‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
रुपेरी पडद्यावरील आखाड सासू…. ललिता पवार!
जिचं नांव घेतलं की प्रथम आठवतात त्या तिच्या रुपेरी पडद्यावर तिने केलेल्या सासुरवासाच्या कथा… ती ललिता पवार…इहलोक सोडून तिला अनेक वर्षापेक्षा जास्त काळ झालेला असला तरी आजही ती मराठी सिनेसृष्टीला वंद्य आहे. सिनेमात काम करण्याचे सोडून तर तिला जमाना झालाय..तरीही जिच्या कर्तृत्ववर्णनाशिवाय मराठी सिनेमाचा इतिहासच अपूरा राहिल अशा या मूक सिनेमाच्या काळापासून मराठी – हिंदी सिनेमाचा पडदा जागता ठेवणा-या ज्येष्ठ चरित्र अभिनेत्री श्रीमती ललिताजी पवार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तिच्या कारकिर्दीचा नव्या पिढीला करून दिलेला हा एक छोटासा कवडसा.
मराठी सिनेमात आजपावेतो अनेक अभिनेत्र्यांनी आपआपल्या परीने सासू रंगवण्याचा अन ती लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला पण सासू रंगवावी तर ललिता पवारनेच (Lalita Pawar) असेच शेवटी सार निघते. त्यांच्या अभिनयाची सर कोणालाच येणार नाही हेही तितकेच खरे. ललिता पवार यांनी रंगविलेल्या सासूने जसे मराठी सिनेमात अन मराठी सिनेचाहत्यांच्या हृदयात अजरामर ध्रुवाचे स्थान निर्माण केले आहे तसे कोणीही नाही. त्यांची सासू जशी गाजली तशा त्यांनी केलेल्या चरित्रभूमिकाही अविस्मरणीय ठरल्या आहेत.
अनाडीमधील मिसेस डिसा, आनंद मधील मौसी, श्री ४२० मधील गंगुबाई केळेवाली, रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील मंथरा, गुरुदत्तच्या मिस्टर अँड मिसेस 4५ मधील पुरुषद्देष्टी उच्चभ्रू समाजातील अतिविशाल महिला मंडळाची समाजसेविका सितादेवी काय किंवा प्रोफेसर या शम्मीकपूरच्या गाजलेल्या चित्रपटातील कडक शिस्तीची व तरुणांपासून आपल्या मुलीला दूर ठेवणारी पण म्हाता-या प्रोफेसर (शम्मीकपूर)च्या प्रेमात बुडालेली बुढी घोडी लाल लगाम थाटाची सितादेवी यासारख्या व्यक्तिरेखा आजही रसिक विसरले नाहीत.
हे देखील वाचा: दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटाचे जनक
मूकपटाच्या जमान्यापासून रुपेरी पडदा गाजवणा-या या ज्येष्ठ अभिनेत्रीने आपल्या चतुरस्त्र अभिनयाने रसिकांच्या मनात एक आगळेच स्थान निर्माण केले आहे. निळू फुले चा पुढारी अन ललिताबाईंची सासू ही त्यांची सहज आठवणारी अशी ओळख असली तरी या ज्येष्ठ कलाकारांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत आपल्या कर्तृत्वाने जे चार चांद लावले आहेत ते कायम झगमगतच राहतील यात शंका नाही.
मूकपटात बालकलाकार म्हणून १९२८ च्या सुमारास आपली कारकिर्द सुरु केलेल्या अंबा सगुण या अभिनेत्रीची ही कारकिर्द अनेकांना मार्गदर्शक ठरावी. सुरवातीच्या काळात त्यांनी नायिका म्हणून त्या काळी चांगली लोकप्रियता मिळवली असली तरी ज्या चित्रपटामुळे त्यांना नायिकेचे रोल सोडून चरित्र भूमिकांकडे वळावे लागले त्या चित्रपटाच्या दरम्यान घडलेला किस्साही श्रवणीय व वाचनीयच आहे. १९४४ च्या जंग ए आजादी या मास्टर भगवानच्या (Bhagwan Dada) चित्रपटाच्या सेटवर त्यांचा मास्टर भगवानबरोबर प्रसंग चित्रित होत असताना मास्टर भगवानने या चित्रपटातील प्रसंगानुरुप ललिता पवारच्या यांच्या श्रीमुखात एवढया जोरात हाणली कि त्यामुळे त्यांच्या डोळयाला कायमची दुखापत होऊन ते व्यंग आयुष्यभर बाळगावे लागले तरी त्यावरही सकारात्मक दृष्टीकोन स्विकारुन त्यांनी चरित्रभूमिकांकडे ऐन तारुण्यात मोर्चा वळवला व भावोत्कट प्रसंगी बारीक होणारा त्यांचा तो डोळा त्यांची जणू खासियत बनली.
हे देखील वाचा: भारतीय सिनेमातला पहिला डान्सिंग अॅक्टर….भगवान दादा
१९४४ च्या प्रभात कंपनीच्या रामशास्त्री या चित्रपटातील त्यांची राघोबादादा पेशव्याच्या पत्नी आनंदीबाईची भूमिका दाद घेऊन गेली. घराना गृहस्थी यासारख्या दाक्षिणात्य संस्कृतीतील कौटुंबिक चित्रपटात त्यांनी सासूची भूमिका रंगवली तर याच चित्रपटातील त्यांच्यावरील हनि इराणी व डेझी इराणी यांच्यावर चित्रित “दादीअम्मा दादी अम्मा मान जाओ ” हे गाणे त्याकाळी विलक्षण लोकप्रिय ठरले. रंगीत जमान्यातही त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटकंपन्यांच्या कौटुबिक चित्रपटात खाष्ट सासू रंगवली. खानदान, निलकमल, हम दोनो, कोहरा आदि चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
अनाडी मधील त्यांच्या मिसेस डिसा या चरित्रभूमिकेबददल त्यांना सर्वोत्कृष्ट चरित्रअभिनेत्री (सहाय्यक अभिनेत्री) म्हणून १९५९ मध्ये फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सातशेच्या वर हिंदी- मराठी कामे केलेल्या या अष्टपैलू अभिनेत्रीचा अंत मात्र अत्यंत दुःखद झाला. पुण्यात औंध परिसरात वास्तव्यास असण-या ललिता बाई वयाच्या ८८व्या वर्षी एकाकी अवस्थेत त्यांच्या सदनिकेत २४ फेब्रुवारी १९९८ ला निधन पावल्या. त्या एकटयाच रहात असल्याने त्या निधन पावल्या हे जगास कळण्यास दोन दिवस लागले.
लेखक – दिलीप कुकडे