‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटाचे जनक
भारतात चित्रपट माध्यम व व्यवसाय रूजवण्याचे सगळे श्रेय दादासाहेब फाळके यांना जाते हे आपणास माहीत आहे. दादासाहेब फाळके (जन्म ३० एप्रिल १८७०) यांनी निर्मिलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी गिरगाव परिसरातील कारोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि दृश्य माध्यमाच्या एका खूप मोठ्या परंपरेला सुरुवात झाली. या चित्रपटात तारामतीची भूमिका साळुंखे या पुरुष कलाकाराने करण्यासाठी आपल्या मिश्या सफाचाट करुन घेतल्या आणि ते स्री पात्र साकारले. तर रोहिदासाची भूमिका फाळके यांचा मुलगा भालचंद्र याने साकारली.
आज दादरच्या पूर्वेला जो फाळके रोड आहे, ते नाव दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले आहे. याच मार्गावरील मथुरा भवन येथे फाळके यांनी एक स्टुडिओ तयार केला आणि आठ महिन्याच्या शूटिंगने चित्रपट पूर्ण केला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन, छायालेखन, कला दिग्दर्शन, संकलन, मेकअप हे सगळे दादासाहेब फाळके यांचे होते आणि या चित्रपटाची लांबी ३,७०० फूट इतकी होती. मुंबईत काही दिवस हा चित्रपट चालल्यावर दादासाहेब फाळके यांनी सूरत व इतर अनेक ठिकाणी हा चित्रपट रिलीज केला. फाळके आपला हा चित्रपट घेऊन इंग्लंडला गेले असता हा चित्रपट पाहून तेथील समिक्षक प्रभावीत झाले आणि तेथील ‘बायस्कोप सिनेमॅटोग्राफ’ या साप्ताहिकाने या चित्रपटाचे कौतुक करणारा लेख लिहिला.
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या इतर काही चित्रपटांवर ‘फोकस’ टाकताना ठळकपणे दिसतेय की त्यांनी ‘सत्यवान सावित्री’ या चित्रपटानंतर निर्मिलेल्या ‘लंका दहन’ या चित्रपटाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. इतका की, गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्ये सकाळी सात वाजता या चित्रपटाचे शो सुरू व्हायचे आणि एकामागोमाग एक असे पहाटे तीन वाजेपर्यंत ते नाॅन स्टाॅप सुरु असत. या चित्रपटाच्या यशाबद्दल अशी एक गोष्ट प्रसिद्ध आहे की, चेन्नईतील (तेव्हाचे मद्रास) या चित्रपटाचे उत्पन्न आणण्यासाठी बैलगाडीची व्यवस्था करावी लागली. तेथील पोलीस बंदोबस्तात फाळके यांनी कृष्ण जन्म, कालिया मर्दन, सेतू बंधन वगैरे चित्रपटांची निर्मिती केली. अर्थात हे सगळे मूकपट होते. बोलपटांचा काळ सुरु झाल्यावर फाळके यांनी १९३७ साली ‘गंगावतरण’ हा एकमेव बोलपट निर्माण केला. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे ६ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांनी भारतात चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली ही खूपच मोठी गोष्ट आहे.
हे देखील वाचा: ’राजा हरीश्चंद्र’ च्या निर्मिती मागची गोष्ट
फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ (Raja Harishchandra) या चित्रपटाच्या निर्मीतीमागचा केलेला विचार, त्यासाठीची मेहनत, त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, या निर्मितीत आलेले अडथळे या सगळ्याचा वेध घेणारा चित्रपट निर्माण होऊ शकतो हे दिग्दर्शक परेश मोकाशी याला सुचलं आणि भारतातील पहिल्या चित्रपट निर्मितीमागची गोष्ट सांगणाऱ्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (Harishchandrachi Factory) (२००८) या चित्रपटाची निर्मिती झाली. परेश मोकाशीने या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, निर्मिती आणि दिग्दर्शन या सगळ्याची जबाबदारी सांभाळली.
मायासाहेब या निर्मिती संस्थेच्या वतीने हा चित्रपट पडद्यावर आला. नंदू माधवने दादासाहेब फाळके यांची व्यक्तिरेखा साकारली. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी थीमनुसार शंभर वर्षांपूर्वीचे वातावरण अतिशय उत्तम रितीने उभारले. या चित्रपटाची जणू एक व्यक्तिरेखा असा या कला दिग्दर्शनाचा प्रभाव होता. विशेष म्हणजे या चित्रपटाची भारताच्या ऑस्करसाठीची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली. पण या चित्रपटाला अंतिम फेरीत नामांकन मिळाले नाही. तरी देश विदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखल झाला हा एक प्रकारचा दादासाहेब फाळके यांचा सन्मानच!
दादासाहेब फाळके यांनी आपल्या देशात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली याचा सन्मान ठेवतच भारतीय सरकारच्या वतीने १९६९ साली त्यांच्या नावाने ‘मानाचा पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award) देणे सुरु केले. हा पुरस्कार आपल्या देशातील चित्रपट माध्यम व व्यवसायात दीर्घकालीन उल्लेखनीय कार्य केलेल्या या क्षेत्रातील व्यक्तीला देण्यात येतो. आपल्या देशात हिंदी आणि मराठीसह एकूण बावीस भाषेत चित्रपट निर्मिती होत असते आणि हा पुरस्कार एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील कार्याचा विचार करुन दिला जातो.
पहिल्या वर्षी अर्थात १९६९ साली अभिनेत्री देविका राणी यांना देण्यात आला. त्यानंतर प्रत्येक वर्षी हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिला जातो. या पुरस्कार विजेत्यांमधील काही नावे सांगायची तर, बीरेन्दनाथ सरकार, पृथ्वीराज कपूर, पंकज मलिक, सुलोचना रुबी मायर्स, बी. एन. रेड्डी, व्ही. शांताराम, राज कपूर, लता मंगेशकर, भालजी पेंढारकर, दिलीपकुमार, आशा भोसले, यश चोप्रा, देव आनंद, प्राण, गुलजार, शशी कपूर, मनोजकुमार, विनोद खन्ना (मरणोत्तर) आणि अमिताभ बच्चन.
कोरोना काळात म्हणजे २०२० साली हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नाही. हा पुरस्कार प्रत्येक वर्षी ३ मे रोजी (या तारखेला ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला म्हणून या दिवशी) राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते देण्यात येतो. प्रत्येक वर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही देण्यात येतात. (अलिकडच्या काळात अनेक संस्था दादासाहेब फाळके या नावाने पुरस्कार देतात, तो विषय वेगळा आणि वादाचाही).
दादासाहेब फाळके यांनी रुजवलेला चित्रपट आज खरंच योग्य मार्गावर आहे का? हादेखील अधूनमधून प्रश्न पडत असतोच, त्याचे हो काय?