‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
चित्रपट क्षेत्रातील फोटोंचा विकसित होणारा एक अनोखा प्रवास
चांगल्या फोटोत ‘कॅमेरा’ हाच ‘डोळा’ असतो आणि कॅमेरामनची कल्पक ‘नजर’ असते, आणि त्याच वेळी त्याच फोटोसाठी पोझ देत असलेल्या व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन तितकाच महत्त्वाचा असतो. कॅमेराचा शोध लागण्यापूर्वी चित्रकार एकाद्या व्यक्तीला समोर बसवून रेखाटन करायचा. यापासून ते आज हातोहाती मोबाईल आल्यावर कधीही सेल्फी काढावा आणि कुठेही क्लिक करावा असा प्रचंड सुकाळ झाला आहे. या दीर्घकालीन वाटचालीत ‘चित्रपट कलाकारां’ चे फोटो ही एक अनेक वळणावळणाची न संपणारी, खरं तर न संपावी अशी गोष्ट सुरु आहे.
सिनेमाचा जन्म झाला तेव्हा त्यातील दृश्यांचेच फोटो ही त्या काळानुसार प्रथा होती हे अगदी स्वाभाविक आहे. दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ (१९१३) च्या दृश्यांचे फोटो आपण वर्षानुवर्षे पाहतो आहोत. पहिल्या काही वर्षातील मूकपट आणि मग चित्रपट बोलू लागला तेव्हाचेही आपण चित्रपटातील दृश्यांचेच फोटो पाहतोय. हे चित्रपट आहेत, अर्देशीर इराणी दिग्दर्शित ‘आलम आला’ (१९३१) हा पहिला हिंदी बोलपट आणि चित्रपती व्ही. शांताराम यांचा ‘अयोध्येचा राजा’ (१९३२) हा पहिला मराठी बोलपट. या चित्रपटांची दखल घेतली जाताना प्रामुख्याने अर्देशीर इराणी आणि व्ही. शांताराम यांचे फोटो आवर्जून असतात, याचा अर्थ ‘येथे दिग्दर्शक महत्वाचा आहे’ असाही होतो आणि ते विशेष उल्लेखनीय आहे.
सुरुवातीची काही वर्षे अशीच सरल्यावर सेटवर ‘स्टील फोटोग्राफर’ कार्यरत झाला. दिग्दर्शकाने दृश्य ओके केल्यावर त्याच दृश्याचा फोटो काढला जातो, त्याचा अल्बम केला जातो, त्यातील अनेक फोटोतील कलाकारांच्या कपड्यांपासून अनेक तपशील चित्रपटाच्या कंटीन्यूटीसाठी उपयोगी पडतात. चित्रपट माध्यमात ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. याच फोटोना पाहून पोस्टर बनली जाऊ लागली. ती रस्त्यावरच्या पोस्टर, होर्डींग्सपासून थिएटरमधील फोटो सेट, थिएटर डेकोरेशनपर्यंत आली. म्हणजे, स्टील फोटोग्राफरने सेटवर काढलेल्या फोटोचा खूप मोठा प्रवास आहे.
हे वाचलंत का: मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट शाहरुखने का सोडला ?
हळूहळू या चित्रपटसृष्टीतील फोटो प्रकार व्यापक होऊ लागला. एकीकडे फोटोग्राफर कलाकारांचे फोटो सेशन करु लागले तर दुसरीकडे अनेक फोटोग्राफर चित्रपटाचा मुहूर्त, सेट, आऊटडोअर्स शूटिंग, प्रीमियर, पार्टी यात फोटो काढू लागले. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात ही गोष्ट रुजत गेली. याच काळात इंग्रजी मिडियात फिल्म स्टारच्या फोटोना स्कोप मिळू लागला. कधी दिवाळीच्या फुलबाजा घेऊन हिंदीतील अभिनेत्री आनंद घेताहेत असे फोटो आले तर एकदा अचानक एका बड्या इंग्रजी मॅगझिनच्या मुखपृष्ठावर बिकिनीतील शर्मिला टागोर झळकताच कल्चरल शॉक लागला. ती अशी काही पोझ देईल अशी अपेक्षा नव्हती आणि तेव्हाचे सामाजिक, सांस्कृतिक वातावरण खूप शांत वाटत होतं. पण हळूहळू बदल होत गेला.
हिंदी चित्रपटसृष्टीत हेमा मालिनी, रेखा, राखी, झीनत अमान, परवीन बाबी, नीतू सिंग अशांचे एकेक करत आगमन झाले आणि फोटो सेशन कल्चर विकसित झाले. रेखा तर संपूर्ण दिवसभर विविध प्रकारच्या ड्रेसमध्ये फोटो शूट करुन अजिबात कंटाळत नसे अगदी संध्याकाळीही ती फ्रेश असे. त्या काळात गौतम राजाध्यक्ष ‘स्टार फोटोग्राफर’ म्हणून ओळखला जाई. आमच्या गिरगाव ऑपेरा हाऊसमधील त्याच्या प्रशस्त घरी अमिताभपासून माधुरी दीक्षित येतात ही गोष्टच तेव्हा कौतुकाची आणि नवलाईची होती. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन खूप वर्षांनी फोटोसाठी एकत्र आणण्यात गौतम राजाध्यक्षला चांगले यश मिळाले. गौतम राजाध्यक्ष फोटोसह छोट्या छोट्या तपशीलाने मोठा लेखही लिहायचा. त्यामुळे ‘त्याच्या फोटोची स्टोरी शब्दातही अनुभवता येई’. गौतम राजाध्यक्षचे अनेक स्टार फॅन होते आणि त्याचा स्वतःचा हुकमी वाचकवर्गही होता.
हे वाचलंत का: चित्रपटातील रजनीकांत आणि राजकारण आता एकत्र होताना दिसणार
वर्षा उसगावकर, अश्विनी भावे यांचे त्यांनी केलेले फोटो सेशन मराठी रसिक मनाला विलक्षण आनंद देणारे ठरले. अश्विनी भावेला रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हीना’ (१९९१) मध्ये भूमिका मिळण्यास गौतम राजाध्यक्षचे फोटो सेशन हितकारक ठरल्याची तेव्हा चर्चा होती. हिंदी चित्रपटसृष्टीत वावरताना वर्षा, अश्विनी, किशोरी शहाणे यांनी हिंदीतील टॉपच्या अनेक फोटोग्राफरकडे फोटो सेशन केले. आणि आपला व्यावसायिक ॲप्रोच दाखवला. विशेष म्हणजे, त्यांची लंबी मुलाखत घेतोय तोच त्या भरपूर फोटो देत. ट्रान्स्फरन्सीच्या युगात त्याही त्यांनी दिल्या.
तर अशा पध्दतीने स्वतंत्रपणे फोटो सेशन करणारे स्टार फोटोग्राफर म्हणून जगदीश माळी, राकेश श्रेष्ठ, दब्बू रत्ननानी, जयेश सेठ, हरिश दफ्तरी यांची नावे घेतली जात. त्यांचे स्वतःचे फोटो स्टुडिओ होते. नंतरच्या काळातील स्टारग्राफर म्हणजे अतुल कसबेकर (तो नंतर चित्रपट निर्माता झाला), अविनाश गोवारीकर यांची आवर्जून नावे घेता येतील. त्यानी फोटोग्राफीत काही नवीन प्रयोगही केले. जगदीश माळीचा वर्सोवातील फोटो स्टुडिओ मी पाहिलाय. जगदीश माळी रेखाचा फेवरेट म्हणून ओळखला जात असला तरी एकदा रेखाच्या फोटो सेशनसाठी असाइनमेंट असूनही जगदीश माळी रविवार असल्याने क्रिकेट सामना खेळायला गेला. आपल्यापेक्षा क्रिकेटमध्ये असे काय बरे आहे हे पाहायला एकदा रेखाच जगदीश माळीची मॅच पाहायला गेली ही अर्थातच बातमी झाली. अक्षयकुमार सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात एका फोटोग्राफरकडे चक्क लायटींग वगैरेचे काम करायचा.
सेटवर अथवा पार्टीत वगैरे फोटो काढणे खूपच जिकरीचे. एक तर अनेक फोटोग्राफर्सच्या गर्दीत कधी स्वतःला धक्का लागू न देता तर कधी धक्का मारत फोटो काढले जात आणि तरीही फोटो चांगले येत. मी ऐशीच्या दशकात मिडियात आलो आणि चित्रपटसृष्टीत भटकंती, लहान मोठ्या भेटीगाठी, निरीक्षण याचा चौफेर धडाका लावला तेव्हा ओळख झालेला पहिला फोटोग्राफर बी. के. तांबे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण बी. के. तांबेने अमिताभ आणि जया भादुरी यांच्या लग्नाचे फोटो काढले होते. रेखा त्याच्याशी मराठीत बोलते हे मी अनुभवलयं.
चित्रपटसृष्टीत चौफेर वावरत यशस्वी करियर केलेल्या फोटोग्राफरमध्ये जगदीश औरंगाबादकर, इंद्रजित औरंगाबादकर, प्रदीप बांदेकर, विनायक गोखले, पीटर मार्टीस, राजू उपाध्यक्ष, के. सुभाष तसेच नंतरच्या काळातील प्रशांत निकते, रमाकांत मुंडे, बाबा लोंढे, बिपीन कुलकर्णी, रावसाहेब दाभाडे, राजेश पवार यांची नावे घ्यायला हवीत. प्रत्येकाची आपली स्वतःची शैली आहे.
सेटवर फोटो काढता काढता बड्या स्टारशी थट्टामस्करीत संवाद, तर कधी अगदी स्वतंत्र फोटो सेशन करीत यांनी आपला कार्यविस्तार केला. आज कधीही इंद्रजित औरंगाबादकर अथवा प्रदीप बांदेकरचा फोन आल्यावर आम्ही ऐशी नव्वदच्या दशकातील अनेक हिंदी चित्रपटाच्या सेटवरच्या आठवणीत रमतो. एकदा गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘आवाम’ च्या सेटवर दुपारी एका बाजूला आम्ही जेवत असताना बाजूच्या टेबलावर राजेश खन्ना शफी इनामदारसोबत जेवत असतानाच शेजारच्या मुकुल आनंद दिग्दर्शित ‘इन्साफ’ च्या सेटवरील डिंपल कपाडिया अचानक आली आणि सगळ्यांचीच तारांबळ उडाली. त्या काळात राजेश खन्ना आणि डिंपल वेगळे राहत होते आणि गॉसिप्स मॅगझिनमधून बरेच काही ना काही रंगवून शिजवून लिहिले जात होते. फोटोग्राफर्सनी प्लेट तशीच ठेवली आणि कॅमेरा धरला तर शफी इनामदारचा गोंधळलेल्या अवस्थेत फोटोत आला. हा फोटो एक्स्युझिव्हज ठरला.
हे देखील वाचा: अमृता खानविलकर…. हिंदीचं ग्लॅमर, मराठी ठसका
मग कधी कमाल अमरोही दिग्दर्शित आणि राजेश खन्ना व राखी यांची भूमिका असलेल्या ‘मजनून’ चा मेहबूब स्टुडिओतील मुहूर्त आठवतो तर कधी संजय दत्त व माधुरी दीक्षितची भूमिका असलेल्या सुशील मलिक दिग्दर्शित ‘अन्नदाता’ या चित्रपटाच्या हॉटेल सी रॉकमधील मुहूर्ताला उशीर झाला म्हणून आम्ही सगळे निघून गेलो होतो आणि मग चित्रपटच बंद पडला हे आठवते. तात्पर्य, सिनेमाच्या जगात फोटो काढले आणि पॅकअप झाले असे होत नाही. त्याची गोष्ट संपतच नसते.
राजश्री प्रोडक्शन्सच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (१९९४) पासून चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी स्वतंत्र फोटो सेशन करण्याचा ट्रेन्ड रुजला. मग हेच फोटो हवे तेवढे ब्लो अप करून होर्डींग्सवर येऊ लागले. एव्हाना, ‘सिनेमाची पोस्टर रंगवणे’ ही कला कमालीची कालबाह्य झाली होती. याच काळात गॉसिप्स मॅगझिनमध्ये बोल्ड फोटो सेशनचा ट्रेण्ड आला आणि उलटसुलट वादळी चर्चा करणारा ठरला. ममता कुलकर्णीने टॉपलेस फोटो शूट करुन खळबळ उडवली तर पूजा भट्टने शरीरभर रंगरंगोटी करुन लक्ष वेधून घेतले. एव्हाना खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे वारे आपल्याकडे वाहू लागले असल्याने असे काही होणारच होते. जग बदलत असते तसेच सिनेमाच्या जगातील फोटोची गोष्टही बदलली. याच टप्प्यावर मिडियासाठी सिनेमाचे रंगीत फोटो द्यायचे युग आले. तोपर्यंत आम्हाला रंगीत सिनेमाचेही ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो देणे मागे पडले. वृत्तपत्राच्याही रंगीत पुरवण्या सुरु झाल्या होत्या.
हे सगळे घडत घडत आणखीन एक फोटो स्पॉट हुकमी झाला. तो म्हणजे, आंतरराष्ट्रीय विमानतळ. येथे ‘चोवीस तास’ फोटोग्राफरची ड्यूटी लागली. कॅटरिना कैफ विदेशात निघाली, काढ फोटो. दीपिका पादुकोन विदेशातून आली रे आली की फोटो. एकदा चक्क यश चोप्रा, पामेला चोप्रा, आदित्य चोप्रा आणि रानी मुखर्जी हे भल्या पहाटे विदेशातून आल्याचा फोटो एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पेज थ्रीवर आला आणि आदित्य व रानीच्या ‘प्रेमाच्या रिश्त्यावर’ शिक्कामोर्तब झाले. तोपर्यंत फक्त त्यांच्या जवळकीची कुजबुज होती. येथे फोटो बोलत होता. मग डोमॅस्टीक विमानतळावरची स्टारची ये जा फोटो स्टोरी होऊ लागली आणि तशी आम्हा सिनेपत्रकाराना आमंत्रणेही येऊ लागली.
सोशल मिडिया काळात फोटो सेशनचा सुकाळ झाला आहे. सतत इंस्टाग्रामवर फोटो टाकत आपल्या लाईक्सची संख्या वाढवणे हा एक प्रकारचा ध्यास असतो. ते करायचे तर काही कन्टेन्ट हवा. कधी पारंपारीक तर कधी वेस्टर्न स्टाईलचे फोटो सेशन हवे. मराठी अभिनेत्रींनी यात चांगली गती ठेवत प्रगती साध्य केली आहे. सई ताह्मणकर यात ट्रेण्ड सेटर ठरली. आजच्या ग्लोबल युगातील रसिकांना आवडेल असाच फोटो फंडा तिने रुजवला. अमृता खानविलकर, ‘पोस्टर गर्ल’ सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, स्मिता गोंदकर, श्रृती मराठे, प्राजक्ता माळी यांनी यात कमालीचे देखणे सातत्य ठेवले आहे. पूजा सावंतचे झीनत अमान रेट्रो लूकचे फोटो सेन्सूअस आणि गुड इम्पॅक्टचे. मराठी अभिनेत्रींचा फोटो फंडा स्वतंत्र असा हिट (कधी हॉट) विषय आहे. ती गोष्टही कलरफुल.
हे देखील वाचा: डीडीएलजेची २५ वर्षे आणि मराठा मंदिरचे दहा सुपर हिट…
सिनेमा जगताची फोटोची ही गोष्ट तशी कधीच न संपणारी आहे. आपल्या सुरुवातीच्या काही फ्लॉप चित्रपटानंतर माधुरी दीक्षितने गौतम राजाध्यक्षकडे असे काही चार्मिंग फोटो सेशन केले की तिच्या करियरने लिफ्ट घेतली. एकदा त्यानेच माधुरीचे मधुबालाची आठवण येईल असे फोटो सेशन केले आणि माधुरीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. तर एका प्रिन्ट जाहिरातीत दीप्ती भटनागरचा फोटो पाहून जॅकी श्रॉफने तिचा टेलिफोन नंबर मिळवायचा प्रयत्न सुरु केला (जवळपास तीस वर्षापूर्वी आजच्याइतके सहज टेलिफोन नंबर मिळत नसत). अखेर तो मिळाला आणि संजय गुप्ता दिग्दर्शित ‘राम शस्र’ मध्ये मनिषा कोईरालासह दुसरी नायिका भूमिका ऑफर केली. दीप्ती भटनागर तेव्हा मुंबईत नवीन घर घेत होती आणि त्यासाठी लागणारा पैसा या ऑफरने मिळवून दिला. एक फोटो कसा कुठून कसा फायद्याचा ठरेल काही सांगता येत नाही…
म्हटलं ना, फोटोची गोष्ट कधीच संपत नाही. आणि संपू देखिल नव्हे. सिनेमाच्या फोटोच्या कलेक्शनची गोष्ट यापेक्षा वेगळी …