‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
म्युझिकल हिटमुळे ‘कटी पतंग’ पन्नाशीतही फ्रेश
राजेश खन्नाची (Rajesh Khanna) अतिशय जबरा क्रेझ ज्यांनी अनुभवली त्यांनाच माहित, तो एक प्रकारचा हिस्टेरिया होता आणि तो शब्दात पकडता येणे शक्यच नव्हते. वय वर्ष सात ते सत्तर सगळेच राजेश खन्नाच्या अखंड प्रचंड प्रेमात. माझे ते शालेय वय होते आणि त्या काळात शाळेतून वर्षभरात एकदा एक आदर्श चित्रपट आम्हा विद्यार्थ्यांना दाखवला जाई.
असाच एक महत्त्वाचा होता ‘प्रार्थना’ (१९७१). आमच्या गिरगावातील रॉक्सी थिएटरमध्ये (Roxy Cinemas) तो पहायला आम्ही शालेय विद्यार्थी गेलो तेव्हा ‘याच रॉक्सी थिएटरमध्ये राजेश खन्नाचा आराधना सॉलिडच चालला होता’ अशी आमची कौतुकाची पण अगदी हळू आवाजातील चर्चा रंगली (शिक्षक काय म्हणतील याची भीती होती). ‘प्रार्थना’च्या मध्यंतरमध्ये शाळेने सर्वांना बिस्किटे दिली आणि ती खायला सुरुवात करणार आणि मध्यंतरनंतरच्या चित्रपटात रमणार तोच ‘कटी पतंग’चा ट्रेलर सुरु झाला रे झाला आम्ही सर्व शाळकरी विद्यार्थ्यांनी अख्खे रॉक्सी थिएटर टाळ्या आणि ओरडण्याने डोक्यावर घेतले. याचे कारण अर्थातच राजेश खन्नाची क्रेझ….
त्या काळात सहकुटुंब सहपरिवार सिनेमा पाह्यला जायची पध्दत होती आणि राजेश खन्नाचे तेव्हाचे सगळे चित्रपट कौटुंबिक मनोरंजन असे. ‘कटी पतंग‘ (Kati Patang) ही असाच याच रॉक्सी थिएटरमध्ये सहकुटुंब पहायला आणि मग विविध भारती असो अथवा रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालामध्ये कधी ‘कटी पतंग ‘मधील प्यार दीवाना होता है, यह जो मोहब्बत है, जिस गली मे तेरा घर अशी हिट गाणी ऐकतोय असे व्हायचे. रेडिओ आणि लोकप्रिय चित्रपट गीत संगीत व तेव्हाची पिढी हे आजही अनेकांना रोमांचित करणारे वाटते आणि
हे नक्की वाचा: या क्रिकेटपटूने सुपरस्टार राजेश खन्नाची विकेट घेतली???
अशाच सुपर हिट गाण्यांमुळे एका पिढीतील हा चित्रपट आज पन्नास वर्षे पूर्ण होत असतानाही तेवढाच आकर्षित करतोय.
‘कटी पतंग’ (रिलीज २९ जानेवारी १९७१) च्या प्रदर्शनास चक्क आज पन्नास वर्षांचा कालावधी झाला हे राजेश खन्नाचे एकनिष्ठ चाहते, राहुल देव बर्मनचे फॅन्स आणि एकूणच हिंदी चित्रपटात भावनिकदृष्ट्या गुंतलेल्या रसिकांना खरंच वाटणार नाही… 50 Years Of Kati Patang
‘आराधना’ Aradhana (१९६९) सुपर हिट झाला आणि निर्माता आणि दिग्दर्शक शक्ती सामंता आणि राजेश खन्ना या जोडीने ‘कटी पतंग ‘ची तयारी सुरु केली. ‘आराधना’चीच हिट जोडी राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि शर्मिला टागोर याही चित्रपटात असणे हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या यशाच्या संस्कृतीला अगदी साजेशेच. पण नेमकी शर्मिला टागोर तेव्हा गरोदर होती, त्यामुळे तिच्या ऐवजी आशा पारेख (Asha Parekh) आली. राजेश खन्ना आणि आशा पारेख जोडीचा नासिर हुसेन दिग्दर्शित ‘बहारो के सपने’ (१९६७) ही तोपर्यंत सुपर हिट झाला होता आणि आता ही हिट जोडी जे. ओम प्रकाश निर्मित आणि मुकुल दत्त दिग्दर्शित ‘आन मिलो सजना’ (१९७०) मध्ये एकत्र भूमिका साकारत होते. डिसेंबरमध्येच ‘आन मिलो सजना’ला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
‘कटी पतंग ‘चेही ‘आराधना’ प्रमाणेच मेन थिएटर रॉक्सीच होते. तेव्हा रॉक्सीत स्टॉल तिकीट दर दीड रुपया, अप्पर स्टॉल दोन रुपये तर बाल्कनी अडिच रुपये असे होते. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच गाणी सुपर हिट होती आणि राजेश खन्नाची जणू अक्राळविक्राळ लोकप्रियता होती. तात्पर्य, सिनेमा रिलीज झाला तोच खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादण्यासाठी!
या चित्रपटाची थीम मनोरंजक चित्रपटाचा विचार करता तसे पाहिले तर धाडसी होती (पटकथा गुलशन नंदा आणि वजेन्द्र गौड यांची आहे). कालांतराने मी मिडियात आल्यावर शक्ती सामंत यांची त्यांच्या नटराज स्टुडिओतील कार्यालयात दीर्घ मुलाखतीचा योग आला असता माझ्या मनात अनेक वर्षे कुतूहल असलेला हा प्रश्न मी त्याना विचारला असता, ते म्हणाले लग्न मंडपातून ऐनवेळी पळून जावून आपल्या प्रियकराशी लग्न केल्याची बातमी आपण वाचतो.
हे वाचलंत का: ‘अच्छा तो हम चलते है’ ह्या गाण्याची हि आहे जन्मकथा
पण असे साहस केल्यावर तो प्रियकरच बदमाश असल्याचे समजले तर? आणि दुर्दैवाने ती पुन्हा लग्न मंडपात अथवा घरी परतल्यावर तिच्या वागण्याच्या धक्क्याने तिच्या वडिलांचेच निधन झाले तर? अशी युवती काही कारणास्तव विधवा म्हणून जगण्याचा निर्णय घेते आणि मग वेगळी प्रेमकथा आकाराला येते. सगळी सहानुभूती नायिकेला जात असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडले असा विश्वास होताच आणि झालेही तसेच….
शक्ती सामंतानी थोडे फ्लॅशबॅकमध्ये जात सांगितले. याच नटराज स्टुडिओतच ‘कटी पतंग’चा मुहूर्त झाला आणि येथेच अनेक सेट लावून इनडोअर्स शूटिंग केले. तर आऊटडोअर्स शूटिंग उत्तर भारतातील रानी खेत, नैनिताल, नैनी लेक येथे झाले. आशा पारेखने एका मालिकेची निर्मिती केली तेव्हा तिच्या मुलाखतीचा योग आला असता तिने ‘जिस गली मे’ या गाण्याच्या शूटिंगच्या वेळचा किस्सा सांगताना म्हटले, नैनी लेकमध्ये या गाण्याचे शूटिंग आहे असे समजताच काकाला (राजेश खन्ना) पहायला इतकी आणि अशी उत्साही फॅन्सची गर्दी झाली की पहिले दोन दिवस एकाही दृश्याचे शूटिंग झाले नाही. मग प्रचंड पोलीस बंदोबस्तात हे गाणे चित्रित करण्यात आले….
लग्न होत असतानाच माधवी (आशा पारेख) आपल्या प्रियकराला (प्रेम चोप्रा) भेटण्यासाठी पळून जाते, पण तेव्हा तो आपल्या गर्लफ्रेन्डसोबत (बिंदू) रंगरंगेलीया करण्यात मग्न असतो. या धक्क्याने ती हादरुन घरी येते तेव्हा ती लग्नातून पळून गेल्याच्या धक्क्याने तिच्या वडिलांचे (नासिर हुसेन) निधन झाल्याचे दिसते आणि ती घाबरुन सैरावैरा पळत सुटते. अशातच तिला जुनी मैत्रीण (नाझ) भेटते आणि माधवी तिला सांगते की, तिचा नवरा रेल्वे अपघातात मृत्यू पावला आहे…..
हे नक्की वाचा: प्रेम… प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा
माधवी आता विधवेचे आयुष्य जगू लागते आणि मग काही योगायोगाच्या गोष्टी घडत घडत एक वेगळी प्रेमकथा आकाराला येते. राजेश खन्नाने कमल सिन्हा साकारलाय. चित्रपटातील सातही गाणी लोकप्रिय झाल्याची मोठीच सपोर्ट सिस्टीम मिळाली. ये जो मोहब्बत है, प्यार दीवाना होता है, यह शाम मस्तानी, जिस गली मे तेरा घर ना हो बालमा, आज ना खेलेंगे, मेरा नाम है शब्बो, ना कोई उमंग है अशी ही सातही गाणी पटकथेतील नाट्य आणखीन खुलवतात.
ही गाणी आनंद बक्षी यांची असून संगीत राहुल देव बर्मनचे आहे. लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतील चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही हिट असतात याचे ‘कटी पतंग’ उत्तम उदाहरण. विशेषतः ये शाम मस्तानी मदहोश किये जा…. कितीही वेळा ऐकावे/पहावे तोच फ्रेश अनुभव मिळतोच. प्रत्येक होळीला आज ना खेलेंगे…. सगळीकडे असतेच.
राजेश खन्नाचे तेव्हा ओळीने सतरा चित्रपट ज्युबिली हिट झाले त्यातीलच हा एक. त्या काळात राजेश खन्नाचे चित्रपट रिलीज व्हायचे ते ज्युबिली हिट होण्यासाठीच! यातील यह श्याम मस्तानी गाण्यातील त्याच्या मॅनॅरिझमवर तेव्हाच्या युवती विलक्षण फिदा होत्या. आशा पारेखला यातील अभिनयासाठी फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला.
प्रेम चोप्राची छद्मी हास्यने गडद होत जाणारी व्हीलनगिरी आणि बिंदूचे मोहक मादक व्यक्तीमत्व
यांनी चित्रपट रोमांचित ठरला. त्यासह सुलोचनादीदी, मदन पुरी, डेझी इराणी, नासिर हुसेन, सत्येन कप्पू, नाझ इत्यादींच्याही भूमिका आहेत. छायाचित्रण व्ही. गोपालकृष्ण यांचे आहे तर संकलन गोविंद दलवडी यांचे आहे. या चित्रपटाची थीम Cornell Woolrich’s च्या आय मॅरीड डेड मॅन (१९४८) या साहित्यावर आधारित आहे अशी चर्चा रंगली.
यावरच नो मॅन ऑफ हर ओन (१९५०) हा विदेशी चित्रपट निर्माण झाला. पण याचे हिंदीकरण करताना आपल्या प्रेक्षकांना रुचेल अशीच मांडणी केली आहे. तेच तर महत्वाचे आहे. ‘कटी पतंग’ वरुन तमिळ (१९८१) आणि तेलगू (१९८७) यानंतर ‘अनुराधा’ (१९९३) या मराठी चित्रपटाची रिमेक करण्यात आली. कुमार सोहनी दिग्दर्शित या चित्रपटात अलका आठल्य, अजिंक्य देव, सुलभा देशपांडे, सूर्यकांत, पूजा पवार इत्यादींच्या भूमिका आहेत.
शक्ती सामंत आणि राजेश खन्ना जोडीचे हे दोन्ही चित्रपट सुपर हिट ठरल्याने ते आणखीन चित्रपटांसाठी एकत्र येणे स्वाभाविकच होते. त्यातूनच छान ट्यूनिंग जमते आणि एकमेकांच्या कामाची शैली, पध्दत, स्वभाव ओळखीचे होत जातात. क्रिकेटमध्ये एकादा सेट बॅटसमन कसा खेळपट्टीवर उतल्यावर त्याला चेंडू व्यवस्थित दिसू लागतो तशी ही केमिस्ट्री आहे. तसे होताना त्यानी शक्तीराज फिल्म वितरण ही संस्थाही स्थापन केली.
‘कटी पतंग’नंतर बरोबर एक वर्षाने या जोडीचा ‘अमर प्रेम’ (रिलीज २८ जानेवारी १९७२) त्याच रॉक्सी थिएटरमध्ये रिलीज झाला आणि पहिल्याच शोपासून सुपर हिट गाण्यांमुळे हाऊसफुल्ल गर्दीत सुरु राहिला. त्यानेही पंचवीस आठवड्यांचा मुक्काम केला. त्यानंतर या जोडीचे अनुराग (१९७३, यात राजेश खन्ना विशेष भूमिकेत आहे), अजनबी (१९७४), मेहबूबा (१९७६), अनुरोध (१९७७), आवाज (१९८४), अलग अलग (१९८५) हे चित्रपट आले. या प्रत्येक चित्रपटाचे प्रगती पुस्तक एक स्वतंत्र गोष्ट आहे. यातील काही चित्रपट प्रेक्षकांनी नाकारलेही. उदा. ‘मेहबूबा’. याची गाणी हिट आहेत, सिनेमा मात्र फ्लॉप.
‘कटी पतंग’ची पन्नाशी म्हणजे खरंच इतका काळ कधी बरे सरला हे लक्षातच आलं नाही असे पुन्हा एकदा म्हणण्याची जणू एक म्युझिकल हिट संधी. लोकप्रिय चित्रपटाची हीच तर खासियत आहे, तो काळाचे अंतर कमी करतो.