ए भिडू….
जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) कुठेही असला तरी ‘कॉमन मॅन’ च्या खूप जवळ असतो. मग तो त्याच्या नवीन चित्रपटाचा खणखणीत ग्लॅमरस मुहूर्त असो, त्याच्या चित्रपटाचे शूटिंग असो, प्रीमियर असो अथवा पार्टी असो. आणि हे सगळे दीर्घकाळ असेच आहे.
देव आनंदचा ‘स्वामी दादा’ (१९८३) हा त्याचा पहिला चित्रपट. पण देवसाहेबांच्या चित्रपटात ते सोडून फारसं काही पाहण्यासाठी नसते हे त्यांचे दिग्दर्शनीय कसब आणि कौशल्य होते.
‘स्वामी दादा’ फ्लॉप झाला तरी जग्गूदादाला सुभाष घईने ‘हीरो’ (१९८३) केला. त्याची नायिका म्हणून अशाच फ्लॉप ‘पेंटर बाबू’ (१९८२) ची मीनाक्षी शेषाद्री निवडली. ‘हीरो’ मध्ये शम्मी कपूर, संजीवकुमार, बिंदू वगैरे वगैरे बरेच कलाकार होते. सुभाष घईच्या कोणत्याही चित्रपटात अशी कलाकारांची फौजच्या फौज हमखास दिसेल पण मुख्य कथासूत्र मेन कॅरेक्टर्स भोवती फिरत राही. येथे दिग्दर्शक दिसतो म्हणूया.
हे नक्की वाचा: नाना पाटेकर – आपला माणूस
‘हीरो’ (Hero) च्या पूर्व प्रसिध्दीला सुरुवात झाली आणि जग्गूदादाच्या वाळकेश्वर येथील तीन बत्ती विभागातील घरी जाण्याचा योग आला. गिरगावातून १०१ अथवा १०३ नंबरच्या बसने तेथे जाणे सोपे झाले तरी हिंदी चित्रपटाचा स्टार म्हटल्यावर त्या काळात पाली हिल (वांद्रे), जुहू येथे जाण्याचा जो फिल येतो तो अजिबात येत नव्हता. मला वाटते जग्गूदादा कायमच ‘कॉमन मॅन’ च्या जवळ राहिलाय त्याचे कारण तो ज्या वातावरणात वाढलाय त्यात आहे. तो आपल्यावर आजूबाजूच्या परिस्थितीने घडवलेले संस्कार विसरला नाही, त्याच्याशी तो कायमच जोडून असल्याने तो आजही ‘पडद्यावरचा स्टार’ न वाटता ‘त्याच पडद्या समोरचा प्रेक्षक’ वाटतो…
पहिल्या भेटीतच त्याने आपली खूपच जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा केल्या (देवसाहेबही हेच करत, पण त्यात ‘देव आनंद’ आणि त्याची स्टाईल खच्चून भरलेली असे. ते त्यानाच शोभे). जग्गूदादाने आम्हा दोघांनाही कॉमन कपबशीतील चहा दिला. ही गोष्ट खूप छोटी वाटते, पण दीर्घकालीन अनुभवातून सांगतो खूपच कमी स्टार तसे करतात. खरं तर ही मुलाखत नव्हे तर गप्पा झाल्या. त्या ओघात समजले की तो विल्सन कॉलेजचा, तर मी त्याच शेजारच्या भवन्सचा! अशा ‘अवांतर’ गोष्टी त्या काळात सहज बोलण्यात येत. त्यातूनच दोन माणसातील अंतर कमी होते. जे आज अजिबात होत नाही हे वेगळे सांगायला नकोच. गप्पा संपल्यावर ‘भिडू, और एक चाय हो जाए…. ‘ही त्याचीच फर्माईश’. सगळे झाल्यावर बस स्टॉपवरही तो सोडायला आलाच. हे सगळे ‘हीरो’ रिलीज होण्यापूर्वी….
आम्हा मिडियासाठीच्या न्यू एक्सलसियर थिएटरच्या चौथ्या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये ‘हीरो’ च्या प्रेस शोसाठी जग्गूदादा आवर्जून आला आणि तेव्हाही मध्यंतराला त्याने सर्वांसाठी असलेला समोसा, वेफर्स सर्वांसोबत खाल्ले.
‘हीरो’ ला समिक्षकांची फारशी पसंती नव्हती. पण संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या तुफान हिट गाण्यांवर चित्रपटाला गर्दी झाली. मुंबईत मेन थिएटर गंगा येथे रौप्यमहोत्सवी यशाकडे चित्रपट वाटचाल करु लागला आणि आता जग्गूदादा कसा वागतोय याबाबत कुतूहल निर्माण झाले…..
हे वाचलंत का: बॉलिवूडचं ग्लॅमर अनुभवूनसुद्धा मराठी इंडस्ट्रीशी नातं न तोडणाऱ्या श्रेयसची यशोगाथा!
नंतरही तो तसाच राहिला. विशेषतः आपले दृश्य ओके होताच तो अगोदर भूमिकेबाहेर येणार आणि मग सेटबाहेर येणार, कोणत्याही कामगाराला ‘दादा बिडी है क्या’ असे सहज विचारणार. अधिक वेळ सेटबाहेर राहत स्टुडिओच्या कॅन्टीनमध्ये येणार. कमलिस्तान स्टुडिओत असेल तर झणझणीत मिसळ पाव खाणार. संपूर्ण स्टुडिओभर कुठेही फिरणार. पूर्वी स्वाक्षरीचे युग होते. आपल्या फॅन्सना न कंटाळता ती देणार. मिडियासाठी तर जग्गूदादा हक्काचा आणि सोपा. फक्त त्याला दोन दृश्यांच्या दरम्यान जास्त वेळ मिळायला हवा. मुलाखत आणि फोटोग्राफरसाठी फोटोना तयार. पंचतारांकित हॉटेल मधील पार्टीतही वेटरकडून एकादी विडी वा सिगारेट घेणार, थोड्या गप्पा करणार. अगदी वांद्र्याला राहायला गेला तरी आपल्या नवीन पत्यावरही जुन्या घरीच असल्यासारखा वागला. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त पत्ता बदलला होता. तो नाही.
सुभाष घईच्या ‘राम लखन‘ (Ram Lakhan) च्या महाबळेश्वरच्या शूटिंग कव्हरेजसाठी जाणे झाले होते, तेथेही जग्गूदादा अगदी तस्साच. समोरची व्यक्ती ओळखीची असो वा नसो त्याला फरक पडला नाही.
प्रत्यक्षात तो असा असल्यानेच पडद्यावरच्या त्याच्या व्यक्तिरेखेशी आपण प्रेक्षक म्हणून सहज जोडले जात असू. बरीच वर्षे त्याने स्वतःला ‘असेही’ मेन्टेन केले आहे. साहजिकच त्याच्या मुलाखतीचे योग अनेक आले. त्यात एकादा तो एक गोष्ट सहज बोलून गेला. त्यात मला त्याच्या या वागण्याचा अर्थ थोडासा का असेना पण लागला.
तो म्हणाला की एक वक्त था भिडू, मेरे पास एक भी गाडी नही थी…. नंतर नवीन मॉडेलची येणारी जवळपास प्रत्येक गाडी मी घेऊ लागलो. माझा तो छंद झाला… उद्या कदाचित माझा पडता काळ येईल. एकही गाडी माझ्याजवळ नसेल. पण म्हणून मी दुःखी होणार नाही. याचे कारण म्हणजे, माझ्याकडे एकेकाळी एकही गाडी नव्हती, तशी ती आताही नाही असे मी समजेन…. होय, भिडू तू कळत नकळतपणे ‘जगण्याचे सूत्र’ च सांगितलेस…..