‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सेलिब्रिटीज, मतस्वातंत्र्य आणि मीडिया… !
काळासोबत अनेक गोष्टींचे संदर्भ बदलतात हेच खरं. तसा हा बहुपदरी विषय आहे, त्यात गुंतागुंतही बरीच आहे. राजकुमारनं आपल्या भोवती गूढ/अनाकलनीय असं वलय निर्माण केलं होतं. आजही आठवतंय, मेहुलकुमार दिग्दर्शित ‘तिरंगा’ या चित्रपटातील ‘पीले पीले’ या राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्यावर आधारीत असलेल्या गाण्याचं वांद्र्याच्या बॅन्ड स्टॅन्डजवळील बंगल्यात (जो बंगला आज शाहरूख खानचा (Shahrukh Khan) ‘मन्नत’ म्हणून ख्यातनाम आहे) शूटिंग असताना आम्हा काही सिनेपत्रकारांना आवर्जून शूटिंगच्या रिपोर्टींगसाठी सेटवर बोलावलं होतं. नानाच्या भेटीचे अधूनमधून योग येत असल्याने दोन दृश्यांच्या मधल्या वेळेत त्याच्याशी संवाद होई. जानी राजकुमार मात्र आपल्या नावाच्या खुर्चीत जाऊन बसे.
इंग्रजी मिडियातील एकाने राजकुमारशी संवाद साधला असता तर तो आपल्या स्टाईलमध्ये म्हणाला असता, “होमवर्क करके आये हो क्या? हमसे बात करने से पहले पुरी स्टडी करके आना..”
अश्या अनेक गोष्टींमुळे राजकुमारची ‘सणकी’ अशी प्रतिमा निर्माण झाली, पण त्यामुळे त्याचं नुकसान न होता, त्याला फायदाच झाला, त्याच्या भूमिका आणि अभिनयाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं गेलं…
पण हे आताच का सांगावसं वाटलं, तर आजच्या सोशल मिडियाच्या युगात अनेक सेलिब्रेटिजना काही सामाजिक गोष्टींवर ट्वीट करण्याची इच्छा होते आणि त्यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया उमटतात. काहीना असं व्यक्त होणं हक्काचंही वाटतं. काही सेलिब्रेटिज ट्रोल होतात. याचा कदाचित त्यांच्या लोकप्रियतेवर आणि चित्रपटाच्या यशापयशावर बरा वाईट परिणाम होऊ शकतो. खरं तर होतोच… हे दीपिका पादुकोनच्या (Deepika Padukone) ‘छपाक’ चित्रपटाचं जे काही झालं त्यावरुन दिसून आलं. तो चित्रपटही अगदी सामान्य होता. पण तिच्या अनेक जाहिरातीही काही काळ मागे घ्याव्या लागल्या. व्यावहारिकदृष्ट्या तिचं विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा देणं सुध्दा अडचणीचं ठरलं.
याचा अर्थ, सेलिब्रेटिजनी पडद्यावरच्याच भूमिकेत चोवीस तास असावं का?
एक व्यक्ती म्हणून एखाद्या गोष्टीवर व्यक्त व्हायचंच नाही का? दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातील कलाकार व्यक्त होत नाहीत का? अशी प्रश्नावळी वाढू शकते.
साठचं दशक गाजवलेल्या बलराज सहानी (Balraj Sahni) यांनी, आपण कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक आहोत हे कधीच लपवलं नाही. तसंच अगदी दादा कोंडके सुद्धा अनेकदा शिवसेनेच्या (Shivsena) व्यासपीठावर आले, आपल्या शैलीत भाषणं केली. पण म्हणून काही त्यांच्या लोकप्रियतेवर किंवा इमेजवर त्याचा परिणाम झाला नाही. याचं एक कारण म्हणजे, दादांच्या रुपेरी प्रतिमेवर खूप मोठा प्रेक्षकवर्ग फिदा होता.
त्यांना, दादांच्या राजकीय बांधिलकीशी फारसं देणंघेणं नव्हतं. दादांचे ‘द्व्यर्थी विनोदाची पेरणी’ असणारे चित्रपट आपला ‘अडीच तीन तास फुल्ल टू टाईमपास करतात’ एवढंही त्यांना पुरेसं असे. आजही दादांचे जुने चित्रपट रिपिट रनला प्रदर्शित होतात आणि चांगला रिस्पॉन्सही मिळवतात. पण सगळ्याच गोष्टी एकसारख्या घडत नाहीत अथवा असत नाहीत हीच तर खरी ब्रेकिंग न्यूज आहे.
देव आनंद अगदी मुलाखत देतानाही ‘मी देव आनंद आहे’ याचा स्वतःला आणि समोरच्याला कधीच विसर पडू देत नसे… हे मी पाली हिलवरील आनंद रेकाॅर्डिंग स्टुडिओत त्याची दोनदा सविस्तर मुलाखत घेत असताना अनुभवलंय.
हाच देव आनंद (Dev Anand) एकदा आपल्या सदाबहार रोमॅन्टीक इमेजबाहेर आला आणि आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत त्याने आपला ‘नॅशनल पार्टी’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. शिवाजी पार्कात एक सभाही घेतली. या देवाच्या दर्शनासाठी गर्दीही झाली… पण आपल्या राजकीय मर्यादा लक्षात आल्यावर त्याने पक्ष गुंडाळला आणि पुन्हा त्याच्यातील देव आनंद जागा झाला, ‘अभी तो मै जवान हू’ याच वृत्तीने पुन्हा वावरू लागला. आणि तेच त्याला शोभले.
तात्पर्य काय तर, आपण भलं नि आपले काम भलं. लाईफ एन्जाॅय करायचं ही प्रवृत्ती या सगळ्यात अतिशय उत्तम, नाही का? समाजात अनेक प्रकारची माणसं असतात तसंच मनोरंजन क्षेत्रात भिन्न स्वभावाचे, मतांचे, दृष्टिकोनांचे सेलिब्रेटिज असतात.
काही सेलिब्रिटींची राजकीय मतं असतात, त्यांना ती व्यक्त करण्याची गरज वाटते. परंतू अशावेळी आपल्या फॅन्स आणि फाॅलोअर्ससमोर आपली पडद्यावरची इमेज कायम ठेवणं आणि आपल्या चित्रपटावर या सगळ्याचा परिणाम होऊ न देणं, अत्यावश्यक असतं. कारण, त्या चित्रपटात निर्मात्याची आर्थिक गुंतवणूक असते, वितरकांनी थिएटर मिळवलेली असतात आणि त्यावर अनेक सहकलाकार, तंत्रज्ञ आणि अगणित कामगार यांचंही भवितव्य अवलंबून असतं याचं भान सोडून चालत नाही. एखाद्या सेलिब्रेटिमुळे कळत नकळतपणे कोणी दुखावलं गेल्यास एकाच वेळी अनेकांचं नुकसान होऊ शकतं.
तर काही जण उघडपणे काही बोलू इच्छित नसतात. आपल्या बिझी शेड्यूलमध्ये कसलंही विघ्न नको अशी ते ‘भूमिका’ घेत वावरतात.
अश्यावेळी संजीवकुमार (Sanjeev Kumar)सारखा ॲप्रोच हवा. तो कायमच अनेक प्रकारच्या आणि अनेक वयोगटाच्या व्यक्तिरेखा साकारत वाटचाल करत राहिला. तरुण वयात त्याने वृध्दही साकारला (शोले, परिचय, मौसम, विश्वासघात इत्यादी चित्रपट) ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटात त्याने चक्क नऊ गेटअपच्या नऊ भूमिका साकारल्या.
आपल्या कामात अतिशय बिझी राहिल्याने त्याने कधीच कोणत्याही सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं नाही. अगदी त्याची भूमिका असलेल्या गुलजार (Gulzar) दिग्दर्शित ‘आंधी’ (१९७५) या चित्रपटावर आणीबाणीत बंदी आली, पण तरीसुद्धा संजीवकुमार त्याबाबतही कुठेही व्यक्त झाला नाही. आपण पडद्यावर आपलं काम चोख केलं आहे ह्याची जाणीव असल्यामुळे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं त्याने, गप्प राहूनच उत्तर दिलं. परंतू आता काळ बराच बदलला आहे, खूप पुढे गेला आहे.
अनेक कलाकार कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याच्या, पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यांच्या बातम्याही होतात. मनसेने केलेल्या कोरोना काळातील सेवेच्या बाबतीत संजय मोने असेच व्यक्त झाले आणि त्याचीही बातमी झाली. (Celebrity and Social Media)
आजच्या ग्लोबल युगात अनेक सेलिब्रेटी सोशल मिडियावर जे काही शेअर करतात त्याची वेगाने बातमी होते, पण त्याचमुळे काही सेलिब्रेटिज सोशल मिडियापासून दूरही राहू लागले आहेत. आपल्या ट्वीटचा भलताच अर्थ काढला जाण्याची शक्यता अथवा भीती वाटणं हादेखील बदलत्या काळाचा परिणाम आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, सेलिब्रेटिज, खासदार, कलाकार एखाद्या विषयावर थेट भूमिका का घेत नाहीत असा प्रश्न नेहमीच पडतो, पण हे सेलिब्रेटिज किंवा कलाकार एखाद्या पक्षाचे किंवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतात, ते त्यानुसार भूमिका घेणं तेव्हा स्वाभाविक असतं.
परंतू राज्यसभेतील अशा स्टार खासदारांचे काय असाही एक प्रश्न असतोच. तो विचारण्याआधी त्यांच्या कामकाजाची पध्दत समजून घ्यायला हवी. असो.
आता आणखीन एक गोष्ट रुळत जाईल, सेलिब्रेटिजना मुलाखतीत फक्त गोडधोड प्रश्नांनाच उत्तरं देऊन ‘आता आणखीन एक मुलाखत देऊया’ असं म्हणत सहज पुढे जाता येणार नाही. तर आजूबाजूच्या घटनांवरही त्यांना भाष्य करावं लागेल आणि ते करताना त्याचे काही साईड इफेक्टस तर होत नाहीत ना, याचंही भान ठेवावं लागेल.
अहो, सगळंच बदललं आहे म्हटल्यावर असाही एक बदल होणारच. सेलिब्रेटिजना मतस्वातंत्र्य आहे, पण ते कोणत्या बाजूने व्यक्त होतात त्यावर पुढचं बरच काही अवलंबून असतं. इतकं सगळं असताना ‘पडद्यावरच्या व्यक्तिरेखेतच आपण रहावं’, पडद्यावरची इमेज आपण जपावी हे जास्त हितावह आहे असं कलाकारांना वाटणं अगदी साहजिक असतं.
आपण “अपनी मर्जी के राजकुमार” असावं, पण आजच्या काळात थोडं जपूनच..