वृत्तनिवेदिका ते निर्माती
मुंबई दूरदर्शनवरील वृत्तनिवेदका, मग रंगभूमी, चित्रपट आणि मग निर्माती होऊन अतिशय उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची आणि मालिकांची यशस्वी निर्मितीकरणाऱ्या स्मिता तळवलकर. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना मुंबईदूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका होण्याची संधी मिळाली. स्मिता पाटील देखील त्यांच्या सोबत होत्या. वर्षभर ट्रेनिंग झालं, शब्दोच्चारांवर विशेषमेहनत घेतली गेली. तो काळ खूप महत्वाचा होता. त्यांनी अनेक वर्षेवृत्तनिवेदिका म्हणून काम केलं.
मुंबई दूरदर्शनवर वृत्तनिवेदन करताना सर्वात आव्हानात्मक क्षण आला तो म्हणजे त्यांची जिवलग मैत्रीण अभिनेत्री स्मिता पाटील यांची निधनाची बातमी वाचण्याची वेळ त्यांच्यावर आली. ‘शो मस्ट गो ऑन’ असा विचार करून मनात प्रचंड यातना होत असताना ती बातमी त्यांनी वाचली आणि बातम्या संपल्यावर मात्र त्यांना रडू कोसळलं.
हेही वाचा : नाती जपणारी थोरली जाऊ
स्मिता तळवलकर यांनी मराठी रंगभूमीवर काम केलं, मराठी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका केल्या. त्यामध्ये तू सौभाग्यवती हो, धाकटी सून, गडबड घोटाळा हे काही चित्रपट सांगता येतील.
निर्माती म्हणून त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट आला तो ‘कळत नकळत’ चित्रपटाच्या वेळी.
स्मिताताई त्या चित्रपटाच्या कार्यकारी निर्माती होत्या. निर्माता कोणी वेगळा होता. पण आयत्या वेळी त्या निर्मात्याने माघार घेतली. आता काय करायचे, असा प्रश्न होता आणि स्वतःच चित्रपटाची निर्माती होण्याचं ठरवलं. निर्मिती संस्थेसाठी काय नाव द्यायचे, असा प्रश्न होता.
मग त्यांच्या पतीचे नाव ‘अविनाश’ आणि स्वतःचे’ स्मिता’ या दोन्ही नावांचा वापर करून त्यांनी ‘अस्मिता चित्र‘ या निर्मितीसंस्थेची स्थापना केली.
‘कळत नकळत’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ‘चौकट राजा’ हा त्यांनी निर्माण केलेला आणखी एक महत्वाचा चित्रपट. या चित्रपटात त्यांची भूमिका देखील होती. या चित्रपटाच्या वेळचा एक किस्सा सांगावासा वाटतो. या चित्रपटातील मुख्य भूमिका परेश रावल करणार होते. शूटिंगसाठी सेट लागला आणि आयत्यावेळी परेश रावल यांनी तो चित्रपट करण्यास नकार दिला. आता काय करायचे हा खूप मोठा प्रश्न होता. स्मिताताई अस्वस्थ झाल्या. मग ही भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी करायचे असे ठरले आणि दिलीप प्रभावळकर यांनी ती भूमिका इतकी उत्तम साकारली की त्यांना त्या चित्रपटासाठी पुरस्कार देखील मिळाले. प्रेक्षकांना कायम केंद्रस्थानी ठेवून स्मिता ताई अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती करत राहिल्या. सातच्या आत घरात, आनंदाचे झाड, सवत माझी लाडकी, तू तिथं मी असे अनेक उत्तम चित्रपट त्यांनी आपल्याला दिले.
प्रेक्षकांना घरपोच तिकिटे पोचवण्याची संकल्पना स्मिता तळवलकर यांनी ‘तू तिथं मी’ चित्रपटाच्या निमित्ताने सुरु केली. मालिका विश्वात देखील एक यशस्वी निर्मात्या म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. अवंतिका, पेशवाई, ऊन पाऊस, अर्धांगिनी, सुवासिनी अशा अनेक उत्तम मालिकांची निर्मिती त्यांनी केली. प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधणे हेत्यांनी कायम पाळलं. चित्रपट निर्मिती किंवा मालिका निर्मिती करतानाचांगला सामाजिक आशय किंवा संदेश देणे, एखाद्या सत्य घटनेवर चित्रपट निर्मिती हे सर्व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना दिसून येतं. त्यांचे सर्वच चित्रपट हे अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.