मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
आणि गाणं रेकॉर्ड झालं….
काही वर्षांपूर्वी गाण्यांची निर्मिती केवळ चित्रपट किंवा स्वतःच्या अल्बमससाठी केली जात होती. ही गाणी मर्यादित लोकांपर्यन्त पोचत असत.मात्र आता काळ बदलत चालला असून अधिकाधिक लोकांपर्यंत रचना पोचविण्यावर भर दिला जात आहे. सोमेश नार्वेकरने याचाच अवलंब केला असून युट्युब, फेसबुक आणि अन्य ऑनलाईन माध्यमातून लोकांपर्यंत तो गाणी, स्वतःच्या रचना पोचवत आहे. असंच एक नवीन गाणं खास रसिकांसाठी फेसबुकच्या माध्यमातून सोमेश घेऊन आला आहे.
२००८ ला कॉलेजमध्ये असताना सोमेश नार्वेकर याने संगीतकार म्हणून काम करण्यास सुरूवात केली. तेव्हा “कवितांच्या गावा जावे” या काव्यसंग्रहातली सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांची “ती वेळ निराळी होती” ही अत्यंत सुंदर कविता त्याच्या वाचनात आली. या कवितेचे शब्द इतके सुंदर आणि भावपूर्ण होते की वाचतानाच अगदी अलगद पणे त्या कवितेला त्याला चाल सुचली. त्यावेळी संगीतकार म्हणून हे त्याचं आयुष्यातलं दुसरं गाणं होतं. पण असं असलं तरी ते गाणं त्यावेळी रेकॉर्ड झालं नाही.
त्या वेळी सोमेशचे वडील संगीतकार भगवंत नार्वेकर हे “वाघी – A Journey of Emotions” या चित्रपटाचं संगीत करत होते आणि त्या चित्रपटाचे गीतकार होते अरुण म्हात्रे. सोमेश त्यावेळी या चित्रपटाचं संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीत करत होता. हे रेकॉर्डिंग सुरू असताना सोमेशची पहिल्यांदा अरुण म्हात्रे यांच्याशी भेट झाली आणि तेव्हा सोमेशने त्यांना “ती वेळ निराळी होती” या कवितेला लावलेली चाल ऐकवली. त्यावेळी ते गाणं आवडल्यावर रेकॉर्ड करायचं ठरलं. पण तेव्हा ते गाणं रेकॉर्ड होऊ शकलं नाही.
पुढे आकाशवाणी वरील युवा वाणी वर माझ्या मुलाखत सदृश कार्यक्रमात हे गाणं सोमेश आणि गायिका सायली महाडिक हिने सादर केलं आणि त्याला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद आला. मात्र त्यानंतरही ते गाणं रेकॉर्ड झालं नाही. वेगवेगळ्या कामांमुळे ते गाणं तसच राहिलेलं. अचानक आत्ता लॉक डाऊनमध्ये काही गाणी चाळत असताना सोमेशला हे गाणं आठवलं आणि ते आत्ता सुरू असलेल्या परिस्थितीला अतिशय अनुरूप असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे ते गाणं आत्ता रेकॉर्ड करायचं ठरवलं. आणि रेकॉर्डिंग झाल्यावर रसिकांच्या भेटीला आता हे गाणं आलं आहे. फेसबुकवर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
छातीत फुले फुलण्याची
वाऱ्यावर मन झुलण्याची
ती वेळ निराळी होती
ही वेळ निराळी आहे… !!
अशा सुरेख ओळींना सोमेशने स्वतःच चाल लावली आहे.आणि सायली महाडिक आणि सोमेश नार्वेकर यांनी हे गाणं गायलं आहे.
सोमेशने त्याच्या स्वतःच्या होम सेट अप वरच हे गाणं रेकॉर्ड केलं. आणि त्यातला फिमेल पार्ट सायलीने तिच्या फोन वरच रेकॉर्ड आणि व्हिडिओ शूट करून पाठवला.अशा प्रकारे लॉकडाऊन मुळे आम्ही उपलब्ध तंत्राचा योग्य वापर करून हे गाणं जितकं छानरित्या प्रेक्षकांसमोर आणणं शक्य आहे तितका आणण्याचा प्रयत्न केला आहे असं सोमेश सांगतो.
संगीतकार म्हणून खूप काम करत राहण्याची, वेगवेगळे कवी/गीतकार, गायक यांसोबत काम करण्याची, नवीन नवीन गीतप्रकार हाताळण्याची इच्छा असून काम कोणतंही असलं तरीही दर्जा टिकवून ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल – सोमेश नार्वेकर
– आदित्य बिवलकर