‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
नव्या काळातही जुन्या चित्रपटांची ओढ कायम !
चित्रपटाचे शौकिन तसे अनेक प्रकारचे. कोणी आपल्या आवडत्या स्टारसाठी चित्रपट पाहतात, तर कोणी चक्क आवडत्या मल्टीप्लेक्समध्ये आवर्जून चित्रपट पाहायला जातात. संपूर्ण चित्रपट पाहायचाय या केंद्रस्थानी असलेल्या गोष्टीच्या अवतीभवतीचे हे असे छोटे छोटे अनेक घटक असतातच. तसेच काही कायमच जुन्या चित्रपटात रमणारे आणि जुन्या चित्रपटांबाबत उत्सुकता असणारे देखील आहेत.
हिंदी चित्रपटाच्या चौफेर वाटचालीचा विचार करतांना, रमेश सिप्पी दिग्दर्शित सर्वकालीन सुपर हिट “शोले”च्या (१९७५) पूर्वीचा आणि नंतरचा अशी मांडणी केली जाते. ही फोड अशीही केली जाते की, राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’पर्यंतचा (१९६४) सिनेमा हा कथा, आशय, अभिनय, संगीत व प्रभाव या सर्वच बाबतीत सरस. त्यानंतर हिंदी चित्रपटाच्या गुणवत्तेला उतरंड सुरु झाली असे मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे. विशेषतः हिंदी चित्रपटाचा सुवर्ण काळ म्हटलं की, चित्रपट संगीताचे शौकिन त्यांच सगळं श्रेय १९६०६५ पर्यंतच्या कालखंडाला देतात. जुन्या चित्रपटाच्या आठवणी, गोष्टी, किस्से, गीत, संगीत, कलाकार यातच भावनिकदृष्ट्या गुंतून राहणे त्यांना खूप खूप आवडते. हा जो बराचसा कृष्ण धवल अर्थात ब्लॅक ॲण्ड व्हाईट चित्रपटाचा काळ होता तोच श्रेष्ठ, असे हा वर्ग मानतो.
दुसरीकडे पाहिले तर ‘शोले'(Sholay) ते सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (Hum Aapke Hain Koun) आणि त्यानंतर असा एक काळ आहे. या काळात तांत्रिकदृष्ट्या चित्रपटाने बरीच प्रगती केली. या सगळ्यात महत्वाचे आहे ते जुन्या चित्रपटाचे वेड. ते असण्याची कारणे कोणती? प्रत्येक पिढीतील युवा वर्गाने आज पाहिलेले चित्रपट भविष्यात जुने होत जातात. म्हणजे, चाळीशी ओलांडली की आपणच विसाव्या वर्षी पाहिलेले चित्रपट जुने वाटू लागतात
हे वाचलंत का: ‘शोले’ रिलीज झाला तेव्हा पहिले एक दोन आठवडे पडला… पडला अशीच हवा होती!
आणि त्या जुन्या चित्रपटासह विद्यार्थी वयातील आठवणी, मित्र मैत्रिणींसोबत चित्रपट पाहिल्याच्या आठवणी, प्रेम प्रकरण झाले असेल तर तेव्हा पाहिलेले चित्रपट, काॅलेजचे लेक्चर बंक करुन पाहिलेले चित्रपट अशा अनेक जुन्या आठवणींना पंचेचाळीशीनंतर उजाळा मिळत जातो. प्रत्येक पिढीत हेच चक्र सुरु असते. राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’च्या (२०००) वेळी ह्रतिक रोशनचे दीवाने झालेल्या युवकांनी आज चाळीशी ओलांडली आहे. प्रत्येक काळातील सिनेमा जस जसा जुना होत जातो तशीच एक पिढी पुढे जाते आणि मग ही पिढी नंतरच्या पिढीला आपल्या काळातील चित्रपटाच्या आठवणी सांगते.
या सगळ्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे, माणूस जसा मोठा होत जातो तसं त्याला पूर्वी काय काय घडले, जग कसे होते, पूर्वीचे चित्रपट कसे होते, ते कसे आणि कुठे पाहिले, त्यातील पाहण्यासारखे कोणते होते असे मागचे बरेच काही जाणून घेता घेता सिनेमाचा जन्म कसा झाला हेही जाणून घ्यावेसे वाटतेच. दादासाहेब फाळके यांचा “राजा हरिश्चंद्र” (Raja Harishchandra) (३ मे १९१३) हा आपल्याकडचा पहिला चित्रपट आहे हे माहित पडल्यावर तर आपल्या चित्रपटाचा १०८ वर्षांचा प्रवास कसा झाला हेही जाणून घ्यावेसे वाटतेच. मग त्यासाठी सिनेमावरची पुस्तके हे वर्षानुवर्षाचे महत्वाचे माध्यम आहे. आता ही जुन्या चित्रपटाची गरज काळानुसार बदलली गेली हेही सांगायला हवे
दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद ही त्रिमूर्ती जबरदस्त फाॅर्मात असताना त्यांचे पन्नास आणि साठच्या दशकातील चित्रपट रिपीट रनला (म्हणजे जुना चित्रपट एखाद्या आठवड्यासाठी पुन्हा एकदा प्रदर्शित होणे) मॅटीनी शोला रिलीज होत. मॅटीनी शो म्हणजे रोज सकाळी अकरा वाजताचा खेळ. साठ आणि सत्तरच्या दशकात हे मॅटीनी शोचे कल्चर प्रचंड लोकप्रिय होते. देव आनंद आणि शम्मी कपूरचे अनेक जुने चित्रपट मॅटीनी शोला पुन्हा पुन्हा रिलीज होत. जुन्या चित्रपटाच्या शौकिनांना ती मोठी पर्वणीच होती.
१९७२ साली दूरदर्शनचे आगमन झाले आणि शनिवारी संध्याकाळी जुना मराठी चित्रपट तर रविवारी संध्याकाळी जुना हिंदी चित्रपट पाहता येऊ लागला. १९८२ साली देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला आणि नवीन चित्रपटांसह अगणित जुन्या चित्रपटाच्या व्हिडिओ कॅसेट, डिव्हिडी हाती आल्या. जुन्या चित्रपटाच्या शौकिनांची चंगळ होत गेली. १९९२ साली देशात उपग्रह वाहिनीचे आगमन झाले आणि दशकभरात चोवीस तास सिनेमा दाखवणारी चॅनल्स आली. आता जुने चित्रपट आणखीन जवळ जवळ येत गेले. आता तर यू ट्यूब चॅनलवर अबब… म्हणावा असा जुन्या चित्रपटांचा/गाण्यांचा प्रचंड मोठा खजिना आहे. राजेश खन्नाच्या “आनंद”ला (रिलीज १२ मार्च १९७१) पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमीत्ताने अनेकांनी ‘आनंद’मधील काही भावूक प्रसंग पुन्हा एकदा पाहिले.
हे नक्की वाचा: हृषीदांच्या ‘आनंद’साठी ‘शोमॅन’लाच होती पहिली पसंती.. मग कशी लागली ‘सुपरस्टार’ला लॉटरी?? जाणून घ्या ‘आनंद’यात्रेचे रंगतदार किस्से…
सोशल मिडियाच्या आजच्या युगात जुन्या चित्रपटांना जणू आपल्या हाती आणले आहे. मी सत्तरच्या दशकात शालेय जीवनात असतांना, विजय आनंद दिग्दर्शित ‘तिसरी मंझिल’ अथवा शक्ती सामंता दिग्दर्शित ‘इव्हिनिंग इन पॅरीस’ कधी बरे मॅटीनी शोला येतोय याची वाट पाहत असे. मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ (१९५८) के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ (१९६०) या चित्रपटाच्या आठवणी मागील पिढीकडून ऐकत असू आणि हेही चित्रपट रिपीट रनला रिलीज व्हावे असे वाटे.
जुने चित्रपट पाहावेसे वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. प्रत्येक पिढीत ती आहे. नव्वदच्या दशकातील युवकांना राजेश खन्नाच्या एकेकाळच्या आराधना, दो रास्ते, अमर प्रेम, कटी पतंग, मर्यादा, हाथी मेरे साथी, सच्चा झूठा, अपना देश, बंधन वगैरे अशा एकूण सतरा सुपर हिट चित्रपटांबाबत विशेष कुतूहल होते. त्यांनी डिव्हिडीवर ते चित्रपट पाहून पूर्ण केले. या सगळ्यात एक अतिशय महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे, अनेक जुन्या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. आणि याच सुपर हिट गाण्यांमुळे एका पिढीतील अनेक चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही हिट राहिले. आपले अस्तित्व आणि महत्व त्यांनी टिकवून ठेवले.
चला, मला देखिल आता राज कपूर दिग्दर्शित “मेरा नाम जोकर” (Mera Naam Joker) पुन्हा एकदा पाहायचाय. पहिल्यांदा मी तो रिपीट रनला पाहिला होता, मग दूरदर्शनवर, व्हिडिओवर तसेच चॅनलवर पाहिला. अगणित वेळा मी ‘मेरा नाम जोकर’ पाहूनही तो पुन्हा एकदा पाहायचाय. अशीच अनेक जुन्या चित्रपटांची मोहिनी अजूनही कायम आहे आणि म्हणूनच चित्रपट रसिकांना जुन्या चित्रपटांबाबत विलक्षण ओढ आहे.