‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आंतर सांस्कृतिक चित्रपट
फार वर्षांपूर्वी चव्हाण सेंटरमध्ये एक इटालियन चित्रपट पाहिला होता. त्यातील नायक आपल्या मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्टेशनच्या बाहेर येतो तेव्हा त्याला तिथे हत्ती, गारुड्याच्या पुंगीवर डोलणारा नाग दिसतो. हे दृश्य पाहताच थिएटर मध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये चुळबुळ झाली. भारतातील शहरांमध्ये लोक अजूनही हत्ती, घोडे, यांच्यावर बसून हमरस्त्यावर प्रवास करतात अशी समजूत असलेल्या त्या परदेशी दिग्दर्शकाने भारताची अशी चुकीची प्रतिमा पडद्यावर दाखवली याबद्दल प्रचंड खेद वाटला होता.
क्रॉस ओव्हर सिनेमाची चर्चा जेव्हा जेव्हा होते तेव्हा मला तो इटालियन चित्रपट सर्वात आधी आठवतो. भारतीय सिनेमा, ते बनवणारे कलावंत आणि प्रेक्षक याबद्दल परदेशामध्ये एक दुय्यम भाव नेहमीच आढळून येतो. तांत्रिक बाजू आणि बजेट या पातळ्यांवर भारतीय चित्रपट मागे असले तरीही आशय ही भारतीय चित्रपटांची उजवी बाजू आहे. १९५५ साली सत्यजित राय यांच्या पथेर पांचालीने परदेशातील समीक्षक आणि प्रेक्षकांना भारतीय चित्रपटांची दखल घ्याया भाग पाडलं. व्ही.शांताराम, बिमल रॉय यांचे कलात्मक चित्रपट परदेशातील महोत्सवामध्ये गाजले. परंतु हे चित्रपट केवळ महोत्सवातील प्रेक्षकांपुरतेच मर्यादित राहिले. राज कपुरच्या आवारा, संगमने परदेशी प्रेक्षकांना संगीताच्या ठेक्यावर ताल धरायला लावलं.भारतीय चित्रपटांबद्दलची एक विशिष्ट प्रतिमा परदेशामध्ये रुढ झाली. भारतीय चित्रपट म्हणजे मेलोड्रामा, गीत-संगीत यांची रेलचेल असं समीकरण निर्माण झालं. हॉलिवूड, ब्रिटन येथील दिग्दर्शकांना भारतात येऊन चित्रपट बनवण्याचं आकर्षण त्यावेळी वाटलं नाही. भारतीय वंशाच्या इस्माईल मर्चंट यांनी जेम्स आयवरी यांच्या सोबत अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. त्यात कस्टडी सारखा अपवाद वगळला तर भारतीय जीवनाचं चित्रण अभावानेच आलं. शशी कपूर, आय.एस.जोहर या कलावंतांनी काही हॉलीवूड, ब्रिटिश प्रॉडक्शन कंपनीच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला पण तिथल्या मुख्य धारेतील चित्रपटात भारतीय कलावंत आपलं स्थान निर्माण करु शकले नाहीत.
भारतीयांना चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळापासूनच हॉलीवूड चित्रपटांचं जबरदस्त आकर्षण आहे. आजही मराठी, हिंदी चित्रपटांच्या बरोबरीने प्रदर्शित झालेला हॉलीवूडचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक व्यवसाय करताना दिसतो. हॉलीवूडच्या निर्मात्यांनी भारतीय प्रेक्षकाची नस अचूक ओळखली आहे. आपल्या इथे चलती असलेला मनोरंजनाचा मालमसाला हॉलीवूड चित्रपटांमध्ये ठासून भरलेला असतो. या पार्श्वभूमीवर भारतातील लोक व त्याच्या जीवनशैलीबद्दल कुतूहल असणा-या परदेशी व परदेशात राहणा-या भारतीय वंशाच्या दिग्दर्शकांनी निर्माण केलेले चित्रपट व ती बनवण्या मागची त्यांची मानसिकता यांचा वेध घेणे संयुक्तिक ठरेल.
क्रॉस ओव्हर सिनेमाची व्याख्याच मुळी an emerging form of cinema that crosses cultural borders at the stage of conceptualization and production अशी आहे. याचा पहिला यशस्वी आविष्कार म्हणजे रिचर्ड अँटनबरो यांचा १९८२ साली आलेला गांधी हा चित्रपट ! रिचर्ड अँटनबरो हे पंडित जवाहरलाल नेहरुंचे स्नेही होते. निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता असलेल्या रिचर्ड अँटनबरोंना भारताविषयी जिव्हाळा होता. त्यांनी सत्यजित राय यांच्या शतरंज के खिलाडी मध्ये विशेष भूमिकाही केली होती. पंडित नेहरुच्या कारकिर्दीत रिचर्ड अँटनबरोंनी गांधी चित्रपटाच्या निर्मितीची सुरुवात केली. चित्रपटासाठी संशोधन आणि संहिता तयार करण्याचा कालावधी लांबला. खरं तर महत्मा गांधीचं अफ्रिकेतील वास्तव ते त्यांची नथुराम गोडसेंनी केलेली हत्या हा १८९३ ते १९४८ या दरम्यानच्या काळाचं तपशीलवार आणि कलात्मक चित्रण हे कोणत्याही सर्जनशील कलावंतासाठी मोठ आव्हानच होतं. रिचर्ड अँटनबरो हे त्या कसोटीला उतरले याची साक्ष गांधी चित्रपटातील प्रत्येक दृश्य आपल्याला देतं. चरित्रपट बनवताना दिग्दर्शकाने घेतलेल्या सिनेमॅटिक लिबर्टीमुळे चरित्रनायकाची प्रतिमा उजळताना इतिहासाची विपर्यास होता कामा नये. गांधीतून रिचर्ड अँटनबरोंनी हा आदर्श घालून दिला. गांधीनी सूटाबूटाचा त्याग करुन केवळ पंचा परिधान करण्याचा निर्णय नेमला. कोणत्या घटनेमुळे घेतला असेल याची इतिहासात नोंद नसली तरीही म.गांधीच्या या निर्णयासाठी रिचर्ड अँटनबोनी चित्रपटात रचलेला प्रसंग अत्यंत ह्रदयस्पर्शी आहे. कस्तुरबा आणि इतर सहका-यांबरोबर एका नदीच्या किना-यावर उभे असलेले गांधी काही अर्धनग्न स्त्रियांना कपडे धुताना पाहतात. आपलं उपरणं काढून ते पाण्याच्या प्रवाहात सोडतात, एक स्त्री ते उपरणे घेऊन आपले उघडं शरीर झाकून घेते. गांधीजींचं पंचा नेसण्याच्या निर्णयापर्यंत येण्याची मानसिकता हा प्रसंग अधोरेखित करतो.
आपल्या कडील दिग्दर्शक ऐतिहासिक चरित्रनायकाला मोठं दाखवण्यासाठी इतर राष्ट्रनेत्यांना खुजं बनवतात हे भगतसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस, आंबेडकर, सावरकर, टिळक यांच्यावरील चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवतं म्हणूनच आजही रिचर्ड अँटनबरोंनी निर्माण केलेला गांधी हा सर्वश्रेष्ठ चरित्रपट ठरतो. गांधीच्या अपूर्व यशानंतर परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय दिग्दर्शकांनी भारतीय व्यक्तिरेखा घेऊन चित्रपट निर्माण करण्याची ख-या अर्थाने सुरुवात केली. यात प्रामुख्याने स्त्री दिग्दर्शिका होत्या हे विशेष !
मीरा नायर, दीपा मेहता, गुरिन्दर चढ्ढा या तीन दिग्दर्शकांनी आपल्या विशिष्ट शैलीत चित्रपट बनवले. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या सलाम बॉम्बे या मीरा नायरच्या वास्तवदर्शी चित्रपटाने खळबळ माजवली. हिंदीतील समांतर चित्रपटांचा प्रवाह यावेळी क्षीण झालेला होता. त्याचवेळी नाना पाटेकर, अनिता कवर, रघुवीर यादव या कलाकारांबरोबरच शफीक सय्यद सारख्या अभिनयाचा गंध नसलेल्या मुलांना ट्रेनिंग घेऊन मीरा नायरने फोरास रोडवर राहणा-या वेश्या, त्यांचे दलाल, रेल्वे स्टेशनवर काम करुन राहणारी मुले व गर्दुल्ले यांच्या अनभिज्ञ जगाचं उघडंवाघडं दर्शन घडवलं. अनिवासी दिग्दर्शिकेने असं भेदक वास्तव मांडण अनेकांना झोंबलं. भारतातील गरीबीचं दर्शन चित्रपटाच्या माध्यमातून जगभर करण्याबद्दल नाराजीचा सूर उठला. सलाम बॉम्बे तांत्रिक व आशय दृष्ट्या निर्विवाद उत्तम होता. सलाम बॉम्बे नंतर मीरा नायर ने ढोंगी उच्चभ्रू समाज व लहान मुलांचे लैंगिक शोषण यावर भाष्य करणारा मान्सून वेडिंग, झुंपा लहरिच्या कादंबरीवर आधारित नेमसेक आणि कामसूत्र हे चित्रपट निर्माण केले. मीरा नायरने भारतीय विषयवास्तूंवर निर्माण केलेल्या या चित्रपटांनी आंतर सांस्कृतिक चित्रपटांचा (Cross over cinema) प्रवाह सुरु झाला.
दीपा मेहता या कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या दिग्दर्शिकेने फायर, अर्थ आणि वॉटर या त्रिसूत्रीवर आधारलेल्या चित्रपटांनी सुद्धा भारतात खळबळ माजवली. स्त्रियांच्या समलिंगी चित्रण करणा-या फायरवर तथाकथित संस्कृती रक्षकांनी स्वयंघोषित बंदी आणली. चित्रपटाची पोस्टर्स फाडली, थिएटर्सवर दगडफेक केली. फायरचा विषय भारतीय प्रेक्षकांसाठी सनसनाटी होता. चित्रपटावर आक्षेप घेणं निषेधार्ह असलं तरी दीरा मेहतांनी प्रमुख व्यक्तिरेखांची नाव राधा आणि सीता ठेवल्यामुळे त्यांना चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी सनसनाटी अपेक्षित होती असं म्हणायला वाव होता.
मीरा नायर, दीपा मेहता यांच्यासारखे अनिवासी भारतीय दिग्दर्शक भारतातील दारिद्र्य, उपेक्षित लोकांच चित्रण करुन जगभरात भारताची प्रतिमा मलिन करतात असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला. या आरोपाला पुष्टी देणारा सिटी ऑफ जॉय हा रोनाल्ड जोफ दिग्दर्शित चित्रपट देखील याच दरम्यान प्रदर्शित झाला. डॉमनिक लॅपियर यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात कोलकाता मधील झोपडपट्टीत राहणारे निर्वासित कुटुंब व ह्युस्टन मधून अध्यात्माच्या ओढीने भारतात आलेल्या डॉ. मॅक्स लोव यांच्या अनुबंधाची गोष्ट मांडली होती. हे सर्व चित्रपट पाहताना दिग्दर्शक व प्रकाश चित्रकार यांनी घेतलेली मेहनत मात्र नेहमीच दाद देण्याजोगी होती. आशयानुरुप तपशिलवार चित्रण, काळाचा संदर्भ अचूक देण्यासाठी वापरलेला पोत यामुळे हे चित्रपट भारतीय चित्रपटांपेक्षा उजवे ठरतात हे नाकारुन चालणार नाही. चित्रपटाची विलक्षण क्रेझ असणारा प्रेक्षक केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगभरात पसरलाय. या प्रेक्षकाला बॉलीवूडचं आकर्षण आहे.
कायम परदेशात वास्तव्य असणा-या या प्रेक्षकाला त्याच्या देशांशी जोडणारा दुवा सिनेमाच असल्यामुळे अनिवासी भारतीय दिग्दर्शकांनी भारतात येऊन, भारतीय आशयाचे चित्रपट निर्माण करणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. यातूनच गुरिन्दर चढ्ढाने बेन्ड इट लाईक बेकमन, ब्राईड अँण्ड प्रिज्युडिस हे चित्रपट तयार केले. ऐश्वर्या राय, अनुपम खेर यासारख्या लोकप्रिय कलाकारांना प्रमुख भूमिका दिल्या.
एकविसाव्या शतकात भारताकडे सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ज्याप्रमाणे भांडवलदारांचे लक्ष गेलं त्याचप्रमाणे सर्वात जास्त प्रेक्षक वर्ग असणारा देश म्हणूनही विदेशी दिग्दर्शकांना भारतात येऊन चित्रपट बनवण्याचं आकर्षण निर्माण झालं. स्टिव्हन स्पिलबर्गचा इंडियाना जोन्स अँण्ड द टेम्पल ऑफ डूम, वेस अँडरसनचा द दार्जिलिंग लिमिटेड, ही त्यातली काही उदाहरणं. या यादीतले सर्वाधिक लोकप्रिय झालेले चित्रपट म्हणजे अँन्ग लीचा लाईफ ऑफ पाय आणि डॅनी बॉयलचा स्लमडॉग मिलेनियर, हे दोन्ही चित्रपट लोकप्रिय झालेल्या कादंब-यावर आधारित होते.
ब्रोकबॅक माऊंटन, क्रॉऊंचिग टायगर हिडन ड्रॅगन, लस्ट अँण्ड कॉशन या भव्य दिव्य आणि आशयघन चित्रपटांमुळे गाजलेल्या तैवानच्या अँन्ग लीला भारताच्या पार्श्वभूमीवरील लाईफ ऑफ पाय सारखा कथात्मक चित्रपट करावासा वाटला. लाईफ ऑफ पाय मध्ये अँन्ग ली च्या शैलीनुरुप फॅण्टसीचा भरपूर वापर होता. पाय पटेल (सूरज शर्मा) ची अथांग समुद्रातील वाघाबरोबरची सफर आणि चमचमणा-या निळ्याभोर तलावातील रात्र ही दृश्य अविस्मरणीय होती.
डॅनी बॉयलाने नियतीचा चमत्कार या सूत्रावर आधारित सिनेमे शॅलो ग्रेव्ह, मिलियन्स केल्यामुळेच असेल कदाचित त्याला विकास स्वरुपांनी लिहिलेल्या कादंबरीवर स्लमडॉग मिलेनियर ची निर्मिती करावीशी वाटली. पुन्हा एकदा धारावीतील बकाल वस्तीचं चित्रण केल्याबद्दल आणि शीर्षकातच स्लमडॉग हा शब्द वापरल्याबद्दल डॅनी बॉयलला टीकेचं धनी व्हावं लागलं पण हा चित्रपट मूळ कादंबरीपेक्षा अधिक चटपटीत आणि मनोरंजक होता. ऑस्करच्या स्पर्धेतही या चित्रपटाने बाजी मारली.
स्टिव्हन स्पिलबर्ग, अँन्गली, डॅनी बॉयल यांच्यामुळे अमरिश पुरी, इरफान खान, अनिल कपूर, तब्बू, गुलजार, ए.आर.रहमान, रसुल पुट्टकी या जातीवंत भारतीय कलाकारांना जगमान्यता मिळाली. क्रॉस ओव्हर सिनेमाचा हा प्रवाह अखंडपणे सुरुच आहे. चित्रपट हे वैश्विक माध्यम असल्यामुळे ज्या दिग्दर्शकाला एखाद्या कथेवर चित्रपट बनवावासा वाटतो, ती कथा ज्या प्रदेशात घडते तिथे जाऊन चित्रपट बनवण्याचे स्वातंत्र्य त्याला मिळते. ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक ग्राथ डेव्हिस, सरु ब्रिटलेच्या ए लॉंग वे होम वर लायनची निर्मिती करतो. तर इराणियन चित्रपटात नववास्तवाद आणणारे मजिद माजिदी भारतात येऊन बियॉन्ड द क्लाऊड ची निर्मिती करतात. भारतीय दिग्दर्शकांना अशी संधी मिळून ते देखील परदेशात जाऊन तिथल्या माणसांच्या मानसिकतेचा शोध घेणारे चित्रपट निर्माण करण्याचं आव्हान स्वीकारतील तेव्हा आंतर सांस्कृतिक चित्रपटाचं हे वर्तुळ ख-या अर्थाने पूर्ण होईल.
-संतोष पाठारे
फोटो सौजन्य – गुगल (Google)