आपला लक्ष्या
लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मी सर्वप्रथम माझ्या गावदेवी – गिरगावच्या भवन्स कॉलेजमध्ये ऐकले. १९७७ चे दिवस होते. आयएनटी, उन्मेष यांच्या एकांकिका स्पर्धेत भाग घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीनी कॉलेजच्या पहिल्या मजल्यावरील ऑफिस शेजारी भेटावे असे नोटीस बोर्डवर वाचून माझा मित्र राजेन्द्र खांडेकरसोबत मी देखिल हजर राहिलो. त्याला अभिनयात रस होता, मी तेव्हा वृत्तपत्रे/मासिकात पत्रलेखन करायचो.
आमच्या संत नावाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापकांनी राजन बने आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांसह आणखीन काही जणांची निवड केली. रमेश पवार लिखित ‘द ग्रेटेस्ट सॉव्हरीन’ ही ती एकांकिका होती आणि आमच्या कॉलेजची एकांकिका म्हणून आमच्या कॉलेजचे विद्यार्थी भारतीय विद्या भवन, एल्फिस्टन कॉलेजचे सभागृह येथे प्रोत्साहन द्यायला गेलो. तेव्हा फक्त लक्ष्याला पाहणे होत होते. तेव्हा मी कमालीचा बुजरा होतो. तेव्हाच्या मध्यमवर्गीय संस्कारांचा पगडा होता तो.
याच लक्ष्मीकांत बेर्डेशी काही वर्षांनी तो मराठी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार आणि मी सिनेपत्रकार म्हणून सातत्याने भेट होईल, त्याच्या घरी जेवायला जाणे होईल, तो माझ्या ‘तारांगण’ या पुस्तकाला प्रस्तावना देईल असे कधीच वाटले नव्हते. पण आमचे नाते छोट्या छोट्या भेटीतून घडत गेले, वाढत गेले, आकाराला येत गेले, घट्ट होत गेले. कोणत्याही नात्याची वीण अशीच असावी तरच ती घट्ट होते हे अनुभवाचे बोल.
कॉलेजच्या त्याच वर्षी कॉलेजच्या निवडणुकीत भारतीय विद्यार्थी सेनेचा दणदणीत विजय झाल्याने कॉलेज परिसरातच कच्ची बाजात आमच्या सोबत लक्ष्याही नाचायला होता. तोपर्यंत त्याच्याशी फक्त चेहरा ओळख होती इतकेच. (मोहन रावले तेव्हा विद्यार्थी सेनेचा प्रमुख होता आणि कालांतराने तो चार वेळा शिवसेना खासदार झाला.)
त्यानंतर काही वर्षांतच समजले लक्ष्याने अथक परिश्रमांतून मराठी रंगभूमीवर संधी मिळवलीय. तो आमच्या गिरगावातील कुंभार वाड्याचा रहिवासी आहे, युनियन हायस्कूलमध्ये शिकून भवन्सला आला होता आणि साहित्य संघ मंदिरात तो काही छोटी मोठी कामे करतोय हे माहित होत गेले होते.
लक्ष्या आपल्या कॉलेजमध्ये दिसत नाही, तो रंगभूमीवर स्थिरावायला धडपडतोय हे माहित असतानाच्या काळातच मी मिडियात आलो. आता लक्ष्यालाही मराठी चित्रपटात भूमिका मिळत होत्या. पण म्हणावा तसा आमच्या भेटीचा योग येत नव्हता. तो ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटाच्या निमित्ताने आला आणि माझे पहिलेच वाक्य होते, मी गिरगावातच राहतो. त्या काळात एक गिरगावकर दुसरा गिरगावकर भेटला की त्याला ‘आपल्या घरचाच’ माणूस भेटल्याचा आनंद होई. तेथेच आमचे सूर जमले.
त्या काळात आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून पुणे, कोल्हापूरला मराठी चित्रपटाच्या शूटिंग कव्हरेजसाठी नेले जाई आणि तेव्हा अनेकदा त्या चित्रपटात लक्ष्या असेच. तो हिंदी चित्रपटात भूमिका साकारु लागला आणि हिंदी चित्रपटाच्या सेटवर आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या. हे सगळे होताना लक्ष्याचा मेकअपमन मोहन पाठारे याच्याशी संबंध वाढत गेले. (आजही ते कायम आहेत. आज मोहन पाठारे भरत जाधवचा मेकअपमन आहे.)
लक्ष्याची एकच भेट नव्हे, तर अगणित भेटीचा सिलसिला वाढत गेला. गिरगाव सोडल्यावर तो अंधेरी पूर्वला रहायला गेला, मग आंबोलीला आणि त्यानंतर यारी रोडला गेला. तेव्हा आपला पत्ता सांगताना म्हणायचा, रानी मुखर्जी राहते त्या कॉम्प्लेक्समध्ये मी राहतो. या प्रत्येक ठिकाणी त्याच्या घरी गेलोय आणि भरपूर मासे खाल्लेत. ते खाऊन झाल्यावर आम्ही मुलाखतीला सुरुवात करु. त्या काळात एकट्याने दीर्घ मुलाखती होत आणि स्टारमधील माणसाची भेट होई (आज स्टार भेटल्यासारखा वाटेपर्यंत मुलाखत संपवावी लागते. कारण एक तर रांगेत उभे राहिल्यावर ती मिळालेली असते, आणि मागे खूप मोठी लाईन असते.) अगदी अखेरच्या काळात त्याने माझ्याकडे त्याच्या आत्मचरित्राची इच्छा व्यक्त केली. चार्ली चॅप्लीनचे जसे एकेक गोष्ट आठवत आठवत, फ्लॅशबॅकमध्ये जात जात आत्मचरित्र आहे, तसेच माझे तू लिही असं म्हणता क्षणीच मी माझ्या गती आणि पध्दतीने कामाला लागलो. काही भेटी झाल्या, सुरुवातीचे काही भाग लिहिलेही… पण ते पूर्ण होणे त्याच्या नशिबात नव्हते.
आज प्रिया तसेच अभिनय आणि स्वानंदी यांची सिनेमाच्या जगात भेट होते तेव्हा ‘आपला लक्ष्या’ पटकन डोळ्यासमोर येतोच. अगदी पहिल्या भेटीपासूनचा!
– दिलीप ठाकूर