मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
‘पब्लिकचा दिग्दर्शक’… मनमोहन देसाई!
मनमोहन देसाई अर्थात मनजी हे आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी टाॅप टेन दिग्दर्शकांतील एक आहेत, असे अगदी सुरुवातीलाच मी म्हटल्याचा अनेकांना धक्का बसला असेल. यावर अधिक बायपास ऑपरेशन न करता इतकेच सांगतो की, त्यांचे दोन तीन चित्रपट वगळता सगळेच पिक्चर सुपर हिट ठरले. ते का बरे ठरले यावर सत्तरच्या दशकात काहींनी अक्षक काथ्याकूट केली, पण म्हणून फिल्म चे दीवाने मनजींचा चित्रपट पुन्हा पाहणार नाही असे म्हणाले नाहीत.
मनजींना पब्लिकची नाडी गवसली होती म्हणा अथवा आपल्या अतर्क्य/अनाकलनीय गोष्टींवर त्यांचा जरा जास्तच विश्वास होता म्हणा… पण तीच त्यांची नाणी खणखणीतपणे यशस्वी ठरली. आणि यशासारखे दुसरे काहीही महत्वाचे नसते म्हटल्यावर तर मनजी जास्त कौतुकाचे वाटतात. पण त्यांच्या आयुष्याचा शेवटही तसाच आश्चर्यकारक व्हावा?
आजही मला आठवतेय, एक मार्च १९९४ रोजी दुपारनंतर पीटीआयने फ्लॅश दिला, मनमोहन देसाईंचे (Manmohan Desai) निधन… माझ्यासाठी ही बातमी कमालीची धक्कादायक होती. त्यांनी खेतवाडीतील आपल्या प्रताप निवासच्या गच्चीतून उडी मारून जीवन संपवले अशी तेव्हा बातमी आली. आजही तेच म्हटले जाते. पण घटनेबाबत उलटसुलट प्रवाद आहेत.
ते त्या सुमारास अभिनेत्री नंदासोबत विवाह करण्यासाठी विशेष उत्सुक होते. त्यानुसार त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या होत्या. (मनजींच्या पहिल्या पत्नीचे म्हणजे जीवनप्रभा देसाई यांचे सत्तरच्या दशकात निधन झाले) आणि १ मार्च रोजी ते नंदाच्या भेटीसाठीच निघाले असता, गच्चीतून आपल्या ड्रायव्हरला गाडी काढण्याची सूचना करीत असतानाच तोल जाऊन खाली पडले.
आपल्या आयुष्याचा भरभरून आनंद घेत इतरांना आपल्या चित्रपटातून मनसोक्त मनोरंजन देणारे ‘फन’मोहन देसाई आत्महत्या करतील यावर माझ्यासारखे त्यांचे निस्सीम चाहते विश्वास ठेवणार नाहीत. राज कपूर आणि नूतनची भूमिका असलेला ‘छलिया’ (१९६०) ते अमिताभ बच्चन, जयाप्रदा, मिथुन चक्रवर्ती यांचा ‘गंगा जमुना सरस्वती’ (१९८८) असा मनजींचा दिग्दर्शनीय प्रवास.
गिरगावातच ते अखेरपर्यंत राहताना मराठी उत्तम बोलत आणि प्रचंड क्रिकेट वेडे असल्याने शूटिंग नसलेल्या रविवारी ते लॅमिंग्टन रोडवरील गिल्डन लेन मैदानावर टेनिस चेंडूवर मनसोक्त क्रिकेट खेळत. आजही या मैदानाबाहेर जी. टी. क्रिकेट क्लब हा फलक कायम असून त्यावरचे मनमोहन देसाई हे नाव लक्ष वेधून घेते.
मनजी अतिशय फटकळ आणि स्पष्टवक्ते त्यामुळे त्यांची मुलाखत म्हणजे भरपूर मटेरियल… असा माझा नेहमीचा अनुभव. १९९१ साली ‘अनिष’ या दिवाळी अंकासाठी त्यांची अमिताभ बच्चनविषयी घेतलेली दिलखुलास मुलाखत माझ्यासाठी यादगार पल ठरला. अमिताभने पाश्चात्य ढंगाच्या व्यक्तिरेखा साकारु नयेत, आपला दूरवर पसरलेल्या प्रेक्षकांना ट्रॅडिशनल व्यक्तिरेखा जास्त आवडतात, अशी अनेक मतं त्यांनी या मुलाखतीत मांडली.
मनजींना आपल्या चित्रपटाच्या मुहूर्ताला आणि मग शूटिंगच्या वेळी सेटवर रिपोर्टींगसाठी सिनेपत्रकरांना आवर्जून बोलावायला आवडे. क्रिकेटच्या मौसमात त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर जायचा योग आलाच तर त्यांनी सेटबाहेर मॅच पाहण्यासाठी दूरचित्रवाणी संचाची व्यवस्था केल्याचे हमखास दिसे. अधेमधे मॅच पाहून त्यांना स्फूर्ती मिळत असावी. सेटवर ते लाईट मूडमध्ये असत. उगाच घाईगडबडीत आणि तणावात ते काम करीत नसत. त्यांचा आवडता स्टुडिओ म्हणजे आर. के. स्टुडिओ, चेंबूर. तेथेच ते जास्त रमत.
मनजींच्या ‘अमर अकबर ॲन्थनी‘ (Amar Akbar Anthony) मधील या तिघांनीही एकाच वेळेस आपल्या आईला (निरुपा राॅय) केलेल्या रक्तदानाचा प्रसंग वैद्यकीयदृष्ट्या कमालीचा हास्यास्पद… समिक्षकांनीही त्याला अतर्क्य/अतिशयोक्तीपूर्ण असे रिमार्क दिले, पण पब्लिकने याच प्रसंगाला भरपूर टाळ्या शिट्ट्या दिल्या आणि येथे दिग्दर्शकाचा विश्वास दिसतो असे म्हणायला हवे. हे तीन भाऊ लहानपणी हरवलेत आणि या प्रसंगात त्यांना आपले एकमेकांशी (अगदी आईशीही) असलेले नाते माहित नाही. पण हा चित्रपट असा काही रंगतो की हे दृश्य हायपाॅईंट ठरते. परंतू आजच्या ग्लोबल युगात मनजींचा हा फंडा रुचला नसता. काही गोष्टी त्या त्या काळानुसार हिट असतात हेच खरे.
हे नक्की वाचा: सिनेमातील ‘या’ गाण्यावर नृत्याभिनय करताना अमिताभ अक्षरश: रडकुंडीला आला….
१९७७ या एकाच वर्षी मनजींच्या परवरीश, धरमवीर, चाचा भतीजा आणि अमर अकबर ॲन्थनी अश्या चारही चित्रपटांनी ज्युबिली हिट केली. एकाच वर्षी एकाच दिग्दर्शकाचे चार चित्रपट आणि चारही भारी हिट हे जगातील एकमेव उदाहरण आहे.
मनजींच्या आठ चित्रपटात काम केलेला अमिताभ,(Amitabh Bachchan) हे देखील दिग्दर्शक आणि हीरो या हिट जोडीचे महत्वाचे उदाहरण. अमर अकबर ॲन्थनी, परवरीश, सुहाग, देशप्रेमी, नसिब, कुली, मर्द, गंगा जमुना सरस्वती यातील देशप्रेमी निर्मितीत रखडल्याने फसला. बाकीचे सगळे सुपर हिट. गंमत म्हणजे, मनजींच्या चित्रपटात भूमिका साकारताना बीग बी कधीच तर्क अथवा शंका उपस्थित करीत नसे, असे किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांच्याच ‘कुली’च्या बंगलोर येथील सेटवर (जुलै १९८२) मारहाण दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवताना बीग बीच्या पोटात टेबलाचा कोपरा लागला आणि तो असा काही आजारी पडला की, संपूर्ण देशभरात अमिताभच्या आजारपणात तो बरा व्हावा म्हणून सर्वधर्मिय प्रार्थना झाल्या.
पण मनजींच्या चित्रपटाला साजेसा असाच हा प्रकार. अमिताभ बरा झाल्यावर मनजीनी पुनीत इस्सारबरोबरच्या त्याच दृश्यापासून शूटिंग सुरु केले. (जानेवारी १९८३) चांदिवली स्टुडिओत त्यासाठी सेट लावला आणि मिडियाला शूटिंग रीपोर्टिंगसाठी बोलावले. तेव्हाचा अमिताभ नेहमीप्रमाणे दमदार वाटला नाही. मग ‘कुली’ रिलीज करताना (२ डिसेंबर १९८३) याच दृश्याच्या वेळी फ्रिझ केला आणि त्यावर ‘याच शूटिंगच्या वेळी अमिताभ आजारी पडला’ असे म्हटले. हे म्हणजे त्या घटनेबाबत सहानुभूती मिळवण्यासारखेच. पण मनजींना ते शोभले. त्यांची तीच तर खासियत होती. ते आम पब्लिकचे हुकमी दिग्दर्शक होते.
सिनेमाची भाषा, दृश्य माध्यम वगैरे तांत्रिक गोष्टीत न अडकता, जनसामान्यांना जे समजेल/रुचेल/आवडेल तेच आपण द्यावे यावरचा त्यांचा फोकस पक्का होता. हे खरेपण हीच त्यांची ताकद. त्यांचे काही चित्रपट घोषणेपुरतेच अथवा काही रिळांच्या शूटिंगनंतर बंद पडलेले… हादेखील त्यांच्या वाटचालीचाच एक भाग. त्यांनी राजेश खन्ना आणि हेमा मालिनी जोडीच्या ‘बाजीराव मस्तानी’ची जोरदार घोषणा केली. अमिताभ व परवीन बाबीच्या ‘सरफरोश’चे काही रिळांचे शूटिंगही केले.
हे वाचलंत का: भारतीय सिनेमातला पहिला डान्सिंग अॅक्टर….भगवान दादा
त्यांच्या दिग्दर्शनीय कारकिर्दीच्या प्रगती पुस्तकात ब्लफमास्टर (मनजी गिरगावकर असल्याने त्यांनी या चित्रपटात ‘गोविंदा आला रे आला’ दाखवले. शम्मी कपूरने गाणे एन्जाॅय केले. मनजीनी गिरगावातील मांगलवाडी, बोरभाट लेन इत्यादी ठिकाणी शूटिंग करत मस्त फिल दिला), राजेश खन्नासोबतचे ‘सच्चा झूठा’ आणि ‘रोटी’ (याच ‘रोटी’च्या क्लायमॅक्सवरुन ते व राजेश खन्नात झालेला वाद गाॅसिप्स मॅगझिननी फारच चघळला.), रामपूर का लक्ष्मण (रणधीर कपूर, रेखा, शत्रुघ्न सिन्हा), आ गले लग जा (शशी कपूर, शर्मिला टागोर, शत्रुघ्न सिन्हा) वगैरे असे अनेक चित्रपट आहेत. पण त्यांची ठळक ओळख म्हणजे बीग बीचे हुकमी दिग्दर्शक.
म्हणूनच तर अमिताभ राजकारणात जाताच (१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अमिताभ इलाहाबाद मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून आला) मनजींनी नाराजी व्यक्त केली आणि दिग्दर्शन संन्यास घेतला. ‘गंगा जमुना सरस्वती’नंतर त्यांनी तो शब्द पाळला. हा चित्रपट फसल्याची चर्चा त्याच्या ट्रायलपासूनच सुरु झाली होती आणि मग मेट्रो थिएटरमध्ये आम्हा समिक्षकांना प्रेक्षकांसोबतच हा चित्रपट दाखवला तेव्हा मध्यंतरामध्ये आवर्जून आम्हाला भेटायला आलेले मनजी काहीसे नरम वाटले हे आजही मला आठवतेय आणि हा चित्रपटही फ्लाॅप झाला.
मनजींची एकूणच गोळाबेरीज जमेची आणि माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील ते एक हे मी कायमच सांगतो. ‘पब्लिकचा दिग्दर्शक’ त्याच गर्दीकडून नाकारला गेला हा त्यांच्या यशस्वी करियरचा ॲन्टी क्लायमॅक्सच! आणि त्यांच्या आयुष्याचा शेवटही अगदी असाच पटकथेत नसणारा. पण दुर्दैवाने घडलेला… मनजी म्हणजे बरेच काही. हा तर केवळ ट्रेलर.