“स्टार पुत्र”: एक नवीन संकल्पना…
सलग चार वर्षे “फिल्मी मिडिया”त टॉपवर राहिलेले एकच नाव, “तैमूर अली खान पतौडी”. त्याच्या चौथ्या वाढदिवसाचीही (२० डिसेंबर) बातमी होणे अगदी स्वाभाविक च होते. राज कपूरचा पणतु (त्याची नात करिना कपूरचा मुलगा) आणि शर्मिला टागोरचा नातू (सैफ अली खानचा मुलगा) या गुणवत्तेवर त्याला मिडियात भरपूर “स्पेस” मिळतेय असे अजिबात नाही. तो जन्मल्यापासूनच बातमीत आहे ही मात्र “रिऍलिटी” आहे. तोंडात न्यूज पेपर अथवा चॅनल फोकस घेऊनच त्याचा जन्म झाला आहे. करिना आणि सैफ तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आपापल्या खानदानात जन्माला आले. पण तैमूरचा जन्म झाला तोच फोकसमध्ये राहत.
ही एक नवीन कल्पना आहे. मिडियाच “चोवीस तास” बातम्या देतेय म्हटल्यावर त्यात लहान मोठ्या सेलिब्रेटिज समावेश होतोच. पण एक आहे, मिडिया स्टार घडवत नाही, अन्यथा “सुनील देव आनंद” ही स्टार झाला असता, या देवपुत्राला मेहबूब स्टुडिओमध्ये “मै तेरे लिये” च्या मुहूर्ताला “मीनाक्षी शेषाद्री” समोर हरवलेला पहिला, तेव्हाच त्यात “देव आनंद” चा कोणताही गुण नाही हे लक्षात आलं. तो “देव आनंद” चा मुलगा म्हणून त्या काळात त्याच्या भरपूर मुलाखती घेतल्या गेल्या. म्हणून तो स्टार झाला नाही. “आनंद और आनंद” चित्रपट पाहताना “देव आनंद” जास्त लक्ष वेधून घेत होता यातच “सुनील आनंद” चे अपयश स्पष्ट दिसते. हा चित्रपट हिट होईल या आशेने “देव आनंद” ने तो रिलीज होण्यापूर्वीच “विजय आनंद” दिग्दर्शित “मै तेरे लिये” चा मुहूर्त केला. देवने पहिल्यांदा अशी चूक केली.
हे वाचलंत का: बेगम पारा: भारताची पहिली बोल्ड अभिनेत्री…
स्टार सन्सना मिडियाने चिक्कार कव्हरेज देण्याचा ट्रेण्ड ऋषि कपूर, कुमार गौरव, संजय दत्त, सनी देओल, मोहनीश बहेल अशा “वयात आलेल्या स्टार” पासून सुरु झाला. तेही आपल्या स्टार पालकांप्रमाणेच सिनेमात आले याचे त्यामागे विशेष कौतुक होते. करिष्मा कपूर, बॉबी देओल, ट्वींकल खन्ना असे स्टार सन्स येत गेले तेव्हा “ही मुले त्यांच्या पहिल्या चित्रपटात कशी चमकताहेत, पालकांचे कोणते गुण त्यांच्यात आहेत” याचे कुतूहल होते.
तेही एकाच वेळेस हिंदी चित्रपटसृष्टी, मिडिया आणि चित्रपट रसिक असे सगळ्यांनाच होते. ह्रतिक रोशन, करिना कपूर अशा सगळ्याच स्टार सन्सची नावे पुन्हा पुन्हा सांगायला नकोच. काजोलचा पहिला चित्रपट राहुल रवैल दिग्दर्शित “बेखुदी” च्या फिल्मालय स्टुडिओतील मुहूर्ताला तिची आजी शोभना समर्थ, आई तनुजा देखील आल्याने तीन पिढ्या एकत्र पाहायचा योग आला. तीच बातमी केली. “अक्षय खन्ना” ची आम्हा सिनेपत्रकाराना ओळख करून देण्यासाठी विनोद खन्नाने आम्हा काही सिनेपत्रकाराना आपल्या “हिमालयपुत्र” (दिग्दर्शक पंकज पराशर) च्या डलहौसी (हिमाचल प्रदेश) येथे शूटिंग रिपोर्टीगसाठी नेले. तुषार कपूरच्या रुपेरी पदार्पणानिमित्ताने विलेपार्ले स्कीममधील आपल्या कृष्णा बंगल्यावर आम्हा काही सिनेपत्रकाराना दिलेल्या पार्टीत चक्क जितेंद्र भाव खाऊन गेला. अभिषेक बच्चनच्या रुपेरी पदार्पणाची चर्चा देखील बरीच रंगली.
अनेक स्टारपुत्रांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी, कथा, किस्से सांगता येतील. पण हे सगळे स्टार सन्स “वयात येता येताच सिनेमात आले” म्हणून मिडियाने त्यांची दखल घेतली. “देव आनंद” ची मुलगी “देविना” याच क्षेत्रात आलीच नाही, त्यामुळे तिच्याकडे मिडियाचे लक्ष जाणे शक्यच नव्हते. स्टार पुत्र जन्माला येताच त्याची बातमी होण्याचा पहिला लाभ राजेश खन्ना आणि डिंपलला झाला. राजेश खन्नाने अगदी मान वळवून बाजूला पाहिलं तरी त्याची बातमी होण्याचे ते मंतरलेले दिवस होते. त्यात पुन्हा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच (म्हणजे २९ डिसेंबर) त्याला मुलगी झाली हाही योगायोग होताच. पण ट्वींकल खन्नाचे बालपण बातम्यांमध्ये नव्हते. एका गॉसिप्स मॅगझिनच्या मुखपृष्ठासाठी राजेश खन्नाने आपल्या दोन मुली आणि डिंपलसह स्वीमिंग पूलवर फोटो सेशन केले इतकेच. तेव्हा मिडियाही ट्वींकलच्या छोट्या छोट्या, आणखीन छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवून नव्हता.
हे देखील वाचा: चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…
अमिताभ जयाला पहिला मुलगा व नंतर मुलगी झाल्यावर अगदी छोटीशी कुठे बातमी आली इतकेच. स्टारच्या मुलांचे शिक्षण, त्यांचे खेळ, त्यांचे मित्र याची बातमी होऊ शकत नाही असा एक अलिखित रिवाजच होता. आणि तेच गरजेचे होते. अन्यथा अशी मुले आपल्यावरचा न्यूज फोकस कसा हो पेलणार??? त्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होऊ शकतो.
शाहरूख खानपासून “स्टार सन्स” च्या गोष्टीत काही बदल होत गेले. “शाहरूख खान” हे नाव नाही, एक प्रकारचे प्रॉडक्ट्च आहे असे जणू मानतच त्याने स्वत: सह आपली पत्नी गौरी, तसेच मुलांसह जमेल तेव्हा आणि तसे फोकसमध्ये आणायला सुरुवात केली आणि मग त्याची त्याला आणि आपल्याला सवयच झाली. एव्हाना, चॅनल संस्कृती आणि मग डिजिटल मिडिया आला, वेगाने रुजला आणि मग “सिनेमावरचा फोकस” च उडाला. सिनेमा हा आता फक्त आणि फक्त त्याचे प्रमोशन आणि गोडधोड मुलाखती घाऊकपणे देणे इतकाच राहिला. जोडीला “पहिल्या तीन दिवसांत” किती कोटी कमावले (मराठी असेल तर चारेक, हिंदी असेल तर जवळपास शंभर कोटी) अशा सपोर्ट सिस्टीम बातमी पुरताच राहिला. स्टारच्या पडद्यावरच्या दिसण्यापेक्षा इंस्टाग्रामवर तो कसा दिसतोय, फोटो कसे पोस्ट करतोय याला महत्व आले. बदल होतच असतो आणि होणारच असतो, पण तो असा???
बरं, पूर्वी दैनिकात आठवड्यातून एक दिवस सिनेमाचे पान (त्यात काही जाहिराती) असे आणि त्या जागेचा वापर करताना समिक्षणातून जी जागा मिळेल त्यात सिनेमाचा मुहूर्त, त्याचे शूटिंग किती झाले अशा “सिनेमाला पूरक” बातम्या असत. गॉसिप्स मॅगझिनमधून ग्लॅमरस, बोल्ड/हॉट फोटोंना जास्त स्पेस मिळे. त्यात बड्या स्टारची मुले आईस्क्रीम खातात काय, कार चालवतात काय अशा गोष्टीना अजिबात थारा नसे. त्याची प्रायव्हसी जपली जाई. नंतर मात्र, काहीही गरज नसताना एखाद्या अभिनेत्रीला तुला मुलगा कधी होणार??? असा अतिशय खाजगी प्रश्न विचारला जाऊ लागला.
जुहूच्या आपल्या बंगल्यावर आम्ही तीन चार सिनेपत्रकारानी शिल्पा शेट्टीशी संवाद साधला असता एका पत्रकाराने शिल्पाला चक्क तसा प्रश्न केला तेव्हा शिल्पाचा चेहरा रागाने लालबुंद होत असतानाच तिने संयम राखत म्हटले, अशा ‘प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तुम्हाला घरी बोलावले नाही’… आता त्या पत्रकाराचा चेहरा पाहण्यासारखा झाल्याचे मी प्रत्यक्षात अनुभवले.
पण आता हे सगळे मागे पडलयं. सोशल मिडियाच्या युगात तर “सिनेमाच्या जगता” ची चोवीस तासातील कशाचीही बातमी होतेय. अशातच तैमूर खानचा जन्म झाला आणि त्याच्या नावावरुनच वाद निर्माण झाला. तो मिटला तरी तैमूर पतौडी नवाबांच्या खानदानात जन्माला आला आणि मग त्याच्या प्रत्येक गोष्टीची बातमी होऊ लागली. यावरून ज्यांनी नाराजी व्यक्त केली, टीका केली ते जुन्या वळणाचे ठरले. कोणी तरी म्हटलेही, अजून एकादा स्टार पुत्र जन्माला येईपर्यंत तैमूरला टीआरपी भारी राहिल. लॉकडाऊन शिथिल होताच सैफ आणि करिना तैमूरला घेऊन नरिमन पॉइंटला फिरायला घेऊन आले तेव्हा मास्क न लावल्याची बातमी झाली नसती तरी तैमूरमुळे या क्षणाला न्यूज व्हॅल्यू होतीच.
आता, आपणाकडे लवकरच गुड न्यूज आहे, असे सेलिब्रेटींनी सांगण्याचा ट्रेण्डही आला आहे. तेही बरे झाले. अन्यथा, त्यावरून प्रश्न झाले असते आणि अनुष्का शर्मा नाही तरी विराट कोहली भडकला असता (एका नवीन कॉंट्रोव्हर्सीला जन्म). तैमूरलाही लवकरच भावंडं येणार. आणखीन काही स्टार पुत्र जन्माला येतीलच, ते सगळेच तोंडात न्यूज पेपर अथवा चॅनलचा हेड फोन घेऊन आले तर अजिबात आश्चर्य नको. वाचक/प्रेक्षकांना या अशा गोष्टी खूपच आवडतात, लाईक्स भरभरून मिळतात, म्हणून तर या बातम्या द्याव्याच लागतात. (असे म्हणतात. असेलही. उगाच कोणी इतका वेळ वाया घालवणार नाही)
एकेकाळी सिनेमा म्हणजे छान टाईमपास असे मानणारा मोठाच वर्ग होता. आता “फिल्मी न्यूज” म्हणजे फुल्ल टाईमपास असे मानणारा मोठाच वर्ग निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर, सिनेमाचे तंत्र, भाषा, संस्कृती आणि वाटचाल या सगळ्याचा विचार करुन सिनेपत्रकारीता करणार कधी??? त्यासाठी सिनेमाचे दृश्य माध्यम विचारात घेऊन काम करायला हवे. केवढी लॉन्ग प्रोसेस हो? त्यापेक्षा स्टार पुत्र जन्माला येताच त्याच्या वाढीसोबत बातम्या देत राहणं सोपे आहे…. भविष्यात कदाचित असे अनेक स्टार पुत्र लहानाचे मोठे होत असताना त्यात आणखी एका गोष्टीची भर पडायची, ते म्हणजे असा सिलसिला सुरुच राहणार आहे, हे सगळे पाहता, अशा स्टार पुत्रांच्या “बालपणीच्या गोष्टी” कव्हर करण्यासाठी मिडियात एक जागा ठेवली जाईल अथवा सिनेमा बीटवर असलेल्याला “तो सिनेमा पाहायची इतकी काही गरजच नाही, स्टारच्या मुलांच्या घडामोडीकडे लक्ष ठेव” असे सांगितले जाऊन, “सिनेमा बाजूला ठेवूनच सिनेमा जगताच्या बातम्या” कव्हर करण्याचे युग येईलही.
सध्या सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना हा देखील बदल होईलच. कधी काळी, स्टार पुत्र सिनेमात आल्यावर त्याची बातमी होई आणि मग त्याची मुलाखत, स्क्रीन प्रेझेंटेस, त्याच्या शैलीची पित्याशी तुलना अशा गोष्टी होत. त्याही आता मागे पडल्या ना? तसेच आता “स्टार पुत्र रडत होता” या बातमीकडे लक्ष द्यावे लागेल…आणि पुन्हा एकदा तैमूर खानला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याने आपल्यावरचा वाढदिवसाचा फोकस कायम ठेवण्यात यश मिळवले. यालाच “खरा स्टार” म्हणतात.