कॅनल कॉंडझिला व्यासपीठ मिळवून देण्याची जबाबदारी घेतलेली परंपरा!
कॉनरॅड डँटस हा ब्राझिलियन दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहे. कॉंडझिला व कॉंड या टोपणनावाने तो ओळखला जातो. तो कॅनल कॉंडझिला या म्युझिक प्रॉडक्शन हाऊसचा संस्थापकही आहे. तसेच गेल्यावर्षी 2019 मध्ये आलेल्या ‘सिंटोनिया’ या नेटफ्लिक्सच्या ड्रामा शोचाही दिग्दर्शकही आहे. फंक ऑस्टेंटॅको या संगीतप्रकाराला प्रसिद्ध करण्यातही त्याचे महत्त्वाचे योगदान आहे. या चॅनलवर जवळपास सर्वच गाणी याच प्रकारातील आहेत. हा प्रकार काय आहे ? याची उत्पत्ती कधी आणि कुठे झाली ? चला हे जाणून घेऊया… (Canal KondZilla Story)
जेव्हा ब्राझिलमध्ये अन्याय आणि गुन्हेगारी वाढली होती तेव्हा रिओ डि जानेरो मध्ये ‘बॉंडे बा जुजू’ हे पहिलं या प्रकारातील गाणं निघालं. सप्टेंबर 2008 मध्ये आलेलं हे गाणं एमसी बाकदी व बायो G3 यांनी बनवलं. ऑस्टेंटेशन या कलाप्रकाराला कंटाळलेल्या प्रेक्षकांना नवीन काहीतरी देणे हा हेतू यामागे होता. त्यानंतर काही फेस्टिव्हल पण साओ पाओलो येथे झाले व या चळवळीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. 2011 च्या मध्यावर एमसी बॉय च्या ‘मिगेन’ या म्युझिक व्हिडिओने या प्रकाराचे जणू राष्ट्रीय पदार्पणच झाले. त्याचवेळी सिनेमॅटोग्राफर कॉंडझिला पहिला रिकॉर्डिस्ट बनला जो या शैलीतील गाणे बनवायला लागला. प्रेक्षकांनीही या गाण्यांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला.
2012 -13 मध्ये ब्राझिलमध्ये जी टॉप दहा गाणी होती त्यात तीन या प्रकारातील होती. डॅनियल पॅलेग्रीन ऊर्फ एमसी डॅलेस्टे याची जुलै 2013 मध्ये कँपिनासच्या स्टेजवर गोळी घालून हत्या झाल्यानंतर तर फंक आर्टिस्टकडून व प्रेक्षकांकडून या कलाप्रकाराला मोठ्या प्रमाणावर डोक्यावर घेतलं गेलं. लवकरच फंक ऑस्टेंटॅको हा ब्राझील न्यू मिडियाशी संलग्न झालेला प्रकार बनला. ज्यामुळे तेथील कलाकारांना रोजगार मिळण्यास व अनेक कलाकार तेथील मातीत बनण्यास सुरुवात झाली. ज्यात एमसी गुईमे ,एमसी लॉन ,एमसी गुई ,एमसी पॉकाहोंटाज असे अनेक मोठे प्रसिद्ध कलाकार निर्माण झाले.
फंक पॉलिस्टा किंवा फंक ऑस्टेंटॅको काय आहे ?
या शब्दाची उत्पत्ती पोर्तुगीज शब्द ऑस्टेंटेशन फंक या शब्दापासून झाली असून हा एक मूळचा ब्राझिलियन संगीतप्रकार आहे जो 2008 मध्ये साओ पाओलो येथे तयार झाला. ‘कन्सपिशियस कंजप्शन’ या संकल्पेवर केंद्रित असणारी याची थीम आहे. थॉरस्टिन विब्लन या अमेरिकन अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञाने जे त्यांच्या काळात ‘भांडवलवादाचे टिकाकार’ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी ही संकल्पना मांडली. (Canal KondZilla Story)
यात एक सुखकारक जीवनशैली आणि भौतिकवाद दर्शवला जातो. आपल्या श्रमांतून आलेली साधनसंपत्ती लपवून न ठेवता त्याचं एक सामाजिक स्थान म्हणून सार्वजनिक प्रदर्शन करणे हा यामागचा हेतू होता. यावरूनच हा संगीतप्रकार उदयास आला. यातील गीतात कार, गाड्या, मद्य, महिला आणि फावेला ( एकोणिसाव्या शतकापासून ब्राझीलमध्ये असलेल्या आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्यांच्या झोपड्या ) पासून निघून आयुष्यातील ध्येय- उद्दिष्ट प्राप्त करण्याची इच्छा बाळगणे हे दर्शवले जाते.
या प्रकारातील गाणी भारतीयांना बघायला भडक वाटतील अशी असल्याने आपल्या देशात ही गाणी कुटुंबासोबत पाहण्यालायक नसतात, त्यामुळे ती सर्व प्रेक्षकांचं मन विशेषतः भारतीय मानसिकतेच्या जिंकू शकत नाहीत. पण त्यातलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरून तयार केलेलं त्याप्रकारातलं संगीत विशेष उल्लेखनीय असतं.
मुळात फंक करिओका (फावेला / बेली बंक), फंक मेलॉडी, प्रोईबिदाओ या तीन स्थानिक संगीतप्रकारापासून बनलेलं आहे. ड्रम मशिन, टर्नटेबल, सँपलर, सिंथेसाईजर, वोकल या ई – वाद्यांचा वापर यात दिसून येतो. यातल्या बहुतांश गाण्यांमध्ये ऐकू येणाऱ्या तंतुवाद्याने बनलेल्या वाद्याचा आवाज हा ड्रम मशिनचा आहे हे सांगून विश्वास बसणार नाही. इतकंच नाही तर यातून वेगवेगळे आवाजही काढता येतात.(Canal KondZilla Story)
कॉनरॅड डँटस ते कॅनल कॉंडझिलाचा संस्थापक
कॉनरॅड डँटस याचं मूळ नाव ॲलन कॉस्टा मॉरेल असं असून 13 सप्टेंबर 1988 मध्ये ब्राझिलमधील साओ पाओलो मध्ये जन्मलेला हा स्पॅनिश मुलगा. त्याची आई शिक्षिका तर वडील गवंडी होते. 18 वर्षांचा असताना त्याने सेंटोस मधील विद्यापिठात वेब डिझायनर म्हणून काम केले. त्याचवेळी त्याची आई वारली आणि तिने काढलेल्या लाईफ ईन्शुरन्सची रक्कम त्याला मिळाली. व्हिडिओ प्रॉडक्शनमध्ये करिअर करण्यासाठी त्याने त्या पैशातून कॅनॉन इओस 5D कॅमेरा घेतला. नंतर साओ पाओलोत स्थलांतर केल्यानंतर त्याने सिनेमॅटोग्राफी, पोस्ट प्रॉडक्शन व फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. 2011 मध्ये सुरू झालेल्या डेंटास प्रॉडक्शन कंपनीचं 2017 मध्ये कॅनल कॉंडझिला या नावाने नामांतर झाले व युट्युबवरच्या या चॅनलने अनेक विक्रम प्रस्थापित केले.
कॉंडझिला कंपनीने अनेक तरूण कलाकारांना आपल्या लेबलअंतर्गत संधी दिली. ज्यामुळे एमसी केव्हिनो, एमसी गिईमी, एमसी फियोटी, एमसी रोडोल्फिनो यांसारखे जगप्रसिद्ध कलाकार तयार झाले. फियोटीचं ‘बम तम तम’ व एमसी डीजी व एमसी गुस्ता यांचं ‘अबुजादामेंच’ ही या चॅनलची प्रसिद्ध गाणी बिलियन व्ह्यूजपर्यंत पोचली. (Canal KondZilla Story)
संपूर्ण जगात ही गाणी मोठ्या प्रमाणावर अर्थ न कळूनही यातल्या संगीतामुळे ऐकली जातात. या चॅनलने आतापर्यंत एक हजार म्युझिक व्हिडिओ बनवले असून 53 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्राईबर्स या चॅनलचे आहेत. त्यात ब्राझीलच्या 22% जनतेचा समावेश आहे. ब्राझील आणि लॅटिन अमेरिकात हे चॅनल मोठ्या प्रमाणावर पाहिले जाते. या दोन्ही प्रदेशातील कलाकार यावर आपली कला सादर करतात. 2013 मध्ये एक लाख सबस्क्राईबर्स असणाऱ्या या चॅनलचे सबस्क्राईबर्स सहा वर्षातच 50 मिलियनपर्यंत गेले.आणि आज जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे हे म्युझिक चॅनल आहे.
टी सिरीज आणि कॉंडझिलातला फरक !
टी सिरीज ही जगातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी. 147 मिलियन व्ह्यूजपर्यंत युट्युबवर सबस्क्राईब असणारी जगातील संगीत क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असणारी ही कंपनी आहे. या कंपनीने चित्रपट, संगीत या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 1983 मध्ये भूषण कुमार यांनी सुरू केलेल्या या कंपनीचा पदभार त्यांच्या मृत्यूनंतर भूषण कुमार सध्या सांभाळत आहे. त्यांच्या दिग्दर्शक पत्नी दिव्या खोसला कुमारही त्यांना सहकार्य करत असतात.
पंजाबीतील गुरू रंधावा, हनी सिंग, बादशाह व अनेक पॉप सिंगर व इंडिपेंडंट आर्टिस्ट या कंपनीने तयार केले. विशेषतः पंजाबीतील अनेक सोलो आर्टिस्ट यातून तयार झाले. चित्रपट क्षेत्रातही संगीत निर्मितीची धुरा सांभाळत आपली मक्तेदारी निर्माण केलेल्या या कंपनीने अनेक चित्रपटांना यश मिळवण्यात मदत केली.
पण, व्यावसायिकतेमागे पळता पळता या कंपनीने आपला देश ,आपली संस्कृती आणि आपल्या स्थानिक भागातलं आणि सामाजिक – सांस्कृतिक अधिष्ठान लाभलेलं संगीत मात्र डावललं. गेल्या काही वर्षांपासून गाजलेल्या आणि फक्त प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असणाऱ्या कलाकारांच्याच गाण्यांचे अधिकार घेण्याचा सपाटा त्यांनी लावला. त्यामुळे नवीन गायकांची फौज इतर चॅनलकडे आपली गाणी देणे वा स्वतंत्र अल्बम तयार करणे याला पसंती देत आहेत.
सारेगामा म्युझिक, इंडी म्युझिक लेबल ,सोनी म्युझिक इंडिया अशा बॅनर अंतर्गत आपली गाणी युट्युबवर रिलीज करण्यास ही नवी कलाकार मंडळी प्राधान्य देत आहेत. यात दर्शन रावल सारख्या प्रतिभा असूनही बॉलिवूडमध्ये मिळावी तितकी संधी न मिळणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे.
कॉंडझिलाने मात्र व्यावसायिक पातळीवर रिस्क घेऊन प्रत्येकवेळी नवनव्या कलाकारांना संधी दिली. गाजलेल्या कलाकारांनाही इतरांसोबत त्यांनी संधी दिली. दररोज दोन तीन गाणी त्यांच्या या ‘कॅनल कॉंडझिला’ चॅनलवर प्रदर्शित होतात. एका दिवसातच काही लाख व्ह्यूजचा टप्पा ही गाणी पार करतात. गाणी दृश्य पातळीवर पार्टी साँगसारखी असून निऑन लाईट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर यात होतो. (Canal KondZilla Story)
विदेशी गाणी सवयीची नसणाऱ्या प्रेक्षकांना ही गाणी अश्लिल, भडक किंवा उथळ वाटतीलही पण त्या देशातील वातावरण आणि भारताबाहेर वातावरणात त्या गाण्यांना मोठी स्वीकार्यता आहे. या गाण्यांचं संगीत खूपच वेगळ्या प्रकारचं आणि तरूणाईला आकर्षित करणारं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर अविरत संगीतनिर्मिताचा ध्यास घेऊन कार्य करणारी ही कंपनी नवोदित कलाकारांसाठी मात्र हक्काचं व्यासपीठ आहे. युट्युबवर गाण्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये शो आयोजित करायचा असेल, तर त्यासाठी संबंधित गाण्यातील कलाकारांचा संपर्क क्रमांकही दिलेला असतो. यावरून व्यावसायिकतेपेक्षा स्थानिक कलाकारांना संधी देण्याकडे या चॅनलचा कल असल्याचे दिसून येते.
=================
हे ही वाचा: थ्री इडियट्स: जेव्हा आमिर दारू पिऊन चित्रीकरण करत होता आणि रिटेकवर रिटेक झाले तेव्हा…
आवर्जून पाहावेत असे ‘अंडररेटेड’ मराठी चित्रपट
===================
कॉंडझिलासारखीच दृश्यपातळीवर भौतिकवादाचा अंतर्भाव असलेली आणि काहीशी मादक वाटणारी गाणी आपल्याकडेही निर्माण व्हावी असा अट्टाहास करण्यासाठी संबंधित लेखाचं प्रयोजन नसून या चॅनलविषयी आणि आपल्याकडे म्युझिक माफिया बनणाऱ्या काही संगीत कंपन्यांकडून होणारी सातत्यपूर्ण पुनरावृत्ती टाळून संगीत क्षेत्रात व प्रेक्षकांच्या आस्वादकवृत्तीत निकोप वाढ व्हावी हाच या लेखाचा हेतू आहे. सध्याच्या नेपोटिझम ,कंपूशाहीच्या राजकारणामुळे नवोदितांना पुरेशा प्रमाणात संधी उपलब्ध होत नाहीत. (Canal KondZilla Story)
त्यामुळे अशा चॅनलने बाळगलेल्या उदात्त हेतूपासून प्रेरणा घेणे गरजेचे आहे व सोबतच भारतीय संगीत प्रकारातच पाश्चात्य संगीताचं अनुकरण करताना नाविन्य संपलेलं संगीत टाळणे व आपला लोप पावत चाललेला सांस्कृतिक वारसा जपणारं संगीत अबाधित ठेवणंही तितकंच गरजेचं आहे!
– ऋषिकेश तेलंगे