‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मिशन पॉसीबल…
लहानपणी डिक्सेस्लीया या आजारामुळे बारा वर्षात पंधरा शाळा बदलणारा मुलगा पुढे हॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय आणि महागडा अभिनेत होईल, हे कोणाला सांगितलं असतं तर नक्कीच पटलं नसतं. कौंटुंबिक वाद, पैशाची चणचण, वारंवार होणा-या दुखापती यावर मात करत या मुलानं मिशन पॉसीबल साध्य केलं….हा मुलगा म्हणजे हॉलिवूडचा अॅक्शन हिरो टॉम क्रुझ. टॉमचं सर्व लहानपण म्हणजे संघर्ष होता. डिक्सेस्लियासारख्या आजारावर मात करत हा संघर्ष टॉमनं जिंकलाय. आज तो या आजारानं त्रस्त असलेल्या मुलांसाठी कामही करतो. या अॅक्शन हिरोचा मिशन इंम्पॉसिबल ते मिशन पॉसिबल हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.
थॉमस क्रूज़ मापोदर, म्हणजेच टॉम क्रुझ याची आई मरियम एक शिक्षिका होती. तर वडील इलेक्ट्रीकल इंजेनिअर. टॉमची आई आणि मावशी या डिक्सेस्लिया आजारानं त्रस्त होत्या. हा आजार टॉमलाही आला. शाळेत त्याचे सहकारी त्याला कायम चिडवायचे. डिक्सेस्लीयामुळे त्याला निट बोलता यायचं नाही. काही लक्षात रहायचं नाही. त्याचे वडील महत्त्वकांक्षी होते. मुलाकडून त्यांच्या अपेक्षा होत्या. पण टॉमला असं अडखळत बोलतांना पाहून त्यांचा संताप व्हायचा. परिणामी टॉमची रोज घरी धुलाई व्हायची. पुढे हे कुटुंब कॅनडाला स्थलांतरीत झालं. टॉमची शाळा पुन्हा बदलली. परत नवीन मित्र आणि त्यांच्याकडून होणारा त्रास. पण टॉमनं अभ्यासापेक्षा खेळामध्ये नाव कमवायला सुरुवात केली होती. तो हॉकी खेळायला लागला. पण त्यात त्याचा पुढचा दात तुटला आणि हॉकी मागे पडली. मग तो कुस्तीकडे वळला. इथे त्याचा गुडघा दुखावला. मग कुस्तीही मागे पडली. यासर्वात टॉमच्या आई वडीलांचा घटस्फोट झाला. तेव्हा टॉम सहावीला होता. त्याची आई टॉम आणि त्या्च्या तीन बहिणीला घेऊन अमेरिकेला परत आली. एकुण टॉमची शाळा पुन्हा एकदा बदलली गेली. आता टॉम आईला घर चालवण्यासाठी मदत करायला लागला. अगदी बागकाम, पेपर टाकणे अशी छोटी कामं करुन तो पैसे मिळवायचा. कॉलेजमध्ये गेल्यावर टॉम फुटबॉलकडे वळला. पण एका मॅचआधी त्याला कोचनं बियर पितांना पकडलं…परिणामी टीममधून त्याची हाकालपट्टी झाली. या सर्वातून त्रस्त झालेल्या टॉमनं प्रिस्ट होण्याचा निर्णय घेतला होता. त्याने तोही प्रयत्न केला. पण एक वर्षानंतर त्याचाही टॉमला कंटाळा आला.
कॉलेजमध्ये असतांना त्याने एका ड्रामामध्ये काम केलं. तेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला अभिनयात करीअर करायला सुचवलं. पाच फूट सात इंच उंची, देखणा चेहरा असलेला टॉमनं मग अनेक ऑडीशन दिल्या. पण त्याला संधी मिळाली नाही. 1981 मध्ये एन्डलेस लव्ह या चित्रपटात त्याला भूमिका मिळाली. ही भूमिका लहान असली तरी टॉमची दखल घेण्यात आली. त्यानंतर त्याला रिस्की बिझनेस नावाचा चित्रपट मिळाला. रोमॅंटीक कॉमेडी असलेला हा चित्रपट यशस्वी झाला. त्यापाठोपाठ टॉमचा टॉप गन आला. यामुळे या देखण्या अभिनेत्यावर सुपरस्टारचा शिक्का बसला.
पुढे या सुपरस्टारचे कलर्स ऑफ मनी, डेज ऑफ थंडर, रॅन मॅन, बॉर्न ऑन दि फोर्थ ऑफ जुलै हे चित्रपट आले. टॉमच्या प्रत्येक चित्रपटानं त्यांचाच रेकॉर्ड तोडला. बॉक्स ऑफीसवर मिलीयन डॉलरचा बिझनेस या चित्रपटांनी केला. अभिनेता म्हणून यशस्वी ठरलेला हा अभिनेता आता निर्मात्याच्या भूमिकेत गेला. 2000 साली त्यानं नवीन भूमिका स्विकारली…त्याच्या नवीन नावानं तरुणांना जणू भूल घातली. आणि अद्य़ापही घालत आहे. हे नाव आहे इथेन हंट…अॅक्शन हिरो….इथेन हंट…मिशन इंम्पॉसिबल या टॉम क्रुझच्या चित्रपटातील हिरोचं हे नाव प्रसिद्ध झालंच पण हा चित्रपटही सुपरडूपर यशस्वी झाला. टॉमच्या या मिशनचे एकामागोमाग एक असे भाग निघत गेले. या चित्रपटाच्या सिरीजमधला सातव्या चित्रपटाचे शुटींग सप्टेंबर मध्ये सुरु होत आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीखही टॉमनं आधी जाहीर केलीय. ती म्हणजे 19 नोव्हेंबर 2021. विशेष म्हणजे वयाच्या साठीकडे झुकलेला टॉम अजूनही हिरोच्या भूमिकेत झळकतो आणि शोभतोही.
टॉमने तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. हॉलिवूडचा हा सर्वाधिक श्रीमंत सुपसस्टार तरुणींच्या ह्दयावर राज करतोय. त्याच्या खात्यामध्ये अनेक सुपरहीट अॅक्शनपटांची भर पडत आहेत. टॉमनं तीन लग्न केली आहेत. मिमी रॉजर, निकोल कीडमॅन, कॅटी होम्स या हॉलिवूडच्या सौदर्यवतींबरोबर त्याचं लग्न झालं. पण काही वर्षांनी घटस्फोटही झाला. आता तीन मुलांचा बाप असणारा टॉम सिंगल असाच स्टेटस लावतो हे विशेष…टॉमला बाईकचं प्रचंड वेड आहे. सगळ्या महागड्या बाईक त्यांच्या संग्रहात आहेत. आपल्या चित्रपटात टॉम याच बाईक वापरतो…आणि त्याचे स्टंट तो स्वतः करतो. एका चित्रपटाच्या अॅक्शन सीनचं शूट करतांना टॉमच्या पायाला फॅक्चर झालं होतं. पण टॉमनं अशा अनेक दुखापतींकडे दुर्लक्ष केले आहे. फोर्ब्स मासिकानं त्याचा उल्लेख जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती असा केला आहे. तर प्रसिद्ध अर्थशास्त्री एडवर्ड हे टॉमचा उल्लेख हॉलिवूडचा सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत अभिनेता, असा करतात.
या अॅक्शन हिरोच्या नावावर अनेक रेकॉर्ड जमा आहेत. त्यापैकी एक म्हणजे HALO jump…अर्थात high altitude low oxygen jump…म्हणजेच पॅराशूटमधून उडी मारण्यात येते त्यापेक्षा अधिक उंचीवरुन ही उडी मारण्यात येते. त्यासाठी विशेष सुटही येतो. टॉमनं ही HALO jump केली आहे. आता हा टॉम नासाच्या एका प्रोजेक्टच्या प्रचारासाठी थेट आंतरराष्ट्रीय आंतराळ केंद्रात शुटींग करणार अशी चर्चा आहे.
एक डीस्लेसिया झालेला मुलगा स्वतःच्या इच्छाशक्तीच्या आधाराने किती मोठी झेप घेऊ शकतो याचं टॉम क्रुझ हे उत्तम उदाहरण आहे. हा अॅक्शन हिरो आज इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
सई बने…