गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
जाणून घ्या नेटफ्लिक्स 2021 स्पेशल वेबसिरीजेसचा मेनू
दोन-तीन तासांत संपणाऱ्या चित्रपटांना कंटाळलेल्या प्रेक्षकांची गरज आणि ‘भूक’ ओळखून ओटीटी प्लॅटफॉर्म्स ‘वेबसिरीज’ नावाचं एक जादुई प्रकरण घेऊन आले आणि बघताबघता प्रेक्षकांवर त्या जादूने गारुडही केलं. सेन्सॉरबोर्डापासून बरेच हात लांब असलेला कंटेंट प्रेक्षकांना या वेबसिरीजेसच्या माध्यमातून अनुभवता आला. स्टारडमच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या अनेक गुणवंत कलाकारांना ह्या वेबसिरीजेसमुळे वाव मिळाला. वेगवेगळे संवेदनशील विषय थेट हाताळणाऱ्या या वेबसिरीजेसना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं.
या मार्चमध्ये, नेटफ्लिक्सने ‘अब मेनू में सब न्यू’ हा हॅशटॅग ट्रेंड करत यावर्षी रिलीज होणाऱ्या सर्व चित्रपटांची आणि वेबसिरीजेसची यादी जाहीर करून प्रेक्षकांना एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांबद्दल तर आपण जाणताच, आता जाणून घेऊयात या वर्षी रिलीज होणाऱ्या वेबसिरीजेसबद्दल..
अरण्यक: (Aranyak) नव्वदीच्या दशकात आपल्या अदाकारीने घायाळ करणारी रविना टंडन ‘अरण्यक’मधून वेबसिरीजच्या दुनियेत पाऊल ठेवतेय. या वेबसिरीजमध्ये ती कस्तुरी डोग्रा या डॅशिंग पोलीस ऑफिसरची भूमिका साकारत असून, तिच्याबरोबर आशुतोष राणा, पराम्ब्रता चॅटर्जी आणि झाकीर हुसेन या अभिनेत्यांनाही पाहता येणार आहे. विनय वैकुल दिग्दर्शित या सिरीजचं कथानक हिमालयाच्या जंगलातील शोधमोहिमेवर आधारित आहे.
बॉम्बे बेगम्स: (Bombay Begums) मुंबईतील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या पाच स्त्रियांची ही कहाणी. या सिरीजमध्ये पूजा भट, अमृता सुभाष, शहाना गोस्वामी, आध्या आनंद आणि प्लबिता बोरठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असून, राहुल बोस, मनिष चौधरी, दानिश हुसेन, सिया महाजन, संघमित्रा हितैशी इत्यादी कलाकार सहाय्यक भूमिकांमध्ये दिसणार आहेत. उण्यापुऱ्या सहा एपिसोड्सची ही मालिका अलंकृता श्रीवास्तव हिने दिग्दर्शित केलेली आहे.
डीकपल्ड: (Decoupled) ‘ब्रीद’ नंतर आर. माधवनची ही दुसरी वेबसिरीज असून, ‘सॅक्रेड गेम्स’मधील जोजो अर्थात सुरवीन चावलाचा हा दुसरा नेटफ्लिक्स प्रोजेक्ट आहे. या दोघांसोबतच श्रेष्ठा मुखर्जी ही अभिनेत्रीही ‘दिल्ली क्राईम’नंतर या सिरीजमार्फत पुनरागमन करताना दिसत आहे. एका घटस्फोटीत जोडप्याची कथा विनोदी ढंगात सांगणारी ही सिरीज हार्दिक मेहता यांनी दिग्दर्शित केली आहे.
नवरसा: (Navarasa) तमिळ सिनेसृष्टीच्या आघाडीच्या नऊ दिग्दर्शकांच्या मानवी जीवनातील भावभावना दाखवणाऱ्या नवरसांवर आधारित कथा आगामी ‘नवरसा’च्या नऊ एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सूर्या, विजय सेतुपती, सिद्धार्थ, योगी बाबू, श्रीराम, गौतम कार्तिक, विक्रांत, बॉबी सिम्हा आणि अरविंद स्वामी ह्या तमिळ अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेली ‘नवरसा’ रतींद्रन आर. प्रसाद, अरविंद स्वामी, बिजॉय नांबियार, के. व्ही. आनंद, कार्तिक सुब्बाराज, कार्तिक नरेन, पोन्ड्राम, हालीता शमीम आणि गौतम मेनन यांनी दिग्दर्शित केलेली आहे.
फील्स लाईक इश्क: (Feels Like Ishq) राधिका मदन, रोहित सराफ, अमोल पराशर सारख्या नवख्या कलाकारांचा भरणा असलेली ही सिरीज मैत्री, प्रेम आणि इतर नातेसंबंधातील दुवे उलगडते. सचिन कुंडलकर, रुचिर अरुण, आशिमा चिब्बर, ताहिरा कश्यप खुराना, आनंद तिवारी, जयदीप सरकार आणि दानिश अस्लम या सात दिग्दर्शकांनी सात वेगवेगळ्या कथा या सिरीजमध्ये मांडलेल्या आहेत.
फाईंडिंग अनामिका: (Finding Anamika) करिष्मा कोहली आणि बिजॉय नांबियार दिग्दर्शित या वेबसिरीजमधून बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित वेबसिरीजच्या दुनियेत पदार्पण करत आहे. माधुरीसोबतच संजय कपूर, सुहासिनी मुळे, मानव कौल, लक्ष्वीर सरन हे कलाकारही या वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या सिरीजमध्ये माधुरीने एका अभिनेत्रीची भूमिका साकारली असून, तिच्या अचानक गायब होण्याने निर्माण झालेल्या गोंधळाभोवती या सिरीजचे कथानक फिरते.
रे: (Ray) सत्यजित रे यांना आदरांजली म्हणून या अँथॉलजी सिरीजची निर्मिती करण्यात आलेली आहे. मनोज वाजपेयी, के के मेनन, गजराज राव, रघुबीर यादव, अली फझल, बिदिता बेग, श्वेता बासू प्रसाद, मनोज पाहवा, चंदन रॉय सन्याल, आकांक्षा रंजन कपूर आणि हर्षवर्धन कपूर अशी तगडी स्टारकास्ट या सिरीजमध्ये असून, अभिषेक चौबे, वसन बाला आणि श्रीजित मुखर्जी यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलेलं आहे.
माई: (Mai) अंशय लाल आणि अतुल मोंगिया दिग्दर्शित ही वेबसिरीज अनुष्का शर्माच्या क्लीन स्लेट फिल्म्सची प्रस्तुती आहे. एक सत्तेचाळीस वर्षीय गरीब, भित्र्या स्वभावाची आई गुन्हेगारी आणि राजकारणाने बरबटलेल्या समाजव्यवस्थेशी कश्या प्रकारे लढा देते, हे या सिरीजमध्ये दाखवलेलं आहे. साक्षी तन्वर, प्रशांत नारायणन, सीमा पाहवा, वमिका गब्बी, विवेक मुश्रन, रायमा देव वर्मा, इत्यादी कलाकारांनी या सिरीजमध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले आहे.
ये काली काली आँखे: (Yeh Kaali Kaali Ankhein) एक खुनशी राजकारणी, त्याची हट्टी मुलगी आणि तिचा साधाभोळा प्रियकर ही ऐंशी-नव्वदीच्या दशकांतील साधारण अॅक्शन फिल्म्सची कथा दिग्दर्शक सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी नव्या स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. श्वेता त्रिपाठी, सौरभ शुक्ला, ताहीर राज भसीन, आंचल सिंग, ब्रिजेंद्र काला, अरुणोदय सिंग, अनंत जोशी, सूर्या शर्मा अशी भरभक्कम स्टारकास्ट प्रेक्षकांना या सिरीजमध्ये पाहता येणार आहे.
याचसोबत, नेटफ्लिक्सने काही जुन्या आणि गाजलेल्या सिरीजेसच्या नव्या सिझनचीही घोषणा केलेली असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये युट्यूबवर प्रचंड गाजलेल्या बहुप्रतिक्षित ‘कोटा फॅक्टरी’च्या दुसऱ्या सिझनचाही समावेश आहे. तसेच, आदिती पोहनकर अभिनित ‘शी’, राजेश म्हापुसकर आणि तनुज चोप्रा दिग्दर्शित ‘दिल्ली क्राईम’, संध्या मेनन यांच्या ‘व्हेन डिंपल मिट रिषी’ या कादंबरीवर आधारित ‘मिस्मॅच्ड’, मसाबा गुप्ता यांच्या जीवनावर आधारित ‘मसाबा मसाबा’ आणि सौमेंद्र पाधी दिग्दर्शित ‘जमतारा – सबका नंबर आयेगा’ या सिरीजेसचाही दुसरा सिझन याच वर्षी रिलीज होणार असल्याचे नेटफ्लिक्सने जाहीर केले आहे. मिथिला पालकर आणि ध्रुव सेहगल या जोडगोळीच्या ‘लिट्ल थिंग्ज’चाही चौथा सीझन याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नेटफ्लिक्सच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट अर्थात ‘सॅक्रेड गेम्स’च्या पुढील सिझनबद्दल अद्यापि कसलीही बातमी आलेली नाही.