यापेक्षा अधिक अशीच असल्याचे दिसून येईल. फार पूर्वी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहे हाच मार्ग होता. ग्रामीण भागात फिरता सिनेमा, टूरिंग टॉकीज, तंबू थिएटर असे काही पर्याय होते.
इरॉस हे प्रामुख्याने इंग्रजी सिनेमाचे थिएटर. दक्षिण मुंबईतील रिगल, स्टर्लिंग, इरॉस, मेट्रो ही प्रामुख्याने इंग्रजी सिनेमाची थिएटर म्हणून ओळखली जात. त्यामुळे तेथील हायफाय ऑडियन्स, तेथील कल्चर, वातावरण अगदी वेगळे. गिरगावातील आम्ही मध्यमवर्गीय मराठी माणसे या इंग्रजाळलेल्या थिएटरकडे अदबीने पाहत असू. हे त्या काळाचे वैशिष्ट्य होते म्हणाना. हळूहळू येथे हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. मेट्रो थिएटरमध्ये ‘अन्नपूर्णा’ (१९६८) पासून मराठी चित्रपटही रिलीज होऊ लागले. मी इरॉसला माझ्या कॉलेजमधील मित्रांसोबत ब्रूस लीचा ‘एन्टर द ड्रॅगन’ हा चित्रपट पाहिला तेव्हा तेथे अप्पर स्टॉलचे तिकीट दर चार रुपये चाळीस पैसे असे होते.
ऐशीच्या दशकात मी मिडियात आल्यावर इरॉसशी नाते निर्माण झाले. एक म्हणजे, इरॉसवरुनच नवशक्ती/फ्री प्रेस जर्नलला जाण्यासाठी शेअर टॅक्सी मिळे. त्याचे पैसे वाढले तरी ती सवयीची झाली. तर याच इरॉसमध्ये वरच्या मजल्यावरच्या मिनी थिएटरमध्ये आम्हा चित्रपट समिक्षकांसाठी प्रेस शो असत. तेथील वेताच्या छडीच्या प्रशस्त अशा खुर्च्या अतिशय आरामदायक असत. या मिनी थिएटरमध्ये अगणित मराठी आणि हिंदी चित्रपट पाहिले. ‘गंमत जमंत’ च्या प्रेस शोला वर्षा उसगावकर हजर होती. तर ‘काफिला’ या हिंदी चित्रपटात भूमिका साकारली म्हणून उदय टिकेकर या चित्रपटाच्या येथील प्रेस शोच्या वेळी आवर्जून आल्याचे आठवतेय. या चित्रपटात जुही चावला, मकरंद देशपांडे, परेश रावल इत्यादींसह उदय टिकेकरची प्रमुख भूमिका आहे. तर ‘वास्तव’ चा प्रेस शो संपल्यावर आम्हा समिक्षकांचे मत जाणून घेण्यास महेश मांजरेकर आला होता.
हे वाचलंत का: सिंगल स्क्रीन वा मल्टीप्लेक्स, लोकांना थेटर्सकडे खेचून आणणारा बॉक्स ऑफिस किंग – सलमान खान!
राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘घायल’ च्या इरॉस मिनी थिएटरमधील प्रेस शोच्या वेळची आठवण ‘ओली’ आहे. ‘घायल’ च्या मध्यंतरमध्ये निरोप मिळाला की सनी देओल आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून जवळच्याच एका तारांकित हॉटेलमध्ये पार्टी देऊन आम्हा प्रत्येकाची मते जाणून घेणार आहे आणि खरोखरच तो आला आणि आम्हा प्रत्येकाशी बोलला तेव्हा त्याच्या लक्षात आले, पिक्चर हिट है. इरॉसच्या अशा काही आठवणी आहेत. तर कधी काही चित्रपटांचे वेगळे प्रेस शो न करता मेन थिएटरची तिकीटे आम्हा सिनेपत्रकाराना दिली जात.
त्यातील विशेष आठवण म्हणजे, उर्मिला मातोंडकरला स्टार केलेल्या ‘रंगीला’ चे मेन थिएटर इरॉसच होते आणि पहिल्या दिवशीचे ( ८ सप्टेंबर १९९५ अनंत चतुदर्शीचा दिवस होता) आम्हा सिनेपत्रकाराना तिकीट दिले असता कॉमन मॅनसोबत असा काही पिक्चर एन्जॉय केला की आपण समिक्षक आहोत हे मी विसरलो. म्हणूनच ‘रंगीला’ जास्त आवडला. तर प्रियदर्शन दिग्दर्शित ‘विरासत’, विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘राज’, मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘कार्पोरेट’ हे चित्रपट इरॉसच्या मेन थिएटरमध्ये ऑडियन्ससोबत आम्हा समिक्षकांना दाखवले.
एक वेगळी आठवण सांगतो, के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ (१९६०) पहिल्या वेळी मराठा मंदिर चित्रपटगृहात अतिशय भव्य डेकोरेशनने रिलीज होताना त्याची हत्तीवरुन प्रिन्ट आणण्यात आली. तेव्हा यात मधुबालाचे ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे तेवढे रंगीत होते. कालांतराने नवीन तंत्रज्ञानाने हा चित्रपट संपूर्णपणे रंगीत करण्यात आला. २००४ च्या दिवाळीत इरॉस थिएटरवर पुन्हा त्याची प्रिन्ट अशीच हत्तीवरुनच आणण्यात आली. (यावेळी या चित्रपटाचे मेन थिएटर इरॉस होते) विशेष म्हणजे, या रोमहर्षक क्षणाचे आम्ही चित्रपट समिक्षक साक्षीदार झालो.
याशिवाय बरेच चित्रपट इरॉसला रिलीज होत राहिले (पण त्याचे प्रेस शो राजकमल कलामंदिर स्टुडिओ अथवा चित्रनगरीतील मिनी थिएटरमध्ये आम्ही पाहिले). इरॉसमध्ये रिलीज झालेल्या काही चित्रपटात अरुणा विकास दिग्दर्शित ‘शक’, नाना पाटेकरचा जबरा व्हीलन असलेला विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘परिंदा’ (१९८९ च्या दिवाळीच्या दिवशी), शिल्पा शिरोडकरचा पहिला चित्रपट रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘भ्रष्टाचार’, ‘मेरे दिल की धडकन मे’ अशा म्युझिकल हिटचा धडकन, ऐश्वर्या रॉयचा पहिला चित्रपट राहुल रवैल दिग्दर्शित ‘और प्यार हो गया’, आमिर खान व मनिषा कोईरालाचा इंद्रकुमार दिग्दर्शित ‘मन’, मल्लिका शेरावतचा ‘मर्डर’, रामगोपाल वर्माचे मस्त, सत्या, जंगल (आपला ‘रंगीला’ ज्युबिली हिट झाल्याचेच थिएटर रामूच्या चित्रपटाच्या वितरकाला हवेसे झाले तरी ‘रंगीला ‘सारखे यश ‘सत्या’ ने मिळवले.)
हे देखील वाचा: जोधा अकबर- भव्यदिव्य प्रेमकथा साकारताना..
आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ (पहिल्याच आठवड्यात दिलीप वेंगसरकरला याच इरॉसमध्ये ‘लगान’ पाहायला खास आमंत्रित करुन त्याची मोठी बातमी करण्यात आली. ‘लगान’ इरॉसला साजेसाच सिनेमा), कमल हसनचा ‘हिन्दुस्तानी’, जे. पी. दत्ताचा ‘एलओसी कारगील’, संजय दत्तचा ‘दाग द फायर’, ह्रतिक रोशनचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’, शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या भूमिका असलेला ‘फायर’ या चित्रपटांचे मेन थिएटर इरॉस हे होते. ‘फायर’ च्या वेळी शिवसेनेने या चित्रपटातील थीमविरुध्द जोरदार आंदोलन केले होते. संजय कपूरचे रुपेरी पदार्पण लांबलेला ‘प्रेम’ हे सगळे आणि इतर अनेक इरॉसमध्ये रिलीज झाले. (त्या काळात नवीन चित्रपट रिलीज करण्यात मेन थिएटर एक विशेष फंडा असे. येथे रिलीज झालेला चित्रपट रसिकांना आवडला तर शंभर दिवसाचे अथवा पंचवीस आठवड्याचे यश निश्चित).
इरॉसमध्येच ‘चिमणी पाखरं’ या मराठी चित्रपटाचा एक खास खेळ आयोजित करण्यात आला होता. इरॉसची अगदी वेगळी आठवण सांगायची तर, फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ मधील सैफ अली खान व सोनाली कुलकर्णीवरचे हे इरॉसमध्ये सिनेमा पाहत असताना त्यात ‘वो लडकी है कहा’ हे गाणे इमॅजिन करतात. इरॉसलगतची दुकाने हा वेगळा विषय आहे. एकात असलेल्या मिनी हॉलमध्ये पूर्वी टीव्ही मालिकांच्या प्रेस कॉन्फरन्स होत. तर इरॉसच्या मागच्या बाजूचा बिअर बार म्हणजे ‘जरा बसू आणि उशिराची ट्रेन पकडू’ असा मेंदूला सूचना करण्याची जागा.
असे ८२ वर्षे जुने इरॉस थिएटर दोन वर्षांपासून बंद आहे आणि त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर काम सुरु असल्याचे दिसतेय. या थिएटरची मालकी खंबाटा एव्हीएशनकडे आहे. इरॉसच्या मुख्य हॉलमध्ये फेरफार करून तेथे दोन थिएटर करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. स्टर्लिंगमध्ये तेच केले आहे तर मेट्रो थिएटरमध्ये चार मिनी थिएटर करण्यात आली आहेत. म्हणजे, बाह्यांग अर्थात मूळ रुपडे कायम ठेवून आतमध्ये बदल करायचा. आज हजार बाराशे प्रेक्षकसंख्या असणारी थिएटर हाऊसफुल्ल होण्याची परंपरा संपुष्टात येत आहे. मल्टीप्लेक्समध्येही पहिले तीन दिवसच प्रेक्षक असतात. ‘कलंक’ अथवा ‘ठग्ज ऑफ हिन्दुस्तान’ सारखा भ्रमनिरास झाला तर पहिल्या दिवशी संध्याकाळीच गर्दी ओसरते. आता तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरिज पाहायची सवय वाढत असताना तर एकूणच चित्रपटगृह संस्कृतीचे भवितव्य काय??? हा प्रश्न वाढत चालला आहे.
इरॉससारखी थिएटर मात्र आपल्या वास्तूकलेचा उत्तम नमुना आणि अनेक सुपर हिट (तर काही फ्लॉप्स चित्रपट) यासाठी कायमच ओळखली जातात. दक्षिण मुंबईतील एकूणच सरकारी, खाजगी आणि कार्पोरेट कार्यालयीन संस्कृतीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले असेच हे थिएटर आहे.