मारा: एक नेत्रसुखद सिनेसफर
काही माणसं ह्या जगात देवदूताच्या रूपातच येतात. आपल्या उदास आयुष्याला आनंदाची नवसंजीवनी देणं हेच त्यांचं प्रथम उद्दिष्ट असतं. इतरांप्रमाणे ठराविक चौकटींच्या बंदिस्त पिंजऱ्यात दिवस काढण्यापेक्षा मस्त आणि उनाड जीवन जगणारे हे देवदूत फुलपाखराप्रमाणे आनंद वाटत, बागडत सुटतात. त्यांचा पाठलाग करायचा झाल्यास, क्वचितच एखादं हाती लागतं आणि त्याच्या मखमली पंखांचे रंग आपल्या हातात सोपवून ते पुन्हा निसटून जातं. असंच एक मस्तमौला फुलपाखरू.. मारा (Maara)..
हे देखील वाचा: विजय थलापतीचा “मास्टर” ओटीटीवर…..
दिलीप कुमार (Dhilip Kumar) दिग्दर्शित ‘मारा’ हा तामिळ चित्रपट २०२१चा रोमँटिक ड्रामा असून, २०१५च्या ‘चार्ली’ या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक आहे. दुलकर सलमान व पार्वती मेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘चार्ली’ मार्टिन प्रकट यांनी दिग्दर्शित केला होता. याच चित्रपटाचा ‘देवा – एक अतरंगी’ नावाचा मराठी रिमेकही बनवण्यात आला होता, ज्याचं दिग्दर्शन मुरली नल्लाप्पा यांनी केलं होतं आणि अंकुश चौधरी व तेजस्विनी पंडित यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. गाणी आणि सिनेमॅटोग्राफी वगळता ‘देवा’ सर्वच पातळ्यांवर निराश करतो. याउलट ‘मारा’ने सर्वच आघाड्यांवर उत्तम कामगिरी करत प्रेक्षकांना अडीच तास खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणातच ‘चार्ली’सारख्या एका गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक म्हणून एक उत्कृष्ट कलाकृती दिलीप कुमार यांनी ‘मारा’च्या रुपात प्रेक्षकांना सादर केलेली आहे.
पार्वती उर्फ पारू (श्रद्धा श्रीनाथ) घरच्यांच्या लग्नाच्या आग्रहाला कंटाळून कामाचं कारण देत घर सोडते. व्यवसायाने रिस्टोरेशन आर्किटेक्ट असलेली पारू केरळच्या समुद्रकिनारी वसलेल्या एका गावाला भेट देते. राहण्यासाठी घर शोधत असताना पारूला गावातील भिंतींवर काही चित्रं रंगवलेली दिसतात, जी तिने लहानपणी ऐकलेल्या एका परीकथेशी मिळतीजुळती असतात. ही चित्रं काढणाऱ्या चित्रकाराचा शोध घेताना पारूला गावातील काही जणांकडून ‘मारा’ (आर. माधवन– R. Madhavan ) या कलाकाराबद्दल कळतं. आपण ऐकलेली परीकथा गावभर चित्रातून उभी करणाऱ्या मारापर्यंत पारू कशाप्रकारे पोहोचते, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळते.
पारू माराला शोधत असताना तिला अनेक व्यक्ती भेटतात ज्यांच्याशी माराचे ऋणानुबंध जुळलेले असतात. या भेटीगाठींमधून एक भुरटा चोर (अॅलेक्झांडर बाबू), नैराश्याने घेरलेली डॉक्टर कनी (शिवदा), आपल्या प्रेयसीची वाट पाहणारा रिटायर्ड पोस्टमन वेलैय्या (मौली) आणि लेकीच्या भवितव्याची काळजी असणारी वेश्या सेल्वी (अभिरामी) यांची कहाणीही प्रेक्षकांसमोर येते. कोडी सोडवायची हौस असलेला नावाडी चोक्कू (गुरू सोमसुंदरम), अँटिक शॉप दुकानदार उस्मान भाई (एम. एस. भास्कर), किनाऱ्यावर खोपट्यात राहणारा डेव्हिड (किशोर) पारूशी माराबद्दल भरभरून बोलतात. त्यांच्या कथाकथनातून उलगडत जाणारा फ्लॅशबॅक प्रेक्षकांना माराचं रहस्य सांगतो.
हे वाचलंत का: प्रभास आता भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला स्वतंत्र ठसा उमवण्यासाठी तयार
आर. माधवनने साकारलेला दिलखुलास, चार्मिंग मारा ‘चार्ली’च्या तुलनेत कुठेही कमी पडलेला नाहीय. आपल्या ‘रोमँटिक बॉय’ इमेजची पुन्हा एक झलक दाखवत माधवनने या भूमिकेसाठी त्याची निवड अगदी अचूक असल्याचं सिद्ध केलेलं आहे. श्रद्धा श्रीनाथच्या सौंदर्य आणि अभिनयाचा संगम पार्वतीच्या भूमिकेत दिसून येतो. काही प्रसंगांमध्ये, फक्त स्मितहास्याच्या जोरावर ती प्रेक्षकांना पारूच्या प्रेमात पडायला भाग पाडते. अभिरामीने साकारलेली सेल्वी, शिवदाची डॉ. कनी, मौली यांचा वेलैय्या ही पात्रे छोट्या छोट्या प्रसंगातही भाव खाऊन जातात. पाहुण्या कलाकार पद्मावती राव यांनीही चित्रपटात छोटीशी पण अतिशय महत्त्वाची भूमिका केलेली आहे.
माराच्या यशाचं जितकं श्रेय सर्व कलाकारांना आणि दिग्दर्शकाला जातं, त्याहून जास्त श्रेय सिनेमॅटोग्राफी आणि म्युझिक या दोन विभागांचं आहे. कार्तिक मुथूकुमार आणि दिनेश कृष्णन यांच्या कॅमेऱ्यातून दिसणारं केरळ, प्रत्येक फ्रेममध्ये आपलं वेगळेपण दाखवणाऱ्या कलरपॅलेट्स एक उत्कृष्ट ‘व्हिज्युअल ट्रीट’ काय असते याचं उत्तम उदाहरण आहेत. मोहम्मद जिब्रान यांचं संगीत दिग्दर्शन कमाल आहे. सिद श्रीराम, पद्मलता, यझीन निजार, सना मोईदुट्टी, बेनी दयाल, अनंत, श्रीशा विजयशेखर आणि दीप्ती सुरेश या गायक-गायिकांनी स्वरबद्ध केलेली ‘यार अळीपधी’, ‘तिरानदी’, ‘ओरू अरई उनादु’, ‘ओ अळगे’, ‘कातीरुंदेन’, ‘उन्नई थाने’ ही गाणी एक सुंदर श्रवणीय अनुभव प्रेक्षकांना देण्यात यशस्वी ठरली आहेत.
अनिर्बंध अश्लीलता आणि हिंसाचार दर्शवणाऱ्या वेबसिरिजेस, टीव्हीवरच्या रटाळ मालिका आणि लॉजिक हरवलेले अॅक्शन सिनेमे पाहून कंटाळला असाल, तर १००% प्रेक्षणीय आणि तितकाच श्रवणीय असा नितांतसुंदर अनुभव घेण्यासाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध असलेला हा चित्रपट नक्कीच बघू शकता.