दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘मोरूच्या मावशी’ची सोनेरी वाटचाल
सामान्यपणे प्रथमतः नाटक रंगभूमीवर येतं आणि नंतर त्याचा चित्रपट होतो. पण पहिले चित्रपट आणि नंतर नाटक असा उलट प्रवास झालेलं सुपरहिट नाटक म्हणजे ‘मोरुची मावशी’. याच नाटकाच्या या काही आठवणी.
‘टी.डी.’ ही पदवी मिळवण्यासाठी आचार्य अत्रे इंग्लंडला गेले असताना ‘चार्लीज आन्ट’ या नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला होता. ब्रॅन्डन टॉमस लिखित हे इंग्रजी प्रहसनवजा नाटक आचार्य अत्रे यांनी त्यानंतर वाचलं. या धमाल नाटकाच्या कथेवरून आचार्य अत्रे यांनी ‘मोरूची मावशी’ हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शितही केला.
चित्रपट तसा यथातथाच चालला पण त्यानंतर चित्रपटावर आधारित नाटक आचार्य अत्रे यांनी लिहिलं ते मात्र सुपरहिट ठरलं. १ मे १९६३ रोजी महाराष्ट्र दिनी ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला. दीड महिन्यात या नाटकाचे सतत हाऊसफुल्ल असे २५ प्रयोग झाले. बापूराव माने यांनी यात मावशीची भूमिका साकारली होती.
काही वर्षांनी हेच नाटक नव्या नटसंचात रंगभूमीवर आलं. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन आणि मावशीच्या भूमिकेत विजय चव्हाण यांनी धमाल केली आणि मोरुची मावशी म्हणजे विजय चव्हाण हे समीकरण जुळलं. विजय चव्हाण आणि लक्ष्मीकांत बेर्डे एकमेकांचे खास मित्र. ‘टुरटुर’ मध्ये ते एकत्र कामही करत. वास्तविक मावशीच्या भूमिकेसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारण्यात आलं होतं. पण ते व्यग्र असल्याने त्यांनी विजय चव्हाण यांचं नाव सुचवलं.
विजय चव्हाण त्यावेळी मफतलाल कंपनीत कामाला होते.नोकरी सांभाळत त्यांनी मोरुच्या मावशीचे प्रयोग रंगवले. बघता बघता २००० प्रयोगांचा टप्पा पार केला. विजय चव्हाण यांचा नाटकातल्या ‘टांग टिंग टिंगा’ गाण्यातला पिंगा आणि कोंबडा म्हणजे प्रेक्षकांसाठी खळखळून हसवणारी पर्वणी असायची. भरजरी साडीत विजय चव्हाण इतक्या सहज ते सारं सांभाळत की मावशी साकारावी तर यांनीच अशी भावना आपसूकच मनात निर्माण होई.
हे वाचलंत का: वंदना गुप्ते यांच्या रंगभूमीवरील एंट्रीची ही धमाल गोष्ट !
या नाटकाच्या अनेक गंमतीशीर आठवणीही आहेत. एका प्रयोगाला चक्क रंगमंचावर मांजर येऊन बसली. कितीही हाकलून काही केल्या ती जाईना. तेव्हा प्रेक्षकांतून कुणीतरी म्हणालं, “ विजू तुझी मावशीच येऊन बसलीय बघ रे” आणि प्रेक्षकातून प्रचंड हशा आला. विजय चव्हाण ही भूमिका अक्षरशः जगले.
त्यांच्यानंतर आता भरत जाधव यांनी मावशीच्या भूमिकेचं शिवधनुष्य पेललं आहे. ही भूमिका म्हणजे एक प्रकारे भरत जाधव यांनी विजय चव्हाण यांना वाहिलेली अनोखी आदरांजली. या नव्या संचातील नाटकात देव्हा-याच्या बाजूला विजय चव्हाण यांची तसबीर आवर्जून ठेवली जाते.
पुरुषांनी चित्रपटात स्त्री भूमिका साकारणं आणि नाटकात स्त्री भूमिका रंगवणं यात फरक आहे. चित्रपट अनेक गोष्टी संकलित करतो. पण नाटकासारख्या जीवंत कलेत हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने सातत्यपूर्ण स्त्री भूमिका साकारणं अवघडंच काम. जुन्या मराठी संगीत नाटकातील स्त्रीपार्टीना नवा आयाम देत रंगमंचावर धुमाकूळ घालणारी मावशी म्हणजे अशा भूमिकांमधलं सोनेरी पानच!