टीकाकार परवडले, ट्रोल धाड नकोत….
मराठी- हिंदी चित्रपटसृष्टीतील अगणित सेलिब्रेटिज आज सोशल मिडियातील ट्रोलर्सना कंटाळलेत. काहीना त्यामुळेच सोशल मिडियातून एक्झीट घेतली. काहींची ती तात्पुरती असू शकते… आपल्या फॅन्स आणि फाॅलोअर्सकडून आपलं “कौतुक एके कौतुकच व्हावे” अशी कोणाचीही अपेक्षा नसतेच. कधी लाईक्स मिळणार तर कधी डिसलाईक्स हे तर होणारच. पण अनावश्यक सल्ला देता देता वाह्यात काॅमेन्टस, अश्लील शेरेबाजी, कसे असावे/वागावे/बोलावे, कोणती मते व्यक्त करावीत यांच्या अवाजवी सूचना असे करता करता एक प्रकारच्या अधिकारवाणीने जणू दमबाजी, अमक्या तमक्या भाषेतील चित्रपटात भूमिका साकारायचीच नाही असे सांगणे हे फारच अतिरेकी होत चाललयं. ही कोणती प्रवृत्ती, ही कसली संस्कृती?
एक सर्वसाधारण मत असते की, चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करु. पण चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू यांच्याकडून अपेक्षा ठेवण्याचे युग मागे पडून आमच्या अपेक्षेप्रमाणेच फोटो सेशन व्हायला हवे, एखाद्या गोष्टीवर आम्हाला हवे तसेच मत व्यक्त व्हायला हवं, आम्ही सांगतो तशाच चित्रपटात भूमिका साकारायल्या हव्यात वगैरे वगैरे बरेच काही ना काही वाढलयं त्याने काय होईल? जे खरे चाहते आहेत, त्यांची मते/अपेक्षा/ शाबासकी बाजूला पडेल, खुद्द सेलिब्रेटिज काॅमेन्टसकडे पूर्णपणे डोळेझाक करुन आपल्या करियरवरचा फोकस्ड वाढवतील, तोच जास्त महत्वाचा आहे याची त्यांना असेलेली कल्पना आणखीन बळकट होईल. स्वतःला घडवणे केव्हाही हितकारकच असते अथवा राधिका आपटेसारखा स्टॅन्ड घ्यावा. सर्व काॅमेन्टसवर नजर टाकताना काही जण चांगल्या प्रकारे व्यक्तही झालेले असतात, त्यांचा स्वीकार करावा. एवीतेवी आपण काॅमन मॅनसाठी असलेल्या माध्यमात कार्यरत आहोत, त्यात एकादा सल्ला उपयुक्त असूही शक्यतो…. असो. चाहत्यांनी व्यक्त होणे नवीन गोष्ट नाही. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या जवळपास प्रत्येक गोष्टीवर आपण उघड बोललो नाही तरी मनात व्यक्त होतो, नजरेतून बोलतो. तो तर मानवी स्वभाव आहे. आपल्या देशात हिंदी तसेच मराठीसह सर्वभाषिक प्रादेशिक चित्रपट आणि क्रिकेट या गोष्टी समाजाच्या अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचल्यात. त्या समजायला सोप्या असे पूर्वापार मानले जाते. प्रत्यक्षात तसे नाही, पण ते सखोलतेने समजून घेण्यात रस असलेला वर्ग अगदी थोडा आहे. अन्यथा, सिनेमा आणि क्रिकेट हे समजणे इतकं सोपं नाही. एखाद्या दिग्दर्शकाने अमूकच थीम का निवडली असेल यापासून सिनेमा पाहणे असते, पण ‘हिंदी चित्रपट म्हणजे दोन घटका करमणूक आणि मराठी चित्रपटात चांगली कथा हीच स्टार ‘ असते हे अगदी सुरुवातीपासूनच अशा पध्दतीने प्रचलित आहे की, ती बघण्याची चौकट अधूनमधून बदलली जाते. कधी हिंदीत एकादा ‘पा ‘ अथवा ‘गली बाॅय ‘ येतो तेव्हा वेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. आणि एकादा मराठी चित्रपट हिंदीची वाईट नक्कल असते तेव्हा हंसे होते.
सिनेमा आणि त्याचे एकूणच विश्व, त्याचे स्टार यावर अगदी सुरुवातीपासूनच काही ना काही बोलण्याची/लिहिण्याची/ऐकण्याची/वाचण्याची/सांगण्याची सामाजिक आणि सांस्कृतिक पध्दत आहे. मूळ गोष्टीत त्यामुळे भर पडत जाते तो भाग वेगळा. मूकपटाचा काळही त्याला अपवाद नाही. तेव्हा हे दृश्य माध्यमच नवीन होते, चालती फिरती दृश्ये पाहणेच रोमांचित अनुभव होता. आपल्या देशात पहिले स्क्रीनिंग ७ जुलै १८९६ साली फ्रान्सच्या ल्युमिरी बंधुनी केले. त्यांनी अवघ्या काही मिनिटांचा ‘द अराव्हल ऑफ ट्रेन ‘ हा लघुपट मुंबईत वाॅटसन हाॅटेलमध्ये दाखवला तेव्हा त्यात एक आगगाडी येते आणि स्टेशनवर थांबते इतकेच दृश्य होते. ते पाहून काही घाबरलेही. तेव्हापासून आजपर्यंत सिनेमाने आणि प्रेक्षकांची खूपच आणि चौफेर अंतर्बाह्य बदलत प्रवास केला. दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र ‘ ( ३ मे १९१३) निर्माण केला तेव्हा ‘आपल्या माणसाने ‘ चित्रपट निर्माण केल्याचा अभिमान वाटला आणि आजही तो कायम आहे. काळ जस जसा पुढे गेला तस तसा चित्रपट पाहण्याच्या पध्दती बदलत गेल्या आणि त्यावर व्यक्त होणारा चित्रपट रसिक, मिडिया आणि खुद्द चित्रपटसृष्टी बदलली तसेच कसे व्यक्त व्हायचे हेही बदलले. सिनेमाचा रिव्ह्यू आणि सिनेमावरची जनसामान्यांची प्रतिक्रिया ही सर्वकालीन गोष्ट आहे. रिव्ह्यूतील ( अनाहूत) मते/सल्ले/सांगितलेले दोष पटतील/न पटतील. पण सिनेमाचा रिव्ह्यू हा पारंपरिक आणि एकूणच सिस्टीमचा एक भाग आहे. तर प्रेक्षक आपला वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करून चित्रपट पाहतात तेव्हा तेही आवडत्या चित्रपटाला डोक्यावर घेणार आणि न आवडलेल्या चित्रपटाला रिकाम्या खुर्च्याना पाह्यला लावणार. आणि यात एक जमात चाहत्यांची. आवडत्या स्टारचा एकेक चित्रपट पुन्हा पुन्हा पाहणे, त्याच्या टूथब्रशपासून नवीन गाडीपर्यंत माहिती मिळवणे, त्याच्या फोटोचे कलेक्शन करणे वगैरे वगैरे काही विचारु नका. वृत्तपत्र मासिकात आपल्या आवडत्या स्टारबद्दल जे जे काही प्रसिद्ध होईल त्याची अतिशय आवडीने कात्रणे जमवणारे आपल्या देशात अगणित फिल्म दीवाने होते आणि आजही आहेत. आवडत्या स्टारच्या हेअर स्टाईलपासून ड्रेसपर्यंत फाॅलो करण्यात त्यांना वेगळा आनंद मिळतो. अशा अनेकांना आपल्या स्टारबद्दल कोणी जरा काही वाईट बोलल्याचे अजिबात आवडत नाही. माझ्या काॅलेज जीवनात राजेश खन्ना श्रेष्ठ की अमिताभ बच्चन यावर आम्हा मित्रांमध्ये काॅलेज कॅन्टीनमध्ये तुंबळ वाद होत.याचीच आणि एक पायरी म्हणजे आवडत्या स्टारला पत्रे पाठवणे. फॅन लेटर्स ही एक दीर्घकालीन संस्कृती आहे. पूर्वी काही चित्रपट साप्ताहिकातून स्टारच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे पत्ते प्रसिद्ध केले जात, मग कलाकार डायरी प्रसिद्ध होऊ लागली. सत्तरच्या दशकात पंधरा पैसे पोस्ट कार्ड तर पंचवीस पैसे पोस्ट पाकिट होते. वांद्रे जुहू परिसरातील स्टारना चक्क गोणतीभर फॅन लेटर्स येत. काही स्टार्सच्या ऑफिसमधून उलट टपाली प्रिन्टेट स्वाक्षरी असलेला फोटो पाठवला जाई….
येथपर्यंत सगळे ठीक होते. पण वेडापायी आपल्या रक्ताने राजेश खन्नाला एका चाहतीने पत्र लिहिणे तर कधी एकाद्या कलाकाराला/विशेषतः अभिनेत्रीला असभ्य भाषेत पत्र लिहिणे असे प्रकार समर्थनीय नव्हते. विशेषतः निनावी पत्रे अथवा फोन अनेक कलाकारांना मनःस्ताप देणारे. लॅण्डलाइनच्या काळापासून ते सुरु आहे. तसेच एकाद्या इव्हेन्टसच्या वेळी एकादी अश्लील काॅमेन्टस अथवा धक्काबुक्कीचा प्रयत्न हे म्हणजे, कलाकाराकडे तीदेखिल एक व्यक्ती अशा दृष्टीने न पाहणे होय. ही प्रवृत्ती अलिकडच्या काळात वाढत गेली. पूर्वी असे प्रकार होत नव्हते असे नाही; पण कालांतराने बघ्यांमध्ये धीटपणा आला. अशा वेळी नेमका दोष कोणाला द्यायचा? काही सेलिब्रेटिज आपली सेक्स सिम्बल इमेज एस्टॅब्लिज करण्यात यशस्वी ठरतात पण याचीच ‘दुसरी बाजू ‘ म्हणजे त्यातून चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता असते. असेच असेल असे नसेलही कदाचीत. सोशल मिडियाच्या काळात सेलिब्रेटिज आणि फॅन्स/फाॅलोअर्स यांच्यातील अंतर खूप कमी कमी होत गेले, पण त्यातून संवाद वाढण्याऐवजी विसंवाद रुजता.
पूर्वी राजकुमारचा वेगळा दरारा होता. वरळी सी फेसवरुन तो उघड्या जीपने उपनगरातील स्टुडिओत जायचा. सिग्नलला कोणीही त्याच्या जवळ जात नसे. तेव्हा आजच्यासारखे फ्लायओव्हर्स नव्हते. रेल्वे क्राॅसिंगवर सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहावी लागे तेव्हा राजकुमार गोरेगावच्या सिग्नलवर एक पाय खाली ठेवून उभा असल्याचे पाहिल्याचे जुनी पिढी उत्साहाने सांगे आणि पुढे म्हणत, पुढे जाऊन त्याच्यावर काॅमेन्टस करण्याची कोणात धमक नसे. अर्थात तो काळ वेगळा होता, “आणि तो राजकुमार होता “. स्टार आणि फॅन्स यात एक अदृश्य भिंत हवी, आकर्षणही हवे आणि अंतरही हवे. सोशल मिडियाने ते घालवले आणि फॅन्सच्या हातात आपल्या आवडत्या आणि नावडत्या अशा दोन्हीना काही चांगले सांगता सांगता काय वाट्टेल ते बोलण्याचा जणू परवानाच मिळाला. यात आणखी एक पैलू आहे, सिनेमा आणि सिनेमावाले यांचा कायमच व्देष करणारा एक वर्ग आहे. काहीना कायमच जुन्या काळातील चित्रपट श्रेष्ठ वाटतो तर काहीना कायमच विदेशात काय क्लासिक कलाकृती बनतात हेच वाटत असते. काहीना सिनेमाचे जग म्हणजे प्रचंड पैसा, चंगळवाद, बेफिकीरी, सामाजिक अवमूल्यन, पार्टी पिपल, उन्मत्त श्रीमंत वगैरे वगैरे वाटते. त्यात तथ्य किती हे कोणी पाहत नाही आणि असा समज रुजण्याची कारणे काय याचाही कोणी शोध घेत नाही. पूर्वी चित्रपटाच्या गुणवत्तेची, कलाकाराच्या अभिनयाची चर्चा व्हायची तेव्हा अनेक गोष्टी सरळमार्गी होत्या.
नव्वदच्या दशकात फिल्मवाल्यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन चित्रपटसृष्टीवरचे काळे सावट ठरले, टीकाकारांना आयतीच संधी मिळाली, तर आता बड्या स्टार्सचे ड्रग्ज प्रकरण याच फिल्म इंडस्ट्रीची इमेज बिघडवणारे आणि ट्रोलर्सना बळकटी देणारे ठरले. अशा गोष्टीत फिल्म इंडस्ट्रीचे दहा वीस टक्के चेहरे मोहरे सहभागी असतील, पण त्याने अख्ख्या चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि जे त्यात नाहीत त्यांनी याविरोधी ट्वीट करावे, पोस्ट असाव्यात अशी अनेक ट्रोलर्सची अपेक्षा असते. पण आपला अशा गोष्टींशी काही संबंधच नाही तर आपण बोला कशाला अशी अनेक सेलिब्रेटिजची भावना असू शकते आणि त्यात काहीच गैर नाही. पण समजून घेण्यात कोणाला रस आहे आणि वेळ आहे? दुसरीकडे पहावे तर आज रिलीज झालेला चित्रपट संपायच्या आतच अनेक कोटीचा व्यवसाय करतोय अशा ब्रेकिंग न्यूजचे युग आल्यावर पडद्यावरचा सिनेमा बाजुला पडला आणि भलत्याच गोष्टीना महत्व आले आणि ट्रोलर्सचा आत्मविश्वास वाढला, त्यांची आक्रमकता वाढली असे तर नव्हे? एकमेकांत गुंतत चाललेला हा बहुपदरी विषय आणखी पुढे कुठे जाणार?