मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘कहानी’ पुरी फिल्मी है!
सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर बॉलीवूड आणि एकंदरच फिल्म इंडस्ट्री मध्ये नेपोटीजम आणि कंपूशाही अशा गोष्टींची चर्चा उघडपणे व्हायला लागली. काही लोकांनी थेट स्टारकिड्स ना टार्गेट करायला सुरुवात केली. त्यांच्या येणाऱ्या आगामी कोणत्याही प्रोजेक्टला होणारा विरोध हा अगदी कॉमन व्हायला लागला. नुकताच रिलीज झालेला खाली पिली सडक २ हे सिनेमे तर ओटीटी वर जोरदार आपटलेच. पण नुकताच रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब ह्या सिनेमाच्या ट्रेलर वर सुद्धा अशाच काही प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. हे सगळं चित्र पाहता लोकं त्यांच्या मनातला राग कुठेतरी काढू पाहतायत हे दिसलं! अर्थात हे कधी ना कधी तरी होणारच होतं, कारण बॉलीवूडची मक्तेदारी अशी आणखीन किती काळ चालणार होती. गेल्या काही वर्षांमध्ये लोक स्टार कडे न बघता सिनेमातल्या कंटेंट कडे बघून थेटरकडे वळताना पाहिले आहेत. बाला, अंधाधुन, स्त्री, असे कित्येक सिनेमे कोणताही स्टार नसताना सुद्धा चालले आणि लोकांनी अक्षरशः ते डोक्यावर घेतले. यामुळेच आयुष्यमान, राजकुमार राव, नवाझुद्दीन सिद्दीकी सारखे कित्येक कलाकार लोकांना आवडू लागले आणि लोकं आता त्यांचे चित्रपट बघायला थेटरकडे वळू लागले. पण तुम्हाला माहित आहे का कि ह्या लोकांनी सुद्धा अगदी छोट्या छोट्या भूमिकांपासून सुरुवात केली होती. राजकुमार राव ने तर एका बालाजी फिल्मच्या एका एरॉटिक हॉरर फिल्म पासून सुरुवात केली, आयुष्यमान हा पहिले व्हिडियो जॉकी होता तर नवाझुद्दीन ने १ मिनिटांच्या रोल साठी सुद्धा सिनेमात काम केलं आहे. आमिर खान च्या सरफरोश मध्ये त्याने केलेल्या भुरट्याची भूमिका आजही लोकांना लक्षात आहे!
आपल्या सगळ्यांच्या मनातला भारतीय सिनेमा हिरो हिरोईन, व्हिलन आणि फार फार तर कॉमेडियन इथवर येऊन संपतो. पण तरीही सिनेमात आणखीन ढीगभर पात्र सुद्धा असतात, काही मॉब मध्ये असतात, काही महत्वाच्या भूमिकेत असतात त्यांना फिल्मी भाषेत सेकंड लीड ऍक्टर असं म्हणतात. ज्यांचा रोल सुद्धा कथानकासाठी अत्यंत महत्वाचा असतो पण त्याच्या भोवती ते कथानक रचलेले नसल्याने त्या पात्राला सेकंड लीड अशी ओळख मिळते. खरंतर आपल्या इंडस्ट्री मध्ये असे बरेच सिनेमे होऊन गेले आहेत ज्यात मुख्य हिरोपेक्षा सेकंड लीड हिरो जास्त भाव खाऊन गेला आहे. अमिताभ बच्चन ह्यांच्या दिवार मध्ये एका पार्ट नंतर शशी कपूर यांचं पात्र लोकांना आवडायला लागतं. शोले सारख्या मल्टीस्टारर माईलस्टोन सिनेमात इतके दिग्गज असताना सुद्धा लोकांच्या लक्षात राहतात ते सुरमा भोपली किंवा अंग्रेजो के जमाने के जेलर साकारणारे जगदीप आणि असरानी. आपण ह्या नवीन सिरीज मध्ये अशाच काही सेकंड लीड हिरोज बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी सिनेमातल्या हिरोला बाजूला सारून स्वतःच्या अभिनयाची छाप लोकांच्या मनावर पाडली, आणि ते सिनेमे त्या हिरोपेक्षा साईड हिरोचे म्हणून जास्त ओळखले किंवा पसंत केले जातात!
सुजॉय घोष दिग्दर्शित विद्या बालनचा कहानी हा सिनेमा आठवतोय का? विद्या बालन हिने निभवलेलं विद्या बागची हि नायिका त्यात प्रेग्नन्ट दाखवली आहे जिचा नवरा कलकत्त्याला येऊन बेपत्ता झालेला आहे. त्यामागे कलकत्ता मेट्रो मध्ये झालेला अपघात आणि त्यामागचा मास्टरमाइंड मिलन दाम्जी टेररिस्ट कारणीभूत असून आपल्या नवऱ्याचा जीव धोक्यात असल्याने ती कलकत्त्याला त्याचा शोध घेण्यासाठी येते आणि इथे येऊन एका वेगळ्याच जाळ्यात ती अडकते. ह्यात तिला तिथला एक लोकल पोलीस सुद्धा खूप मदत करतो. एकंदरच हा सिनेमा स्त्री पात्राला समोर ठेऊन लिहिला असल्याने आपण सगळे विद्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडतोच. पण त्याच दरम्यान ह्या कथानकात एंट्री होते ती आयबी च्या ऑफिसर खान ची जे पात्र साकारलं आहे नवाझुद्दीन सिद्दीकी ह्याने. बास तिथून हा सिनेमा एक वेगळंच वळण घेतो. त्यानंतर विद्या बागची तिच्या नवऱ्याला शोधण्यात यशस्वी होते की नाही? तिच्या समोर हा सगळा सस्पेन्स उघडतो कि नाही हे सगळं तुम्ही सिनेमात अनुभवलं असेलच. पण तरीही हा स्ट्रॉंग महिला पात्रावर फॉकस केलेला हा सिनेमा आयबी ऑफिसर खान च्या एंट्री मुळे एक वेगळंच वळण घेतो.
आयबी ऑफिसर खान पहिले विद्या हिला खूप चांगल्या शब्दात समजावतो पण नंतर ती आपलं काहीच ऐकत नाही हे समजल्यावर तो त्याचे रंग दाखवायला सुरुवात करतो. सिनेमा बघताना आपल्याला असं देखील वाटत राहतं कि ह्या सगळ्या प्रकरणात खान सुद्धा सामील आहे पण हळू हळू जसा चित्रपट पुढे सरकतो आपली ती शंका सुद्धा दूर होते, आणि अचानक त्या ऑफिसर खान बद्दल एक मनात सॉफ्टकॉर्नर तयार होतो. खरंतर हे पात्र तसं सिनेमात महत्वाचं असलं तरी पूर्ण सिनेमात ह्या पात्राला बराच कमी स्क्रीन टाइम दिला गेला आहे. तरी जेवढा वेळ आहे त्या वेळात हे पात्र इतर सगळ्या पात्रांवर भारी पडते हे आपल्याला प्रत्येक सिन मध्ये जाणवतं. ऑफिसर खानचा करारीपणा, स्वतःच्या तालावर इतरांना नाचवण्याची कला, फटकळ स्वभाव आणि शक्य होईल तितकं स्पष्टवक्तेपणा नवाझुद्दीन ने अगदी परफेक्ट उचलला आहे. त्याचं त्याच्या ज्युनियर ऑफिसर वर चिडणं तर इतकं नॅचरल वाटत कि तो खऱ्या जीवनात सुद्धा असाच फटकळ असावा असं आपल्याला वाटत. समोर बाई असो वा पुरुष पण तितक्याच खंबीरपणे लोकांची चौकशी करणाऱ्या ऑफिसर खानचा दबदबा हा प्रत्येक सिन मध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतो! सिनेमातला एक सिन आहे जिथे विद्या लोकल पोलीस स्टेशन मध्ये खान समोर बसलेली असते, स्टेशन मधले सगळे ऑफिसर बाहेर उभे असतात आणि अचानक विद्या ला मदत करणारा इन्सपेक्टर तिथं येतो आणि कसलीही भीड न बाळगता दार उघडून आत जातो तेंव्हा खान त्याच्यावर ज्या पद्धतीने ओरडतो ते पाहून आपल्याला सुद्धा जाणवतं कि ह्या माणसापासून १० हात लांब असलेलंच बरं. असे कित्येक सीन्स आहेत जिथे हा ऑफिसर खान सिनेमातल्या प्रत्येक पात्राला अक्षरशः खाऊन टाकतो!
नवाझुद्दीन ने हे पात्र ज्या सचोटीने साकारलं आहे ते पाहून आपण सुद्धा त्या खानचं नाव ऐकताच मनात एक वेगळीच धडकी भरते. सिनेमा हा पूर्णपणे विद्या बालन ने साकारलेल्या विद्या बागची वर आधारित असला तरी आयबी ऑफिसर हे खान विद्या बालन वर सुद्धा भारी पडते. अशी पात्र बरीच लिहिली जातात पण ती त्याच ताकदीने लोकांसमोर उभी करायला सुद्धा तितकाच प्रतिभावंत कलाकार लागतो. कदाचित नवाझुद्दीन ऐवजी हे पात्र दुसऱ्या कुणी साकारले असते तर ते वेगळे झाले असते पण तसा प्रभाव लोकांवर पडला नसता हे मात्र नक्की.