दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
चित्रपट अनेक.. पण नाव मात्र एक…!
‘शोले’ म्हणताक्षणीच गब्बरसिंगची दहशत, वीरु आणि जयची ‘यह दोस्ती हम नही तोडेंगे’ चा विश्वास, बसंतीची नॉन स्टॉप बकबक, ठाकूर बलदेवसिंगची सूडाची भावना, कालिया, सांबा अशी छोटी छोटी कॅरेक्टर्स असे सगळे एकदमच आठवते. अनेकांना तर मिनर्व्हा थिएटरचा सत्तर एमएमचा पडदा आणि स्टीरिओफोनिक साऊंडचा इफेक्टसही आठवला असेल. काही काही चित्रपट हे असे ही अनुभवायचे असते.
‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ असं म्हटलंकी दुसरं काहीही आठवणारच नाही. ‘जरासा झूम लू मै’, ‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘रुक जा ओ दिल दीवाने’, ‘हो गया है तुझको तो प्यार सजना’, ‘घर आजा परदेसी’, ‘मेहंदी लगा के रखना’, ‘मेरे ख्वाबो मे वो आए’, अशी सॉलिड सुपरहिट गाणी एव्हाना ओठांवर आली असतीलच. गुणगुणायला लागले असालच.
प्रत्येक चित्रपटाचे आपले एक व्यक्तिमत्व असते (खरं तर ते नाव आणि पोस्टरपासूनच असायला हवे. त्यातही दिग्दर्शक दिसायला हवा). सर्वच चित्रपटांबाबत असे घडत नाही. (काही गोष्टी अपवाद असणारच) सुभाष घईने ‘खलनायक’ दिग्दर्शित करायला घेतला म्हणून त्याच्याशी स्पर्धा म्हणून सावनकुमारने ‘खलनायिका’ चे दिग्दर्शन हाती घेत, ‘खलनायक’ च्याच स्पर्धेत रिलीज केला. पण ‘खलनायक’ म्हणताक्षणीच ‘नायक नही, खलनायक हू मै’, ‘चोली के पीछे क्या है’ जे पटकन आठवते तसे ‘खलनायिका’ बाबत होत नाही.
पण एका नावाचे दोनच काय, अनेक चित्रपट येत असतात, काहींचे असे काही ‘नाव’ होते की रसिकांची पिढी बदलूनही त्या चित्रपटाचे ‘नाव’ कायमच राहते. तर त्या नावाचा दुसरा (कधी तिसराही) चित्रपट होता हे फारसं कोणाच्याही लक्षात येत नाही. अगदी जे ‘सिनेमातील कीडे’ असतात, त्यांना ‘दिल्लगी’ म्हणताच धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचा बासू चटर्जी दिग्दर्शित मजेशीर चित्रपट आठवतोच, पण सनी देओलने या नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि त्यात सनी, बॉबी देओल आणि उर्मिला मातोंडकर असा प्रेम त्रिकोण होता आणि हा चित्रपट पडद्यावर आला तोच पडला हेही आठवते. काही फिल्म दीवाने त्याहीपेक्षा जुन्या ‘दिल्लगी’ च्या आठवणी सांगतात. तू मेरा चांद मै तेरी चांदनी हे १९४९ च्या ए. आर. कारदार दिग्दर्शित ‘दिल्लगी’ तील आहे सांगतात. श्याम आणि सुरय्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसाच एक ‘दिल्लगी’ १९६६ सालीही पडद्यावर आला होता. संजय खान आणि माला सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘दिल्लगी’ (दिल लगी) हे नावच तसे कॅची आहे म्हणा.
सर्वसामान्य चित्रपट रसिक मात्र अनेक चित्रपट ‘नावा’ पासूनच ओळखतात. तरी चकमा कधी मिळतो माहितीये? ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ चे अगदीच वेगळे पोस्टर दिसल्यावर (मजकूरासोबतचे बघा). हा चित्रपट कधी बरे येऊन गेला असेल असा प्रश्न पडतो. हा डीडीएलजे १९८० ला आला. अगदीच छोटा चित्रपट असल्याने त्याची कोणी फारशी नोंद घेतली नाही. आतिश दिग्दर्शित या चित्रपटात देश गौतम आणि बीना यांच्या भूमिका आहेत. (ही बीना म्हणजे प्रदीपकुमारची मुलगी). तात्पर्य, डीडीएलजे एकच होता असे नव्हे. पण दोन्ही चित्रपटांची तुलना केली तर मात्र एकच हो, ‘शाहरूख आणि काजोलचा’ असेच तुम्ही म्हणाल.
हे वाचलंत का: ‘काळी दिवाळी’ आणि तीदेखील फिल्मवाल्यांची? आश्चर्य!
रमेश सिप्पीच्या ‘शोले’ च्या खूपच अगोदर निर्माता आणि दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी ‘शोले’ (१९५३) निर्माण केला होता. अशोककुमार, बीना रॉय आणि पूर्णिमा यांच्या त्यात प्रमुख भूमिका आहेत. पण या दोन ‘शोले’ मध्ये काळाचा खूपच मोठा फरक आहे. चोप्रांचा ‘शोले’ सामाजिक चित्रपट होता, तर रमेश सिप्पीचा ‘शोले’ हिंसक डाकूपट आहे. त्यात मनोरंजनाचे अधिकाधिक लहान मोठे घटक आहेत. एकाद्या चित्रपटाचे नाव रिपीट होताना त्यात अशाही गोष्टी असतात.
‘सरफरोश’ (१९९९) म्हटलं की आमिर खान, नसिरुद्दीन शहा आणि सोनाली बेंद्रे, जॉन मॅथ्यूज दिग्दर्शित वेगळ्या पठडीतील देशभक्तीपर चित्रपट पटकन आठवतो. (नवाजुद्दीन सिद्दीकी त्यात अगदी छोट्या भूमिकेत आहे). पण तत्पूर्वी दासरी नारायण राव दिग्दर्शित याच नावाच्या चित्रपटात जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आजही मला या ‘सरफरोश’ (१९८५) चा फिल्मीस्थान स्टुडिओतील मुहूर्त आठवतोय. दासरी नारायण राव आपल्या साऊथ इंडियन स्टाईल हिंदीत सांगत होते की, त्यांच्याच एका तमिळ चित्रपटाची ही हिंदी रिमेक आहे. प्रत्यक्षात हा हिंदी चित्रपट पडद्यावर आला तेव्हा त्यातील दक्षिणेकडील भडकपणा कायम असल्याने त्याला अजिबात यश मिळाले नाही. सत्तरच्या दशकात दिग्दर्शक मनमोहन देसाई अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी, कादर खान इत्यादीना घेऊन ‘सरफरोश’ बनवत होते. पण चार पाच रिळांच्या शूटिंगनंतर हा चित्रपट डब्यात गेला. यात अमिताभचा वेगळा गेटअप होता. मात्र, हा चित्रपट मनजी स्टाईल मसालेदार मनोरंजक झाला असता.
हिंदीतील युध्दपटात चेतन आनंद दिग्दर्शित ‘हिन्दुस्तान की कसम’ (१९७३) या चित्रपटाचे नाव आवर्जून सांगायला हवे. (‘शोले’ च्या अगोदर अमजद खानने यात छोटीशी भूमिका साकारलीय हे सहज आपलं जाता जाता सांगतो), त्यानंतर ॲक्शन दिग्दर्शक वीरु देवगन यांनी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकताना याच ‘हिन्दुस्तान की कसम’ (१९९९) नावाचा चित्रपट घडवला. अमिताभ बच्चन आणि अजय देवगनच्या भूमिका असलेला हा चित्रपट अपेक्षित परिणाम साध्य करु शकला नाही. म्हणूनच विसरला गेला. सिनेमाचा इम्पॅक्ट त्याचे नाव एस्टॅब्लिज करतो हे महत्वाचे सूत्र आहे. दिलीपकुमारची दुहेरी भूमिका असलेला ‘राम और श्याम’ (१९६७) म्हणूनच तर चित्रपट रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही आजही हिट आहे. दिलीपकुमार आणि राम और श्याम हे घट्ट समीकरण आहे. तरीही दिग्दर्शक राजू मावानी याने माणिक बेदी आणि सम्राट यांना ‘राम और श्याम’ (१९९६) बनवले. म्हणजे त्याने या दोन व्यक्तिरेखा केल्या. म्हणून ओरिजिनल ‘राम और श्याम’ ची ओळख पुसली गेली नाही. हिट पिक्चर आपल्या नावाच्या आणि गाण्याच्या ओळखीसह असतो.
एका नावाचे अनेक सिनेमा याला अगदी नाईलाज आहे. नवीन नावे आणणार कुठून हा सर्वात मोठा प्रश्न आहे. चित्रपट निर्मात्यांची संस्था ‘इम्पा’ मध्ये आपल्या चित्रपटाचे नाव रजिस्टर करावे लागते. दरवर्षी फी भरुन त्या नावाचे हक्क कायम ठेवावे लागतात. काही निर्मात्यांनी आपल्या रिलीज झालेल्या चित्रपटाचे नाव त्यानंतरच्या काळात कोणीही घेऊ नये म्हणून त्यांचे कायमस्वरुपी रजिस्ट्रेशन केले. त्रिमूर्ती फिल्मच्या गुलशन रॉय यांचे याबाबत आवर्जून नाव घ्यायला हवे. त्यांनी निर्माण केलेल्या आणि विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’ (१९७०) चे नाव पुन्हा कोणी वापरणार नाही. अशातच संजय दत्त व रति अग्निहोत्री यांच्या ‘जॉनी’ नावाच्या चित्रपटाचा मुहूर्त झाला आणि गुलशन रॉय यांनी या नावाला जोरदार आक्षेप घेतल्याने त्या चित्रपटाचे नाव ‘जॉनी आय लव्ह यू’ असे करावे लागले.
‘चित्रपटाच्या नावाची गोष्ट’ हा एक खूपच मोठा आणि वळणावळणाचा विषय आहे, इतका की रामदास फुटाणे निर्मित आणि डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ (१९७५) या चित्रपटाचे नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असे होते. त्या काळातील मराठी चित्रपटानुसार ते परफेक्ट असले तरी ‘सामना’ म्हटल्यावर एक विशिष्ट प्रतिमा डोळ्यासमोर येतेच तसे मूळ नावाचे होत नाही. तरी बरं, पुन्हा कोणी आपल्या चित्रपटाचे नाव ‘सामना’ ठेवले नाही. जरी ठेवले असते तरी डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या जबरदस्त अभीनयाचाच ‘सामना’ डोळ्यासमोर येणार.
चित्रपटाचे नाव ही त्याची पहिली आणि महत्वाची ओळख असते, पण त्याच नावाचा खेळ नंतर कसाही वळण घेऊ शकतो.