
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ पुनश्च आगमन
कोरोना काळात लॉकडाऊनने नाट्य रंगभूमीवर पडदा पडला. जवळपास ६ महिने रंगभूमी हतबल होती. आता नव्याने अनलॉक होत रंगभूमीवर तिसरी घंटा खणखणणार आहे. या अनलॉकींग मधलं महत्त्वाचं नाटक म्हणजे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’.
प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, अभिनीत, अद्वैत दादरकर लिखीत- दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग पुण्यात १२/१३ डिसेंबरला होणार आहे. या नाटकाची तिकीटं जवळपास हाऊस फुल्ल प्रतिसादात बुक झाली. इतक्या दीर्घ काळानंतर कोरोनाची भीती घालवून नव्याने प्रेक्षकांना नाट्य गृहात खेचून आणणं जिकीरीचं काम होतं. अशा वेळी स्वत: प्रशांत दामले आणि कविता मेढेकर तिकीट वाटपासाठी उभे राहिले. त्याचा परिणाम निश्र्चितच तिकीट विक्रीवर दिसून आला.
हे देखील वाचा: रंगभूमी गाजवलेलं सदाबहार नाटक ‘मोरूची मावशी’ ह्याचे काही रंगतदार किस्से
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक म्हणजे ‘एका लग्नाची गोष्ट’ या श्रीरंग गोडबोले लिखित मंगेश कदम दिग्दर्शित नाटकाचा सिक्वेल म्हणता येईल. ‘एका लग्नाची गोष्ट’ मध्ये मनी आणि मन्या यांच्या लग्ना आधीची आणि लग्ना नंतरची गोष्ट दाखवली गेली होती. नाटकातील ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणं विलक्षण गाजलं होतं. या नाटकाचे जवळपास १८०० प्रयोग झाले. त्यानंतर २० वर्षांनी लग्नात स्थिरावलेल्या मनी आणि मन्याची कथा ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ मधून मांडण्यात आली. हे नाटक लॉकडाऊनच्या आधी उत्तम चालू होतं. २.३० तासाचं नाटक जबरदस्त हशा, टाळ्या यांच्या मुळे ३ तासांपर्यंत जाई. या नाटकाची निवड अनलॉकींगसाठी करताना प्रेक्षक प्रतिसादाची खात्री बाळगली गेली होती. ती खरी ठरली.

अर्थात नाटकाला हाऊस फुल्ल बोर्ड लागला तरी काही गोष्टींची काळजी घेणं अनिवार्य असेल. मास्क शिवाय नाट्यगृहात प्रवेश मिळू शकणार नाही. त्याशिवाय टेंपरेचर तपासणी, सॅनिटायजेशन अशा गोष्टी सोबत असतीलच.
तरीही नाटकाची घंटा या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा खणखणणार आणि प्रेक्षक व रंगभूमी यांच्यातील दुरावा मिटणार हे अधिक महत्त्वाचं!