‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
उर्मिला मातोंडकर आणि बरंच काही
उर्मिला मातोंडकर एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. आणि अशी स्वतःची ओळख असणारे स्टार सिनेमाच्या जगात खूपच मोजकेच असतात. काहींना त्यांची घट्ट चिकटलेली इमेज स्वतःचे खरे आयुष्य जगू देत नाही, तर काहींना आपण २४ तास स्टार आहोत हे अजिबात विसरायचे नसते. त्यांच्या फॅन्स आणि फॉलोअर्सना आपल्या आवडत्या स्टारने पडद्यावरच्याच जगासारखे अथवा स्टाईल/देहबोलीने प्रत्यक्षात वावरावे असे वाटत असते. या चक्रव्यूहातून सुटका करून घेणे फारच कमी स्टारना जमते आणि आवडते. त्यात एक उर्मिला मातोंडकर आहे.
ती तशी का आहे? माझ्या मते, त्याचे कारण तिच्या लहानपणापासूनच्या जडणघडणीत आहे. तिने डॉ. श्रीराम लागू दिग्दर्शित ‘झाकोळ’ ( १९८०) या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून चित्रपटाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. मग काही हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारत सतत नवीन अनुभव घेतले. ते करताना एकीकडे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतले आणि चित्रपट स्वीकारताना श्याम बेनेगल (कलयुग), शेखर कपूर (मासूम), राहुल रवैल (डकैत), के. विश्वनाथ (सूर संगम) अशा उत्तम आणि फोकस्ड दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारल्या.
त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील भटकंती अनेकदा तरी अशा बालकलाकारांचे पालक आपल्या पाल्याचा फोटो अल्बम आणि सुपर हिट गाण्यांवरच्या रेकार्ड डान्सची व्हिडिओ कॅसेट घेऊन फिरताना भेटत. या स्टुडिओतून त्या स्टुडिओत अशा त्यांच्या निर्मात्यांच्या भेटीगाठीत आम्हा सिनेपत्रकारांनाही ते भेटत. उर्मिलाच्या बाबतीत तसे काही नव्हते. मोजक्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारत असतानाच उर्मिलाचे अभ्यासावरचे लक्ष कायम होते आणि आईबाबांची शिस्त आणि संस्कार होते. बाबांची आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, साहित्य क्षेत्रातील घटनांकडे अतिशय तटस्थपणे पाहण्याची दृष्टी आणि त्यावरचे आपले स्पष्ट मत व्यक्त करण्याची वृत्ती उर्मिलात आहे आणि ती मग वाढत्या वय आणि अनुभवानुसार वाढत गेली आणि म्हणूनच कंगना रानावतला तिने रोखठोक आणि मुद्देसूद उत्तरे दिली. यात एक अतिशय जागरुक व्यक्ती म्हणून उर्मिला वागली, बोलली. अभिनेत्री म्हणून यावेळी तिची फक्त ओळख आहे, अस्तित्व नाही. हीच तिच्या यशस्वी कारकीर्दीची मोठी मिळकत आहे.
उर्मिलाने ‘नरसिंह’ (१९९१) पासून नायिका म्हणून वाटचाल सुरु करताना मराठी मिडियाची उत्फूर्त प्रतिक्रिया होती. हिंदी चित्रपटसृष्टीत आणखीन एक महाराष्ट्रीय अभिनेत्री! अथवा हिंदी चित्रपटसृष्टीत आणखीन एक माधुरी दीक्षित!! खरं तर उर्मिलाच्या स्वभावाला हे अजिबात रुचणारे नव्हते. मराठी साहित्याचे भरभरून वाचन केल्याने तिच्यात अतिशय उत्तम मॅच्युरिटी आली होती, आता ती जगभरातील उत्तमोत्तम इंग्रजी साहित्य वाचू लागली होती. पण तद्दन फिल्मी मॅगझिनमधून काय प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. ‘नरसिंह ‘चेच दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्याच ‘तेजाब ‘ ( १९८८) ने माधुरी दीक्षित स्टार झाल्याने उर्मिलाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माधुरीशी तुलना होत होती. उर्मिला मिडिया क्रेझी नसल्याने तिने उठसूठ मुलाखती दिल्या नाहीत (त्याचाही काहीना राग आला तो विषयच वेगळा). आपल्याकडे काही सांगण्यासारखं असेल तरच मुलाखत द्यावी, ते देखील नेमक्याच मिडियाला हा तिचा ॲप्रोच होता.
‘नरसिंह ‘ ९१ च्या ५ जुलै रोजी रिलीज झाला. मुंबईत मेन थिएटर मिनर्व्हा. उर्मिलाच्या पडदाभरच्या उत्फूर्त स्क्रीन प्रेझेन्ससमोर तिचा हीरो रवि बहेलचे अस्तित्वच जाणवले नाही. त्या काळात ‘सिनेमा पाहून मुलाखत घ्यायच्या प्रथेप्रमाणे ‘उर्मिलाच्या घरी फोन केला, तेव्हा ‘तिच्या काही पुढील चित्रपटांचे शूटिंग सुरु झाल्यावर आपण मुलाखत करु, काही नवीन सांगण्यासारखे असेल’ असा मिळालेला निरोप मी सकारात्मक घेतल्याचे खूप पथ्यावर पडले. काही दिवसांनी पुन्हा संपर्क करताच अंधेरीतील तिच्या घरी किती नंबरच्या बसने यायला हवे, कुठे उतरायला हवे असे सगळे तपशील मिळाले. (गंमत माहित्येय का, त्या काळात प्रिन्ट मिडियात असे सगळेच तपशील दिले जात आणि एक प्रकारे त्या स्टारपर्यंत वाचकांना नेले जाई. प्रत्येक काळाची काही खास वैशिष्ट्य असतात हो)
उर्मिला मातोंडकरशी झालेल्या पहिल्या भेटीत मी दोन मुलाखती घेतल्या. एक होती, वनलाईनर. ‘सह्याद्री’ साप्ताहिकात स्टारच्या आवडीनिवडीचे सदर मी लिहित होतो ( कोई काम छोटा नही होता या तत्वानुसार त्यात अनेक मराठी हिंदी स्टार कव्हर केले). त्यात माझा एक प्रश्न होता, मुंबई बंदच्या दिवशी? ( काय करते हे त्या प्रश्नात सुचित होते.) त्यावर पटकन तिने उत्तर दिले, मुंबई खूप छान दिसते. दुसरी मुलाखत नवशक्ती दैनिकासाठी होती. आणि ‘नरसिंह’ नंतर हा फोकस होता. त्यासाठी तिने अगदी भरभरून उत्तरे दिली.
उर्मिलाच्या करिअरमध्ये चढउतार आहेत. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगिला’ ( १९९५) च्या रिलीजपूर्वीचा काळ काहीसा असाच पडता होता. जुहूच्या सुमीत प्रिव्ह्यू थिएटरमध्ये त्याच्या गाण्यांचे आम्हा सिनेपत्रकारांसाठी स्क्रीनींग असताना आतमध्ये जाताना आम्ही बरेच मिडियावाले कोरडे होतो. ( फार अपेक्षा नव्हत्या) रामूचा ‘शिवा’, ‘द्रोही’ पाहून फार इम्प्रेस झालो नव्हतो. ‘रंगीला’ची गाणी पाहता पाहता असे काही रंगून गेलो की, कधी एकदा उर्मिलाची दिलखुलास मुलाखत करतोय असं झाले. अर्थात, चांगली मुलाखत हवी असेल तर स्टारचे बिझी शेड्युल समजावून घ्यायला हवे. उगाच आपलं, आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला भेटत नाही म्हणजे काय असा कांगावा करता येत नाही.
एव्हाना उर्मिलाकडेही मिडियाचे बरे वाईट अनुभव आले होतेच. स्टार एकाच वेळेस बहुस्तरीय वाटचाल करत असतो, त्यात हा एक फंडा महत्वाचा! खारच्या केतनव डबिंग थिएटरमध्ये ‘रंगीला’चे डबिंग आहे, आपण तेथे भेटू शकतो. त्या काळात स्टारच्या मुलाखती स्वतंत्रपणे घेता येत, त्यामुळे अशी संधी महत्वाची. ‘रंगीला’ मधील आपला ग्लॅमरस लूक छान प्रेझेंटेबल आहे, तो कुठेही बिभत्स अथवा अश्लील वाटत नाही. अशा प्रसंगाची (विशेषतः तनहा..तनहा यहाँ पे जीना यह कोई बात है गाणं) गरज का आहे, दिग्दर्शक त्याकडे कसे पाहतोय, पडद्यावर ते कसे दिसेल याची पूर्वकल्पना होती आणि मगच हे गाणे केले असे उर्मिला म्हणाली. आणखीनही अनेक गोष्टी आमच्या गप्पात आल्या.
काही दिवसांनी आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून इरॉसचे ‘रंगीला’चे फस्ट डे फर्स्ट शोचे तिकीट दिले आणि पब्लिकसोबत हा सिनेमा एन्जॉय करताना तो आणखीन कलरफुल वाटला. अर्थात, काही दिवसांनी उर्मिलाच्या मुलाखतीचा योग येणे अगदी स्वाभाविक होतेच. मग अनेकदा तरी उर्मिलाचा नवीन चित्रपट पाहून तिची मुलाखत घ्यायची असे घडत गेले. त्या काळात कधी लोकसत्तेच्या “रंगतरंग” या मनोरंजन क्षेत्रावरच्या चार पानी पुरवणीत पानभर मुलाखत, तर कधी लोकप्रभा साप्ताहिकात किमान पाच सहा पाने मुलाखत अथवा सामनाच्या उत्सव पुरवणीत पहिल्या पानावर सुरु होऊन शेवटच्या पानावर अशी मुलाखत घ्यायचो.
एक म्हणजे अनेकदा तिच्या घरी जाऊन मुलाखत घ्यायचो त्यामुळे सवड असे. महत्वाचे म्हणजे मी कधीच कोणत्याही स्टारला खाजगी प्रश्न करत नाही अथवा आपले हे व्यावसायिक संबंध आहेत हे विसरत नाही. कधी कधी एका मुलाखतीसाठी वारंवार फोन करावे लागले, महिनाभर थांबावे लागले तर तो एकूणच कामाचाच भाग मानले / आजही मानतो. त्या काळात लॅन्डलाईन फोन असल्याने आजच्यासारखा मोबाईल डिस्टर्ब नसे आणि स्टारशी थेट संवाद असल्याने पीआरओच्या सूचना अथवा ‘सिर्फ इसी फिल्म के उपर पुछना. आपको दस मिनिट मिलेगा’ अशा सूचना नसत. अशी दहा मिनिटे तर ख्याली खुशाली विचारण्यात जातात.
‘दौड’, ‘मस्त’, ‘सत्या’, ‘कौन’, ‘भूत’, ‘पिंजर’, ‘खुबसुरत’, ‘दिल्लगी’, ‘दीवाने’ अशा अनेक चित्रपटांच्या निमित्ताने उर्मिलाच्या मुलाखतीचे योग येताना जाणवले की ती विचारपूर्वक चित्रपट स्वीकारते. प्रत्येक वेळी तिच्याकडे अनुभवातून नवीन काही सांगण्यासारखं असते. एकादा चित्रपट निर्मितीवस्थेत काही कारणास्तव फसला तर कलाकार व्यक्तीशः काही करू शकत नाही. तिला एकाच वेळेस भरपूर चित्रपटात भूमिका साकारण्यास विशेष रस नाही, आपल्या वाचन, फिटनेस, कुटुंब, मित्रपरिवार यांनाही बराच वेळ द्यायला हवा; ती तिच्या मतांशी ठाम असते. विनाकारण ती कोणालाच जवळ येऊ देणार नाही.
तर या अनेक मुलाखतींमधील काही सांगण्यासारखं असं, ‘दौड’ हा चित्रपट आपल्याकडे फसल्यासारखा वाटला, पण विदेशात अशा प्रकारचे चित्रपट म्हणजे एक वेगळा अनुभव असतो. मी चित्रपट स्वीकारताना ‘अरे बापरे, आज या सिनेमाच्या शूटिंगला जायचयं?’ असा कंटाळा वाटेल असे चित्रपट स्वीकारत नाही. आपले सगळेच चित्रपट चांगले असतात असा माझा दावा नाही आणि तसा तो कोणीही करु शकत नाही. सनी देओल दिग्दर्शक म्हणूनही चांगला आहे असाच ‘दिल्लगी ‘च्या वेळी अनुभव आला. केवळ तारखांचा प्रॉब्लेम होता म्हणून यश चोप्रा यांच्या ‘दिल तो पागल है ‘मधील भूमिका स्वीकारली नाही. ती मग करिष्मा कपूरने केली. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित अनेक प्रकारच्या चित्रपटांत भूमिका साकारल्या तशाच इतरही अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारली. एन. चंद्रा, चंद्रप्रकाश व्दिवेदी, हॅरी बावेजा, अनिझ बज्मी, राज कंवर, राजकुमार संतोषी, अनुपम खेर इत्यादी अनेक नावे घेता येतील.
उर्मिलाच्या अनेक वैशिष्ट्यांतील एक, रोजची वृत्तपत्रे वाचणे आणि ते करताना बिटविन द लाईन्सही वाचणे. म्हटलं ना, उर्मिला मातोंडकर एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे आणि ते अशा अनेक लहान मोठ्या गोष्टीतून घडलयं आणखीन घडतेय.