हाती टेनिसची बॅट होती… ऋषि कपूर
अगदी शालेय वयात धोबीतलावच्या मेट्रो थिएटरमध्ये तब्बल दोन तास लाईन लावून स्टाॅलचे दोन रुपये वीस पैशाचे तिकीट काढून हाऊसफुल्ल गर्दीत एन्जाॅय केलेल्या ‘ बॉबी’ (१९७३) पर्यंत मन फ्लॅशबॅकमध्ये गेले. राजेश खन्नाच्या क्रेझपाठोपाठ ऋषि कपूरचे तेव्हाच्या तरुणाईवर कमालीचे गारुड होते. देव आनंद आणि राजेश खन्नाच्या पाठोपाठ चिंटू कपूरच्या फॅशनचे फॅन्स खूप खूप होते…
मिडियात येईपर्यंत ‘स्टाॅलचा पब्लिक’ म्हणून असंख्य चित्रपट पाहताना त्यात ऋषि कपूरचे ‘खेल खेल मे’, ‘झूठा कही का’, ‘कर्ज’, ‘सरगम’ वगैरे पाहणे जणू कर्तव्यच झाले. मध्यमवर्गीय संस्कारांचा पगडा अथवा परिणाम असल्याने मिडियात आल्यावर सुरुवातीच्या काळात ‘पडद्यावरचे स्टार’ चित्रपटाच्या मुहूर्त/शूटिंग/पार्टी/प्रीमियर यात ‘लाईव्ह’ कसे दिसतात आणि आपल्यातील ‘फॅन’ जागा ठेवून त्याना मनोमन ‘लाईक्स’ कसा करतो याकडे माझे जरा जास्तच लक्ष.
सहज एक आठवण सांगतो, दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या ‘गंगा जमुना सरस्वती’ या चित्रपटाच्या अंधेरीच्या नटराज स्टुडिओतील मुहूर्ताला अमिताभ आणि ऋषि कपूर एकत्र पहायला मिळणार म्हणून वेळेच्या खूपच अगोदर जाऊन बसलो. ‘अमर अकबर अॅन्थनी’ आणि ‘नसिब’ या सुपर हिट चित्रपटानंतर मनजींच्याच चित्रपटात ते पुन्हा दिसणार याचे कुतूहल आणि कौतुक होते (यश चोप्रा दिग्दर्शित ‘कभी कभी’ इत्यादीत ते एकत्र आले होतेच). गंगा जमुना…. च्या मुहूर्त दृश्यात या दोघांसह मिथुन चक्रवर्तीने सहभाग घेतला. मनजींच्या चित्रपटाचा मुहूर्त अथवा शूटिंग हे एकदम भारी प्रकरण असे. उत्साह अगदी ओसंडून वाहत असे. मिडियात या सगळ्याची खूप दिवस चर्चा रंगे आणि अशातच एके दिवशी बातमी आली, या चित्रपटातून ऋषि कपूर बाहेर…..
तसं घडलं तरी ‘मुहूर्ताचा इव्हेन्टस’ विसरता येत नाही. त्या काळात ‘नगिना’ , ‘रणभूमी’ इतरही चित्रपटांच्या सेटवर जाणे झाले, पण ऋषि कपूर ‘आपले काम भले आणि आपण भले’ अशा वृत्तीचा! तात्पर्य, संवाद सहज शक्य नव्हता.
ते शक्य झाले, सुरेन्द्र मोहन दिग्दर्शित ‘हनिमून’च्या (१९९२) सेटवर ! खार जिमखान्यावर या चित्रपटाच्या सेटवर मी वर्षा उसगावकरच्या मुलाखतीसाठी गेलो, वर्षा अतिशय तपशीलवार मनसोक्त मुलाखत देते हा माझा अनुभव. ती व ऋषि कपूरवर ‘सुनिये जनाब, बोलो मेमसाब’ या गाण्यातील एक कडवे येथे चित्रीत होतेय हे शूटिंग सुरु होताच लक्षात आलेच. महत्वाचे म्हणजे, शुभ्र पांढरा वेष धारण केलेले दोघं टेनिस खेळताहेत आणि खेळता खेळता आपल्याला चेंडू लागला असं वर्षा नाटक करते असे अगदी गंमतीदार दृश्य चित्रीत होत होते. वातावरण अतिशय खेळकर व शांत होते. पहिला टेक छान रंगला, पटकन ओके झाल्यावर ऋषि कपूर नेमका मी आणि वर्षा बसलो होतो तेथे टॉवेलने अंग पुसत पुसत आला आणि तेवढ्यात वर्षाने त्याच्याशी माझी अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करुन दिली… तत्क्षणी अर्थात, काही जुजबी गोष्टीच बोलायच्या असतात. तो काळच तसा होता (स्टार भेटला, घे मुलाखत असे होत नसे.)
‘शॉट रेडी है’ असं कानावर पडताच ऋषि कपूर जागेवरून उठला. आता त्याचा सोलो शॉट होता. आणि अर्थात, माझी वर्षाशी सुरु असलेली मुलाखत पुढे रंगत राहिली.
ऋषि कपूरच्या सविस्तर मुलाखतीचा योग आर. के. स्टुडिओत ‘आ अब लौट चले’ ( १९९९) च्या सेटवर आला. यावेळी तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत होता (त्याने दिग्दर्शित केलेला हा एकमेव चित्रपट होय). यावेळी लक्षात आले ते, भिन्न शैलीच्या दिग्दर्शकांकडे भूमिका साकारल्याचे अनुभवाने ऋषि कपूरमधला दिग्दर्शक छान आकाराला आला होता. चित्रपट या माध्यम व व्यवसायाबाबत त्याचा दृष्टिकोन परिपक्व झाला होता.
हा चित्रपट प्रदर्शित होताना आम्हा सिनेपत्रकारांसाठी त्याचा वेगळा प्रेस शो आयोजित केला नाही (‘हीना’च्या वेळी दिग्दर्शक रणधीर कपूरने आर. के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये तसा शो आयोजित केला असता त्या मिनी थिएटरचे वेगळेपण आणि भव्यता अनुभवली). आ अब लौट चले आम्हा मिडियाला मिनर्व्हा थिएटरमध्ये पब्लिकसोबतच दाखवण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी आपल्या पुतण्याच्या दिग्दर्शनाला प्रेक्षक आणि समिक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतोय हे जाणून घेण्यास शशी कपूर आला होता हे आठवतेय आणि त्याने आम्हा जवळपास प्रत्येक सिनेपत्रकाराला या चित्रपटाबाबत विचारले…..
ऋषि कपूरच्या पहिल्या भेटीसह अशा आठवणी अनेक… आता फक्त आणि फक्त त्या आठवणीच!
दिलीप ठाकूर