‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
चित्रपट एक… भाषा अनेक …
चित्रपटाचे डबिंग, बहुभाषिक निर्मिती, सबटायटल्स आणि रिमेक यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, असे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याची शक्यता असते. चित्रपट माध्यम व व्यवसायातील हा एक वेगळा, माहितीपूर्ण आणि रंजक गोष्टींचा खजिना असलेला विषय आहे. सध्या यातील बहुभाषिक चित्रपट निर्मितीचा ट्रेण्ड वेगाने सेट होतोय असे दिसते. दोन ठळक उदाहरणे देतो,
भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडमधील लाॅर्डसच्या मैदानावर बलाढ्य अशा वेस्ट इंडिज संघाचा पराभव करुन पहिल्यांदा विश्वचषक जिंकला, त्यावर आधारित कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा चित्रपट एकाच वेळेस हिंदी तसेच कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम अशा एकूण पाच भाषेत प्रदर्शित होईल. आता कोणी असेही म्हणेल की, संपूर्ण देशभरात क्रिकेटचे लय भारी वेड आहे आणि कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला हे ‘सिनेमाच्या भव्य पडद्यावर’ पाहायला देशविदेशातील सर्वच भाषांतील क्रिकेट शौकिनांना नक्कीच आवडेल. त्यामुळे हा चित्रपट मराठी, गुजराती, बंगाली, छत्तीसगढी, कोंकणी इत्यादी अनेक भाषेतही असायला हवा. अर्थात, ही क्रिकेटवरच्या प्रेमातून व्यक्त झालेली अपेक्षा आहे.
असाच आणखी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा देखील एकाच वेळेस हिंदी तसेच कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम अशा एकूण पाच भाषेत निर्माण होत आहे. या चित्रपटाची भव्यता पाहता इतक्या मोठ्या प्रमाणावर हा चित्रपट निर्माण होत असल्याचे आश्चर्य नाही. तर श्रिया पिळगावकरची भूमिका असलेला “हाथी मेरे साथी” (Haathi Mere Saathi) हा त्रिभाषिक चित्रपट आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा तीन भाषेत तो आहे. तसं पाहिलं तर एकाच वेळेस दोन अथवा त्याहीपेक्षा जास्त भाषेत चित्रपट निर्मिती होणे हे अजिबात नवीन नाही. बदलत्या काळानुसार त्यामागची कारणे मात्र बदलत गेली.
एक छोटासा फ्लॅशबॅक…..
चित्रपती व्ही शांताराम (V. Shantaram) यांनी चाळीसच्या दशकातच एकाच वेळेस मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत चित्रपट निर्मिती केली. त्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, आपल्या चित्रपटातील सामाजिक आशय अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचावा. हे चित्रपट होते, १९३७ सालचा ‘कुंकू’ (हिंदीत ‘दुनिया न माने), १९३९ सालचा ‘माणूस’ (हिंदीत ‘आदमी’), १९४१ सालचा ‘शेजारी’ (हिंदीत ‘पडोसी’). यातील ‘शेजारी’ या चित्रपटाबाबत काही गोष्टी आवर्जून सांगायला हव्यात. व्ही. शांताराम यांना ही कथा सुचली होती प्रभातच्या पाच भागिदारांपैकी दामले आणि फत्तेलाल यांच्या मैत्रीतून. दामले हिंदू होते तर फत्तेलाल मुसलमान. पण त्या दोघांत जिवाभावाची मैत्री होती. आणि ही मैत्रीच या कथेचा जीव होता. असे विषय जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहचवण्याचा एक मार्ग म्हणजे असे चित्रपट एकाच वेळेस दोन भाषेत निर्माण करणे हा होता.
त्यानंतरच्या काळातही एकाच वेळेस हिंदी तसेच मराठी अशा दोन्ही भाषेत चित्रपट निर्मितीची उदाहरणे अधूनमधून घडली. अशोक गायकवाड दिग्दर्शित ‘उपकार दुधाचे’ हा चित्रपट हिंदीत ‘दूध का कर्ज’ या नावाने होता. (जॅकी श्राॅफ, वर्षा उसगावकर, नीलम, सदाशिव अमरापूरकर, अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, अनंत जोग, गुलशन ग्रोव्हर, गोगा कपूर इत्यादींच्या भूमिका यात आहेत), महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अस्तित्व’ एकाच वेळेस मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत निर्माण झाला. सचिन खेडेकर, तब्बू, नम्रता शिरोडकर इत्यादींच्या भूमिका यांत आहेत. तर काही चित्रपट हिंदी व बंगाली अशा दोन भाषेत निर्माण झाले. शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अमानुष’ (उत्तमकुमार, शर्मिला टागोर), प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘शत्रू’ (अशोककुमार, राजेश खन्ना, शबाना सिद्दीकी) अशी काही उदाहरणे द्यायला हवीत.
त्या काळात अशा पध्दतीने एकाच वेळेस दोन भाषेत चित्रपट निर्माण करताना एका भाषेतील दृश्याचे शूटिंग झाल्यावर मग दुसरी भाषा विचारात घेतली जाई. यातील एक भाषा हिंदी तर दुसरी भाषा प्रादेशिक असल्याने थोडासा बदल असे. पण कालांतराने एक गोष्ट होऊ लागली. कमल हसन, रजनीकांत, श्रीदेवी हे दक्षिणेकडील स्टार हिंदी चित्रपटातही स्टार झाले आणि त्यांचे काही तमिळ, तेलगू चित्रपट हिंदीत डब होऊन प्रदर्शित होऊ लागले. कमल हसनचे मेयरसाब, अप्पू राजा हे साऊथचे चित्रपट असेच हिंदीत डब झाले. कमल हसनचा अतिशय थाटात रिलीज झालेला ‘हिन्दुस्तानी’ हा तमिळ भाषेत ‘इंडियन’ या नावाने निर्माण झाला. मूळ चित्रपटात मनिषा कोईराला आणि उर्मिला मातोंडकर या बाॅलीवूड अभिनेत्री असल्याने हा चित्रपट हिंदी म्हणून ओळखला जाणे सोपे झाले. आणि मूळ चालीतील गाणी हिंदीत वेगळी वाटली आणि हिटही झाली.
श्रीदेवीचा (Sridevi) एक तमिळ चित्रपट ‘जवानी की कहानी’ या नावाने हिंदीत रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटांचे त्यावेळी चक्क प्रेस शोदेखिल झाले. तर ‘चेन्मीन लहरे’ हा महत्वाचे पारितोषिक प्राप्त, मूळ मल्याळम भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन प्रदर्शित झाल्याने पाहता आला. हा चित्रपट अगदी वेगळ्या थीमवरचा असल्याने तो दक्षिण मुंबईतील रिगल थिएटरमध्ये आवर्जून रिलीज करण्यात आला. तर मणि रत्नम दिग्दर्शित ‘रोजा’ (तमिळ) हिंदीत डब होऊन प्रदर्शित झाल्याने एक चांगला चित्रपट आणि ए. आर. रहमानचे श्रवणीय संगीत अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचले. काळ जस जसा पुढे सरकला तसा यातही बदल होत गेला. कमल हसन (विश्वरुपम) आणि रजनीकांतचे (0.2) काही तेलगू अथवा तमिळ चित्रपट आता मूळ एक भाषा आणि मग त्याचे हिंदी आणि दक्षिणेकडील अन्य प्रादेशिक भाषेत डबिंग करायचे आणि असे पाच भाषेतील चित्रपट एकाच वेळेस जगभरात रिलीज होऊ लागले.
ही व्यावसायिक प्रगती कशी आणि का होऊ शकली?
एका भाषेतील चित्रपट इतर भाषेत डब केल्यावर पूर्वी त्याच्या वेगळ्या प्रिंट काढाव्या लागत. आपला चित्रपट शहरापासून खेड्यापाड्यात दूरवर प्रदर्शित होत असल्याने या प्रिंट सतत कुठे ना कुठे प्रदर्शित झालेल्या असत. पण नवीन शतकात सॅटेलाइट पध्दतीने चित्रपट रिलीज होऊ लागल्याने प्रिंटचा खर्च वाचला आणि आता अधिकाधिक ठिकाणी एकाच वेळेस चित्रपट प्रदर्शित करता येऊ लागला. ग्लोबल युगातील ही एक उत्तम प्रगती झाली. यात मग नाना पाटेकर, रजनीकांत, अंजली पाटील यांच्या भूमिका असलेला “काला”सारखा बाॅलीवूड आणि साऊथचा सिनेमा असा दोन्हीकडे सूट होईल असाही एक चित्रपट आला. हाही चित्रपट पाच भाषेत आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “ठाकरे” (Thackeray) हा चित्रपट एकाच वेळेस हिंदी आणि मराठीत निर्माण करताना बाळासाहेबांचे कर्तृत्व आणि शिवसेनेची जडणघडण अन्यभाषिक प्रेक्षकांपर्यंतही पोहचावी असा विचार केला. दिग्दर्शक अभिजित पानसेने मराठी बाणा स्पष्ट करताना मराठी आवृत्तीत आणखीन काही आवश्यक प्रसंग दाखवले.
बहुभाषिकता येताना भाषांतरकार आणि डबिंग आर्टिस्ट यांच्या कामात वाढ झाली. एक प्रकारे रोजगारच वाढला असे म्हणा ना! पडद्यावरच्या सिनेमाच्या मागच्या गोष्टी या अशा चौफेर आहेत. रजनीकांतचे मुंबईतील जबरा फॅन्स तर त्याच्या तमिळ चित्रपटासाठी सायन अथवा वडाळ्याच्या मल्टीप्लेक्समध्ये भल्या पहाटे वाजत, गाजत, नाचत त्याच्या चित्रपटाचे जंगी स्वागत करतात, त्याच्या कटआऊटला दूधाची आंघोळ घालतात. हे म्हणजे, रजनीकांतचे चित्रपट एकाच वेळेस पाच भाषेत रिलीज होत असले तरी प्रेक्षकांचा प्रादेशिक भाषेचा अभिमान कायम असतो. तर दक्षिणेकडील अनेक प्रादेशिक चित्रपट हिंदीत डब करुन ते उपग्रह वाहिनीवर प्रक्षेपित होत असल्याचेही प्रमाण वाढले आहे याची आपणास कल्पना असेलच. याच्या वाढत्या प्रमाणामुळे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात मोठ्या प्रमाणावर तेलगू अथवा तमिळ चित्रपटाची हिंदीत रिमेक होत असे. (अनेक चित्रपटात जितेंद्रच हीरो असे आणि या ‘रिमेक फॅक्टरी’नुसार त्याने काही वर्षे चक्क हैद्राबादलाच मुक्काम केला. त्याची भूमिका असलेल्या ‘उधार की जिंदगी’ या चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टीगसाठी आम्हा सिनेपत्रकारांना हैद्राबादला नेले होते.)
आता हीच बहुभाषिकता आणखीन व्यापक व्हायचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट रिलीज होणे. कोरोना काळात म्हणजे २०२० मध्ये हा ओटीटी प्लॅटफॉर्म बराच चर्चेत राहिला आणि तेवढाच तो एस्टॅब्लिशही झाला. अमिताभ बच्चनची (Amitabh Bachchan) भूमिका असलेला ‘गुलाबो सिताबो’ या हिंदी चित्रपटाला जगभरातील तब्बल पंधरा भाषा सबटायटल्स होत्या. म्हणजे, युरोपमधील प्रेक्षकांना फ्रेन्च तर कुठे जर्मन भाषेतील सबटायटल्समध्ये पाहायला मिळाला. अरेबिक, इंग्रजी वगैरे वगैरे भाषांचे त्याला सबटायटल्स होते. प्रेक्षकांना सबटायटल्सचा पर्याय उपलब्ध झाला आणि जगभरातील अभारतीय चित्रपट रसिकांच्या पलिकडे हा चित्रपट पोहचू शकला.
म्हणजे आता, आपल्या चित्रपटाला जगभरातील अनेक भाषांचा सबटायटल्सचा पर्याय उपलब्ध आहे तर त्याच वेळी भारतीय भाषेतील डबिंगची प्रक्रिया वाढत जाईल हे निश्चित. महत्वाचे म्हणजे, डिजिटल मिडियामुळे अशा बहुभाषिक चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीला गतीदेखिल आली आहे. बदल ही सर्वाधिक आवश्यक गोष्ट आहे आणि त्यामुळे नवीन कल्पनांना चालना मिळते. चित्रपट हे अनेक प्रकारच्या कला आणि विज्ञान यांची केमिस्ट्री असल्याने तर त्यात बरीच प्रगती होत आहे आणि त्याचे स्वागतही करायला हवे. चित्रपट रसिकांनी या बहुभाषिक ट्रेंडचे स्वागतच केले आहे….