द बेस्ट..ऑल द बेस्ट..
नाटक ही अशी कला आहे जी कलाकाराचं आयुष्य बदलवून टाकते. असंच तीन कलाकारांचं आयुष्य बदलवून टाकणारं नाटक म्हणजे ऑल द बेस्ट!
अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर यांना व्यावसायिक रंगमंचावर प्रस्थापित करणा-या देवेंद्र पेम लिखीत या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. त्याच नाटकाच्या आठवणींना देऊया उजाळा.
३१ डिसेंबर १९९३ ला हे नाटक रंगभूमीवर आलं तेव्हा या तिन्ही नव्या चेह-यांना ओळखणारे फार कमी होते. तिन्ही कलाकारांनी आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा गाजवल्या होत्या पण व्यावसायिक रंगमंचावर त्यांचं ते पहिलंच पाऊल होतं. ऑल द बेस्ट ही एकांकीका अनेक नाट्यस्पर्धांमध्ये गाजली होती. या एकांकिकेने अनेक बक्षीसं पटकावली होती. ही एकांकिका दोन अडीज तासांची होती, पण नाट्यस्पर्धेतील वेळेच्या मर्यादेमुळे त्या एकांकिकेत खूप काटछाट करावी लागली. चंद्रलेखातर्फे या एकांकिकेचं नाटक करायचं ठरलं तेव्हा पुन्हा तो सगळा कापलेला भाग नाटकात समाविष्ट झाला.
मूळ एकांकिकेत भरत जाधव आणि अंकुश चौधरी मुका आणि आंधळा साकारत. पण एकांकिकेचं व्यावसायिक नाटक करताना बहिरा आणि नायिकेच्या भूमिकेसाठी नव्याने विचार करण्यात आला. त्यातून भरत आणि अंकुश सोबत संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकरची एंट्री नाटकात झाली.
भरत जाधव या नाटकाआधी शाहीर साबळे आणि पार्टीसोबत छोटीमोठी कामं करत असे. त्यावेळी मोहन वाघांच्या “चंद्रलेखा” नाट्यसंस्थेची बस लांबून जरी दिसली तरी या प्रतिष्ठित संस्थेच्या बसमध्ये एकदा तरी कलाकार म्हणून बसायचं स्वप्न भरतनं पाहिलं होतं. त्यासाठी या संस्थेच्या नाटकात अगदी नोकराची भूमिका मिळाली तरी करायची भरतची तयारी होती. पण ऑल द बेस्ट नाटकातील भूमिकेने भरतला या बसमध्ये फ्रंट सीट मानाने देऊ केली. भरत या नाटकात मुक्याची भूमिका करायचा. एकही वाक्य नसताना या ‘मुकाभिनयाने’ त्याला सर्वोत्तम विनोदी भूमिकेची अनेक पारितोषिकं मिळवून दिली.
संजय नार्वेकरचा बहिराही असाच खास होता. या भूमिकेसाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. तालमीच्या वेळी कुठेही काही पडलं वा आवाज आला तरी संजयचं तिकडे लक्ष जायचं. त्यामुळे बहिरा साकारताना ऐकू येत असतानाही ऐकू न येण्याचा अभिनय करणं आव्हानात्मक होतं. ते संजयनं उत्तम पेललं.
अंकुश चौधरीसारखा देखणा नट पहायला तरुणाईची या नाटकाला झुंबड उडायची. ह्या भूमिका अक्षरश: तिघंही जगले. लोकांना या कलाकारांची नावंही माहित नसायची. आंधळा, मुका, बहिरा म्हणूनच लोकं त्यांना ओळखत असत. या नाटकाला रिपीट ऑडीयन्स खूप लाभला. एका चाहत्याने तर शिवाजी मंदिरला ऑल द बेस्टचे जवळपास १५० प्रयोग पाहिले .५०,१००,१५० व्या प्रयोगाला त्यांनी स्वत: पेढे वाटले. आणि विशेष म्हणजे हा चाहता कर्णबधिर होता.
आठव्या प्रयोगापासून या नाटकाला जो हाऊसफुल्लचा बोर्ड लागला तो अगदी शेवटपर्यंत.या नाटकाने ३६५ दिवसात ४५२ प्रयोगांचा विक्रमच केला.विविध संचात हे नाटक रंगभूमीवर येत राहिलं. मराठीसह गुजराती, हिंदी,तुळू भाषांतही हे नाटक साकारलं गेलं.
आज २७ वर्षांनंतरही या नाटकाच्या आठवणी सदाबहार आहेत. या नाटकाने तिन्ही कलाकारांना स्टार तर केलंच पण मुख्य म्हणजे विविध माध्यमांच्या भडीमारात अडकून नाटककला विसरलेल्या तरुणाईला हाताला धरुन नाट्यगृहात आणून बसवलं.या नाटकाचं हे ऋण मराठी नाट्यरसिकांच्या मनात कायम जपून राहतील.