अमृता खानविलकर…. हिंदीचं ग्लॅमर, मराठी ठसका
नेमके सांगायचे तर, दीड वर्षापूर्वी मालदीवज समुद्र किनाऱ्यावरील किनारावरील अमृता खानविलकरचे अतिशय ग्लॅमरस, सेन्सूअस, आकर्षक फोटो सोशल मिडियात पहायला मिळाले तेव्हा सुरुवातीला मला ते कॅटरिना कैफचे आहेत असेच वाटले. आणि का वाटू नये? अगदी तस्साच फिटनेस, लूक, बोल्डपणा, सेक्स अपिल, तोच निळाभोर समुद्र, तीच नमकीन चमकणारी वाळू आणि महत्वाचे म्हणजे त्या फोटोना फॅन्स आणि फॉलोअर्सकडून मिळत असलेल्या लाईक्स, सकारात्मक कॉमेंट्स हे सगळे पाहता तर अमृता खानविलकर कॅटरिनापेक्षा कुठेही कमी नाही असे माझे पक्के मत होते आणि ते व्यक्त करायला कॅटरिनाची पर्वा का करु? एवीतेवी हिंदी ग्लॅमरच्या तुलनेत मराठी ठसा, ठसका, ठुमका कुठे कमी पडता कामा नयेच. कॅटचं आपलं एक ‘खान आणि जोहर’ विश्व आहे, तसेच अमृताची आपली एक हुकमी पोझिशन आहे, पण ‘मालदीवज फोटो फिचर ‘मध्ये अमृता कांकणभर सरसच! अतिशय ब्युटीफूल लूक. आजच्या ग्लोबल युगातील रसिकांना आवडेल असाच सही फंडा.
अमृताची वाटचाल कधी मराठी, कधी हिंदी, कधी चित्रपट तर कधी छोट्या पडद्यावरचा डान्स शो, कधी वेबसिरिज अशीच घडत राहिली. ते विविधरंगी अनुभवासाठी चांगले असते, अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचता येते, स्वतःला आजमावता येते, अधिकाधिक जणांसोबत काम करण्याचा अनुभव येता येता मनोरंजन क्षेत्रातील विविध स्तरांवरील अनेक चांगल्या गोष्टी तर काही अनावश्यक आणि वाईट गोष्टी समजत जातात. कोणत्या गोष्टी, कोणती माणसे टाळावीत याची समज येत जाते (ते फारच महत्वाचे हो). स्वतःमध्ये करेक्शन करता येते आणि ते केल्यानेच आपण टिकून राहतो. सर्वानाच माहित्येय ती ‘इंडिया बेस्ट सिनेस्टार की खोज’ यातून या मनोरंजन क्षेत्रात आली. ती आली तो काळ काही बदल घडत जाण्याचा होता. ऑस्करसाठीची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘श्वास’ ची निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळाली होती, मराठी चित्रपट निर्मितीची संख्या वाढायला त्यामुळे विश्वास आणि गती आली, मनोरंजन उपग्रह वाहिन्या अधिकाधिक एस्टॅब्लिश होत होत्या, रिऍलिटी शो, डान्स शो, गेम शो वाढत होते. मल्टीप्लेक्स कल्चर फोफावत होते. दुसरीकडे पाहिले तर, मुंबई आणि पुणे यातील अंतर आता जाणवत नव्हते.
आपल्याकडच्या सर्वच महानगरात ग्लोबलायझेशन एस्टॅब्लिश होत होते. युथमध्ये मोकळेपण वाढत होता. ‘स्टाईल मे रहेना का’ हा ‘जिने का फंडा’ रुळला होता. मोबाईलचे प्रमाण हातोहाती वाढत होते. उच्च शिक्षणासाठी विदेशी जाणे कॉमन झाले होते. मराठी चित्रपटसृष्टीच्या इव्हेन्टसमध्ये ‘कलर’ आला होता. झगमगाटाकडे वाटचाल सुरु झाली होती. अमृताचे मनोरंजन क्षेत्रात येण्याचे टायमिंगही परफेक्ट होते. ते फारच महत्वाचे हो. त्यात ती कॉमर्स ग्रॅज्युएट, उत्तम इंग्रजी बोलणारी, नवीन गोष्टी जाणून घेणारी आणि अतिशय उत्फूर्त, पण गुणांना ‘स्कोप’ देण्यासाठी तसा ‘प्लॅटफॉर्म’ मिळावा लागतो अथवा जी संधी मिळेल त्यात चमकधमक दाखवत पुढे सरकावे लागते. त्यासाठी एक प्रकारचा व्यावसायिक लवचिकपणा लागतो. जे काम आपण स्वीकारु ते चोखच करु अशीच प्रवृत्ती कायम ठेवावी लागते. मग तो चित्रपट असो अथवा डान्स शो. तसेच एखाद्या हिंदी चित्रपटातील भूमिका दुर्दैवाने एडिट होऊन पडद्यावर आली तरी ते स्वीकारत (अथवा पचवत) पुढे जायची सवय लावून घ्यावी लागते. मिडियात त्याबाबत काही बोलायचे नसते. अगदी खाजगीत कोणाकडे नाराजी व्यक्त करणे वेगळे. प्रत्यक्षात मनोरंजन क्षेत्रात वावरताना, मार्ग काढताना, व्यावसायिक तडजोड करताना तत्वांना मुरड घालावीच लागते हे यात वावरताना लक्षात येते आणि अमृता खानविलकरचे यश त्यातच आहे असे माझे निरीक्षण आहे. तिच्याही वाटेला अप डाऊन आहेत, पण ती स्थिर वाटतेय हे जास्त महत्वाचे आहे.
हे देखील वाचा: सुबोध भावे – चोवीस तासही त्याला अपुरे
अमृताला सर्वप्रथम मी पाहिले ते ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘गोलमाल’ च्या प्रीमियरच्या वेळी! एलफिस्टन रोडच्या प्रीमियर थिएटरमध्ये तो होता. सिनेमातील आणि प्रत्यक्षातील अमृता अतिशय उत्साही होती. मराठी चित्रपटसृष्टीत नवीन पिढी येत होती. आपल्या पहिल्या चित्रपटाचा आनंद तिच्या एकूणच व्यक्तीमत्वात दिसला. तेव्हाच सहार विमानतळाजवळच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘मुंबई सालसा’ या हिंदी चित्रपटाच्या पार्टीत तिला भेटलो, तेव्हाही तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. तेव्हा ती हिंदी फिल्म इंडस्ट्री स्टाईलची वाटली. त्याच उत्साहाला गती आली ती ‘नटरंग’ च्या मला जाऊ द्या ना घरी या फक्कडबाज ठसकेबाज लावणी नृत्याने! पिक्चर हिट तो सबकुछ हिट या नियमानुसार अमृताला देश विदेशातील अनेक इव्हेन्टसमध्ये या आणि ‘अप्सरा आली’ या सुपर हिट लावण्यांवर धमाकेदार धडाकेबाज नृत्याची संधी मिळाली, मनसोक्त मुलाखती दिल्या आणि तिने हे सगळे एन्जॉयही केले. अर्थात, ग्रामीण भागात तिच्या नृत्याला शिट्टीने रिस्पॉन्स मिळाला तर विदेशात रसिकांनी भेटून कौतुक केले. नेमक्या किती वेळा या गाण्यांवर तिने फोर्सफुल नृत्य केले हे तिलाही सांगता येणार नाही. आणि येऊ देखिल नव्हे. ती अशी मोजून मापून काम करणारी आणि आनंद घेणारी नाही. पण पूर्ण स्टेजचा पुरेपूर वापर करुन नृत्य साकारण्यासाठीची क्षमता, सातत्य, आत्मविश्वास तिच्यात दिसला. एकदा तर तिच्या पूर्वीच्या लोखंडवाला संकुलातील घरी जाऊन तिची मी मुलाखत घेताना याचाच खास उल्लेख केला तेव्हा मला जाणवलं की तिने खुद्द याचा विचार केला नव्हता. पण तेव्हा एक जाणवले की, ती आपल्या वाटचालीला अनावश्यक मर्यादा घालणार नाही. काही वर्षांनी तसा प्रत्यय येत गेलाच.
एखादा शो (डान्स इंडिया डान्स वगैरे), एखादा महत्वाचा मराठी चित्रपट (कट्यार काळजात घुसली), एकाद्या चांगल्या दिग्दर्शकाचा चित्रपट (मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’) यात आवर्जून काम करणार पण व्यावसायिक रणनीतीने आणखीनही याच अवतीभवतीची कामे करणार. ‘बाजी’ मध्ये तिने व्यक्तिरेखेची गरज म्हणून मेकअपशिवाय भूमिका साकारली. या चित्रपटाचा वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील मुहूर्त मला आजही आठवतोय. श्रेयस तळपदे सहज गंमतीत म्हणाला होता, ‘ओम शांती ओम’ नंतर एकाद्या ‘खान’ सोबत भूमिका साकारायची होती. ती संधी अमृता (‘खान’विलकरमुळे) मिळाली… यासह तिने अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारली. ‘चोरीचा मामला’ वगैरे लिस्ट वाढत जाईल.
विशाल भारव्दाज दिग्दर्शित ‘रंगून’ मध्ये तिला शोधावे लागले तो भाग वेगळा. होते असे कधीकधी. पण तोही याच व्यवसायाचा भाग आहे याची तिने सवय लावून घेतली आहे. मनोरंजन क्षेत्रात टिकून राहण्यासाठी अशाच अनेक प्रकारच्या सवयी उपयोगी पडतात हे तिच्या कळत नकळतपणे लक्षात आले असावे. त्याच वेळेस तिच्या छोट्या छोट्या गोष्टीचीही न्यूज होते (होत नसेल तर करायची असते, रिअली) एकदा आपणच शूटिंग करीत असलेल्या स्टुडिओत रणवीर सिंग शूटिंग करतोय हे समजताच त्याला आवर्जून जाऊन भेटली आणि बिलगली त्याची ‘फोटो स्टोरी’ झाली. एखाद्या स्टारचे किती चित्रपट हिट झाले आणि पडद्यावर आले तेच पडले या गणिताच्या पलिकडे हे सगळे असते आणि जवळपास प्रत्येक कलाकार हे जाणून असतोच.
सोशल मिडियात सदैव अॅक्टीव्ह हीदेखील तिची खासियत. यासाठी कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न ड्रेसमध्ये मॉडर्न स्टाईलचे फोटो सेशन सातत्याने करण्याची तिची सवय भारी आहे. दोन्हीत ती सारखीच ग्लॅमरस दिसते. तीदेखिल माधुरी दीक्षितप्रमाणेच आपलं यु ट्यूब चॅनल यशस्वी करु शकते. तेवढं सांगण्यासारखं आणि अगदी शोमनशीपसाठीही तिच्याकडे नक्कीच बरेच काही आहे, तिचा फॅन्स आणि फॉलोअर्सही वाढत आहे. ते करायचे तर काही कन्सेप्टवर काम करावे लागेल. तात्पर्य, तिच्या टॅलेंट, अनुभव, ग्लॅमर आणि आठवणी यांना खुलवण्याची गरज आहे. त्यालाच दिशा द्यायला हवी. कधी तरी ते होईलच. आजच्या डिजिटल युगातील तो फंडा आहे. बरं, अमृताला कशाचा कंटाळा असा कधीच दिसत नाही. ती प्रचंड एनर्जेटीक असून तेच तिला फ्रेश ठेवतेय. आज एकूणच मनोरंजन क्षेत्रात सतत नवीन चेहरे मोहरे येताहेत, अनेकांना पुढे जायचे असते, अशा वाढत्या गर्दीत आपण हरवून जायचे नसते हा ‘रियॅलिटी शो’ अमृताला छान जमलाय. एकीकडे तिची ‘स्टाईलीश स्टार’ अशी इमेज आहे, कुठे तिच्या ‘फिगर’ चे कौतुक आहे. तर कधी तिने ‘डॅमेज’ या रक्तपाती वेबसिरिजमध्ये बोल्ड बट ब्युटीफूल अदाकारी केल्याचे कौतुक आहे. आजच्या डिजिटल युगात हादेखील अभिनयाचा एक प्रकार झाला आहे. त्यासाठीच्या फिटनेसची तिची तयारी आहे. अरे आणखी एक गोष्ट सांगायला हवीच, फिल्म फेअरच्या ‘फिल्म स्टार अॅण्ड फॅशन’ या न्यूज स्टोरीत चमकलेली एकमेव मराठी स्टार अमृता!
हे वाचलंत का: उर्मिला मातोंडकर आणि बरंच काही
या सगळ्यात तिचा सगळ्यात मोठा आणि घट्ट आधार अर्थात तिची आई! तिचा हात घट्ट धरुनच अमृताची वाटचाल सुरु आहे. तशी अमृता खूप संवेदनशील, भावूक आहे, ग्लॅमर हा तिचा मुखवटा आहे. तो व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचाच आहे. हिमांशू मल्होत्रा तिचा लाईफ पार्टनर तिला साजेसा असाच आहे.
आजच्या तिच्या वाढदिवसाला तिला शुभेच्छा देताना मला आठवतेय ते आपल्या वाढदिवसानिमित्ताने ती करीत असलेली सामाजिक सेवा. दोन तीन वर्षांपूर्वी तिने गोरेगावच्या एका कॅन्सरग्रस्त मुलांच्या शाळेत जाऊन त्यांच्यासोबत तिने आपला वाढदिवस साजरा केला. मी आवर्जून हजर राहिलो होतो. अमृताचे हे वेगळे आणि खरे रुप होते. दरवर्षी ती कुठे ना कुठे अशी जाते आणि हे आवर्जून करते. वर्षभर इतर गोष्टी सुरुच असतात, त्यात काही नवीन गोष्टींची भर पडत असते. कधी ती खतरो के खिलाडीचा थरारक अनुभव घेते तर कधी हिम्मतवाला’मध्ये ‘धोखा धोखा’ गाण्यावर भन्नाट नृत्य करते (आणि त्या भडक चित्रपटात तेवढेच पाहण्यासारखं असते), तर कधी आणखी काही तिचे सुरु असते. तेव्हा भेट होतेच असते. आज या सगळ्यावर फोकस टाकतच तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण आपली चौफेर वाटचाल सुरु ठेवण्याच्या तिच्या फोकस्ड पर्सनालिटीला शुभेच्छा!