सूर तरुणाईचा…
दहावी बारावी चा निकाल लागला की प्रत्येक जण नवीन विश्वात पाऊल ठेवत असतं. खरं तर स्वप्नात रमण्याचं हे वय. एखाद्याच्या मनात परिकथेतील परी येऊ लागते, तर एखादीच्या मनात परिकथेतील राजकुमार येऊ लागतो . अशा प्रसंगावर आधारित अनेक गाणी आपल्याकडे आहेत. अलीकडच्या काळात आलेला ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट तुम्हाला नक्की आठवत असेल. या चित्रपटासाठी गीतकार अश्विनी शेंडे हिला एक प्रसंग सांगण्यात आला . कॉलेजचे दिवस, नवीन स्वप्न, नवीन ओळख, प्रेमात पडण्याआधीची धुंदी असं काहीसे त्या गाण्यात हवे होते. त्या गाण्याला संगीत निलेश मोहरीर याचे असणार होते. अश्विनी आणि निलेश हे साधारण एकाच काळात जवळपासच्या कॉलेजमध्ये शिकलेले.
१९९० च्या दशकातील हिंदी गाण्यांचा दोघांच्याही मनावर प्रभाव असल्याचं अश्विनी सांगते. त्या दशकातील ‘दुनिया हसींनो का मेला’,’पापा कहते हैं’ अशी कॉलेज जीवन मांडणारी गाणी दोघांनाही आठवत होती. अश्विनी आणि निलेश या दोघांनीही ठरवलं की गाणे जरी कॉलेज जीवनातील भावना मांडणारे असेल तरी त्यात एकही इंग्रजी शब्द येता कामा नये आणि हिंदी शब्द सुद्धा येता कामा नये. आपल्या पद्धतीचे पूर्ण मराठी गाणे केले पाहिजे . कॉलेजची मुले म्हटली की त्यांच्या बोलण्यात हिंदी, इंग्रजी शब्दच असतात, असा गैरसमज आहे, तो दूर करून आपल्या भावना मराठी भाषेत व्यक्त करणारे गीत लिहूया, असे ठरले. हे बोलणं सोपं होतं, पण ते निभावणं खरंच आव्हान होतं . अश्विनी शेंडे हिने ते आव्हान निभावलं आणि गीत लिहिलं,
” परिकथेतील पऱ्या, होऊनी खऱ्या
उतरल्या चंद्रावरुनी
खबर नवी ही जरा, मला बावरा
अचानक गेल्या करूनी “
संगीतकार निलेश मोहरीर ने या शब्दांना उत्तम चाल दिली. अभिनय बेर्डे या अभिनेत्यावर हे गाणे चित्रित झाले असून त्याने या गाण्यातील शब्दांना एक अभिनेता म्हणून उत्तम न्याय दिला आहे. सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये या गाण्याचे चित्रण झाले आहे, असे समजते. कौशिक देशपांडे याने हे गाणे गायले आहे. गाणे जरी आत्ताच्या काळातील असेल, तरी कोणत्याही काळात कॉलेजमध्ये शिकलेल्या मुलाला आपलेसे वाटेल, असे हे गीत आहे.